Friday, March 26, 2010

गौरी


८ मार्च २००४, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने बांद्र्याला रंगमंदिरात गौरी देशपांडे आणि प्रिया तेंडुलकर ह्यांच्या आठवणी असा कार्यक्रम होता. ह्या दोघींचे आपल्यातुन निघून जाणे हुरहुर लावणारे खरे पण त्यांच्या अगदी जवळच्या मोजक्या लोकांनी फार हृद्य आठवणी सांगितल्या. कार्यक्रम छानच झाला. कार्यक्रम संपल्यावर दादरला येऊन फास्ट ट्रेन घेतली आणि खिडकीतली जागा पटकावुन बसले. अजून मनात त्या सगळ्या आठवणी रुंजी घालत असतानाच भांडुप आले. भर दुपारी उन्हाची मी स्टेशन वर उतरत होते. अचानक कुठुन आले आहे, कुठे चालले आहे आठवेचना. धक्क्यांमधुन सावरत, ट्रेन मधुन उतरणार्‍र्या आणि चढणार्‍या गर्दीतुन कुठल्या दिशेने चालायला सुरूवात करायची आहे हे ठरवण्यासाठी आधी स्वतःला एका जागेवर उभे केले आणि एकदम माझे लक्ष एका आकर्षक व्यक्ती कडे गेले.


...खादीचा लांब कुडता, पांढरी पडलेली निळ्या रंगाची जीन्स, खांद्याला लटकवलेली एक पिशवी की शबनम की असेच काहीतरी लटकत होते ज्यात बरेच जास्तीचे सामान कोंबले होते. कुडत्याला बटनपट्टीपाशी एक गॉगल लटकत होता. डोक्यावरचे केस जवळ जवळ सगळे पांढरे झाले होते आणि लहानपणी घामोळ्या येऊ नयेत म्हणुन कापतात तसे बारीक कापले होते. म्हणजे नवरात्रात सहाव्या-सातव्या माळेला गहु जितपत वाढतात तेव्हढे. मला वाटते ह्या सगळ्यात आधी दिसली ती हातातली सिगरेट. गुरुदत्त स्टाईल मधे कपाळावर आठ्या घालुन झोकात सिगारेट ओढत ट्रेन ची वाट न बघता स्टेशन वर उभं असलेल ते सुंदर ध्यान मला बघत रहावसे वाटले. मी एकटक बघत आहे हे लक्षात येउनही माझ्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करुन थंडपणे उभ्या असलेल्या त्या व्यक्तीकडे मी दुर्लक्ष करुन निघून जाउच शकत नव्हते.


आमचं मन तेव्हढ्यात पचकलं, "जाउन बोल तरी नाहीतर चल घरी. उगाच आपलं उन्हातान्हात, गर्दीत इथे येड्यासरखं उभं रहायचं." पण काय बोलु ? ओळख नाही, पाळख नाही. बर ज्यांच्यासमोर मी ट्रेन मधुन उतरले त्यांना विचारता पण येणार नाही, "कल्याण गेली ?". मी विचारात असतानाच पावलांनी 'ध्यानाच्या' दिशेने चालायला सुरुवात केली आणि अर्ध्या मिनीटात मी ध्यानाच्या एकदम समोर. आमच्या थोबाडाचा टाइम सेन्स एकदम भारी, ताबडतोब प्रश्न बाहेर आला, "मी तुम्हाला कुठेतरी पाहीलयं असं वाटतं आहे, नाव काय आपलं?" ध्यान उत्तरलं, "गौरी देशपांडे". मी डोळे विस्फारुन, तोंड बंद करायचं विसरुन बघतच राहीले. बॅकग्राउंड ला बाजुने येणार्‍या जाणार्‍या ट्रेन्स ची धाडधाड धाडधाड, एकदम फ़िल्मी स्टाईल.


तेव्हढ्यात कोणीतरी ट्रेन पकडण्यासाठी धावत आले आणि मला धक्का मारुन गेले. त्या धक्क्यासरशी मी जरा शुद्धीवर आले. डोळे नेहेमीच्या आकारात आले, तोंडही बंद झाले. बघीतले तर आजुबाजुचे लोक माझ्याकडे आश्चर्याने बघत होते. गर्दीतल्याच एक बाई माझ्याजवळ येउन म्हणाल्या, "बरं वाटत नाहीये का तुला ?" मी नकारार्थी मान हलवुन त्यांना म्हंटलं, "मी ह्यांच्याशी बोलायला थांबले आहे." ह्या वाक्यावर बाई घाबरल्यासारख्या मागे सरकुन निघुन गेल्या.


बाई म्हणाल्या, "चल आपण तुझ्या घरी जाता जाता बोलु. एक गोष्ट सांगते तुला." आम्ही रिक्षाने गेलो. बाईंची चालत जाण्याची तयारी होती पण मला चालणं शक्यच नव्हतं. रिक्षात त्या बोलत होत्या, मी ऐकत होते. एक दोनदा मी फ़क्त ऐकता ऐकता 'हं' म्हणाले तर रिक्षावाल्याने चमत्कारीक नजरेने मागे वळुन पाहीले. घर येईपर्यंत त्यांची गोष्टही संपली. बाई घरापर्यंत आल्या आणि म्हणे, "आता वर नही येत, उशीर होईल. रात्री प्रियाकडे जेवायला जायचयं".


माझ्या डोक्यात त्यानंतर बराच वेळ फक्त मुंग्या !!!
*****************************************************
~रचना आवटी
माझ्या धाकट्या बहिणीने लिहिलेली ही कथा. तिचा स्वत:चा ब्लॉग नाहीये म्हणून माझ्या ब्लॉगवर प्रकाशित केली आहे.

Wednesday, March 24, 2010

क्षणभर

सकाळी जमेल तितक्या लगबगीने आवरून विंदुने दाराला कुलूप घातले आणि गाडीचे कुलूप काढणार तर सिंधूची गाडी तिच्या गाडीच्या मागे उभी बघून तिच्या तोंडून पटकन "अरे देवा" निघून गेले. आधीच उशीर झालेला त्यात आता पुन्हा गाड्या पुढे-मागे कुठे करा म्हणून तिने निमूट पिशवीतून दुसरी चावी काढली नी सावकाश पायर्‍या उतरू लागली. नाही म्हंटले तरी सहावा लागूनही एक आठवडा उलटून गेला होता. पोट आता चांगलेच दिसू लागले होते. त्यामुळे एरवी कितीही कौतुकाची असली तरी आता सिधच्या स्पोर्टस् कारमधे बसायचे म्हणजे विंदुला अवघडल्यासारखे व्हायचे. "संध्याकाळी सांगितले पाहिजे सिधला त्याची गाडी पुढे लावून ठेवायला" असे मनात म्हणत ती गाडीत बसली. समोरच्या घरातनं निघून लिझ दणादणा पायर्‍या उतरून धप्पकन गाडीत बसल्याचं तिच्या नजरेतून सुटलं नाही.

सकाळी नऊ वाजता सुद्धा इतके ऊन चढले होते. डोळ्यांवर काळा चष्मा चढवून तिने गाडी सुरू केली आणि रिव्हर्स टाकला. सवयीप्रमाणे आरशात मागे बघितले आणि ती घाबरलीच. लिझची गाडी एकदम वेडीवाकडी होत वेगात मागे येत होती. एक क्षण गांगरलेला गेल्यावर तिने चपळाईने गिअर बदलला आणि गाडी जमेल तेव्हढी पुढे घेतली. पण ड्राइव वे मध्ये त्यांचीच दुसरी गाडी उभी असल्याने पुढे जाण्यास फारसा वाव दिसेना. आता ही बया धडकते की काय असे वाटल्यावर तिने दार उघडले. गाडीच्या बाहेर पडणार एव्हढ्यात मागून करकचून ब्रेक दाबल्याचा आवाज आला नी ती गाडी भुर्रकन निघून पण गेली. विंदुला वाटले उगीच घाबरलो आपण. लिझ अशीच गाडी चालवते नेहमी. तिच्या आईच्या जिवाला एक घोर असतो ही बया कुठे बाहेर गेली म्हणजे. एक मोठा सुस्कारा टाकून "काय मस्ती करायची ती घरात करावी, दुसर्‍यांच्या जीवाशी खेळ कशाला..." असे पुटपुटत तिने गाडी पार्किंगमधून बाहेर काढली.

ऑफिसला येई येईतो साडे-नऊ झालेच. खाली कॅफेटेरिआत, इमारतीच्या आवारात बरेच लोक घोळक्याने उभे होते. तिला उगीचच आजी गेली तो दिवस आठवला. संजुचा- धाकट्या भावाचा- ताबडतोब घरी निघून ये असा निरोप आला तेव्हा बाप-लेकांचे परत भांडण झालेले दिसतेय असेच तिला वाटले. हे नेहमीचेच होते. त्यांच्या भांडणांची कारणे तशी क्षुल्लकच असत पण विंदुला मध्ये घेतल्याशिवाय काही "मांडवली" होत नसे. त्याला जायचे असे मित्रांबरोबर हुंदडायला तर बाबांना वाटे आता त्याने धंद्यात अधिक लक्ष घालावे. इथून सुरुवात होऊन मग विषय हमखास आमची पिढी कर्तृत्ववान तुमची आयताड पर्यंत जात असे. "आयताड" म्हंटले की संजुचे डोके भयंकर तडके आणि मग तो "ह्या घरात एक क्षण थांबणार नाही", "पाणी पिणार नाही" अशा शपथा घेऊन घराबाहेर पडे. विंदु कॉलेजमधे नसली तर वाचनालयात नाहीतर मैत्रिणीच्या घरी अभ्यास करताना सापडे. मग प्रत्येकवेळी वेगवेगळे बहाणे काढून ती संजुला घरात यायची परवानगी मिळवे. एव्हाना त्याच्या शपथा त्यालाच आठवत नसत.

पण त्या दिवशी घराशी आली तो गल्लीच्या टोकालाच कुजबुजणारे जोशी काका आणि कुलकर्णी आजोबा दिसले. "दीक्षित निघाले आहेत...पोचायला ४-५ तास तरी लागतीलच..." अस्पष्टसे कानावर आले. आणि मग सगळ्या गल्लीभर अशा कुजबुजणार्‍या लोकांची रांग. ती रांग तिच्याच घरापाशी येऊन थांबलेली. तिच्या काही लक्षात येईना काय चालले आहे. थोडे घराजवळ गेल्यावर आतून येणार्‍या आवाजांनी काही तरी आपल्याच घरी झाले आहे ह्याची तिला खात्री झाली. घराच्या पायरीवर तिची वाट बघत बसलेला हमसून हमसून रडणारा सजू दिसला आणि काय झाले असेल हे जाणवून ती थिजल्यासारखी एका जागी उभी राहिली. "आजी..." आजीला २-३ दिवसापूर्वीच घरी आणले होते. म्हातारीची तब्येत ठणठणीत पण रक्तदाब जरा वाढला होता. घरी येताना डॉक्टर तर म्हणाले होते सगळे उत्तम आहे, घाबरण्यासारखे काही नाही. मग हे काय ? धावत जाऊन आजीला बिलगावेसे वाटले पण पुढे पाऊलच टाकवेना, ती उभ्या जागी "आजी...आजी" पुटपुटत राहिली. शेवटी शेजारच्या काकूंनी बळे ओढत तिला आपल्या घरी नेली. सगळे संस्कार झाले, लोक पांगले तरी विंदु मख्खपणे काकूंच्याच घरात बसून होती. आजीला शेवटचे बघायला पण गेली नाही.

विचारांच्या नादात समोर "Caution: Wet Floor" ची पाटी तिला दिसलीच नाही. ओल्या गुळगुळीत फरशीवर तिचा सर्रकन पाय सरकला. सहा महिन्यांचे पोट घेऊन तिला तोल सावरता येणं अशक्य होतं. पण जवळच उभ्या असलेल्या एका सुरक्षा व्यवस्थापकाने चटकन पुढे होऊन आधारासाठी हात देऊन तिला धड उभी केली. विंदुने पुन्हा पुन्हा त्याचे आभार मानल्यावर तो गमतीने म्हणाला, "कितीवेळा धन्यवाद देणार आहेस. त्यापेक्षा मला एक कप  कॉफी दे".

वर गेल्यावर पाहिले तर मार्क नेहमीप्रमाणे फोनवर कुणाला तरी शिव्या देत होता, बरेच टीम मेंबर्स घोळक्याने गप्पा ठोकत होते आणि कॅफेटेरिआत काम करणारे अक्षरशः: आग्रह करून सगळ्यांना आईस क्रीमचे कप आणि कोल्ड्रिंक्स देत होते. तिला एकदम सगळा उलगडा झाला. कनेटिकटमधे आल्यापासून गेले ३ वर्षे त्यांना हा अनुभव न चुकता आला होता. जुलैच्या मध्यात एकदा तरी कुठे कुठे अती उष्णतेने पावर ग्रीड तुटायची नाहीतर वाकायची आणि अर्धे कनेटिकट सुट्टी साजरी करायचे. विंदु काम करत होती त्या बँकेत भले थोरले जनरेटर्स होते पण त्यांचा ट्रेडिंग फ्लोअरही तेव्हढाच मोठा असल्याने सगळे स्रोत तिकडे वळवण्यात यायचे. जवळ-जवळ सगळे संगणक, वातानुकूलित यंत्रणा बंद करण्यात येत. आजही तसेच झाले होते. बारा  न पंधरा  मजले चढून जायला कुणीच तयार नसे म्हणून एलेवेटर्स चालू ठेवत. सध्याच्या परिस्थितीत तर दोन मजले चढून जायला पण विंदु नाही म्हणाली असती.

डेस्कपाशी जाऊन तिने पिशवी खाली ठेवली. एवीतेवी वीज नाहीये तर बर्‍याच दिवसांपासून थकलेली काही ऑफलाइन कामे हातावेगळी करावी ह्या विचाराने ती टेबलवरच्या प्रिन्टसची चळत चाळायला लागली. तेवढ्यात कॅफेटेरिआतर्फे आइस क्रीम घेऊन कोणीतरी आले. आता वायाच जाणार त्यापेक्षा वाटून टाका असा त्यांचा विचार. तिने औपचारिकता म्हणून एक छोटा कप ट्रेमधुन उचलला. पहिला घास घेतला तो पोटात जोरात खळबळ झाली. गोड हसत तिने पोटावर हात ठेवला नी स्वतःशीच म्हणाली "आवडतेय वाटते आइस क्रीम !!!".

एक-दोन मीटिंग, काही थकलेली कामे उरकल्यावर तिला कंटाळा यायला लागला. उकाड्याने नको नको झाले होते. बाहेर जायची पण सोय नव्हती. ऊनच इतके होते. गप्पा ठोकायला कोणी आहे का म्हणून तिने प्रीतीला फोन लावला तर ती देखील घरी निघालेली. तिच्या टीममधलेही बरेच जण घरी जायच्या तयारीत होते. इतकी छान सुट्टी कोण वाया घालवणार. काही तरी चाळा म्हणून ती खुर्ची फिरवून खिडकीतनं बाहेर पाहायला लागली. समोर अस्ताव्यस्त पसरलेला लॉग आयर्लंड साउंड दिसत होता. लांब क्षितिजावर बोटींचे बारीक पांढरे ठिपके दिसत होते. आपणही बीचवर जाऊन पाण्यात खेळावं असं तिला वाटलं.

"वृंदाssss" अचानक आलेल्या आजीच्या प्रेमळ हाकेने विंदुने दचकून मागे वळून बघितले. तिला कळेना आज आजीची का आठवण येते आहे ? आजीला जाऊन आता किती वर्षे झाली. एव्हढ्यात काही विषयही नाही आजीचा. तिला वाटले, सकाळपासून दोनदा अपघात होता होता वाचले, कदाचित म्हणूनच असा आजीचा भास. ती लहान असताना कुठे धडपडायच्या आधीच आजीचा आवाज असे, "वृंदा, पडशील बाळ....जरा जपून". आज पण आजी काही सांगते आहे का ? अस्वस्थ होऊन तिने सिधला फोन लावला.

"बोला राणी सरकार, काय सेवा करू ?" त्याचा प्रसन्न आणि प्रेमळ आवाज ऐकून विंदुला जरा बरे वाटले. त्याला मनातले सांगायला तिने तोंड उघडले खरे पण तिला एकदम वाटले संध्याकाळीच सांगावे त्याला. नाही तर तो एकदम पॅनिक होईल आणि सगळा कार्यक्रम रद्द करून घरात डांबून ठेवेल.

"सिध, संध्याकाळी तुझी गाडी पुढे काढून ठेव. आणि आता नीघ ऑफिसमधून. आपण जोन्स बीच वर जात आहोत"

"जशी आपली इच्छा. पण मला निघायला अर्धा तास तरी लागेल. एक काम संपवायचे आहे."

"चालेल. तसे पण बीच तुझ्या ऑफिसपासून जवळ आहे. मला यायला तेवढा वेळ लागेलच. मी कुठे घ्यायला येऊ ?"

"विंदु तू आता हाय वे वर गाडी चालवत येणार ? मीच येऊ का घरी ? आपण नॉरवॉक बीचवर जाऊ." घातलाच त्याने खोडा.

"नssssको, त्या डबक्यात डुंबायला तुझ्या एखाद्या सुंदर गर्ल फ़्रेंडला घेऊन जा" ह्यावर सिधु मोठ्याने हसला. मग बोलता बोलताच त्याने जाण्या-येण्याच्या दिशा तिला मेल केल्या. तिचा कंप्युटर बंद आहे हे दोघांच्याही लक्षात आले नाही. मधल्या एका स्टेशनवर तिने त्याला घ्यायला जावे आणि तिथून मग दोघांनी मिळून बीचवर जावे असे ठरले.

त्याच्याशी बोलून झाले तसे विंदुने भराभर आपली पिशवी आवरली. दिवसभर खायला म्हणून फळे-बिळे आणले होते. ते सगळे आवरून ती निघणार तोच टॉमचे टक्कल आपल्या दिशेने येत असल्याचे तिला दिसले. जणू बघितलेच नाही अशा आविर्भावात तिने दाराकडे चालायला सुरुवात केली. पण एखाद्या पेंग्विनसारख्या दुडक्या चालणार्‍या विंदुला टॉमने गाठलेच.

"हेssss वँडु काय विशेष ?" त्याने विंदुचे असे विडंबन केलेले एक हजार वेळा ऐकूनही आता पुन्हा तिला दाताखाली खडा आल्यासारखे झाले.

आंबट तोंडाने ती म्हणाली, "मला तुझा फार कंटाळा आलाय म्हणून कुठे तरी लांब पळतेय" त्यावर नुसतेच हसून त्याने खिडकीतून दिसणार्‍या रांगत जाणार्‍या महामार्गाकडे बोट दाखविले. तिनेपण नुसते हसून रस्त्याच्या विरुद्ध दिशेला बोट दाखविले. दक्षिणे दिशेने रहदारी छान सुरळीत जात होती.

"हो तू तिकडे राहतेस नाही का. बरं तुला वेळ असेल तर यूजर्स कडून आलेले नवीन फॉर्म्स बघूयात का ?"

आता हा पण आला का खोडा घालायला, विंदु चडफडली. "त्यापेक्षा तू तुझा mid year performance review का नाही करत मार्कला गाठून. तसेही त्याच्या सर्व शिव्या एव्हाना संपल्या असतील"

आणि टॉम काय म्हणतोय याची वाट न बघता ती वळून चालायलाही लागली. तीच्या बोलण्याने अवाक झालेला टॉम ती गेली त्या दिशेने नुसताच बघत बसला.

 विंदुने तिची शानदार गाडी पार्किंग गरजांबाहेर काढली तेव्हा अनेक लोकांच्या नजरा वळल्या, काही कौतुकाच्या काही असूयेचा. कंपनीतल्या भारतीय लोकांमध्ये तर चर्चेचा विषय होती तिची गाडी. कोपर्‍यावरच सिग्नलची वाट बघत असताना तिला रस्ता पार करत असलेला जेसन दिसला. विंदुकडे नजर जाताच त्याने व्याकुळ हावभाव करत हृदयावर हात ठेवला. हे सगळे तिच्या गाडीसाठी होते हे दोघांनाही पक्के ठाऊक होते. "नाटकी...." त्याच्याकडे हसून बघताना विंदु स्वत:शीच म्हणाली. आता अजून एक सिग्नल की हाय वे लागेल. गर्दी झाली नसेल तर बरे असा विचार करत करतच तिने रँपवर गाडी घातली आणि एकदम आपल्याकडे प्रिंटस् नसल्याचे तीच्या लक्षात आले. सिधला फोन लावेपर्यंत रँपवर वळसा घेऊन ती महामार्गावर आली सुद्धा. एकदम लखक्कन डोळ्यांवर ऊन आले. एका हातात फोन आणि दुसर्‍या हातात गॉगल व त्याच हाताने लेफ्ट इंडिकेटर देऊन तिने गाडी डावीकडे घेतली. तेवढ्यात सिधचा आवाज ऐकू आला. "सिध, ऐक मला प्रिंटस् घ्यायला झालेच नाही...पावर नाहीये ना...यार हा जेसन ना फार पकवू आहे...आता कशाला फोन करतोय" पुढचे वाक्य जेसनचा फोन येतोय हे बघून होते. सिधुला तीच्या अशा भुलभुलैया बोलण्याची सवय होती. "ठीक आहे, मी येताना..." पण त्याचे बोलणे पूर्ण झालेच नाही.

सगळ्या गडबडीत आपल्या मागे एखादी गाडी आहे का हे तिने बघितलेच नाही. पण डाव्या बाजूच्या आरशात अगदी जवळ काही तरी आल्याचे दिसले आणि तिला एकदम जाणवले की अंमळ उशीरच झाला ब्लाइंड स्पॉट बघायला. पलीकडच्या लेनमधून एक ट्रक तोवर त्याच लेनवर पोचला होता ज्यावर विंदु होती. काय होते आहे हे कळायच्या आत विंदुच्या गाडीला ट्रकची जोरदार धडक बसली. एवढ्या अवाढव्य ट्रकपुढे काडेपेटीसारखी दिसणारी तिची छोटीशी गाडी त्या धडकेने स्वत:भोवती दोन गिरक्या घेऊन मधली संरक्षक भिंत फोडून रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला जाऊन उभी राहिली. चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रकही रस्त्यात आडवा उभा राहिला. रस्त्यावर नुसता गोंधळ माजला. तुटलेल्या भिंतीचे अवशेष, रस्त्यात आडवा झालेला ट्रक आणि विंदुच्या लाडक्या गाडीच्या काचा. रस्त्याच्या दोन्ही बाजूनं गाड्यांचा समुद्र.

"सिध, I am sorry..." व्याकुळ होत जाणार्‍या आवाजात ती अचानक असे का म्हणाली हे क्षणभर त्याला कळलेच नाही. पण त्यापाठोपाठ तिच्या किंकाळ्या, चित्रविचित्र आवाज आणि मध्येच बंद पडलेला फोन ह्या सगळ्यांनी पलीकडे काय घडले असावे ह्याची जाणीव शिरशीरत मेंदूपर्यंत पोचली. पण आपण काय ऐकतोय, काय झाले असावे ह्यावर विश्वासच ठेवायला मन राजी होईना. विंदुच्या गाडीला अपघात ? छे कसे शक्य आहे ते. तिचं गाडी चालवणं किती वेगळं आहे, सुसाट तरी सावध. स्वत:वरचा आणि गाडीवरचा ताबा सोडत नाही कधी. हाय वे वरून जाते तर सरळ, एका रेषेत..कधी लेन सोडून जाणे तर तिला माहितीच नाही. गाडी चालवायला लागल्यापासून एकदाही कधी किरकोळ अपघातातही सापडली नाही ती. कधी वेळ आलीच तर अतिशय संयमाने ती सर्व सांभाळून घेणार. "तू ना उगी पॅनिक होतोस सिध" तो खाडकन भानावर आला. अशी हाय खाऊन चालणार नव्हते. त्याने तिला फोन लावायचा प्रयत्न केला...

...हातात घट्ट धरून ठेवलेला फोन किणकिणतोय हे लक्षात आल्यावर तिने त्या अवस्थेतही हात उंच धरला. हातातून फोन घेणारी व्यक्ती पोलीस आहे की देवदूत हे नीटसे उमजण्याआधीच तिचे डोळे मिटले. गाडी गिरक्या घेत मधल्या भितीला धडकली तेव्हा डाव्या बाजूचे दार चेपले गेले होते. खिडकीच्या काचा आणि दाराचा पत्रा आत घुसून तिचा डावा हात संपूर्ण खांद्यापासून सोलवटून निघाला होता. त्यांतून रक्स्त्राव बराच होत होता. दोन्ही गुडघ्यांना मुका मार बराच लागला होता. आणि एअर बॅगच्या दाबाने पोट दाबले जाऊन पोटातून प्रचंड कळा यायला लागल्या होत्या. विंदुला तातडीने जवळच्याच हॉस्पिटलामध्ये नेण्यात आले.

सिद्धार्थाने दोन-तीन वेळा फोन लावला पण पलीकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्याचा धीर खचला. कसाबसा तो बॉसच्या- वेंकटच्या- डेस्कपाशी पोचला आणि त्याला काय झाले ते सांगितले. वेंकटनेच मग पोलिसांचा हेल्पलाइन, ९११ ला फोन करून काही माहिती मिळते का बघितले आणि सिधला घेऊन तो हॉस्पिटलला पोचला. डॉक्टरांनी विंदुला early contractions चालू झाल्याचे सांगितले. बाळाचा खाली जाणारा रक्तदाब बघता त्यांनी शस्त्रक्रिया करायचा निर्णय घेतला. ह्या सगळ्यात विंदुच्या व बाळाच्या जीवाला धोका तर होताच. सिध पुन्हा पुन्हा विंदुला काही होऊ देऊ नका असे डॉक्टरांना बजावत होता. एकदाची शस्त्रक्रिया पार पडली. विंदु आणि बाळ दोन्ही सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सहा महिन्यांच्या अपुर्‍या कालावधीत जन्माला आले असल्याने बाळाला इन्क्युबेटरमधे ठेवण्यात आले.

विंदुची परिस्थिती हळूहळू सुधारत होती. ती अधून मधून डोळे उघडे पण त्यात ओळख काहीच नसे. सिध दिवस दिवस तीच्या शेजारी बसून राही. तिला बाळाच्या गोष्टी ऐकवे. पण तिच्याकडून काहीच प्रतिसाद येत नसे. सिध निराश होई. आणि त्यातच एक दिवस डॉक्टरांनी त्याला ती धक्कादायक बातमी सांगितली. झाल्या प्रकाराचा विंदुला जबरदस्त धक्का बसला होता. कदाचित आपल्या चुकीमुळे आपण बाळ गमावू असे तीच्या मनाने घेतले होते. शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त झाल्यावरही कुठलाही अवयव हालवणे, कुठलीही क्रिया करणे- साधे उठून बसणेही ती स्वतःहून करत नव्हती. डोळे उघडे असूनही ते कुणालाही बघत नव्हते. डॉक्टरांनी तीच्या अनेक टेस्ट्स केल्या. आजूबाजूला काय घडते आहे ह्याची तिचा मेंदू नोंद घेत होता, ते त्यांना EEG Monitor दिसत होते. परंतु विंदु किंवा तिचा मेंदू कशालाच प्रतिसाद देत नव्हता. बहुतेक वेळ ती डोळे मिटून खोलीत पाडून असे. सिध तिला खुर्चीत बसवून फिरायला नेत असे तेवढा वेळ डोळे उघडे असत तेवढेच काय ती जिवंत असल्याची खूण.

असे जवळ जवळ दोन अडीच महिने गेल्यावर डॉक्टरांनी तिला घरी जाण्यास परवानगी दिली. त्याच्याकडूनही करण्यासारखे काही उरले नव्हते. बाळाची तब्येतही आता बरी होती. बाळ दाखवल्यावर तरी काही तरी घडेल अशी आशा फोल ठरली होती. तरी देखील विंदुला भावणार्‍या गोष्टी करत राहाव्या, तिला आवडणारी ठिकाणे दाखवावीत, तिच्याशी बोलत राहावे अशा काही गोष्टी डॉक्टरांनी आवर्जून सांगितल्या.

हे सगळे एकट्याने झेपण्यासारखे नव्हते म्हणून सिधने विंदु आणि बाळाला घेऊन भारतात जायचा निर्णय घेतला. तिथे तिचे आणि त्याचे आई-वडील मदतीला होते. सर्वांना सोयीचे होईल असे ओळखीच्याच एका डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये तिला ठेवावे असे ठरले. अधून मधून सिधचे तिला ने सिद्धिविनायकाला, ने तीच्या आवडत्या आमराईत, ने त्यांच्या जुन्या घरी असे चालू असे. ह्या सगळ्यात त्याचे बाळाकडे दुर्लक्षच होत होते. बाळाची सगळी जबाबदारी विंदुच्या आईवर आणि तिच्या बहिणीवर सोपवून तो विन्दुची शुश्रूषा करण्यात मग्न असे. तसे तिथे डॉक्टर्स, नर्सेस होत्या पण तरी सिध दिवस-दिवस तिच्या उशाशी बसून राही. सर्वांनी त्याला पुष्कळ समजावले पण व्यर्थ. अशी तीन वर्षे गेली. ह्या तीन वर्षात जणू तीन तपे पार व्हावी इतका काळ धीमे चालला होता. विंदुची अवस्था आहे तीच होती. त्यांचा मल्हार तीन वर्षांचा झाला होता- तीन वर्षाचा गोजिरा गोंडस मल्हार, अगदी विंदुचा तोंडवळा घेऊन जन्माला आलेला मल्हार, विंदुचा आवडता राग मल्हार. मुलगा आहे कळल्यावर विंदुने दुसर्‍या कुठल्या नावाचा विचारच नव्हता केला. सिधला, तीच्या घरातल्या कुणालाच हे नाव आवडले नव्हते. सिध तर म्हणे, "तुझ्या पोटातनं घोड्यावर बसून आणि हातात तलवार घेऊनच येईल बघ तुझा मल्हारबा." पुढे हे सगळे रामायण झाल्यावर अर्थातच त्याने बाळाचे नाव मल्हार ठेवले.

सिधचा दिनक्रम आताशा थोडा बदलला होता. मल्हारच्या बाललीलांमध्ये त्याला आनंद वाटू लागला होता. मल्हारासाठी काही-बाही खाऊ आणणे, त्याला बागेत नेणे असे सुरू झाले होते. एक-दोनदा मल्हाराला घेऊन तो विंदुच्या भेटीसही गेला. पण छोट्या मल्हाराला काहीच बोध झाला नाही आणि त्याने तिथल्या मॉनिटरवर कार्टून का दिसत नाही म्हणून हट्ट धरला. शेवटी सिधने तो नाद सोडला. विंदुला तर कशा कशाची जाणीव नव्हती. असे दिवस चालले होते.

आज विंदुचा वाढदिवस. परिचारिकेने सकाळीच सिधने आणलेला नवा गाऊन विंदुवर चढवला होता. एरवी निचेष्ट पाडून राहणार्‍या विंदुच्या चेहर्‍यावर आज थोडे हसू उमलले होते. सकाळी तिच्या तपासणीसाठी आलेले डॉक्टरसुद्धा मॉनिटरवरील आलेख बघून खूश झाले होते. सिधने दरवर्षी प्रमाणे सर्वांना निमंत्रणे धाडून बोलवून घेतले होते. विंदुचे आई-बाबा, बहीण, तिचा नवरा, मुलं, मल्हार सगळीच जमली होती. आज सकाळांपासूनच विंदुच्या चेहेर्‍यावर थोडी जाग दिसत होती. तीच्या आईने कुठली-कुठली स्त्रोत्रे म्हंटली, अंगारा लावला. मग भाचरांनी आणि मल्हाराने केक कापला. लहानग्यांच्या कौतुकात सगळे असतानाच हलके हलके हसत विंदुने डोळे उघडले. सिध अनिमिष नेत्रांनी तिच्याकडे बघत होता. ज्या दिवसाची, ज्या क्षणाची चातकासारखी वाट बघितली तो असा अनपेक्षित समोरा आल्यावर त्याच्या हाता-पायातले बळच सरले. तो नुसताच तोंडाचा ऑ वासून तिच्याकडे बघत बसला. विंदुची नजर हळूहळू तिथे बसलेल्या प्रत्येकावर फिरू लागली.

आई-बाबा तरण्याताठ्या मुलीचे हे असे झालेले उघड्या डोळ्यांनी बघावे लागल्यामुळे अधिकच म्हातारे दिसत होते. आई तर पार खंगली होती. तरी आपले लटलटत्या हातांनी लाडक्या मल्हारबासाठी स्वेटर विणणे चालूच होते. कधी काळी विंदुच्या ऑर्कुटची पाने सजली होती आईच्या हस्तकलेने. संजुच्या डोक्यावर अक्षता पाडून अवघे दोन महिने झाले होते. त्याची लाजरी-साजरी नववधू उगी चुळबुळत नवर्‍याशेजारी उभी होती. मोठी बहीण स्वतःच्या संसाराबरोबर विंदुचाही अर्धवट पडलेल्या संसाराचा गाडा ओढून थकली वाटत होती. मल्हारबा आजोबांच्या खोड्या काढत त्यांच्या मांडीत बसला होता. कोणाचा बरे हा मुलगा ? अगदी त्या आजोबांसारखाच दिसतोय. बाजूलाच दोन चिली-पिल्ली खेळत होती. ही सगळी आली कुठून इथे ?

आणि हे कोण पुढारी बसलेत इथे ? पांढरा स्वच्छ खादीचा कुर्ता, कडक इस्त्री केलेला, दवाखान्यातल्या खोलीतही डोळ्यांवर काळा चष्मा आणि भाळी शिवगंध. इतक्यात एखाद्या मंत्र्याचा PA शोभेल अशा एका माणसाने मोठ्या अदबीने त्यांच्या हातात फोन आणून दिला. अतिशय हळू आवाजात ते काही कुजबुजले. उत्तरादाखल पलीकडची व्यक्ती त्यांना कौतुकास्पद काही म्हणाली असावी. कारण अशावेळी हसायचे तसे ते ठेवणीतले मिशीत हसले. एकदम ती ओळख पटून विंदु क्षीण पुटपुटली, "दीक्षित.." . आणि तेवढे श्रमही सहन न झाल्याने तिने थकून डोळे मिटले. डोळ्याची पापणीही न लवता तिच्या चेहर्‍याकडे एकटक बघणारा सिध त्यासरशी ताडकन उठून उभा राहिला आणि त्याने तिच्या बेडशेजारी असलेले emergency बटण जोराजोरात दाबायला सुरुवात केली. एकीकडे त्याने विंदुच्या चेहर्‍यावर हलके हलके थापटायला सुरुवात केली. एकीकडे व्याकुळ आवाजात त्याचे विंदुला हाका मारणे चालू होते, "विंदु ऊठ ना गं...किती वाट पाहिली तुझी...ऊठ ना गं...डोळे उघड विंदु...एकदा बघ गं माझ्याकडे..." विंदुच्या डोक्यात मात्र धाड धाड आवाज होत होते. सिधच्या कर्कश हाका कानांवर आदळत होत्या. तिने एकदम डोळे उघडले.

सिध मोठ्याने हाका मारत तिच्यासमोर उभा होता. त्याचा काळजीने ग्रासलेला चेहरा बघून तिने विचारले, "काय झाले ?" त्यावर तो चिडून म्हणाला,"काय झाले मला काय विचारतेस ? दुपारची निघालेलीस ऑफिसमधून. मी कितीवेळा फोन केला. शेवटी लवकर निघून घरी आलो तर दार उघडेनास. माझ्याकडच्या किल्लीने घरात यावं म्हणून मागच्या दारी आलो तर तू पुस्तक वाचता वाचता इथे बॅकयार्ड मध्ये झोपा काढतेयस. किती घाबरलो होतो माहिती आहे का ?" विंदुला काही बोधच होईना कशाचा. ती नुसतीच एकदा सिधकडे, एकदा आजूबाजूला बघत बसली. "विंदुssssss" सिधच्या असह्य हाकेने एकदम भानावर येत ती म्हणाली,"असे रे काय करतोस ? क्षणभर तर डोळा लागला माझा !!"

स्वप्न

मी आणि आपला मुंगेरीलाल भारत सरकार तर्फे एका कामगिरीवर अमेरिकेत गेलो होतो. अमेरिकेत म्हणे एक मोठी इमारत आहे ज्यात असंख्य अतिरेक्यांच्या मदतीने बाँब निर्मिती चालू होती. मी आणि मुंगेरीलाल अमेरिकेला ह्या पासून रोखण्यासाठी आणि भारत-पाकिस्तान (हे काय मध्येच ? पण असे होते खरे) संबंध सुरळीत करण्यासाठी गेलो होतो. मी मुंगेरीलालची सेक्रेटरी होते. मी भयंकर तडफदार आणि स्मार्ट होते (होते काय्य्य्य्य...आहेच !!!). आमच्या जिवाला धोका आहे अशी सगळीकडे कुणकुण होती. पण मुंगेरीलाल हट्टाने तिथे गेला होता.

तर "त्या" इमारतीसमोरच आमच्या सन्मानार्थ भोजन समारंभ आयोजित करण्यात येतो. इमारतीच्या खिडक्यांमधून अतिरेक्यांचे चेहरे दिसत आहेत (कसे कोणास ठाऊक पण ते सगळे शीख आहेत). समोरच्या इमारतीतून अचानक गोळीबार सुरू होतो. जो फक्त मला दिसतो (बघा आहे की नाही स्मार्ट) मी मुंगेरीलालला सुचवते की तिथून निघून गेले पाहिजे. पण तो नाही म्हणतो. इतक्यात खूपच जोरात गोळ्या यायला लागतात. मग मुंगेरीलाल माझा हात धरून पळायला लागतो. बाकीचे लोक आधीच गायब झालेले असतात. अचानक त्या इमारतीची मशीद होते. आम्ही Confidential असे लिहिलेल्या जाड जाड files ने गोळ्या परतवून (ह्याला म्हणतात तडफदार) लावत तिथून पळतो. पळता पळता मी घातलेल्या स्कर्ट-टॉप चा सलवार-कुर्ता होतो. अचानक आम्हाला एका घास बाजारात रिक्शा मिळते. आम्ही रिक्शात बसत असतानाच दिसते की समोरच्या रिक्शात अतिरेकी आमचा पाठलाग करण्यासाठी निघाले आहेत (पाठलाग करायला समोरच्या रिक्शात ?). त्यातला एक म्हणतो "बडे स्मार्ट लोग है...गोलीया बाचाके भाग लिये". मग त्यांना ओळखू येऊ नये म्हणून आम्ही रिक्शात पडलेल्या थर्माकोलच्या तुकड्यांनी तोंडे झाकून घेतो. एव्हढ्यात रिक्शा संगमनेरला पुणे फाट्याकडे जाताना एक मशीद आहे तिथे पोचते. नेमकीच दुसर्‍या बाजूने अतिरेक्यांची रिक्शा येते. मग आम्ही आमची रिक्शा मागे घेतो. अशा प्रकारे त्या मशीदीला २-३ चक्कर मारल्यावर मुंगेरीलाल म्हणतो (मराठीत बोलतो बरं का)) "गेले एकदाचे. पण आपल्याला हे गाव (फक्त गाव ? तडफदार लोकांचे तडफदार निर्णय!) सोडून गेले पाहिजे". मग त्याला आपल्या प्रेयसीची आठवण येते (ही कुठून आली अमेरिकेत ? अहो असे काय करता संगमनेरात नाही का आम्ही?) मग आम्ही तिच्या घरी जातो. ती एका झोपडीत राहणारी कळंक कपड्यातली लिसा रे असते. तिला आम्ही निघायला सांगतो. तेव्हढ्यात तिचा नवरा (कहानी मे twist) रडत ओरडत येतो की माझ्या बाळाला नेऊ नका. इतक्या सुंदर लिसाचे बाळ अतिशय काळे शेंबडे आहे. आम्ही त्याला समजावून सांगतो की फक्त पंधरा दिवसांची गोष्ट आहे. मग तो तयार होतो. लिसा भराभर एका चादरीत फक्त स्वत:चे कपडे बांधते. हे सगळे कपडे इतके भारी असतात की विचारता सोय नाही.

मी आणि लिसा एका सोफ्यावर बसून पळून जायचा प्लॅन करतो. पण एका सोफ्यावर मी, लिसा आणि मुंगेरीलाल मावणार नाहीत म्हणून मुंगेरीलाल टॅक्सी आणायला जातो आणि एक Mercedes नावाची  Ambassador घेऊन येतो. लिसाच्या झोपडीतून आम्ही गाडीकडे चालायला लागतो तो एकदम Oxford University मध्ये येतो. तिथे सुटाबुटातली अनेक तरुण मुले निर्गुणी भजन शिकण्यासाठी जमलेली असतात आणि मग...........
.
.
(Thank God) मुलगा उठला म्हणून माझे स्वप्न भंग पावले !!!!!!!

Monday, March 22, 2010

हुब्या जागी पळपळ आन गंगीची चंगळ

नमस्कार मंडली...वळख हाये का नाय ? आवो बगता काय...अवो म्या तरुप्ती...हितं काय समद्या बायाच जमल्या वाट्ट...असुदेत की..मला काय त्याचं...आयाय गं...अश्शी कळ येऊन र्‍हाईली का काय ईचारु नगा...आत्ता ईचारु नका म्हटलं तर काय झालं कोन म्हनतयं ? सांगु म्हन्ता...मंग ऐकाsss...


आमचं ह्ये बी महिती हाये की तुमा समद्यास्नी. तर त्येच्या सायबाकडं पारटी व्ह्तं. आमी दोगं बारक्याला घेउन गेल्तो. तिथं अजुक एक्-दोघाचं मंडली आनी हापिसातल्या बाया बी जमलेल्या. समद्या निस्त्या मरतुकड्या. काय जीव हाये कुडीत का न्हायी. आन समद्या लान्ह्या पोरासुदिक इवलं इवलं आंगडं आन टोपडं घालुनशान आलत्या. काय ते हाट हाट म्हनं. म्या मातुर झ्याक पैटनी घालुन गेल्ते. तिथल्लीच येक बया मला ईचारतीया की म्या आमच्या ह्येंची आय हाय का. असा राग आल्ता. न्हायी म्हनायला बारक्या झाल्यापास्नं म्या यकदम गोलमटोल झालीये पन म्हुन काय ह्येंची आय म्हनावं ? काय जिभला हाड ? पन काय कर्नार, हापिसातल्या लोकास्नी काय म्हनायचं न्हाय म्हनं.


घरला आल्यावर ह्येस्नी म्या सम्दा किस्सा सांगित्ला. तर त्ये बी प्वाट धरु धरु हसाया लागलं. आत्ता ? म्हंजी म्या खरच की काय ह्येंची आय दिसते ? तवापास्न निस्त मन खात व्हतं. आमचं ह्ये मला म्हन्लं रोजच्याला वायम केला पायजे. आन त्ये करायचं तर ज्येममधी गेलं पायजे. मंग येक दिस आमी गानं ऐकायचं मिशीन, ढवळी बुटं अस काय बाय घेउन आलो. मंग त्ये मला ज्येममदी घेऊन गेलं.


इथल्ली बया बी तसलीच मरतुकडी आन लांडे कपडे घातलेली. गेल्या गेल्या ती म्हन्ली "हान!!". म्या मस्तपयकी काकणं सारली आन म्हटलं, "कुनाला हानु ?" पन आमचं ह्ये मधी पल्डं आन त्या बयेशी विंग्रजीत काय्-बाय बोल्लं. मंग बाकी गडीमानसांमधी जाउन हुब्या जागी पळाया लागलं.


हिकडं पयलं त्या बयेनं माझं माप घेत्लं आन म्हनाली, "आव !!". म्या म्हटलं, "हाये की हितंच हुबी, आजुन कुटं आव". म्या काय बी बोल्ले की बया निस्ती खिदळायची. मंग तिनं मला हुब्या जागी पळाया लावलं. तिथं येक मिन्टात वाट लाग्ली बगा. न्हायी, साळंत असताना गुर्जी मागं आन म्या फुडं असं लयी पळापळी केलं की पन हे असं हुब्या जागी काय जमना. पळता पळता लुगडं आटकलं ना. म्या आशी दाणकनी थोबाडावर आपटले की काय ईचारु नगा. वर पुना ती बया, "आव !!! दोन वारी..". म्या म्हटलं, "दोन वारी न्हवं, नऊ वारी हाये." तिच्या काय बी डोस्क्यात घुसलं न्हायी. मला म्हने शाईकल चालीव. त्ये बी हुब्या जागी. ह्ये जरा बरं हाये. तिथं म्या झ्याक पायडल मारत व्हते तर तिथं बी पदराचं टोक आटकलं. येवडी सोभा होईस्तवर आमचं ह्ये आलं आन बयेला टोमारो म्हनुन आमी तिथनं निघलो.


ह्ये मला घरला सोडुन हापिसात गेलं. येताना बयेनं यक कागुद दिल्ता. त्यात काय खायचं न्हाय लिवलं व्हतं. आन यक डब्बा बी दिल्ता. जेवाण म्हनं. घरला येउन बगते तर त्यात निस्तं घासफुस. यकदम करंट पेटला. माजी बाय ती, लई मायाळु हो. गंगीसाठी चारा दिल्ता की वो तिनं. गंगी कोन म्हन्ता ? आवो मागल्या महिन्यात शेरडु घेतलं. आता बरक्यास दुध्-दुभतं नको ? गंगी बी आशी खुस जाली बगा त्यो घासफुस खाऊन.


दुसर्‍या दिसाला कोनाला ठो मारायचं म्हुन मी जरा खुसीतच गेल्ते. पन कशाच खुशी आन काय. बयेनं माजा असा छळ मांडला की काय ईचारु नगा...आयाई गं...आदी हुब्या जागी पळ्-पळ केलं. मंग शाईकिल चालीवलं. मंग अजुन काय बाय मिशीनं दावली. त्ये निस्त बगुनच धाप लागल्यागत झाल्तं मला. पन बयेनं त्या समद्या मिशीनीवर्ती मला वर्ती-खाल्ती, हुबं-आडावं केलं. बाई हाये का कसाई. असा लयी येळा झाल्यावर पार माजा जीव जायला लागला तवा कुटं बया म्हटली, "फिनिस". म्या बी बिगी बिगी "ठोमारो" म्हटलं नी आले घरला. गंगीला त्ये काचंच्या डब्ब्यातलं चारा दिला नी म्या चांगलं वाटीभर तेल मारुन ठेसा, कालवन आन भाकर हानली तवा कुटं जीवात जीव आला. सारं अन्ग निस्त ठनकत व्हतं. दुपारच्याला बारक्यासोबत मस्त तानुन दिली. उटल्यावर मस्तपयकी चा आन दहा पाच भिस्कुट खाल्लं. आत्ता कशी जरा मानसांत आल्यावानी वाटलं.


सांजच्याला आमचं ह्ये घरी आलं. तवा म्या त्येस्नी समदं सांगितलं. मला वाट्लं ह्ये जरा अंग रगडुन देतील पन न्हायी. त्ये निस्तचं वरडत सुटलं. म्हनं गंगीसाटी दिलेलं जेवाण म्याच खायचं. म्या घास खायचं ? निसत्या ईचारानच प्वाट ढवळलं. अवो म्या भल्या घरची ल्येक हाये. पाच्-पन्नास येकर जिमीन हाये माज्या बा ची. बगितल्या बरुबर दिस्ते का न्हाय बागायतदाराची ल्येक. आन म्या घास खायचं ? माझं बी टकुरडं फिर्ल. म्या त्येस्नी सपस्ट सांगित्लं, "म्या त्ये घास खाणार न्हायी आन ज्येमला बी जानार न्हायी. मंग मला कुनी तुमची माय म्हनुदेत न्हायतर बा म्हनुदेत न्हायी तर गनपती बाप्पा म्हनुदेत" !!!!
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी