Thursday, April 9, 2015

इमॅजिनेशन अप्लाइड : भाग ३

या भागात काही जगभरातल्या प्रसिद्ध इमारती आहेत आणि नंतर पॉल बसी आणि त्यांच्या टीमनं बनवलेले काही नमुने.

आर्क द त्रिओम्फ, फ्रान्स
Mount MorrisChurch.JPG

ओसाका, जपान
Mount MorrisChurch.JPG

पेट्रा, जॉर्डन
Mount MorrisChurch.JPG

पिसाचा झुलता मनोरा, इटली  
Mount MorrisChurch.JPG

हे नमुने
Mount MorrisChurch.JPG

Mount MorrisChurch.JPG

Mount MorrisChurch.JPG

Mount MorrisChurch.JPG

Mount MorrisChurch.JPG

अमेरिकेत बर्‍याच राज्यांमध्ये ही प्रदर्शनं असतात. एकदा तरी अनुभवावं असं हे प्रकरण आहे तेव्हा अवश्य भेट देण्याचे करावे.

~समाप्त~

Wednesday, April 8, 2015

इमॅजिनेशन अप्लाइड : भाग २

या भागात न्यू यॉर्क सिटी आणि आसपास असलेल्या ऐतिहासिक इमारतींच्या प्रतिकृतींची प्रकाशचित्र आहेत.

ओलाना आणि मॉन्टगमरी पॅलेस
Mount MorrisChurch.JPG

सेन्ट पॅट्रिक्स कथेड्रल
Mount MorrisChurch.JPG

बे यार्ड कन्डिक्ट बिल्डिंग
Mount MorrisChurch.JPG

सिटी हॉल
Mount MorrisChurch.JPG

क्रायस्लर बिल्डिंग आणि इतर स्कायस्क्रेपर्स
Mount MorrisChurch.JPG

अपोलो थियेटर
Mount MorrisChurch.JPG

डकोटा बिल्डिंग
Mount MorrisChurch.JPG

ग्रॅन्ट्स टॉम्ब
Mount MorrisChurch.JPG

हॉटेल चेल्सी
Mount MorrisChurch.JPG

जे एफ के एयरपोर्ट
Mount MorrisChurch.JPG

लायब्ररी
Mount MorrisChurch.JPG

मेसिज
Mount MorrisChurch.JPG

ब्रुकलिन ब्रिज
Mount MorrisChurch.JPG

माउन्ट मॉरिस चर्च
Mount MorrisChurch.JPG

म्युझियम ऑफ आर्ट
Mount MorrisChurch.JPG

ओल्ड यॅन्की स्टेडियम
Mount MorrisChurch.JPG

पेन स्टेशन
Mount MorrisChurch.JPG

सायरॅकस सिटी हॉल
Mount MorrisChurch.JPG

अनामिका
Mount MorrisChurch.JPG

काही जवळून घेतलेली छायाचित्र
Mount MorrisChurch.JPG

Mount MorrisChurch.JPG

Mount MorrisChurch.JPG

एक डॉक्युमेंटरी : ट्रेझर्स ऑफ न्यु यॉर्कक्रमशः

इमॅजिनेशन अप्लाइड : भाग १

"हडसन व्हॅली, नदीच्या किनार्‍याला अगदी खेटून असलेला ट्रेन ट्रॅक, लाकडी पूल, ट्रॅकवर धावणार्‍या आणि पुलाच्या बरोबर मध्यभागी आल्या की एकमेकींना जणू छेदत जाणार्‍या दोन ट्रेन्स आणि 'ऑल अबोsssर्ड' हाकारा देणारा खर्राखुर्रा इंजिन ड्रायव्हर."

 लहान मुलांना आवडेल असा ट्रेन शो आहे एवढ्या माहितीवर न्यू यॉर्क सिटीतलं बॉटनिकल गार्डन गाठलं. भन्नाट पळणार्‍या मॉडेल ट्रेन्स असतील, सणासुदीचे दिवस असल्यानं ट्रॅक्सच्या आजूबाजूनं रेन्डियर्स असतील, लाल-हिरव्या दिव्यांची सजावट असेल आणि शो संपतो तिथे 'फोटो विथ सँटा' आणि एक गिफ्ट शॉप असेल अशा अपेक्षेनं गेलो होतो. अशा ठिकाणी सहसा दिसणारी जनता म्हणजे जोडीनं किंवा एकेकटे आलेले पालक, त्यांचं बोट धरून किंवा सोडून पुढं पळणारी कार्टी, स्ट्रोलरमध्ये पॅसिफायरच्या दुनियेत रममाण बाळं, आजी-आजोबांसोबत आलेली काही मुलं आणि  आतापासूनच अनुभव घेण्यास आतूर प्रेग्नंट जोडपी. त्या दिवशी बरीच विजोड जनता दिसली. गटागटानं आलेली जरा मोठ्या वयातली मुलं होती. प्रो-कॅमेरे घेऊन आलेले जीव होते. लोकल टीव्ही चॅनलची व्हॅन होती. जरा उत्सुकतेनंच रांगेत जाऊन उभं राहिलो. बॉटनिकल गार्डनच्या 'एनिड हॉप्ट कॉन्सरवेटरी'मध्ये शो होता. आत प्रवेश केल्या केल्या सुरुवातीला वर्णन केलेलं दृश्य नजरेस पडलं. त्या धावणार्‍या ट्रेन्सपेक्षाही आमचं लक्ष वेधून घेतलं ते मागे उभ्या असणार्‍या इमारतींनी. एक होती, 'मॉन्टगमरी पॅलेस' आणि दुसरी 'ओलाना'. पुढे चालायला सुरुवात केली तेव्हा अशाच आणखी इमारती होत्या. सेंट पॅट्रिक्स कथेड्रल समोर आलं तेव्हा एकदम उपरती झाली. या सगळ्या न्यू यॉर्क सिटीतल्या ऐतिहासिक इमारती. आता जरा बारकाईनं बघायला सुरुवात केली. प्रत्येक इमारतीची अगदी हुबेहूब प्रतिकृती बारीकसारीक तपशिलांसह उभी केलेली. बॉटनिकल गार्डनमध्ये सिमेंटचं जंगल? अहं! बांधकामासाठी वापरलेला कच्चा माल एकदम नैसर्गिक. झाडांची वाळलेली पानं, काटक्या, खोडाच्या साली, बिया, फुलांच्या पाकळ्या, पाइन कोनं. कधी प्रत्यक्ष बघायला जाल तर या इमारती आपले सौंदर्य मिरवत अगदी दिमाखात उभ्या असलेल्या दिसतात. त्या दिमाखाला, त्यांच्या सौंदर्याला अजिबात धक्का न लावता एक अद्भुत नगरी इथे वसवलेली दिसत होती. प्रतिकृती आहेत किंवा नैसर्गिक घटकांपासून बनवल्या आहेत म्हणून अजिबात तडजोड न करता.

एकदा भारतात गेले असताना धाकट्या बहिणीनं तिच्या कंपनीत भरलेल्या प्रदर्शनातून आणलेली दोन फ्रीज मॅग्नेट्स मला भेट दिली होती. ती 'इको फ्रेंडली' मॅग्नेट्स अशीच संपूर्णपणे नैसर्गिक साहित्य- वाळलेली पानं, काटक्या, इ.- वापरून बनवलेली. त्यामुळे असा काही कलाप्रकार अस्तित्वात आहे हे माहिती होतं. पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर केला जातो याची तसूभर सुद्धा कल्पना नव्हती. तिथे लिहिलेले फलक आणि नंतर मिळालेली माहितीपत्रकं वाचून समजलं की या मायानगरीचे शिल्पकार आहेत पॉल बसी आणि त्यांची 'अप्लाइड इमॅजिनेशन' कंपनी. तेवढ्यावर उत्सुकता शमली नाही म्हणून घरी आल्यावर गुगल आजोबांना शरण गेले. तेव्हा समजलं की बॉटनिकल गार्डनमध्ये वीस वर्षांहून अधिक काळ हे प्रदर्शन भरतं. शंभरेक ऐतिहासिक इमारती किंवा 'मॉन्युमेंट्स'पासून सुरुवात करून आता दीडशेहून अधिक स्थापत्यसौंदर्याचे नमुने इथे मांडलेले असतात. दर वर्षी दोनेक लाख प्रेक्षकसंख्या प्रदर्शनाला लाभते. आधी सांगितल्या प्रमाणं हा लॅंडस्केप बनवताना शक्य तेवढ्या नैसर्गिक घटकांचा वापर केलेला असतो. स्वतः पॉल बसिंना त्यांनीच निर्माण केलेल्या 'गार्डन रेलरोड लँडस्केपस्'पैकी सर्वाधिक आवडणारं हे प्रदर्शन अक्षरशः आमच्या शेजारात म्हणावं इतक्या जवळ असताना आम्हाला ऐकून सुद्धा माहिती नव्हतं. Ignorance is not always bliss!

पॉल बसिंना लहानपणापासून ट्रेन्सचं भयंकर आकर्षण होतं असं वाचण्यात आलं. तरुणपणी आपल्या गाडीत बसून एका क्रॉसिंगपासून दुसर्‍या क्रॉसिंगपर्यंत रेल्वेगाड्यांचा पाठलाग करण्याचा वेडा नाद होता. निसर्गाची ओढही होतीच. फार थोडे लोकं आपल्या छंदाचा त्यात आयुष्य घडवण्याइतका पाठपुरावा करतात. पॉल बसी त्यांच्यापैकीच एक. म्हणूनच लॅंडस्केप आर्किटेक्ट बनण्याचा निर्णय त्यांनी घेतला असावा. रेल्वेसारख्या यांत्रिक गोष्टीविषयी वाटणारं आकर्षण आणि निसर्गाची आवड याचा संगम साधत 'गार्डन रेलरोड लँडस्केप'ची अनोखी कल्पना पॉल बसिंनी थोडी अपघातानंच अस्तित्वात आणली आणि ती प्रचंड लोकप्रिय झाली. इतकी की 'बिग अ‍ॅपल'च्या तेव्हाच्या गर्वर्नरांनी स्वतः फोन करून पॉल बसिंना बॉटनिकल गार्डनमध्ये ही मिनिएचर दुनिया बसवण्यासाठी आमंत्रित केलं. आजवर शेकडो नव्या-जुन्या इमारतींच्या प्रतिकृती त्यांनी घडवल्या आहेत. सगळ्याच इमारती प्रसिद्ध नाहीत, काही फारशा माहितीत नसलेल्या परंतू स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असलेल्या इमारती पण आहेत. पार्किन्सन्ससारख्या हालचालींवर मर्यादा आणणार्‍या ठकाशी गाठ पडल्यावरसुद्धा त्यांची कलानिर्मिती थांबलेली नाही. आता मुलगा, पुतण्या आणि त्यांच्या 'इमॅजिनेटिव्ह' टीमच्या साथीनं हे काम सुरूच आहे आणि राहील.

इंजिनाच्या धुडामागं शिस्तीत, एका लयीत, नजाकतीनं धावणारी रेल्वे दृष्टीस पडली की बघतच राहावीशी वाटते. वयाच्या कुठल्याही टप्प्यावर असलो तरी आपल्या मनावर मोहिनी घालण्याचं कसब या धावत्या रागिणीकडे आहे. तसं बघायला गेलं तर ट्रेन्स म्हणजे मानवी इतिहासातला प्रगतीचा मोठा टप्पा. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून बनवलेल्या यंत्रांच्या साहाय्याने आयुष्य सुकर करण्याच्या दिशेनं टाकलेलं वामन पाऊल. इतर कुठलीही लहान-थोर यंत्र बघा. ती शक्तिशाली असतील, त्यांची जडणघडण अगदी भुरळ पडावी अशी असेल पण ती उचलून निसर्गात नेऊन ठेवली तर अतिशय विजोड वाटतील, सृष्टीसौंदर्याचा र्‍हास करणारी वाटतील. रेल्वे (आणि पवनचक्की) मात्र याला अपवाद म्हणावी अशी. अगदी धूर ओकणारं इंजिन असलं तरी घाटातून, नदी काठानं, माळरानातनं, भाताच्या शेतांमधून, छोट्या-मोठ्या पुलांवरून धावणारी रेल्वे त्या-त्या ठिकाणचं सौंदर्य खुलवते. A perfect complement to its beauty! म्हणूनच एम्पायर स्टेट, सिटी हॉल आणि पेन स्टेशनसारख्या इमारतींच्या पार्श्वभूमीवर तळहाताएवढ्या रुंदीच्या रुळांवरून बुटक्या झाडांची गर्दी कापत पळणार्‍या ट्रेन्स बघताना भान हरपतं. मॅनहॅटनच्या त्या गल्ल्यांमधून फिरताना मनुष्याचा सतत नवे शोध लावत यांत्रिकीकरणाचा चाललेला अट्टहास, कलानिर्मितीत गुंतलेले त्याचे हात आणि निसर्गाशी लगट करण्याची वृत्ती पुनःपुन्हा सामोरे येत राहतात आणि विस्मयात पडायला होतं.

मी काढलेली काही प्रकाशचित्र इथे देतेय. सगळ्या चित्रांना नावं दिलेली नाहीत कारण बर्‍याच इमारती बघितलेल्या नाहीत. तसेच सगळ्याच फोटोंमध्ये नावं आलेली नाहीत त्यामुळे जरा शोधाशोध करून प्रत्यक्ष इमारतीचा फोटो आणि प्रतिकृतीचा फोटो अशा जोड्या जुळवून काही नावं दिलीत. एखादी जोडी चुकली असेल तर कृपया तसं सांगा. बाकी बॉटनिकल गार्डनचं अंगण अंमळ वाकडंच आहे हे ध्यानात ठेवूनच प्रकाशचित्र बघा.

Mount MorrisChurch.JPG

 Mount MorrisChurch.JPG

Mount MorrisChurch.JPG

Mount MorrisChurch.JPG

Mount MorrisChurch.JPG

Mount MorrisChurch.JPG

पॉल बसिंवर न्यू यॉर्क टाइम्समध्ये आलेला एक लेख आणि हा वॉशिंगटन पोस्टमध्ये आलेला लेख. दोन्ही लेख वाचनीय आहेत. पॉल बसिंविषयी, त्यांच्या कामाविषयी आणि आजवरच्या प्रवासाविषयी बरीच माहिती यात मिळते.

अप्लाइड इमॅजिनेशनचं अधिकृत संकेतस्थळ आणि त्यांचा ब्लॉग. या दोन्ही दुव्यांवर ठिकठिकाणच्या प्रदर्शनांचे फोटो बघायला मिळतील. त्यांच्या चमूची ओळख पण वाचायला मिळेल.
क्रमशः

Saturday, March 21, 2015

नूतन वर्षाभिनंदन!!!

गुढीपाडव्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा! नवे वर्ष तुम्हाला आणि तुमच्या आप्तस्वकीयांना आनंदाचे आणि सुखसमाधानाचे जावो. नवे वर्ष, नवी स्वप्न, नव्या आशा, नव्या आकांक्षा सफल होवोत.

ब्लॉगनं आज मैलाचा दगड गाठला त्यामुळे यंदाचा पाडवा आमच्यासाठी विशेष म्हणायचा. पाच वर्ष आणि पाच दिवस!

गुढीपाडव्यानिमित्त लोकसत्तेनं छापलेला लेख, वाचनीय आहे-  चष्टनाने सुरू केले शालिवाहन शक

Friday, March 13, 2015

QSQT आणि आमची नेतृत्व भरारी

'QSQT' रिलीज झाला तेव्हा मी नाबालिग होते त्यामुळे अर्थातच चित्रपट बघायची परवानगी मिळाली नाही. तेव्हा कॉलनीतल्या एक काकू चित्रपट बघून आल्यावर आमीर खान 'लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट' मटेरियल आहे असं महिलामंडळास सांगत असताना मी घरचा अभ्यास करता-करता चुकून(च) ऐकलं होतं. 'लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट' या संज्ञेशी ती पहिली चोरटी भेट. असो, नंतर अनेक वर्षांनी चित्रपट दूरदर्शनवर दाखवणार होते. तोपर्यंत मी अशा 'भूतो न भविष्यती' संधीचा फायदा घ्यायचा असेल तर फिजिक्ससह इतर सर्व लेक्चर्स 'बंक' मारून घरी जाणे आवश्यक आहे हा निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घेण्याइतकी बालिग झाले होते. खरं तर वर्गातल्या सगळ्याच मुलींनी लेक्चर्स बुडवायची ठरवलं होतं. दिवसाच्या सुरुवातीची काही लेक्चर्स उरकून मधली सुट्टी झाल्यावर आम्ही बोचकी आवरली आणि गुमान पार्किंगचा रस्ता धरला. कशी कुणास ठाऊक पण मी सगळ्या गँगच्या पुढे चालत होते (उपजत नेतृत्वगुण हो, दुसरं काय!). आमच्या फिजिक्सच्या शिंदे सरांनी नेमका तो नजारा बघितला. सर भयंकर कडक. त्यात त्यांच्या हातात प्रॅक्टिकलचे मार्क्स असायचे. त्यांचा तास पण बुडणारच होता. ते तास घ्यायला वर्गावर गेले तेव्हा वर्गात बसून राहिलेल्यांनी सरांकडे पद्धतशीर चुगली केली. शिंदे सरांच्या गुड बुक्समध्ये जाण्याची संधी त्यांनी तरी का सोडावी? सरांनी आम्हाला बघितलं तर होतंच आता सगळी गँग कुठे गेली हे सुद्धा त्यांना समजलं. आमचं कॉलेज रयत शिक्षण संस्थेचं. बरेचसे शिक्षक सातारा भागातले होते. शिंदे सर पण सातार्‍याचेच. हुशार होते, विषय चांगला शिकवायचे त्यामुळे आमच्या वर्गाला शिंदे सर फिजिक्स शिकवणार समजल्यावर आनंद आणि भिती दोन्ही वाटलेलं कारण सर कडक होते खूप, उदाहरणं सोडवण्यात एखादी स्टेप गाळली-चुकली की उभं करून सगळ्या वर्गासमोर टाकून बोलायचे, मुलांना तर खूपच बोलायचे, मूड असेल तर मिश्किल बोलून सगळ्या वर्गाला हसवायचे, चाचणी पेपर चांगला सोडवला की पेपर हातात देताना नुसतं 'हं!' एवढंच म्हणायचे. कौतुकाची परिसीमा म्हणजे टॉपरचा पेपर गठ्ठ्यात सगळ्यात वर ठेवून आणायचे आणि 'टॉपरला पैकीच्या पैकी मार्क्स आहेत' असं सांगून पेपर बाजूला ठेवायचे. मग सगळ्यात शेवटी त्या टॉपरला पेपर मिळायचा, वर्गाला कळायचं टॉपर कोण आहे. एकुणात शिंदे सरांची बर्‍यापैकी दहशत वाटायची. त्यांनी आम्हाला पळून जाताना बघितलं आहे आणि त्यामागचं कारण त्यांना समजलं आहे हे जर आधी कळतं तर आम्ही कुणीच उरलेलं वर्षभर त्यांच्यासमोर उभं राहायची हिंमत केली नसती. अज्ञानातलं सुख फार काळ उपभोगायला मिळालं नाही. दुसर्‍या दिवशी सर वर्गात आले तेच भयंकर चिडलेली, खुनशी वाटेल अशी नजर घेऊन. हजेरी घेतली, मला नीट आठवत असेल तर हजेरी घेताना मुलींची नावं आली की 'आलात का?' असं विचारत जळजळीत नजरेचा प्रसाद वाटत होते. हजेरी झाल्यावर त्यांनी निवांतपणे मस्टर बंद केलं, एक थंड नजर सगळ्या वर्गावर फिरवली, मुलींच्या दिशेने दोन क्षण रोखून बघितलं आणि आपल्या सातारी लयीत मोठ्यानं म्हणाले, 'तृप्ती आवटीच्या नेतृत्वाखाली पळून गेलेल्या सर्वच्या सर्व लेडीज उभ्या राहा'. सगळ्या वर्गात खसखस पिकली. आणि मग अचानक इतक्यावेळचा सगळा चिडका आवेश सोडून त्यांनी अतिशय विनोदी ढंगात आमची यथेच्छ शाब्दिक धुलाई केली. उभ्या नसलेल्या उर्वरित वर्गानं भरपूर मजा घेतली हे ओघानं आलंच. आज एका मैत्रिणीनं कशावरून तरी 'QSQT' ची आठवण काढली आणि विसरायला झालेला हा प्रसंग अचानकच आठवला.

Saturday, February 7, 2015

व्हॅलेंटाइन्स डे बुकमार्क्स

इथल्या शाळांमध्ये सारख्याच 'क्लासरूम पार्ट्या' असतात. प्रत्येक वेळी १८-२० लहान मुलांसाठी भेटवस्तू काय पाठवाव्या हा प्रश्नच असतो. वर्गशिक्षिकांनी पाठवलेली फार मोठं नको, फार महाग नको, धारदार नको, टोकदार नको, नटी नको, शुगरी नको अशी बरीच मोठी यादी असते. त्यात आमची भर म्हणजे त्यातल्या त्यात उपयोगी हवं. मग सारखीच अनुभवी आयांना साकडी घालावी लागतात. हा असाच एका मैत्रिणीने सुचवलेला लेमन्या आणि लेमनांना सहज करता येईल असा एक प्रकार- बुकमार्क्स!

०. तुम्हाला हँड असल्यास सुंदर हँडमेड कागदांवर चित्र काढू शकता. हँड नसलेल्यांनी क्लिपआर्ट, आपल्याकडे असलेले फोटो इ. वापरावे.

१. लेकाने शाळेत किंवा घरी केलेल्या हस्तकलेची प्रकाशचित्र होती. मी त्याचेच काही भाग बुकमार्क्स बनवण्यासाठी वापरले. जो भाग वापरायचा तो पेंटमध्ये (MS Paint) एका कोर्‍या पानावर कट-पेस्ट केला.

२. त्या कोर्‍या चित्राला साधारण बुकमार्कची लांबी-रुंदी दिली. हे पेंटमधून कॉपी केलेले चित्र वर्ड (MS Word) डॉक्युमेंटमध्ये पेस्ट केले असता खूपच मोठे दिसत होते म्हणून पेंटमध्ये लांबी-रुंदी आणखी कमी करून घेतली.

३. वर्ड डॉक्युमेंटमध्ये चित्र चिकटवल्यावर इन्सर्ट शेप, फॉर्मॅट शेप हे पर्याय वापरून त्यात रेघा, हार्ट शेप्स, स्मायली टाकले. रंग भरले, किनारी काढल्या.


४. एका 'पोट्रेट' पानावर साधारण तीन बुकमार्क्स बसतात.

५. वर्ड डॉक्युमेंट घरातल्या प्रिंटरवर छापले आणि ती पानं लॅमिनेट करून आणली.

६. बुकमार्कचे आकार कापून घेतले. वरच्या बाजूला दोरा अडकवण्यासाठी पंचिंगने छोटे छेद दिले.  बुकमार्कवरच्या रंगसंगतीला साजेसा दोरा बांधला आणि बुकमार्क तयार झाले.


अधिक टिपा:
१. पेंट, वर्ड ऐवजी पावरपॉइंट किंवा पब्लिशर वापरून अधिक चांगले 'प्रोफेशनल' बुकमार्क बनवता येतील.
२. कुठलेही टूल वापरले तरी पानाचे सेटिंग 'लॅंडस्केप' ठेवल्यास एका पानावर जास्त चित्र मावतील.
३. बुकमार्क्स लॅमिनेट करायच्या आधीच कापले तर एका लॅमिनेशन पाउचमध्ये जास्त बुकमार्क्स मावतील. नंतर लॅमिनेट केलेला कोरा भाग वाया जाणार नाही.
४. साध्या प्रिंटर पेपरवर पानभरून बबल्स, हार्ट्स टाकले आणि दोन्ही बाजूंनी प्रिंट केले तर मागचा भाग कोरा राहणार नाही.
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी