रोजच्या सारखी बरोबर सहा वाजता तिला जाग आली. डोळे उघडल्याबरोबर आपसूकच मान वळली. अंगावरचे पांघरुण फेकून तो वेडावाकडा पालथा झोपला होता. त्याची ही नेहमीची सवय. कधी कधी झोपेतच तिच्या गळ्यात हात पडत. हात सोडवायला गेले तर त्याची झोप चाळवे. ती मग टक्क छताकडे बघत विचारांच्या माळा गुंफत पडून राही, तो बाजूला होईतो.
तिने त्याचे पांघरुण सारखे केले आणि हलक्या पावलांनी खोलीबाहेर आली. दार बंद करुन सरळ न्हाणीघराचा रस्ता धरला. आवरुन चहा घेऊन झाला तेव्हा आतल्या खोलीत जाग जाणवली. तिने आत डोकावून पाहिले. पांघरुण पुन्हा फेकून देऊन तो आता उताणा झोपला होता. कौतुकाने हसत ती त्याच्या शेजारी जाऊन बसली. त्याच्या निरागस चेहर्याकडे निरखून पाहता-पाहता तिची बोटे त्याच्या केसांतून फिरू लागली. डोळे जरा किलकिले करत त्याने तिच्याकडे कूस वळवली. तिला बघताच ओठ थोडेसे विलग होत सगळ्या चेहर्यावर गोड हसू पसरले. त्याचे विस्कटलेले केस सावरत ती पुन्हा विचारात हरवली.
"झोपेतही किती छान हसला मला बघून. मला माहिती आहे, खूप खूप आवडते मी त्याला. माझा...अगदी माझा आहे तो"
तिला उगीचच लहानपणीचा प्रसंग आठवला. सातवीत असताना एका संध्याकाळी खेळ झाल्यावर आईने तिला गल्लीतल्या मुलांबरोबर खेळायचे नाही असे सांगितले होते. तिच्याच वयाची, तिच्याबरोबर लहानाची मोठी झालेली दिप्या, संद्या, अज्या ही मुलं.
"त्यांच्या बरोबर का नाही खेळायचे ? त्यांच्या बरोबर नाही तर कुणाबरोबर खेळायचे ?"
पुढे कधी तरी असंच मावस भावंडांबरोबर पेरुच्या झाडावर चढून पेरु काढण्याचा खेळ रंगात आलेला असताना मावशीने येऊन रागे भरले होते. झाडावरुन उतरल्यावर फराफरा घरात नेऊन बरंच काही बोलली होती. गोंधळात पडायला झालं होतं अगदी आई-मावशीचं ते वागणं बघून.
"हे तर भाऊ आहेत माझे. मग त्यांच्यासोबत झाडावर चढून पेरु खायला काय हरकत आहे ?"
कॉलेजमध्ये असताना एकदा सगळा ग्रूप कट्ट्यावर चकाट्या पिटत उभा होता. एका मित्राच्या डोक्यात कुठून तरी किडा पडला. ही त्याच्या शेजारीच उभी होती. हिने सांगून त्याला समजेना. एवढा मोठा किडा, उगी चावेल-बिवेल त्याला म्हणून तिने पटकन पुढे होईल हाताने झटकला. त्यासरशी मित्र चटका बसल्यासारखा मागे झाला. त्यानंतर तो आपल्याला टाळतोय, शेजारी उभा राहत नाही असे चांगलेच जाणवले तिला. इतके अपमानास्पद वाटले.
"मित्र ना तू माझा ? मग इतका हक्क नाही माझ्या तुझ्यावर ?"
मग 'तो' भेटला. वाटले हा खरा आपला हक्काचा. पण तो तरी काय रस्ता क्रॉस करताना हात धरला की ह्याला संकोच वाटतो. बरोबर फिरायला गेले की तो आपला दहा पावले पुढेच. एके दिवशी त्याचे मामा-मामी, त्यांचा मुलगा-सून आले होते. सगळ्यांसाठी पोहे करुन, बश्या हातात देऊन झाल्यावर ही जाऊन बसली त्याच्या शेजारी तर तो चक्क कॅमेरा आणायच्या बहाण्याने सरळ उठून गेला.
"लग्नाची बायको ना मी तुझी ? आणि मी केलेय तरी काय ? शेजारी येऊन बसले ना ? तेवढा पण अधिकार नाही का मला ?"
असे काही झाले की तिला क्षुद्रांहून क्षुद्र वाटायचे. चीड यायची. कमालीचे वाईट वाटायचे.
...आणि मग हा आला. आला तो सगळे आयुष्यच व्यापून राहिला.
"असं वाटतं हा खरा माझा. माझ्यातून निर्माण झालेला. ह्याच्याबरोबर कितीही खेळले तरी कोणी रागे भरत नाही. त्याच्या शेजारी काय तो मांडीत असतो किंवा कडेवर असतो माझ्या. त्याच्या केसांतून हात फिरवला की असा खूश होऊन बिलगतो. आता काय आणि अजून किती वर्षांनी काय, माझा पूर्ण हक्क असणार आहे त्याचा चेहरा कुरवाळण्याचा, त्याचे केस सावरण्याचा."
एकदम तिला वाटले बापासारखा उंच झाला तर तिचा हात सुद्धा नाही पुरणार त्याच्या केसांपर्यंत.
"हा असा ताड-माड वाढून मला एकदम लहान करुन टाकेल का ?"
त्या विचारासरशी डोळ्यांच्या कडा ओलसर झाल्या तरी ओठांवर हसू फाकले. हलक्या पावलांनी खोलीच्या बाहेर पडत तिने दार जरासे ओढून घेतले आणि त्याच्यासाठी खीर करायला म्हणून स्वयंपाकघराकडे वळली.