Friday, March 19, 2010

बेमर

परवाच्याला बगा आमच्या गाडीचं काय डागडुजीचं काम निगालं. आमचं ह्ये म्हटलं त्या कुनकडच्या ठेसनात येतो टाकुन गाडी. म्या म्हटलं यावा. ते ठेसनावालं लई बेस. त्येंनी बदली गाडी दिली ना. आता पयली गाडी इकली. तवा बदली गाडी लागती आमाला. त्याचं असं झालं, यक वरसामागं (असं मागं नगा बगु...मागं म्हणजे मागल्या वरसात) बारक्या झालत्या. आता येवड्या तेवड्या जीवाला दुसर्‍याच्या दारात सोडुन कामाला जायाचं मला काई बरं वाटना. म्हुन मी बशीले घरीच. आमचं ह्ये म्हटलं, माह्यीवाली काडुन टाकु. म्या म्हटलं टाका. तसंबी त्ये दोन शिटाचं गाडी, त्ये काय खेळगाडी म्हणं (खेळगाडी म्हण्जे खेळाची नव्हं..तशी मोप हायेत बारक्याकडं....ह्ये लई लांब लांब रेशीमधं लागतं म्हणं असलं गाडी). आता तीन जणाला कशी काय पुर्नार ? लई जीव खाली वर झाला बगा. लई चालिवलं त्ये गाडी. असा बुंग बुंग करत चालयचं का काई इचारु नगा. दिली आपल्या वळखितच येक जणाला. त्येची गाठभेट झाली का त्ये दोन शिटाचं गाडी भी भेटतं. आन माझ्याकडं बघुन खुदु खुदु हसतया बगा. आन मी बी त्याच्याकडं बघुन दात काढतिया. लई माया हाये माझी त्येच्यावर.


कायच्या बाय बोलत बसु नगा व्हं. म्या सांगत व्हते ना त्ये बदली गाडी दिलं. आमचं ह्ये म्हटलं तुला समदी शेट करुन देतो. म्या म्हटलं द्यावा. त्ये काय शेटिंग करुन गेलं हापिसात. मग म्या बारक्याचं कालवण, कोरड्यास बांधुन बिंधुन त्याला बखोटीला मारलं अन निघाले आन बगते तर काय.....काय गाडी ह्ये का काय ह्ये....लई भारी भो.....नवं कोरं बेमर दाराफुडं उभी ना.

 म्या बारक्याला घाई घाई त्येच्या शीटात टाकलं नी गाडी हाकाया बसले. आन घोळ ध्यानात आला. रोजच्ची चावी न ह्यीची चावी येकदम येगळी ना.....आत्ता काय करावं......तरि पन धिर धरुन तिथल्ल्याच येका भोस्कात घुसवली....घर्रर्र आवाज झाला नी गाडी इश्टार्ट्.....म्या काय खुळी वाटले कि काय....झाली ना चालु.....मंग येकदम झोकामंदी आरशे लावले....मागचे फुडचे समदे लावले...आन मागं जायाचा ग्यार टाकला....आता गाडी मागं घ्यावासाठी आक्शिटलेवर पाय दिला आन पुना घोटाळा....गाडी फुडं जाया लागली ना.....आत्ता काय करावं.....गाडी बगली वाट्टं....न्हाई म्हणाया ह्ये असं लई बगलेली धेंडं बघितल्याती मी....माह्यावालं काम त्ये कांपुटटर मधीच तर हाये.....मंग म्या म्हटंल जवा गाडी मागं जाया पायजे तवा त्ये फुडं जाताया तर मंग्... हितं बगा डोस्कं लागतया....तर मंग जवा ती फुडं जाया पायजे तवा नक्की मागं जाणार....म्हुन मी त्ये फुडं जायाचा ग्यार टाकला...तर्री गाडी फुडंच ना...आत्ता काय करावा....येकदम माज्या डोस्क्यामधी प्रकाश पडला....कुणीतरी खुळा आणुन लावला त्ये शिश्टम लिवाया नी ह्ये घोटाळा झाला....त्येनं नक्कि फुड जायाचं लाइनी आन मागं जायाचं लाइनी येकच लिवलं...म्हुन गाडी बी असं खुळ्यागत कराया लागली. आता काय करावं तरी काय मानसानं ?

 आमच्या ह्येना फुन लावला. पहिल्या रिंगात उचलला ना. नायतर आमचं ह्ये लई बिजी. त्येच हापिस लई मोटं बघा. कुनच्या तरी कार्डाच्या सुश मधी ह्ये काम करत्याती. अख्खा दिस ह्ये मीटिंग न त्ये मीटिंग. सारी गडी माणसं मिळुनशानी नुस्त्या मीटिंगा करत्यात आन मग काम कधी करत्यात कुणास ठावं. आन आमचं ह्ये, मीटिंगात नाय गावलं तर त्येच्या सायबांसोबत गावत्याती. आन मग त्येच्याम्होरं माज्याशी विंग्रजीत काय बोलत्यात, मला ते हानी काय म्हणत्यात. एव्ह्ढं हुश्शार आमचं ह्ये पण आसं खुळ्यागत हुन जातं बगा हापिसात गेल्यावर. न्हायी मी काय म्हटलं...आपलं रानी म्हटलं तर येक वेळ खपुन घीन पण त्ये हानी म्हन्जे कसं अंगाला मुंगळं चिगटल्यागत वाट्टं बगा.

 त्यो सायब बी येक पंटरच हाये. आठेक दिसा मागं त्यो आन मंडली जेवाया आल्ती. म्या झ्याक कालवण आन मिरचीचा ठेसा केल्ता. शान्यासुर्त्या मानासावानी खाल्ला-पिल्ला, लई वेला कवतीक केलं. आन जायच्या वग्ताला म्हनतुया, "हाग". आत्ता बया...न्हायी कालवण वाईच तिखाट झाल्तं पन म्हनुनशान बायामानसा देखत ह्ये असा बोल्णं...काय म्हनावं बाई सायबाला. म्या मुंडी खाली घालुन त्येला परसाकडची खोली दावली तर आमचं ह्ये समद्या देखत व्हस्सकनी वरडलं. वरडलं तर वरडलं आन पुना त्येच्या गल्यात पल्डं. माह्या तर बाई राडाया यायला लागलं. मंग त्येचं मंडली माह्या गल्यात पल्डं. बायामानसाची दुक्क बायमानसालाच ठाव.

 अन त्येच्या घरी गेल्तो तवा तर लयी वंगाळ झालं बगा. तुमास्नी म्हनुन सांगते, उगा कुटं बोलु नगा. म्या अन आमचं ह्ये गेल्तो सायबाच्या घरी काय पारटी हुती म्हनं. ह्ये एव्ह्ढी मानसं आल्ती अन समद्याला कितीक येळ निस्तं चनं फुटानं दिलं. कवातरी दुपारच्या येळेला सायबानं चुल लावली. म्या म्हटलं आत्ता बया आता काय बाप्या भाकरी थापणार की काय. पन त्येनं निस्तं बल्गर म्हुन पाव वडा दिलं समद्यास्नी. अन मला इचारतुया, "तिरुपती, कसं काय बरं हाय ना ?" अस्सा राग आल्ता. माज्या बानं येवडं झ्याक नाव ठिवलया माजं, तरुप्ती अन ह्ये मला म्हनतया तिरुपती. बालाजी कुनकडचं !!! अन निगायच्या येळेला पुना मगच्या येळेसारखं ना.."हाग". म्या म्हटलं कारं बाबा हाय की येव्हडं वावर तुज्याच मालकीचं...जा की मग कुटं जायाचं ते...पन न्हायी बायामानसासमोर ह्ये असं वंगाळ बोलायची लयी खोड. अन आमचं ह्ये बी लगी त्येच्या गल्यात पल्डं. आवो त्येला परसाकडं जायचं अन तुमी कुटं त्येच्या गल्यात पल्डतया. आन म्या ह्ये समदं इचार करत्ये तवर्...बया बया कसं सांगु तुमाला...लयी लयी वंगाळ्....त्ये सायब माज्या गल्यात पल्डं ना...समद्या देकत्...आमचं ह्ये, त्येचं मंडली, समदी हापिसातली मानसं बगत्यात ना....आता त्येचं लगीन झालेलं, माझं लगीन झालेलं अन तरी मनसानं असं वागावं का...ह्ये असलं पापी मानसापायी जगबुडी यायची र्‍हायील का तुमी सांगा ?

 कायच्या बाय बोलत बसु नगा व्हं. म्या सांगत व्हते ना ह्येना फुन लावलं. लावल्या लावल्या उचललं आन "काय ग" म्हणालं. काय डोस्क ठीकाणावर होतं वाट्ट. अवं हसता काय फिदी फिदी. मला त्येच म्हणायचं व्ह्तं, आमचं ह्ये डेस्काच्या ठीकाणावर व्हतं. त्येंना ह्यो घोटाळा सम्जुन सांगितला. तवा त्येनी समदी शिश्टम आगदी झकाsssस एकचप्लेन केली. म्हटलं न्हायी आमचं ह्ये लई हुश्शार.

 तर आता आसं बगा आदी बरेक लावायचा...साधा सुधा न्हायी चांगला कचाक्कनी लावयाचा...मंग चावी त्या भोस्कात पुशायची.....आवो पुशाची म्हन्जी फरशी पुसल्यावानी नव्हं....आत्ता काय करावं बया....त्ये चावी आन त्ये गाडी लई चकापक हायती, त्येला पुशायची जरुर न्हायी... हितं पुशायची म्हन्जी घुसवायची....मंग्....अम्म्म्म्....विसरले की बया...हा....तर चावी पुशायची आन मंग मोट्टं ढवळं बटान पुशायचं....तेव्हढं झालं की जिकडं जायच तिकल्ला ग्यार टाकायचा.....हाय काय आन नाय काय.....आन मंग फुडं काय इचारताय्....निस्तं बुंग बुंग बुंSSSSSSग !!!!

Thursday, March 18, 2010

पुस्तकांची यादी


ही माझ्याकडील पुस्तकांची यादी. ह्यातली जवळ जवळ सगळीच पुस्तकं आवडती आहेत, (माझ्या मते) वाचनीय आहेत.

~ ललित ~
भावगंध : पु.ल.देशपांडे
मैत्र : पु ल देशपांडे
माणदेशी माणसं : व्यंकटेश माडगू़ळकर
रविंद्रनाथ तीन व्याख्याने : पु ल देशपांडे
गाये चला जा : शिरिष कणेकर
विंचुर्णीचे धडे : गौरी देशपांडे
भोवरा : इरावती कर्वे
गंगाजळ : इरावती कर्वे
व्यक्ती आणि वल्ली : पु ल देशपांडे
वाइज अँड आदरवाइज : सुधा मुर्ती
मृदगंध : इंदिरा संत
अंतरंग : नीना कुलकर्णी
महर्षी ते गौरी- स्त्री स्वातंत्र्याची वाटचाल : मंगला गोडबोले
माणसे अरभाट आणि चिल्लर : जी ए कुलकर्णी
परिपूर्ती : इरावती कर्वे
पांढर्‍यावर काळे : व्यंकटेश माडगुळकर
बापलेकी : पद्मजा फाटक (संकलक)
गौरी मनातली : मेधा राजहंस (संकलक)
सुजनहो : पु ल देश्पांडे
चांदण्याचा रस्ता : प्रकाश नारायण संत
आणि मी : विजय तेंडूलकर
भिन्न : कविता महाजन
ऋतुचक्र : दुर्गा भागवत
मौनराग : महेश एलकुंचवार
अशी माणसं अशी साहसं : व्यंकटेश माडगूळकर
आजी आजोबांची पत्रे : संकलन- सुरेखा पाणंदीकर
कलात्म ऐल : संकलन
कलात्म पैल : संकलन
एका रानवेड्याची शोधयात्रा : कृष्णमेघ कुंटे
पु.ल. एक साठवण : पु.ल.देशपांडे
धुळपाटी : शान्ता शेळके
सोयरे सकळ : सुनीता देशपांडे
असंही : प्रिया तेंडुलकर
ऐसपैस गप्पा- दुर्गाबाईंशी : प्रतिभा रानडे

~ कथासंग्रह ~
किंबहुना : राजन खान
तिची कथा : गौ दे, प्रि तें, मे पे इ.
खुणेची जागा : मंगला गोडबोले
आहे हे असं आहे : गौरी देशपांडे
व्हायरस : जयंत नारळीकर
वामन परत न आला : जयंत नारळीकर
सर्वोत्कृष्ट मराठी कथा (खंड १) : राम कोलारकर (संकलक)
निळासावळा : जी ए कुलकर्णी
प्रयाण : सानिया
स्यमंतक मण्याचे प्रकरण : भारत सासणे
गोष्टी सार्‍याजणींच्या : कथासंकलन
रंग : कमल देसाई
रंग२ : कमल देसाई
आईची देणगी : गो नि दांडेकर
कल्पांत : प्रमोदिनी वडके-कवळे
लेकुरवाळी : शान्ता ज शेळके
जन्मलेल्या प्रत्येकाला : प्रिया तेंडुलकर
चित्रकथी : व्यंकटेश माडगूळकर

~ कादंबरी ~
माचीवरला बुधा : गो.नी.दांडेकर
अमृतवेल : वि स खांडेकर
अधांतरी : जयवंत दळवी
कर्कोटक : अनंत सामंत
युगांत : इरावती कर्वे
कृष्णकिनारा : अरुणा ढेरे
गोफ : गौरी देशपांडे
दुस्तर हा घाट आणि थांग : गौरी देशपांडे
मुक्काम : गौरी देशपांडे
एकेक पान गळावया : गौरी देशपांडे
प्रेषित : जयंत नारळीकर
निशाणी डावा अंगठा : रमेश इंगळे
बखर बिम्मची : जी ए कुलकर्णी
सावित्री : पु शि रेगे
समुद्र : मिलिंद बोकील
रुमाली रहस्य : गो नि दांडेकर
द्रोहपर्व : अजेय झणकर
अघटित : डॉ बाळ फोंडके

~ प्रवासवर्णन ~
कुण्या एकाची भ्रमणगाथा : गो नि दांडेकर
परदेसाई : विनय देसाई
महाराष्ट्र माझा : उद्धव ठाकरे

~ विनोदी ~
खोगीरभरती : पु ल देशपांडे
अघळपघळ : पु ल देशपांडे
गुगली : दिलीप प्रभावळकर
फडणिस गॅलरी : शि द फडणीस

~ अनुवादित ~
काबुलीवाल्याची बंगाली बायको : सुस्मिता बॅनर्जी (अनुवादः मृणालिनी गडकरी)
पुणे ते पंतप्रधानांचे कार्यालय : बी.जी.देखमुख (अनुवादः अशोक पाध्ये)
डेझर्टर : विजय देवधर
महाश्वेता : सुधा मुर्ती (अनुवादः उमा कुलकर्णी)
एका कोळीयाने : पु ल देशपांडे
चीपर बाय दी डझन
तोत्तोचान
प्रज्वलीत मने : डॉ. ए.पी.जे. कलाम
अकूपार : ध्रुव भट्ट (अनुवादः अंजनी नरवणे)
कमला : कृपाबाई सत्यनादन (अनुवादः रोहिणी तुकदेव)
ब्योमकेश बक्षी : शरदिन्दु बंद्योपाध्याय (अनुवादः अशोक जैन)
एक होते सरोवर :  लॉरा वाइल्डर (अनुवादः भा रा भागवत)
महाभारत खंड १, २ : कमला सुब्रमण्यम (अनुवाद: मंगेश पाडगावकर)
कैफी आणि मी : शौकत कैफी (अनुवादः जयश्री देसाई)
बाइकवरचं बिर्‍हाड : अजित हरिसिंघानी (अनुवादः सुजाता देखमुख)
खेळता खेळता आयुष्य : गिरीश कर्नाड (अनुवादः उमा कुलकर्णी)
देवडी : गुलजार (अनुवादः अंबरीश मिश्र)

~ ऐतिहासिक ~
स्वामी : रणजित देसाई
अंताजीची बखर : नंदा खरे
बखर अंतकाळाची : नंदा खरे
वॉर्सा ते हिरोशिमा : वि.स.वाळिंबे

~ आत्मचरित्र/चरित्र ~
झिम्मा - आठवणींचा गोफ : विजया मेहता
सत्याचे प्रयोग : महात्मा गांधी
आमचा बाप आणि आम्ही : नरेंद्र जाधव
काळेपाणी : वि दा सावरकर
...आणि डॉ. काशीनाथ घाणेकर : चारुशीला ओक
पंचावन कोटींचे बळी : गोपाळ गोडसे
आय डेअर : किरण बेदी
प्रकाशवाटा : डॉ. प्रकाश आमटे
नेगल १/२ : विलास मनोहर
मुसाफिर : अच्युत गोडबोले
अमलताश : सुप्रिया दिक्षित
नर्मदा परिक्रमा- एक अंतर्यात्रा : भारती ठाकूर

~ माहिती विश्लेषण ~
लवासा : निळू दामले
अस्वल : दुर्गा भागवत

~ तत्वज्ञान ~
ताइ ची आणि चतुर साहचर्य : डॉ राजीव शारंगपाणी

~ पाककला ~
पुडिंग्ज व कस्टर्डस : मंगला बर्वे
कॉर्न खासियत लेखिका : उषा पुरोहित
रुचिरा : कमलाबाई ओगले
सूप्स, रोटी आणि पराठे : मंगला बर्वे
पूर्णब्रह्म : लोकसत्ता 

~ गर्भारपण आणि बालसंगोपन ~
गर्भसंस्कार
वंशवेल
मसाज- तंत्र आणि मंत्र
अडगुलं मडगुलं
घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती

~ दिवाळी अंक ~
२००६ : ललित, किस्त्रीम, दीपावली, म. टा., मौज, अक्षर
२००८ : किस्त्रीम
२००९ : श्री दीपलक्ष्मी, मौज, कथाश्री, साप्ताहिक सकाळ
२०१० : अक्षर, माहेर, ललित, दीपावली, मानिनी, कथाश्री, मौज
२०११ : माहेर, चारचौघी, महाराष्ट्र टाइम्स, वहिनी, कालनिर्णय
२०१२ : ललना, सुवासिनी, माहेर
२०१४ : अक्षर, अंतर्नाद, अनुभव, माहेर, मौज, मेनका, ऋतुरंग, साधना, शब्द, पुण्यभूषण

~ इतर ~
श्री तशी सौ मेंदी विशेषांक
कालनिर्णय (२००४ ते २०१५)
माहेर : फेब्रुवारी २०११
तनिष्का : सप्टेंबर २०१३

~ हिंदी ~
प्रेमचंद की सर्वश्रेष्ठ कहानीया : प्रेमचंद
मधुशाला : हरिवंशराय बच्चन
रबिंद्रनाथ ठाकुर की सर्वश्रेष्ठ बाल कहानियां : रविंद्रनाथ टैगोर

Wednesday, March 17, 2010

आंबे पुराण

दर वर्षी प्रमाणे ह्या ही वर्षी आंबा मोसम फारसे आंबे न खाताच गेला. पायरीसारख्या चवीचे मॅरेथॉन २-३ वेळा आणले. त्याचा रस झाला. लंगड्याचा जातभाई शोभेल असा एक प्रकार होल फूड्स मध्ये मिळाला. तो एक चिरून खायचा प्रकार झाला. बस्स बाकी काही नाही. इथे एक जणांकडून हापूस मागवणार होते पण ते राहूनच गेले.

घरी होतो तेव्हा मोसम चालू झाल्यापासून एक एक करून सगळे प्रकार येत. बाजारात मिळणारे हापूस, पायरी, बदाम, केशर, लंगडा, तोतापुरी इ. आणि घरचे अनेक प्रकार. ते तर शेकड्याने येत. संपूर्ण आंबा मोसम अक्षरशः रोज रस असे. हे कितीही खाल्ले, शेजारी-पाजारी, ओळखी-पाळखीच्यांना दिले तरी उरतच. त्याच्याच पोळ्या, वड्या होत. आई रस काढून ऍल्युमिनिअमच्या थाळ्यांमध्ये तूप लावून ओतून देई आणि आम्ही ते थाळे गच्चीवर ठेवून येत असू. धुळ किंवा कचर्‍यापासून संरक्षण म्हणून वर वाळवणाचे प्लॅस्टिकचे आवरण. सकाळी ठेवले की संध्याकाळपर्यंत पोळी तयार. वड्यांना मात्र फार वेळ लागे. आईने वड्या करायला घेतल्यापासून तयार होईपर्यंत अगदी जीव टांगणीला लागे. आधी चांगला २-३ लीटरचे पातेले भरून रस काढायचा. तो चांगला घट्ट गोळा होईपर्यंत आटवायचा. एव्हढा रस आटायला ३-४ तास तरी लागत (असावेत). तो गोळा गार झाल्यावर त्यात पिठीसाखर माळून वड्या थापायच्या. तो नुसता गोळा पण इतका चविष्ट लागतो. गेली कित्येक वर्षे आई न चुकता, न कंटाळता पोळ्या/वड्या करते आहे. आणि आता जमेल तश्या आम्हा सगळ्यांना पाठवते. मागच्याच महिन्यात नवर्‍याच्या मैत्रिणीबरोबर माझ्यासाठी पाठवल्या.

शाळेत असताना आम्ही झाड उतरवायचे असले की जातीने मालुंज्याला जात असू. गड्यांनी कैर्‍या खाली घेतल्या की त्यातल्या शाख (झाडावरच थोडी पिकलेली कैरी) शोधून खाणे हा अतीव आवडता प्रकार. त्यातल्या त्यात आरतीला जरा जास्तच सापडत (तिचे नाक फार तिखट आहे). आता मला तर जाणे जमत नाही पण तिघी बहिणी मात्र घरचे आंबे एक-एक करून उतरायला लागले की चक्कर टाकतात. तरी आम्ही सगळ्या पूर्णवेळ घरी होतो तेव्हा ज्या प्रमाणात आणि वेगात आंबे संपत तेव्हढे आता संपत नाहीत. आई-बाबा रोज सकाळी "फ्रूट आवर" मध्ये एखादा दुसरा चिरून खातात, एखादा दुसरा चोखून खायला चांगला म्हणून तो प्रकार. बाकीच्यांचा बहुतेक करून रस आणि मग वड्या. आणि मग ते आम्ही नाही म्हणून हळहळतात. बाकी तिघी कमीत-कमी बाजारात मिळणारे आणून खाऊ शकतात. आणि आई त्यांना घरचे आंबेही पाठवतेच अधून मधून. राहता राहिले ती मीच.

मग बाबा आपले रोज फोनवर मला "आंबे-वृत्तांत" देतात. साधारण मोहोर यायच्या वेळेपासूनच प्रत्येक फोनवर त्यांची "आंबे-बोलणी" सुरू होतात. आईचं मागून चाललेलं असतं, झालं का तुमचं आंबे-पुराण सुरू? एखाद्या वर्षी सगळ्याच झाडांना खूप चांगला बार येतो. बाबांचा आनंद बघण्यासारखा असतो. मग हमखास गारपीट होते, मोहोर गळून जातो. एखाद्या लहान मुलाचं आवडतं खेळणं हरवावं तसा त्यांचा सुर होतो. ह्या वर्षी असेच झाले. बार खूप चांगला आला होता. पण अवेळी आलेल्या पावसाने बराच गाळून गेला. मग सध्या कुठला आंबा भरपूर मिळतोय (पावसाळ्याच्या सुरुवातीला केशर/बदाम मिळायला सुरुवात होते ना? ). आज एक शेकडा "राम" उतरवला. मग अढी लावली. इथे परत एकदा अढी लावायचे शास्त्र गिरवून होते. मग आज काय सगळे आंबे पिकल्याने कसा घमघमाट सुटलाय घरात. कपड्यांना पण कसा आंब्यांचाच वास येतोय. आणि कधी कधी (उगीचच) "तुझी आईच सगळे आंबे खाते, माझ्या वाटेला काय १-२ आले तर वाट बघतोय". आणि मग पाठीमागून आईचा "मुली काय आज नाही ओळखत आईला" अश्या अर्थाचा हुंकार!!!

इथे मला आंबे फारसे मिळत नाहीत ह्याचे मला जितके वाईट वाटते त्यापेक्षा आई-बाबांनाच जास्त वाटते. गेल्या वर्षी आंबे अमेरिकेला निर्यात होणार अशा बातम्या यायल्या लागल्यावर त्यांना कोण आनंद झाला. अक्षरशः रोज (पूर्वी घर ते  ऑफिस आणि आता पाळणाघर ते ऑफिस असा रोज फोन करते घरी) ते मला काय नवी-जुनी बातमी आली ते सांगत. आम्हीही उत्साहात एक पेटी आणली खरी पण उघडल्यावर फार निराशा झाली. सगळे आंबे अर्धे-मुर्धे कच्चे/सडके निघाले. ह्या वर्षी पुन्हा असे होणार नाही कारण काय प्रक्रिया बदलली की यंदा Reliance निर्यात करणार अशा काही बातम्या आल्या नी बाबांना पुन्हा आशा वाटली की यंदा तरी लेकीला चांगले आंबे मिळतील. 

पण इथे कितीही चांगल्या दर्जाचे आंबे मिळायला लागले तरी सगळ्यांसोबत बसून खाल्लेल्या घरच्या आंब्यांची  लज्जत वेगळीच. लहानपणी सकाळी अकराच्या सुमारास घमेलंभर आंबे अढीतून काढून आम्ही सगळे गोल करून बसायचो. आई, आरती एका पातेल्यात रस काढणार. आम्ही बाकीचे "कुच्चर" नुसते आंबे खाणार.  त्या चीकमिश्रित रसाची चव न्यारीच. त्याची सर अमेरिकेत आयात केलेल्या "दर्जेदार" आंब्यांना कुठे यायला!!!!
.
असो, इथे काही आंब्यांच्या जाती देत आहे, हे सगळे आमच्या शेतावरील आंबे आहेत-
राम- मध्यम आकार, हिरवी जाड साल, रस पिवळसर केशरी. आंबा चांगला झाला असेल तर चव गोड. कोय आंब्याच्या एकूण आकारच्या मानाने बरीच मोठी. दशा खूप.
.
गोटी- नाव सार्थ करणारा गोटीचा आकार. ती एक मोठी गोटी असते ना, अगदी तेव्हढा. हिरवी साल आणि रस एकदम गोड, रंगाने केशरी. कोय लहानीच. ह्याचाच एक प्रकार काळी गोटी. साल काळी बाकी सगळा गोटीसारखा.
.
गाढवमुत्या- चांगला तळहाताएव्हढा मोठा आंबा. हिरवी पातळ साल. रस भरपूर पण अगदी फिकट पिवळा आणि पाण्यासारखा पातळ. नावाचा बोध आता झाला असेल.
.
मारुती- हा आमच्या सगळ्यांचा एकदम आवडता. ह्याची चव, रसाचा रंग अगदी हापुसाशी स्पर्धा करणारा. रस करून किंवा चिरून दोन्ही प्रकारे खाता येतो. साल मात्र जाड हिरवी. मारुतीचे एकच झाड आता शिल्लक आहे. त्यालाही दर वर्षी बार येत नाही आता. यंदा खूप आला होता पण निसर्गाने दगा दिला. असो, हा खाण्याची एक विशेष पद्धत आहे-केळं सोलल्यासारखे सगळी साल सोलून घ्यायची. मग लाडूसारखा आंबा खायचा. ह्याची कोय एकदम चपटी असते (बहुतेक). हापूसही अनेक लोक असा खातात.
.
वनराज- हा पुष्कळ ठिकाणी दिसतो. आमच्या शेतात नाही पण शेजारच्या काकांनी लावला आहे. किलोत एकच बसेल एव्हठा मोठा आंबा. भरपूर गुठळ्या असलेला पिवळसर रस. 
.
सीता आणि भरत- हे मला फारसे आठवत नाहीत. 
.
राजा- हे आमच्या दारातच झाड होते. हा दिसायला "राम" सारखाच. पण रस अगदी हापुसासारखा घट्ट, जर्द केशरी, गोड. दशा अजिबात नाहीत. हे झाड काही वर्षांपूर्वी जळाले.
.
खोबर्‍या- कुंकवाची कोयरी असते तसा आकार. कैरीत आंबटपणा अजिबात नाही. तयार आंबा कसा लागतो माहिती नाही. कारण ह्याची २-३ झाडे नमकी आमच्या सोसायटीतल्या खतरुड लोकांच्या दारात होती. हे लोक मे महिन्याच्या सुट्टीत गावाला गेलेच तर कैर्‍या हाती लागायच्या (आणि कैर्‍यांबरोबर तोंडी लावायला आईची बोलणी). पण बरोबर झाड उतरवायच्या वेळेस यायचेच परत. त्यामुळे ह्याची शाख पण कधी खाल्ली नाही
.
साखर्‍या- नावाप्रमाणे साखरेसारखी गोडी. मध्यम आकार, हिरवी साधारण साल. बाबांच्या भाषेत साखर्‍या थकला आता. ह्या वर्षी चार-दोनच कैर्‍या दिल्या ह्याने.
.
नळ्या- अगदी नळ सोडल्यासारखा भरपूर रस म्हणून नळ्या.
.
कागद्या- कागदासारखी पातळ साल.
.
चरख्या- चरख्यासारखी लांबलचक चांगली ९ इंच कैरी.
.
राघ्या- ह्याच्या कैरीला देठाच्या विरुद्ध बाजूला पोपटासारखी चोच म्हणून राघ्या.
.
ढोल्या- चांगली ढोली, गुबगुबीत कैरी.
.
फुट्या- ही खास लोणच्याची कैरी. लोणच्यासाठी फोडावा लागतो म्हणून फुट्या.

तर असे हे आंबे पुराण. तुम्हालाही अशा काही वेगळ्या (गावठी? ) जाती माहीत असतील तर जरूर ओळख करून द्या.

Tuesday, March 16, 2010

|| श्री गणेशा ||

ब्लॉग विश्वाची मला फारशी माहिती नाही, इथे मी पाट्या टाकत नाही कारण मी  एक खेडवळ बाई आहे असे माझ्या एका मित्राचे स्पष्ट आणि प्रामाणिक मत. बरं  घर शहरात घेतले म्हणावे तर ते पण वाकड(बुद्रुक) मध्ये. म्हणजे माझे खेडवळपण अगदी पक्के. घर तर बदलू शकत नाही मग कमीत कमी ब्लॉग लिहायला सुरुवात करावी असा विचार सुरू होता. विचार करकरून पक्का झाल्यावर एक दिवस खाते काढले. एके दिवशी बसून सजावट केली. अधून मधून ओळखीचे ब्लॉग पालथे घातले. तिथे 'वा वा छान छान' म्हणून आले. अशी बरीच पूर्वतयारी केल्यावर आता एखादे पोस्ट टाकावे असे वाटू लागले. पण लिहायचे काय ? त्याचा विचार करण्यात आणिक दिवस खर्ची झाले. मग आला गुढी पाडवा- साडे तीन पैकी एक मुहूर्त. शुभ  कामासाठी दुसरा मुहूर्त नाही. आता अधिक विचार करण्यात वेळ दडवू नये असा (अ)विचार करून हे एक मुहूर्ताचे पोस्ट लिहून टाकले.
 
गुढी पाडव्याच्या आणि हिंदू नवं वर्षाच्या शुभेच्छा !!! 
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी