Wednesday, November 3, 2010

दसरा दिवाळी, आमच्या घरी : भाग २

दिवाळी



दसरा सरत नाही तो दिवाळीची चाहूल लागते. मध्ये सहामाही परीक्षेचाच काय तो अडसर असतो. आईची घर आवरून घेणे, दिवाळीचे सामान आणून घेणे अशी कामे सुरू होतात. संजूला आता आईचा मदतनीस म्हणून घरी जास्त वेळ थांबावे लागते. आम्हालाही परीक्षा संपल्यावर करायची कामे नेमून मिळतात. त्यात पुस्तकांचे कपाट आवरणे आणि स्वत:ची सायकल सर्विसिंग करून आणणे पहिल्या नंबरावर असतात. अशातच एक दिवस आई बाजारात जाऊन आम्हा सर्वांसाठी  फ्रॉक, सलवार-कमीज असे काय काय शिवायला कापड घेऊन येते. भावासाठी अर्थातच तयार शर्ट/पँट येतात त्यामुळे त्याला नव्या कपड्यांची जरा कमी वाट बघावी लागते. एखादे वर्षी दिवाळीच्या दरम्यान प्रेसच्या अथवा पार्टीच्या कामानिमित्त बाबांचे पुण्या/मुंबईला जाणे झाले तर आम्हाला एक-एक बोनस ड्रेस मिळे. आई अतिशय उत्तम शिवणकाम करते त्यामुळे आम्ही लहान असल्यापासून ते परवा परवा पर्यंत आमचे कपडे ती घरीच शिवायची. आम्ही मोठ्या झाल्यावर अशीच बाही हवी, तसाच पॅटर्न हवा, एम्ब्रॉयडरी हवी अशा मागण्या करत असू. शिवाय दिवाळीच्या तीन दिवसांचे तीन वेगवेगळे पॅटर्न्स हवे असत. आई पण इतके मस्त शिवायची की त्यापुढे इतर मैत्रिणींचे किंवा बाबांनी आमच्यासाठी विकत आणलेले कपडे फिके वाटत. इतके छान कपडे घालण्यासाठी दिवाळीपर्यंत वाट बघावी लागे हा आणखी एक अत्याचार!!!

परीक्षा संपेपर्यंत आईने बाई, सजू ह्यांच्या मदतीने घर आवरून ठेवलेले असे. सगळे डबे, क्रॉकरी घासून पुसून आल्याने स्वयंपाकघर तर विशेष चकचकीत दिसे. बाबांची प्रेसवरील कामावर देखरेख असे. तिथे पण साफसफाई, रंगरंगोटी, सगळी मशीन्स घासून पुसून स्वच्छ करणे, त्यांचे तेल-पाणी करणे अशी कामे सुरू असत. ह्या काळात प्रेसमध्ये जायला फार आवडे. कारण प्रश्नपत्रिकांची कामे आवरल्याने आणि लग्नसराईस अवकाश असल्याने सहसा फक्त दिवाळी भेटकार्डांची कामे सुरू असत. गुळगुळीत कागदांवर मनमोहक रंगात पणत्या, आकाशकंदील, रांगोळ्यांची चित्रे आणि आत दिवाळी शुभेच्छांचा लाघवी मजकूर अशी भेटपत्रे बघायला खूप गंमत वाटे.

... आणि एके दिवशी सकाळी अचानक कॉलनीतल्या बायकांचा भांडणसदृश्य कलकलाट ऐकू येई. तो आवाज दिसर्‍या तिसर्‍या कशाचा नसून दिवाळी फराळाचे जिन्नस करण्यासाठी महाराजाशी चाललेल्या घासाघिशीचा असे. मुख्य अडचण असे महाराजाच्या वेळेची. मग एखादीकडे दिवाळसण वगैरे असेल तर तिला पहिला नंबर मिळे. पण तिच्या दारात महाराजाची भट्टी पेटणार आणि एकामागून एक सगळ्यांचेच जिन्नस तिथेच होणार ह्या अटीवर. सहसा बुंदीचे लाडू, बालूशाही, गाठी प्रकाराची पण तिखट शेव, एखादे वेळेस मक्याचा चिवडा ह्यासारखे प्रकार आई महाराजाकडून करून घेई. बाकी दडप्या पोह्यांचा चिवडा, चकल्या, शेव, शंकरपाळी, लाडवांचे प्रकार, अनारसे, करंज्या हे सगळे आई बसुबारसेपासून करायला सुरुवात करे. चकली तर एका वेळी एक पायलीचा डबा भरून अशी दोन तीन वेळा तरी होई. कारण आम्ही खादाड, आमचे मित्र-मैत्रिणी खादाड!!! आता मी दोन तीन प्रकार करते तर सगळ्या गावाला जाहिरात असते. पण आई तेव्हा एकटीने सगळे व्याप कसे सांभाळत असेल ह्याचे आश्चर्य वाटते. आम्ही मोठ्या झालो तसे आईला जमेल तशी मदत करत असू. त्यातल्या त्यात आरतीने आईच्या हातचे करणे हुबेहूब- कणभर अधिकच- उचलले आहे. बाकी आम्ही तिघी जन्मभर साइड हिरॉईन्स! भावाला पण आईने काही नाही तर सोर्‍यात पीठ घालून दिले की चकल्या कशा करायच्या ते शिकवण्याचा प्रयत्न केला. पण तो चुकीच्या ठिकाणी प्रेशर देतो. त्यामुळे त्याला २-३ चकल्या केल्या की लगेच पळावे लागते. मग आई त्याला सामान आणणे, वरचे डबे काढून देणे गेला बाजार लाडवांपासून स्वतःला आणि मांजरांना दूर ठेवणे अशी कामे सांगते.

त्याचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे किल्ला करणे. पुढच्या दारात कोन होत असलेल्या कुठल्याही दोन भिंतींना धरून तो किल्ला करतो. एक संपूर्ण दिवस तो किल्ल्यात घालवतो. त्यावर शेणाचा सडा वगैरे 'संस्कार' बाईकडून करवून घेतो. अळीव, धणे वगैरे धान्य लावणे, आरसा ठेवून तळ्याचा देखावा करणे, किल्ल्याच्या अर्ध्या उंचीएवढा शिवाजी राजांचा पुतळा लावणे, त्या पुतळ्याच्या बेसपेक्षाही छोटे मावळे लावणे, ह्या दोन्हींच्या उंचीशी काहीही संबंध नसलेल्या तलवारी, भाले वगैरे लावणे काही म्हणून करायचे ठेवत नाही :) एके वर्षी तर त्याने किल्ल्यापेक्षा उंच दोन त्रिशूळ लावले होते. एवढे करून शेवटच्या दिवशी सगळे मित्र मिळून खास टाइम बाँब (एका मोठ्या फटाक्याला सुतळी बांधून त्या सुतळीचे टोक आधी पेटवायचे. सगळी सुतळी जळून फटाका फुटेपर्यंत थोडा टाइम जातो म्हणून 'टाइम बॉंब') लावून एक एक किल्ला उडवून देतात.

एव्हाना सगळा बाजार दिवाळी अंक, कंदील, रांगोळ्यांचे रंग, लाह्या-बत्ताशे आणि फटाक्यांनी सजतो. घरी मटा, सास, सकाळ, विवेक असे अंक येत पण ते अगदी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी. एखादे दिवशी आम्ही बरीच चर्चा, बोलाचाली, वादावादी इत्यादी करून यंदा कसा आकाशकंदील आणायचा आणि अजून कुठले दिवाळी अंक आणायचे हे 'एक'मताने ठरवून बाजारात खरेदीला जात असू. बाबांनी पैसे सगळे स्वाती नाहीतर आरतीकडे दिलेले असत. त्यामुळे आधी काहीही ठरले असले तरी बाजारात गेल्यावर ह्या स्वत:च्या पसंतीने खरेदी करत. ह्याच वेळी आपापल्या ड्रेसला मॅचिंग क्लिप्स, टिकल्या, नेलपेंट्स, लिपस्टिक्स वगैरेची पण खरेदी होई. आणि थोडे फार फटाके. फटाक्यांचा मुख्य बाजार गावाबाहेर भरतो. गावात दोन-चार लहान स्टॉल्स लागलेले असत. तिथून आम्ही अगदी थोडे फटाके घेत असू. कारण फटाक्यांची आमच्या घरी प्रथा अशी की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी बाबा आम्हाला कुठले फटाके हवे ते विचारून मोठ्या मार्केटमध्ये खरेदी करत. एखाद्या वर्षी नवीन आलेले प्रकार त्यांनी मुद्दाम जास्त घेतलेले असत. हे सगळे फटाके प्रेसमध्ये आधी जात. प्रेसमध्ये पूजा झाल्यावर लावायची पाच हजाराची लड, तिथे वाजवायला वेगळे आणि आम्हाला घरी वाजवायला वेगळे असा फटाक्यांचा ढीग लागलेला असे. पूजा झाल्यावर आधी ती लड लागे आणि मग बाकीचे फटाके उडवायला मिळत. घरी पण पूजा झाल्याशिवाय फटाके मिळत नसत. हे सर्व नियम आम्हालाच बरं. आता नातवंडांसाठी सगळे नियम गुंडाळून माळ्यावर गेलेत. ही कार्टी दिवाळी सुरू नाही झाली की दुपारी बारा वाजता भुईनळे लावतात आणि आजी-आजोबा त्यांचे कौतुक बघतात.

सगळी जय्यत तयारी होते आणि नरकचतुर्थीचा दिवस उजाडतो. हा दिवस म्हणजे सूर्योदयाच्या आधी न्हाण्याचा दिवस नाहीतर नरकात प्रवेश नक्की. रचना, भाऊ आणि स्वाती हे सर्व नरकनगरीचे कायमस्वरूपी नागरिक. अगदी लहान असताना आईने सूर्य उगवायच्या आत न्हाणीघरात उभे करून डोक्यावर पाणी ओतून जी काही पुण्याची सोय केली तेवढीच. आई, आरती, मी, रचना, स्वाती, भाऊ+बाबा अशा क्रमाने मंडळी उठतात आणि आवरतात. आजचा खास दिवस म्हणजे बाबा आणि भावाला तेल लावायचा. बाबा नावापुरते चार थेंब डोक्यावर चोळून घेतात. भाऊ मात्र वर्षभराची खुन्नस ह्या दिवशी आणि भाऊबीजेला काढतो. हात-पाय-पाठ-डोकं अगदी व्यवस्थित रगडून घेतल्याशिवाय उठतच नाही. एवढं करून भाऊबीजेला सुट्टे पाच रुपये द्यायचा. आणि एक लहानपणापासूनची खोड की तो अंघोळ करत असताना बाहेर फटाके वाजवायचे नाहीतर तो बाहेरच येत नाही. आता मोठा झालाय तसा. लक्षात ठेवून आमच्यासाठी काहीतरी आधीच आणून ठेवतो :)

बरेचदा लक्ष्मीपूजन आणि नरकचतुर्थी एकाच दिवशी येतात. दिवाळीला काही मेहूण नसते. त्यामुळे आई थोडी रिलॅक्स असते. तरी साडे अकरा-बाराच्या सुमारास तिचे सगळे आवरतेच. आजच्या दिवशी आमच्याकडे बासुंदीचा बेत असतो. कधी आई घरी करते तर कधी बुवा हलवाईकडची प्रसिद्ध बासुंदी ऑर्डर देऊन आणतो. मला आणि आरतीला बासुंदी आवडत नाही म्हणून आमच्यासाठी चितळ्यांचे आम्रखंड असते. बाकी भजी, दोन-चार भाज्या, ओल्या नारळाची चटणी, कोशिंबीर, पापड-कुरडया, पुर्‍या असे नेहमीचे यशस्वी कलाकार असतातच. सोवळ्याचा स्वयंपाक नसल्याने कांद्याची भजी पण होतात. आजही सगळ्या घरादाराला झेंडू, शेवंतीचे हार होतात. येता जाता फराळावर ताव मारत आम्ही सडा घालणे, रांगोळ्या काढणे, फुसक्या फटाक्यांची दारू गोळा करणे अशी कामे करतो. आज आम्ही सगळे घरचेच असल्याने सगळे बैठकीच्या खोलीत खाली पंगत मांडून जेवायला बसतो. बाबांचा स्वभाव फार मिश्किल आहे. ते जास्तकरुन आईला आणि आरतीला काहीबाही चिडवतात. आम्ही असतोच फिदीफिदी हसायला. गोडाचे जेवण झाल्यावर मसाला पान हवेच. हे काम मात्र भाऊ आनंदाने करतो. आणि मग दुपारी दिवाळी अंक वाचता वाचता इतकी मस्त झोप लागते.

जाग येते तीच अनारशांच्या वासाने. आईने लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू केलेली असते. तेल, वाती घालून पणत्या एका मोठ्या थाळ्यांत ठेवलेल्या असतात, स्वच्छ चकचकीत पूजेची चांदीची भांडी, समया, लक्ष्मीची मूर्ती, लाह्या बत्तासे, हळद कुंकू, फुलं, उदबत्त्या असा सगळा सरंजाम तयार असतो. एकीकडे अनारसे करणं सुरू असतं. सजू पण प्रेसमधल्या पूजेच्या सामानाची यादी घेऊन आलेला असतो. त्याची वेगळी तयारी असते. प्रेसमध्ये सतरंजी पासून सर्व सामान द्यावे लागते. बाबा संजुकडून सगळ्या बागेत, अंगणात पाणी मारून घेणे, गाड्या लांब उभ्या करून आमच्या फटाक्यांसाठी मोकळी जागा बनवणे अशी कामे करून घेतात आणि खूप वेळा 'मी आहे म्हणून सर्व कामं वेळेत होतात' असे आईला ऐकू जाइलशा आवाजात म्हणतात. ताया आज पण सुंदर रांगोळी रेखाटतात. आजची रांगोळी अशी काढलेली असते की त्यात ठिकठिकाणी पणत्या ठेवून सजावट करता येईल. आम्ही किल्ल्यासमोर पण त्यांच्याकडुन रांगोळी काढून घेतो आणि सगळ्या किल्ल्यावर त्यांना रांगोळीसाठी नको असलेले रंग फवारतो. किल्ल्यात पणत्या ठेवायला मोक्याच्या जागा असतात. तो रंगीबेरंगी किल्ला सगळ्या पणत्या लावल्यावर इतका गोजिरा दिसतो.

सगळे आवरुन मग आम्ही प्रेसमधल्या पूजेसाठी जातो. प्रेस जिथे आहे तिथे एका बैठ्या इमारतीत शेजारी-शेजारी पाच-सहा ऑफिसेस आहेत. सगळ्या सहा कार्यालयांना पुरेल असा प्रशस्त मांडव घातलेला असतो. मध्ये मध्ये नारळाच्या झावळ्या उभारलेल्या असतात. प्रत्येक कार्यालयासमोर तिथल्या कामगारांनी त्यांच्या आवडीप्रमाणे रांगोळी वगैरे सजावट केलेली असते. आमच्या प्रेससमोर हटकून 'कमळ' काढलेले असते. इथे मात्र माझे कलाकौशल्य जोखण्याची मला मुभा असते. थोड्याच वेळात इंद्रधनुष्याला लाजवेल असे रंगीबेरंगी कमळ दिमाखात हसते. तिथे एकच गुरुजी सगळीकडे पूजा सांगायला येतात. गुरुजींची वाट बघत मंडळी मांडवात खुर्च्या घालून बसतात. मग बाबांचे कुणी कुणी स्नेही त्यांना भेटायला येतात. त्यांच्या बायका प्रेसमध्ये आत आईला भेटतात. प्रत्येकाला आम्ही यंदा कितव्या यत्तेत आणि परीक्षा सोप्प्प्प्पी गेली सांगतो. एकदाचे गुरुजी येतात. प्रत्येक ठिकाणी जाऊन ऐकली तरी बोध होणार नाही अशा अगम्य भाषेत आणि अचाट वेगाने गुरुजी पूजा सांगतात. एरवी दहा हाका मारूनही ढिम्म न हालणारा माझा भाऊ गुरुजींनी पूजेत सांगितलेले विधी मात्र बिनचूक कसे करतो हे एक कोडेच आहे. आम्हाला तसे पण पूजा कधी एकदा संपते आणि कधी एकदा फटाके फोडायला लागतो ह्याची घाई असते. एकदा का लाह्या बत्तासे, पेढ्याचा बोकणा भरला की आम्ही उदबत्त्या, फुलबाज्या घेऊन तयार असतो. सगळ्यात धमाल असते ती मोठ्या लडींची. जसे गुरुजी एका एका ठिकाणची पूजा संपवतात तशा ह्या लडी पेटायला लागतात आणि सगळीकडे नुसता तडतडतडतड आवाज भरून राहतो. आई पदर लावून तिच्या नातवंडांचे कान घट्ट झाकण्याचा प्रयत्न करते पण ते घाबरतातच. प्रेसमध्ये कागद भरलेला असल्याने दरवर्षी न चुकता बाबा थोडे दूर जाऊन फटाके उडवायला सांगतात. प्रेसमध्ये आणलेले फटाके तिथल्या कामगारांना आणि आम्हाला असे असतात. त्यामुळे ते पण खूश असतात. मला आठवते लहानपणी प्रेसमधल्याच कुणाचे तरी बोट धरून पहिला सुतळी फोडला होता.  झाडून सगळे फटाके उडवल्यावर आम्ही कुणाची कशी फजिती झाली आठवून दात काढतो. मग तिथला सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे बोनस वाटप करून सगळेच घरी येतो.

आईने पूजेची तयारी आधीच केलेली असते. इतक्या वर्षांच्या अनुभवाने घरची पूजा आईच सांगते. दिव्यांच्या प्रकाशात एकाग्र चित्ताने श्रद्धेने एक एक विधी सांगणार्‍या घरच्या लक्ष्मीचं ते देखणं रूप बघतच राहावं असं. बाबा मुद्दाम 'आज जरा नवी साडी नेसायची की' असं म्हणतात पण ती त्यांच्या परीने दिलेली दादच असते. आई पण लटक्या रागाने, 'तुमच्या पेक्षा बरं आहे. तुमचे तर नवे की जुने कळत नाहीत' असं उत्तर देते. देवीची आरती करून आणि प्रसाद घेऊन आम्ही फटाके वाटप उरकून घेतो. प्रत्येकाचे तीन दिवसांचे तीन वाटे होतात. दिवाळीचे नवे, सुळसुळीत कपडे घालून फटाके फोडायचे नाहीत हा अजून एक दंडक. नवेच पण कॉटनचे कपडे घालून आम्ही फटाके घेऊन अंगणात जमतो. एकामागून एक भुईनळे उडतात, सुतळी कानठळ्या आणतात, चक्रं भिरभिरतात तर बाण सुईsssss आवाज करत आकाशात झेपावतात आणि चिल्ली पिल्ली फुलबाज्या नाचवत गातात दिन दिन दिवाळी.... गाई म्हशी ओवाळी!!!

दिवाळी निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी