Friday, March 30, 2012

सहावी !

...जीवन मग सहाव्या बहिणीच्या भेटीस आले. उंच उंच भिंती आणि काटेरी कुंपण असलेल्या तिच्या महालात आत जाण्यास वारा धजवेना. जीवन एकटेच आत गेले. कर्मठ भाव विहीन चेहर्‍याची सहावी त्याला सामोरी आली. आत महालात तिच्याच असंख्य प्रतिकृती मेंढरांसारख्या दावणीला बांधल्या होत्या. रिती, परंपरा, धर्म अशी अनेक जोखडे त्यांना घातली होती. त्या जोखडांनी त्या दुर्बल झाल्या होत्या. परंतु त्याचे त्यांना दु:ख नव्हते. त्या आनंदाने तिथे नांदत होत्या. कुणाचे जोखड सैल झाले आहे असे दिसताच दुसरी तत्परतेने ते अधिक करकचून बांधत होती. जीवनाने सहावीला म्हणावे, "मी तुमच्यासाठी भेट आणली आहे."

सहावीच्या प्रतिकृतींनी उत्सुकतेने त्या पेटार्‍याकडे पाहिले. काही आशेने जीवनाकडे धावल्या. परंतु बाकीच्यांनी त्यांचे पाय खेचले, ओरबाडले, बोचकारले. त्या जखमी झाल्या, रक्तबंबाळ झाल्या. काहींनी तेथेच हार मानली, काहींनी मान टाकली तर काही नेटाने जीवनाकडे चालत राहिल्या. त्यांच्या वाटेत होते असंख्य बोचरे काटे पण त्यांनी जिद्द सोडली नाही. कारण जीवनाने त्यांसाठी आणले होते एक मोकळे आकाश आणि विस्तीर्ण क्षितिज...उर भरून श्वास आणि स्वातंत्र्य!!!
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी