Sunday, April 22, 2012

दोन नमुने

कडकडून भूक लागली होती. घरून डबा आणला होता. गरम करायला पँट्रीत गेले. दोन्ही मायक्रोवेव्ह मध्ये अन्न गरम होत होतं. मला थांबणं भाग  होतं. काही काही लोकं ७-८ मिन. अन्न गरम करत ठेवतात. फ्रोझन मील असेल तर ठेवावंच लागतं. मला फार गरम अन्न आवडत नाही.  पण अगदी गार सुद्धा घशाखाली उतरत नाही. पण त्या  १ मिनिटासाठी नेहमी ताटकळत  उभं राहावं लागतं. कुणी ओळखीचं किंवा  टीममधलं भेटलं की वेळ बरा जातो. नाही तर  तिथल्या लोकांच्या कानावर आदळणार्‍या गप्पा आपण त्यातले नाहीच असं दाखवत ऐकत उभं राहा.  हा  त्या दिवशी कानावर आदळलेला  संवाद-
'मस्त वास येतोय.  काय आहे ?'
'बिर्याणी ! तुला आवडते का ?'
'हो तर, हा काय प्रश्न झाला ?  मी आणि माझी मुलगी  नेहमी जातो  इंडियन रेस्टॉरंटमध्ये'
'अरे वा ! कुठल्या ?'
'गावात आहे ते, दक्षिण ?'
'हो, त्याचं नाव आता कोरोमंडल झालंय'
'हो का ? तू कुठून आणलीस बिर्याणी ?'
'आणली नाही, ही घरी केलेली आहे'
'घरी ? बायको सुगरण दिसतेय तुझी'
'बायको सुगरण आहेच पण  ही बिर्याणी मुलीने केली आहे'
'मुलीने ? पण तू तर म्हणत होतास ती शाळेत जाते'
'हो, हाय स्कूलला जाते. सध्या बायको इथे नाही म्हणून स्वयंपाकाची जबाबदारी तिच्यावर आहे. मला तर  बुवा साधा भात सुद्धा करता येत नाही. स्वयंपाकघरात गॅससमोर उभं राहून काही करायचं म्हणजे जीवावर येतं अगदी.  बायकोने मुलीला सगळं शिकवलं आहे. त्यामुळे  ती नसली  तरी आमचे हाल होत नाहीत. तसं पण मुलीला  पुढे जाऊन  स्वयंपाक-पाणी करावं लागणार आहेच'
एवढं बोलून तो थांबला नाही. पुढे अजून  'योग्य  वयातच' रांधा-वाढा  संस्कार करणे   कसे गरजेचे आहे हे  अगदी ठासून सांगितले.  
'....' समोरचा माणूस हतबुद्ध झाला असावा.  त्याने पुन्हा एकदा बिर्याणीचे आणि त्या मुलीचे कौतुक केले आणि स्वतःचा डबा घेऊन निघून गेला.
  
*****************

गेल्या भारत वारीत आम्हाला काही कामासाठी बाहेर जायचं होतं. मुलांना घरीच  थांबायचं होतं.  बहिणीकडे  तिच्या मुलीला सांभाळायला बाई येते.  तिला मुलांना सोबत म्हणून आणखी थोडा वेळ थांबायला जमेल की नाही  माहिती नव्हतं. तिला विचारलं तर म्हणे फोन करते घरी.  हिला  सगळे भाभी म्हणतात. भाभीकडे मोबाइल आहे. मुलीचा नंबर हिंदीतून पाठ आहे  पण  वाचता  येत नाही  त्यामुळे  फोन करायचा तर  मदत लागते. मी तिला फोन लावून दिला.  माझ्या कामाची गोष्ट होती त्यामुळे कान देऊन ऐकलेला हा संवाद-
'हॅलो  बेटा, मम्मी बात कर रही  हुँ'
'...'
'बेटा,   पापा आ गये घर ?'
'...'
'अच्छा सुनो बेटा स्वाती  मैडम की बहन आयी  हैं और उन्हे शॉपिंग  करने  जाना है |  मैं थोडी देर   यहां रुक  रही  हुँ बच्चों  को देखने के लिए  क्योंकि  बच्चे नही जाना चाहते  हैं |'
'...'
' नहीं उसकी  कोई जरुरत  नहीं है बेटा, पापा आते  हि होंगे | वो खाना बना देंगे, आप  पढाई पे ध्यान दो बेटा |'
त्या दोघी अजून एखादा मिनिट बोलल्या आणि भाभीने फोन ठेऊन दिला. आमच्याकडे वळून म्हणाली,'मेरी बेटी सी ए कर रही है ना  मैडम, बहुत पढाई करनी  पडती है | अभी तो पढाई के दिन  हैं तो खाना-वाना  बनाने मे टैम  क्यों बरबाद  करें, हैं ना ?'

सगळेच सुशिक्षित असे असतात किंवा सगळेच अशिक्षित असे असतात असा अजिबात दावा करायचा नाही.  गंमत अशी आहे की  दोन्ही प्रकारच्या लोकांचे प्रमाण सारखेच असावे अशी शंका यावी इतपत असे विचार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कानावर आले आहेत !!!

7 टिप्पणी(ण्या):

हेरंब said...

नाही ग. उलट सुशिक्षित असूनही अशिक्षित असणाऱ्यांचं प्रमाण अति आहे !!

Anagha said...

'उलट सुशिक्षित असूनही अशिक्षित असणाऱ्यांचं प्रमाण अति आहे!!'
...आणि हा सर्वात धोकादायक गट आहे ! आव सुशिक्षित असण्याचा आणि खोल गाभा मात्र अशिक्षितच !

सचिन उथळे-पाटील said...

सुशिक्षित अडाणी लोकांची काही कमी नाहीये ....

तृप्ती said...

हेरंब, अनघा- वरताण म्हणजे अशा सुशिक्षितांना काही म्हणायचे नसते नाही तर हजार प्रकारचे सोनेरी मुलामे लावून त्याच विचारांचे पॅकेज पुढे करतात.

तृप्ती said...

सचिन, बरोबर आहे अडाणीच म्हणायचे हे लोक.

Abhijit Dharmadhikari said...

Chaan lekh...

तृप्ती said...

Thanks Abhijit :)

Post a Comment

लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी