Tuesday, January 18, 2011

भाकरीचे लाडू

एक गरीब कुटुंब. जेमतेम हाता-तोंडाची गाठ पडणारं. सणवारास सुद्धा पोटभर जेवायला मिळालं तरी खूप, गोडधोड करणं तर दूरच. नवरा-बायको, दोन-तीन मुलं. सगळ्यात मोठी मुलगी. ह्या कुटुंबात  कुठल्या तरी एका सुदिनी सगळ्यांची जेवणं झाल्यावर तीन-चतकोर भाकरी उरते. दुसर्‍या दिवशी मुलांना न्याहरी होणार म्हणून आईला बरे वाटते. पण सकाळी उठून बघते तर काय भांड्यात भाकरी नसतातच. आदल्या रात्री  सगळे झोपल्यावर थोरलीला माजघरात जाताना तिने बघितलेले असते. रात्री तिनेच भाकरी खाल्ल्या असाव्यात अशा समजातून आई रागे-रागे मुलीला काही बाही बोलते.  दुपारच्या जेवणात थोरली आईच्या पानात लाडू वाढते. त्या दिवशी कुठला तरी सण असतो आणि ते हिने लक्षात ठेवून आदल्या रात्रीच गूळ-भाकरीचे लाडू करून ठेवलेले असतात. आईच्या उरात लेकीविषयी अभिमान दाटून येतो. थोरलीमुळे कुटुंबाला गोडाचं जेवण घडतं.

लहानपणी आई आम्हाला बर्‍याच गोष्टी सांगायची, त्यातली ही एक. गोष्ट ऐकल्यानंतर थोरलीतल्या 'आदर्श मुली'ची मला फारच भुरळ पडली होती. त्यापेक्षा जास्त खुणावत होते भाकरीचे लाडू. ते खाण्याची फारच इच्छा होत होती. आईकडे एकदा  भाकरीच्या लाडवांची मागणी करून  बघितली.  पण गोष्टीची एकूण पार्श्वभूमी बघता आईला ती कल्पना फारच अभद्र वाटली असावी. तिने अगदी 'धुडकावून लावणे' ची प्रचिती  देत आणि आमची 'विशिष्ट' लक्षणे उद्धरत नकार दिला. तरी आम्ही भाकरीच्या लाडवांचं टुमणं सोडलं नाही. शेवटी आईने परवानगी दिली. उत्साहात भाकरी कुस्करायला घेतली पण भाकरी हाताने पोळीसारखी  कुस्करली जात नाही हे लक्षात आले. मग आईने आम्हाला मिक्सर मधून भाकरी बारीक करून दिली. आईनेच त्या चुर्‍यात तूप आणि गूळ घालून झकास लाडू वळले.  मस्तच लागले असणार कारण त्यानंतर आम्ही बरेचदा ते लाडू केले. बाजरीची भाकरी, तूप, गूळ हे जिन्नस आमच्या पोटात जाताएत बघून आईने पण  मना नाही केले.

आज कुठे तरी भाकरी बद्दल लेख वाचला आणि एकदम हे भाकरीचे लाडू आठवले.
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी