एक गरीब कुटुंब. जेमतेम हातातोंडाची गाठ पडणारं. सणवारास सुद्धा पोटभर जेवायला मिळालं तरी खूप, गोडधोड करणं तर दूरच. नवरा-बायको, दोन-तीन मुलं. सगळ्यात मोठी मुलगी. ह्या कुटुंबात कुठल्या तरी एका सुदिनी सगळ्यांची जेवणं झाल्यावर तीन-चतकोर भाकरी उरते. दुसर्या दिवशी मुलांना न्याहरी होणार म्हणून आईला बरे वाटते. पण सकाळी उठून बघते तर काय भांड्यात भाकरी नसतातच. आदल्या रात्री सगळे झोपल्यावर थोरलीला माजघरात जाताना तिने बघितलेले असते. रात्री तिनेच भाकरी खाल्ल्या असाव्यात अशा समजातून आई रागे-रागे मुलीला काही बाही बोलते. दुपारच्या जेवणात थोरली आईच्या पानात लाडू वाढते. त्या दिवशी कुठला तरी सण असतो आणि ते हिने लक्षात ठेवून आदल्या रात्रीच गूळ-भाकरीचे लाडू करुन ठेवलेले असतात. आईच्या उरात लेकीविषयी अभिमान दाटून येतो. थोरलीमुळे कुटुंबाला गोडाचं जेवण घडतं.
लहानपणी आई आम्हाला बर्याच गोष्टी सांगायची, त्यातली ही एक. गोष्ट ऐकल्यानंतर थोरलीमधल्या 'आदर्श मुली'ची मला फारच भुरळ पडली होती. त्यापेक्षा जास्त खुणावत होते भाकरीचे लाडू. ते खाण्याची फारच इच्छा होत होती. आईकडे एकदा भाकरीच्या लाडवांची मागणी करुन बघितली. पण गोष्टीची एकूण पार्श्वभूमी बघता आईला ती कल्पना फारच अभद्र वाटली असावी. तिने अगदी 'धुडकावून लावणे' ची प्रचिती देत आणि आमची 'विशिष्ठ' लक्षणे उद्धारत नकार दिला. तरी आम्ही भाकरीच्या लाडवांचं टुमणं सोडलं नाही. शेवटी आईने परवानगी दिली. उत्साहात भाकरी कुस्करायला घेतली पण भाकरी हाताने पोळीसारखी कुस्करली जात नाही हे लक्षात आले. मग आईने आम्हाला मिक्सर मधून भाकरी बारीक करुन दिली. आईनेच त्या चुर्यात तूप आणि गूळ घालून झक्कास लाडू वळले. मस्तच लागले असणार कारण त्यानंतर आम्ही बरेचदा ते लाडू केले. बाजरीची भाकरी, तूप, गूळ हे जिन्नस आमच्या पोटात जाताएत बघून आईने पण मना नाही केले.
आज कुठे तरी भाकरी बद्दल लेख वाचला आणि एकदम हे भाकरीचे लाडू आठवले.



4 टिप्पणी(ण्या):
मी सुद्धा खाल्ले आहेत लहानपणी.
बालपण आठवलं... :)
भाकरीच्या लाडवांची गोष्ट शाळेत मराठीच्या पुस्तकात होती बहुतेक ... ‘पाडवा गोड झाला’ असं नाव होतं गोष्टीचं. :)
राजेंद्र, नागेश, गौरी :)
गौरी, माझ्या एका मैत्रिणीला होती ती गोष्ट धडा म्हणून. आईने माझ्या आत्यांच्या पुस्तकात वाचली असेल कदाचित. कारण आई शाळेत होती तेव्हा अभ्यासक्रम अजून वेगळा असणार.
Post a Comment