Friday, January 5, 2018

स्मरणरंजन

गेल्या वर्षी उन्हाळ्याच्या मध्यात कधीतरी गावातल्या लायब्ररीकडून 'मेमॉयर रायटिन्ग वर्कशॉप' आहे असा ईमेल आला. फॉलमध्ये बुधवारी संध्याकाळी  साडे-सहा ते साडे-आठ असे पाच आठवडे सेशन्स होती. बॉस्टन ग्लोब, न्यू यॉर्क टाइम्स, इ. प्रथितयश वृत्तपत्रांमध्ये लेखन केलेल्या एक बाई वर्कशॉप घेणार होत्या. लायब्ररीमध्ये लहानांतल्या जरा मोठ्या मुलांसाठी असे उपक्रम नेहमीच होत असतात. मुलाच्या शाळेत यंदा अभ्यासक्रमात आत्मचरित्र लेखन आहे. या उपक्रमाचा त्याला फायदा होईल अशा विचारानं नाव नोंदवलं. काय शिकवत असतील अशी उत्सुकता वाटली आणि वयाची अट नव्हती म्हणून माझं पण नोंदवलं. दोन दिवसांनी लायब्ररीतून फोन आला. उपक्रम फार 'इन डिमान्ड' आहे आणि यायचंच असेल तरच नाव नोंदवा नाही तर नोंदणी रद्द करा अशी ताकीदवजा विनंती करण्यात आली. फोन करणार्‍या बाईंशी बोलताना समजलं की उपक्रम लहानांसाठी नाही. लहान मुलांसाठी 'इनअ‍ॅप्रोप्रिएट' होईल असे विषय बोलले/हाताळले जातील असं तिनं सांगितल्यावर पोराचं नाव काढून घेतलं. माझं काढणारच होते पण त्या बाईंच्या जरा चढ्या आवाजाला शह म्हणून मुद्दामच काढलं नाही. सगळ्या सेशन्सना मी येणारंच आहे कारण मी एक ब्लॉगर आहे, क्रियेटिव रायटिन्ग करते असं जरा दामटून सांगितलं आणि नोंदणी पक्की केली. ही असेल जुलैमधली गोष्ट. उपक्रम सुरू होणार होता सप्टेम्बरमध्ये. मधल्या काळात लायब्ररीत फोन करावा आणि नावनोंदणी रद्द करावी असं सतराशेसाठवेळा मनात आलं. बुधवारी संध्याकाळी साडेसहा वाजता तिथे पोचायचं म्हणजे बर्‍याच तजविजी कराव्या लागणार होत्या. सगळ्या भानगडी करण्यापेक्षा ते वर्कशॉप. माझं शिक्षण दहावीपर्यंत मराठी माध्यमात झालं. वाचनाची मोप आवड असली तरी सवयीनं मराठी पुस्तकंच वाचली गेली आहेत. अगदी मोजके अपवाद वगळता इंग्रजी वाचन केलं आहे ते टेक्निकल बुकांचंच. इंग्रजी शब्दसंपदा अपुरी पडेल, वाचनाचा नसलेला अनुभव नडेल अशी एक भिती पण होती. ती भिती होती म्हणूनच इतकी कारणं सुचत होती की विचारू नका. 

हो-नाही करता गेले शेवटी. बाईंनी स्वतःची ओळख करून दिली आणि विद्यार्थ्यांची ओळख म्हणून 'तुमच्या आयुष्यावर प्रभाव पाडलेल्या व्यक्तीबद्दल' २० मिनिटांत काही लिहा म्हणाल्या. सरसावून एका मैत्रिणीच्या आईबद्दल लिहून काढलं. २० मिनिटांत शेवटापर्यंत पोचताना दमछाक झाली. वाचायला सुरुवात करायच्या आधी, 'विन्ग्रजी म्हायी सावत्र आय हाय' असं सांगून चुकांची सोय करून घेतली. लेख वाचल्यावर सगळ्यांनी कौतुक केलं. ते इथल्या गोड बोलायच्या पद्धतीप्रमाणं असेल असं मला वाटलं. पण क्लास संपल्यावर १-२ जण 'विनोदाची झाक असलेलं साध्या-सुध्या भाषेत लिहिलेलं लिखाण आवडलं' असं येऊन म्हटले तेव्हा जरा बरं वाटलं. माझ्या भारतीय उच्चारांचा बाऊ केला नाही कुणीच. क्लास संपताना घरचा अभ्यास म्हणून एक विषय दिला गेला. त्यानंतर प्रत्येक क्लासच्या सुरुवातीला एका प्रसिद्ध आत्मचरित्रातला उतारा वाचायचा, त्यातली सौंदर्यस्थळं, शैली, विशेष यावर चर्चा करायची मग बाई त्यांचं मत त्या आत्मचरित्राबद्दल आणि आमच्या मतांबद्दल सांगायच्या. हे झालं की आधीच्या बुधवारी दिलेली असाईनमेंट ज्यानं-त्यानं वाचायची. कधी-कधी लेखनाचा रॅपिड-राउन्ड असायचा. एकदा त्यांनी वेगवेगळे शब्द वाचून दाखवले. प्रत्येक शब्द ऐकला की मनात येणारा विचार, उमटणारी प्रतिमा कागदावर लिहायची आणि मग त्यातला एक विषय घेऊन २० मिनिटात लेख लिहायचा. त्या दिवशी एक जणीनं तिच्या आईच्या हाताच्या लांबसडक बोटांवर, विशेष लाड न करताही आपला डौल टिकवून ठेवलेल्या नॅचरली शेप्ड नखांवर सुंदर लेख लिहिला. वाचल्यावर असं वाटलं चार-दोन तपशील उजवे-डावे करून तेच सगळं मी माझ्या आईबद्दल लिहू शकले असते की. आणि तसं लिहायला न सुचल्याबद्दल स्वतःचा रागही आला. एकदा विषय होता 'Write about an object which was difficult to possess'. एका आजींनी तिच्या शेंदरी रंगाच्या कारवर खुसखुशीत लेख लिहिला. दोन विद्यार्थी आणि १५ विद्यार्थिनी असलेल्या त्या वर्गात बहुतेक सगळ्या जणी ७५-८० पार केलेल्या होत्या. अपवाद फक्त तीन- मी, रेबेका आणि एक गॅल्विन म्हणून गृहस्थ होते. त्या सगळ्यांची आयुष्य इतक्या तर्‍हेतर्‍हेची होती. ७०-७५ वर्ष म्हणजे केवढा मोठा काळ. स्वतः लिहिलेलं वाचताना अनेकांना भावना अनावर होत. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात असताना किती तरी गोष्टी किती दूर राहिल्या याची कुरतडणारी जाणीव होत असेल. नोकरी-व्यवसाय, त्या निमित्तानं केलेला प्रवास, भेटलेली माणसं, वैयक्तिक आयुष्य, टिकलेले-तुटलेले नातेसंबंध, हयात नसलेले आई-वडील, दुसर्‍या युद्धाबद्दलच्या काही लख्ख तर काही पुसट आठवणी. सगळं एकदम 'आहे मनोहर...' कुळीतलं! मी लिहायचे त्यात त्यांना अगदी वेगळं, अनोळखी जग दिसत असेल का? 

मराठी माणूस स्मरणरंजनात फार रमतो असा एक हेटाळणीयुक्त सूर आपल्याकडे ऐकायला मिळतो. मराठी आंतरजालीय साहित्यजगात 'मेमॉयर' प्रकार घाऊक निकाली काढलेला पण बघितला आहे. साध्यासोप्या भाषेत लिहिलेलं असेल तर पायरीचा दगडच. इथे भुतकाळात रमण्यासाठी आमंत्रण देऊन बोलावलेलं. 'स्मरणरंजन' हा प्रकार मखरात बसवलेला. बाई घरचा अभ्यास देत किंवा वर्गात सुद्धा ढोबळ विषय, एखादी टॅगलाइन देत. आठवणीत बारीकशी सुद्धा नोंद ठेवू नये असे विषय घेऊन त्यावर लोकं लिहायचे. एरवी अत्यंत बिनमहत्वाचे वाटणारे तपशील अगदी मानाच्या पंगतीत बसल्यासारखे येत. एक-दोन वेळा दुसर्‍याच कुणीतरी निवडलेला विषय एवढा रिलेट झाला, भिडला तर कधी एखादा विषय/प्रसंग/आठवण वाचून त्यावर सुद्धा कुणी दोन पानं भरून लिहू शकतं याचं आश्चर्य वाटलं. भाषेची, शैलीचीही इथे काही प्रतवारी केलेली दिसली नाही. गुन्हेगारी जगात "नावाजलेली" एक आजी उपमाउपमेयांचा सढळ वापर करून अनेकांना क्लिष्ट वाटेल अशा भाषेत तिच्या काळ्या भूतकाळात घेऊन जायची. अनेक वर्ष युरोप आणि मग अमेरिकेत राहिलेली ती फिलिपिनो बाई चेहऱ्यावरची रेष न हालवता तिच्या करतुदींविषयी वाचायची तेव्हा कित्येकदा मी कुणाला दिसेल न दिसेल असं फोन मांडीवर ठेवून गुगलाअजोबांना अमुक एक शब्द  ढमुक संदर्भानं वापरला असेल तर त्याचा काय अर्थ अभिप्रेत आहे  विचारून  घेतलं. एक आजोबा पंचाऐंशी वर्षांचे आहेत, हाताला होणारा कंप सावरत त्यांच्या फिल्म आणि टेलिव्हिजन क्षेत्रातले अनुभव लिहायचे. एका आजींनी त्यांच्या आईचं आजारपण आणि मृत्यू याबद्दल लिहिलं होतं. दोन ए४ पानं भरून लिहायचा नियम सगळ्या असाईनमेंटसाठी होता. यांनी एकच पान लिहिलं. आता ऐंशी वर्षाची झालेली मुलगी आपल्या आईच्या शेवटच्या आठवणी, तिचा शेवटचा दिवस याबद्दल साध्या पण इतक्या परिणामकारक शब्दांत लिहिते की किती तरी दिवस ते शब्द पाठकुळी घट्ट बसतात. पहिल्या दिवशी बाईंनी ओळख करून द्यायची थोडी वेगळी पद्धत सांगितली तेव्हा एका आजींनी अतिशय कुत्सित स्वरात, 'नकारात्मक प्रभाव पाडलेल्या व्यक्तीबद्दल लिहिलं तर चालेल का?' असं विचारलं. त्यांनी लिहिलं ते स्वतःच्या व्यसनी आईबद्दल. वडील पळून गेलेले. व्यसनापायी आणि तर्‍हेतर्‍हेच्या प्रेमप्रकरणांच्या नादात आईनं मुलीची कशी हेळसांड केली याचा राग शब्दाशब्दांतून दिसत होता. लहानपण बेजबाबदार आई-वडलांमुळे कुस्करून गेलं याचा इतका विषाद विखार मनात होता. त्यानंतर आम्ही छोट्या-मोठ्या ६-७ तरी असाइनमेन्ट केल्या असतील. सगळ्या लेखांमधून त्यांची आई डोकावत राहिली. पहिल्या लेखात असलेला काटेरी सूर सहज लक्षात येईल एवढा मऊ होत गेला. शेवटच्या दिवशी त्या म्हणाल्या, 'गेल्या काही दिवसांत मी स्वतःच्या आयुष्याकडे त्रयस्थ नजरेनं बघायला शिकले. आईची बाजू मला अजूनही समजून घेता येत नाही पण मी तिला माफ करू शकले.' या आजींचं लिखाण थोडं विस्कळीत वाटायचं. बरेचदा एका परिच्छेदाचा दुसर्‍याशी संबंध समजणं कठीण जाई. डोक्यातले विचार हवे तसे कागदावर उतरवता न येताही पाच आठवड्यांत हा प्रवास त्या करू शकल्या. ही सगळी हौशी लेखक मंडळी. खरं तर यांना लेखक तरी म्हणावं का? यांचे कुणाचे ब्लॉग्स नाहीत. कुणाच्या नावावर पुस्तकं छापलेली नाहीत. आपण लिहिलेलं कुणी वाचावं म्हणून अट्टहास नाही. आपल्या पाठी आपल्या खरडींचं काय होईल याची त्यांना कल्पना नाही. फिकीर पण नसावी. तरी धडपडीनं येतात, लिहितात. लिहितात ते फक्त सतःसाठी. हे अवघड आहे, जमलं पाहिजे. 

पाच आठवडे भर्रकन संपले. चुकून नावनोंदणी केली होती. जावं की नाही अशी शंका मनात होती पण दिलेला वेळ अगदी सार्थकी लागला. मेमॉयर रायटिन्गबद्दल डोक्यात उजेड भरपूर पडला. ध्यानीमनी नसताना नव्या ओळखी झाल्या. वेगवेगळ्या रंगांच्या, पोतांच्या आठवणींनी भरलेले लेख वेगळ्याच विश्वात घेऊन गेले. जगाच्या कानाकोपर्‍यात अशी किती तरी अनुभवसंपन्न आयुष्य असतील. त्यातली काही जवळून निरखता आली. स्मरणरंजनात रमणं हा एकुणच मनुष्यस्वभाव आहे. त्यात मराठी नि अमेरिकी असा काही भेदभाव नाही, नसावा या मताचा खुंटा बळकट झाला. क्लासच्या शेवटी बाईंनी, 'I hope our paths cross again!' म्हटलं. आता पुन्हा असा उपक्रम होईल तर न जाण्यासाठी कारणांची यादी तयार असेलच. पण नावनोंदणी केली तर ती समजून-उमजून असेल, चुकून नाही.

माझी लेखनप्रक्रिया कासवाच्या गतीनं चालते त्यामुळे एक सुद्धा लेख पहिल्या ड्राफ्टच्या पुढे गेला नाही. उपक्रम संपल्यावर अनेक दिवसांनी एक  लेख माझ्या मते पूर्ण झाला आहे तो इथे प्रकाशित करतेय.

10 टिप्पणी(ण्या):

Kapil said...

mast!

Unknown said...

आपला ब्लॉग उत्कृष्ट वाटला.मराठी साहित्यातील काही अप्रतिम कालसुसंगत लेख,कथा आणि इतर साहित्य शोधून ते आम्ही आमच्या #पुनश्च या पोर्टलवर प्रसिध्द करतो. त्यासाठी १०० ते १५० व्र्षांपुर्वीचेही साहित्य आम्ही वाचतो आणि उत्तम निवडून वाचकांना पोर्टलवर देतो. नुकतीच मराठी ब्लॉगर्स साठी आम्ही एक अभिनव स्पर्धा जाहीर केली आहे. कुठलेही प्रवेशमुल्य नसलेल्या या स्पर्धेत तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर www.punashcha.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि स्पर्धेबद्दल सविस्तर जाणून घेऊन भाग घ्या.

Ashish said...

Hello Trupti,

I have started a Marathi Bloggers page on Facebook from the last few weeks.

The idea is to promote blogs by Marathi Authors. On this page, I paste a snippet from the original blog post and also the link to the blog. My intention is to direct the users to the original site so that the bloggers would get more visits on their own site.

I was wondering if you can allow me to post some blog snippets and links to your blog on this page.
So far, I have 3 bloggers on this page. I would not say that it would increase the visibility of your blog to a great extent, but it will certainly help people to find your blog.
Here is the page link -
https://www.facebook.com/Marathi-Bloggers-Srujan-106226017801437/

Thank you,

Ashish

PS - Random Thoughts वाले राज ने त्यांचा ब्लॉग निष्क्रिय केला होता तो आता परत चालू केलाय नवीन नावाने. त्या ब्लॉगवरील पोस्टच्या लिंक वरील फेसबुक पेज वर आहेत.

Jatin3102 said...

Don't sing the wrong lyrics when you can avail the actual lyrics of your favourite bollywood song in hindi. All these old songs' lyrics are free. hindi song lyrics

Raajsonwane said...

Best fitness band in India, under 2000 re 5000 rs and in 1500. Get the best fitness band in India. best fitness band in india under

Mihir Mane said...

Get projects for freelance filmmakers jobs, freelance singing jobs, freelance acting jobs, freelance bloggers, freelance influencers in India.
acting auditions

rohit chavan said...

Grab the best best microwave oven with solo, convection, grill under 5000, 10000, 15000. best microwave oven under 5000

abhikhurana said...

Get exiting offers on Christmas for your parents, grandma, grandpa, brother, sisters and for all. christmas gifts for parents

sanjupawar said...

Get all the viral news, trending topics of India in Hindi. Know which are the upcoming Hindi web series, trending stuffs in twitter, trending news etc. trending india

Jon Hendo said...

Thanks mate. I am really impressed with your writing talents and also with the layout on your weblog. Appreciate, Is this a paid subject matter or did you customize it yourself? Either way keep up the nice quality writing, it is rare to peer a nice weblog like this one nowadays. Thank you, check also event marketing and 5 Steps for Marketing Your Virtual Event

Post a Comment

लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी