Monday, October 24, 2011

एका प्रेमाची गोष्ट

एक डॉलर आणि सत्यांशी सेंट्स. बास ! त्यातले सुद्धा साठ सेंट्स नुसतीच एक एक पैशाची सुट्टी नाणी. कधी वाण्याशी, कधी भाजीवाल्याशी आणि कधी बेकरीत घासाघीस करुन त्यातला एक एक पैसा  जमला होता. डेलाने ते पैसे तीन तीन वेळा मोजले. एक डॉलर आणि सत्याएंशी सेंट्स. क्रिसमस एक दिवसावर येऊन ठेपला होता. अतीव दु:खात  डेलाने तिथल्या जुन्या जीर्ण सोफ्यावर झोकून देत हुंदक्यांना वाट करुन दिली. याखेरीज ती करु तरी काय शकत होती. आयुष्य हे असेच सुख दु:खानी विणलेले असते ह्याची टळटळीत शिकवणच तिला मिळत होती जणु. सुख थोडे आणि दु:ख भारी !

तिच्या घराची अवस्था तर बघण्यासारखी झाली होती. आठवड्याचे आठ डॉलर भाडं असलेल्या त्या घरात दारिद्र्य एक एक पायरी उतरून आत येत होते. घरात असलेल्या सामानसुमानामुळे अगदी दळभद्री नाही म्हणता येणार पण तरी गरीबीच्या खुणा जागोजागी दिसत होत्या. दारातून आत येणार्‍या बोळकांडातल्या टपालपेटीने गेल्या कित्येक दिवसांत पत्र बघितले नव्हते, ना तिच्या शेजारची घंटी कुणी वाजवली होती. तिथेच मिस्टर जेम्स डिलिंघम ह्यांच्या नावाची पाटी लटकत होती. डिलिंघम!!! जे नाव एकेकाळी  अतिशय ख्यातनाम  होते ! जेव्हा आर्थिक सुबत्तेच्या काळात त्या घराचे भाडे आठवड्याला तीस डॉलर होते! आता पगारच आठवड्याला २० डॉलर होता, तेव्हा त्या नावाचे फक्त "डी" असे सुटसुटीत  रुपांतर करावे असा त्यांचा विचार होता. डेला त्यांना 'जिम' म्हणे. जेव्हा मि. जेम्स डिलिंघम यंग त्या दुसर्‍या मजल्यावरच्या घरी येत तेव्हा डेला म्हणजेच मिसेस डिलिंघम अतिशय प्रेमाने  त्यांचे स्वागत  करे. एकूण हे असे होते !

डेलाने रडं आवरलं आणि चेहरा रडवेला दिसु नये म्हणून तोंडावर पावडर फासली. मग उदास चेहर्‍याने खिडकीत उभी  राहून ती  मागच्या अंगणातल्या कुंपणावरुन चालणार्‍या एका राखाडी मांजरीकडे बघत राहिली. दुसर्‍या दिवशी क्रिसमस होता आणि जिमसाठी भेटवस्तु घेण्याकरीता तिच्याकडे फक्त एक डॉलर आणि  सत्याएंशी  सेंट्स होते. महिनोन् महिने एकेका पैशाची काटकसर केल्यावर ही एवढीच शिल्लक उरली होती. आठवड्याला वीस डॉलर पगारातुन कितीसे उरणार म्हणा! तिच्या अंदाजापेक्षा खर्च बराच जास्त होत होता. त्या एक डॉलर सत्याएंशी पैशात जिमसाठी एखादी छान भेटवस्तु घेता येइल ह्या विचारात तिने तासन् तास घालवले होते. जिम ! तिला त्याच्यासाठी काही तरी मस्त, एकदम अनोखी, दुसर्‍या कुणाकडे नसेल अशी दुर्मीळ भेटवस्तु घ्यायची होती. जिमकडे अगदी शोभून दिसेल अशी एखादी वस्तू.

डेला उभी होती त्या खोलीतल्या खिडक्यांमध्ये छोटे छोटे आरसे लावले होते. एखादी अगदी बारीक चवळीची शेंगच त्या लांबुळक्या काचांमध्ये एकामागून एक पडणार्‍या प्रतिबिंबांत स्वतःची पूर्ण  प्रतिमा बघु शकेल असे आरसे. बारीक चणीची डेला सवयीने ह्या कलेत पारंगत झाली होती. काही तरी  जाणवून एकदम एक गिरकी घेत ती आरशासमोर उभी राहिली आणि झर्रकन तिने लांबसडक केस मोकळे  सोडले, पूर्ण मोकळे ! आरशात स्वतःकडे बघताना तिचे डोळे आनंदाने लकाकत होते....आणि क्षणभरात चेहर्‍याचा नूर साफ उतरला होता. 

ज्याचा अभिमान वाटावा अशा दोनच गोष्टी मिस्टर जेम्स डिलिंघम यंग ह्यांच्या आयुष्यात होत्या. त्यांच्या वडिलांना त्यांच्या आजोबांकडून मिळालेले एक पिढिजात सोन्याचे घड्याळ आणि दुसरी गोष्ट म्हणजे डेलाचा सुंदर केशसंभार! त्यांच्या समोरच्या घरात रहात असती, तर साक्षात क्वीन शीबाला देखिल खिडकीत  उभ्या डेलाच्या विपूल केशसंभारापुढे तिची सर्व संपत्ती फिकी वाटली असती. आणि...आणि प्रत्येक वेळी जिमचे घड्याळ बघून, तळघर भरुन संपत्ती असलेल्या राजा सोलोमनने मत्सराने दाढीचे केस उपटले असते ! 

डेलाच्या  सोनेरी केसांच्या लडी  अवखळ  निर्झरासारख्या दिसत होत्या. गुढग्याच्याही खाली पोचणारे ते  सोनेरी कुंतल म्हणजे तिने ल्यायलेले मऊ मुलायम वस्त्रच जणु. थोड्याशा अधीरतेने...थोड्या घाईतच डेलाने केस विंचरले. आणि एक क्षण तिथेच अगदी स्तब्ध उभी असताना सुद्धा दोन चुकार अश्रु खाली अंथरलेल्या जुनाट लाल  गालिच्याला बिलगले.

जुन्या तपकिरी कोटवर जुनीच तपकिरी टोपी चढवत झरझर जिना उतरुन स्कर्ट उडवत डेला तरातरा रस्त्यावर चालु लागली तेव्हाही तिच्या डोळ्यांतली लकाकी कायम होती !!!

'आमचे येथे सर्व प्रकारचे विग मिळतील.  प्रोपा. सोफ्रोनी' अशी पाटी दिसल्यावरच ती थांबली.  जाडजुड, गोरीपान, थंड चेहर्‍याची ती म्हातारी कुठल्याच बाजुने 'सोफ्रोनी' वाटत नव्हती.
"माझे केस घ्याल तुम्ही ?" डेलाने विचारले.
"तेच तर विकत घेतो आम्ही. जरा टोपी काढ तुझी, बघु देत कसे आहेत."
सोनेरी लडी सरसरत उलगडल्या.
"वीस डॉलर देइन"  सराईत हातांवर तिचा केशसंभार तोलत बाई  म्हणाल्या.
"ठीक आहे. लवकर  द्या."

पुढचे दोन तास डेला नुसती हवेत तरंगत होती. जिमच्या  भेटवस्तूसाठी बरीच दुकानं धुंडाळल्यावर अखेरीस  तिला ती सापडली. नक्कीच तिच्या जिमसाठीच घडवली गेली होती. सगळी दुकानं अक्षरशः पालथी घातल्यावर देखील तिला  असं अनोखं काही कुठेच दिसलं नव्हतं. एक सुंदर, सुकुमार, प्लॅटिनमची घड्याळ लावण्याची चेन ! बघताक्षणी नजरेत भरावी अशी! कुठल्याही आभुषणांशिवाय मुळच्या सौंदर्याने झळाळुन उठलेल्या सौंदर्यवतीसारखी! त्या घडाळ्यापेक्षा बहुमुल्य!  ही चेन असायलाच हवी जिमकडे! ती चेन बघितल्याक्षणी तिला अगदी मनापासून वाटलं. ती चेन  त्याच्यासारखीच तर होती- साधी पण तेजस्वी! पुरते एकवीस डॉलर त्या चेनसाठी मोजल्यावर उरलेले सत्त्याएंशी  सेंट्स घेऊन डेला घाईने घरी परतली.  डेलाची खात्री होती, ही  चेन आणि ते घड्याळ बरोबर असताना जिमला जळीस्थळी वेळेचे भान राहील. कारण घड्याळ कितीही महागडे असले तरी त्याला लावलेल्या जुनाट लेदरच्या पट्ट्यामुळे वेळ बघायची वेळ आली तर जिम अगदी हळुच कळेल न कळेलशी नजर घड्याळ्यावर टाकत असे.

घरी पोचेपर्यंत थोडी शांत झाल्याने डेलाच्या डोक्यातल्या विचारांना वाट मिळाली. तिने केस कुरळे करण्यासाठी  असलेली खास इस्त्री बाहेर काढली आणि गॅस पेटवला. प्रेमासाठी केलेल्या त्यागाच्या दुष्ट खुणा मिटवायच्या म्हणजे सोपे काम नव्हे. हे करायला तिला हजार हत्तींचे बळ लागणार होते ! पण अर्ध्या पाउण तासातच तिच्या डोक्यावर छोट्या छोट्या कुरळ्या केसांनी दाटी केली. एखाद्या मस्तवाल तरुण मुलासारखी डेला दिसत होती. त्या लांबुळक्या आरशांमध्ये स्वतःचे प्रतिबिंब बारकाईने बघत ती उभी राहिली. "मला या रुपात बघताक्षणी त्यानं माझा गळा दाबला नाही, तर तो नक्कीच मी कोनी आयलंडवरील कोरस गायिकेसारखी दिसते असं म्हणेल" विचारांत हरवत डेला स्वतःशीच म्हणाली, "मी तरी काय करु शकते? एक डॉलर आणि सत्याएंशी सेंट्समध्ये काय मिळणार होतं ?"

जिम त्याची नेहमीची वेळ कधीच चुकवत नसे. बरोब्बर सात वाजता तिने कॉफी करायला ठेवली, चॉप्स तळायला तवा गॅसवर ठेवला आणि चेन हातात गुंडाळून ती दाराजवळच्या टेबलवर जिमची वाट बघत बसली. त्याची  चाहूल लागली तशी डेला क्षणभर भितीने पांढरी पडली.  एकच क्षण! छोट्या छोट्या गोष्टींसाठी मनातल्या मनात देवाची प्रार्थना करायची तिला सवय होती. "देवा, त्याला मी पहिल्यासारखीच सुंदर दिसु देत" डेला पुटपुटली.

जिमने आत येऊन दार पुन्हा बंद करुन घेतले. वयाला न साजेसा पोक्तपणा त्याच्या चेहर्‍याला व्यापून राहिला होता. वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षी  बिचार्‍याच्या  कोवळ्या खांद्यांवर कुटुंबाची जबाबदारी पडली होती. एक नवा थंडीचा कोट आणि त्याच्या  उघड्या हातांना मोजे हवेच होते !

डेलाकडे बघितल्यावर जिम थबकून दारापाशीच उभा राहिला, शिकारीच्या चाहुलीवर कुत्र्याने उभे रहावे तसा...स्तब्ध! त्याचे डोळे  तिच्यावर रोखले होते. त्याच्या थंड डोळ्यातले भाव वाचता न आल्याने डेला भयंकर घाबरली. क्रोध, आश्चर्य,  नकार, भिती काहीच नाही. तिने ज्याची अपेक्षा केली होती ते काहीच  डेलाला जिमच्या डोळ्यांत दिसले नाही. विचित्र नजरेने तो नुसताच डेलाकडे बघत राहिला.
डेला गडबडीने उठून त्याच्याकडे गेली.
"जिम,  असा नको बघुस रे माझ्याकडे...हे बघ मी केस  विकले कारण...कारण क्रिसमसमध्ये तुझ्यासाठी काहीच न घेता येणं मला सहनच झालं नसतं...माझ्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता रे...अरे केस काय पटकन वाढतील पुन्हा...माझ्या केसांना वाढ आहे खूप...आणि तुला तसं पण काही  फरक पडत नाही...बरं ते राहु देत...चल मला 'मेरी क्रिसमस' म्हण बघु...आणि तू कल्पना सुद्धा नाही करु शकणार असे मस्त गिफ्ट आणलेय मी तुझ्यासाठी. "
" तू..तू केस कापलेस ?" मोठ्या मुश्किलीने त्याच्या तोंडातुन शब्द बाहेर पडले.  जणु  काही काय घडलेय हे अजून त्याच्या मेंदुपर्यंत पोचलेच नव्हते.    
"कापले आणि विकले", डेलाने सांगितले, "पण मी तुला अजून सुद्धा आवडते ना? केस नसल्यावर कसं माझी मी वाटते, हो ना ?"
जिमने कुतुहलाने खोलीत सभोवार बघितलं.
"तुझे केस गेले ?" त्याने मुर्खासारखा प्रतिप्रश्न केला.
"इथे शोधु नकोस" डेला म्हणाली, "विकले सांगितलं ना ? वि-क-ले...गेले ते केस. आज क्रिसमस आहे. जरा प्रेमाने बोल की माझ्याशी. तुझ्यासाठीच तर गेलेत माझे केस. तोळ्यांवर मोजून आलेय मी ते."  आणि मग जरा गंभीर होत पण लाडिक स्वरात ती म्हणाली, "पण माझे प्रेम मात्र कशानेच  मोजता येणार नाही हं ! बरं चल आता चॉप्स खाशील ना ?"

भानावर येत जिमने डेलाचे दोन्ही हात घट्ट धरुन ठेवले. जरा वेळाने त्याने कोटाच्या खिशातुन एक लिफाफा काढून टेबलवर टाकला.
"डेल, माझ्याविषयी काही गैरसमज करुन घेऊ नकोस. केस कापल्याने, टक्कल केल्याने किंवा कुठला खास साबण वापरल्याने कशा कशाने माझे तुझ्यावरचे प्रेम कमी होणार नाही. पण तू त्या पाकिटात काय आहे हे बघशील तर मी असा बघत का उभा राहिलो हे तुला समजेल." जिम म्हणाला.

गोर्‍या नाजूक हातांनी हळुवार तो लिफाफा उघडला. त्यात ठेवलेली भटवस्तू बघितल्यासरशी डेलाच्या मुखातून आनंदाचा एक चित्कार बाहेर पडला....आणि क्षणात अश्रुंचे पाट वाहु लागले. तिच्या सांत्वनासाठी त्रिलोकातील शक्ती सुद्धा अपुर्‍या पडल्या असत्या इतके अपार दु:ख तिला  झाले. केसांना लावायचे नाजूक खड्यांनी नक्षीकाम केलेले तीन सुंदर हस्तिदंती आकडे त्या लिफाफ्यात पहुडले होते. हे आकडे आपल्याकडे असावे  अशी  तिची किती दिवसांपासून इच्छा होती. पण ती केवळ मनिषाच करु शकत होती इतके ते महाग होते. तेच आकडे आता तिच्या हातात होते. पण ते माळून ज्यांची शोभा वाढवावी असे सुंदर सोनेरी केस आता नव्हते हे केवढे दुर्दैव !! तिने किती तरी वेळ तो लिफाफा नुसताच हृदयाशी धरला. अखेरीस धैर्य एकवटून जिमच्या डोळ्यांत बघत ती अस्पूटसे म्हणाली, 'माझे केस वाढतील भराभर बघ.'

आणि अचानक  तिच्या लक्षात आले जिमने त्याच्यासाठी आणलेली भेटवस्तू बघितलीच  नाहीये. हाताच्या तळव्यात चेन त्याच्यासमोर धरुन डेला उत्सुकतेने त्याच्याकडे  बघत राहिली. डेलाचा ओसंडून जाणारा आनंद जणू त्या  चेनमध्ये अजूनच तेज ओतत होता.
'मस्तंय ना? मी सगळा गाव धुंडाळला ह्या चेनसाठी. आता तुला दिवसातून शंभरवेळा तरी घड्याळ बघावे लागेल. दाखव तुझे घड्याळ. बघु तरी ही चेन कशी दिसते.'
तिला घड्याळ देण्याऐवजी जिम मटकन खाली बसला आणि दोन्ही हातांनी डोक्याला  आधार देत  विषण्ण हसत म्हणाला, 'डेल, खरं तर तुझ्यासाठी ते आकडे घ्यायचे म्हणून मी घड्याळ विकले.'

'राहु देत गं त्या भेटवस्तू. आपण रोज वापरु नयेत इतक्या छान आहेत त्या. तू चॉप्स तळायला घे कशी.'


*** O. HENRY ह्यांच्या THE GIFT OF THE MAGI ह्या कथेच्या भाषांतराचा एक प्रयत्न. ***
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी