Sunday, August 28, 2011

स्पेशल वार्डातल्या म्हातार्‍या

आमच्या घरात बैठकीच्या खोलीला लागूनच बेडरूम आहे. घरात कुणी आजारी असलं की पेशंटचा मुक्काम त्याच खोलीत असतो. सध्या आमच्या म्हातारीची रवानगी त्या 'स्पेशल' वॉर्डात. दरवर्षी श्रावणात आईला दम्याचा खूप त्रास होतो. दर काही वर्षांनी त्या खोलीत मुक्काम पडेल इतका जास्त होतो. आईच्या दिमतीला बहिणी एक एक करून राहून आल्या. सध्या मावशी तिथे गेलीये. सात वर्ष देशाबाहेर व्यतीत केल्यावर तिच्या आजारपणावर ब्लॉग लिहिण्याइतका कोडगेपणा येत असावा. तर काल मावशीशी बोलत होते. ह्या दोघी बहिणी एका कॉटवर एक अशा गप्पा करत 'पडल्या' होत्या आणि मी फोन केला. आईच्या भेटीस जाता येत नाही हा सल आहेच. त्यात ह्या दोन म्हातार्‍यांच्या काय सुख-दु:खाच्या गोष्टी चालल्या असतील त्या ऐकायला मिळत नाहीत ह्या विचाराने कळ !!! जीव तरी कशाकशात अडकवावा माणसाने. हरिकेन येणार म्हणून दोडक्याची वेल आत आणायची होती. एक दोन नाही चांगली चार दोडकी लागलीत. गजांना घट्ट चिकटून बसलेली वेटोळी काढताना बाग आठवली. तिथे शेकड्याने घोसाळी लागली असतील. पानांच्या गच्च दाटीत लटकलेली घोसाळी शोधायची, आकडीने नेमकी ओढून काढायची. सुरुवातीला कौतुक. मग शेजारी सुद्धा कंटाळतात. शेजार्‍यांची संख्या पण कमी होतेय. कुणाकुणाची मुलं बाहेरगावी पडलीत नोकरी निमित्ताने. आई-वडिलांना तिकडेच बोलावून घेतात. काहींना देवाने बोलावून घेतले. आईला बरं नाही म्हटल्यावर ठुबे काकूंनी रोज भाजी-आमटी पाठवली असती. लोकरीचे गुंडे, सुया असा लवाजमा घेऊन संध्याकाळी येऊन बसल्या असत्या. आईशी गप्पा करायला. ह्या बाया सगळ्या भारी. एखादी जुनी कविता आठवत बसतात. त्यांच्या बालवाडीत शिकलेली. तेव्हाचे मास्तर बाई ह्यांच्या आठवणी काढून हळहळतात. चांभार चौकश्या, सुनांच्या कागाळ्या सहसा नाहीत. आता ठुबे काकू नाहीत. पण बाकीच्या जमतातच. त्यांच्या गप्पा ऐकण्यात पण मजा असते. त्या ऐकायला मिळत नाहीत म्हणून हळहळ !

माझा जीव तिथे आणि त्यांचा इथे. त्यांचा(?) बाळकृष्ण माझ्या ताब्यात. हा लहान होता तेव्हा मी पाच एक महिने मुक्कामी होते तिथे. सगळ्यांचा संध्याकाळचा विरंगुळा म्हणजे येऊन त्याच्याशी गप्पा(?) मारणे. ईशानने पण छान खळीदार हसून ह्या गोपींना वेड लावलं होतं. विशेषतः शेजारच्या जोशी काकूंना फारच लळा लागला ईशानचा. आई आणि काकू मिळून सारख्या ह्याच्या आठवणी काढतात आणि त्यांच्यापासून इतक्या दूर घेऊन आले बाळाला म्हणून मला दुष्ट ठरवतात. पुढच्या वेळी आला की त्याला जाऊच द्यायचं नाही असं तर त्यांचं अनेकदा ठरतं. त्यानेच लिहिलेलं पेक्षा रचलेलं एक गाणं(?) देतेय. गेल्या शनिवारी उठल्या उठल्या की-बोर्ड घेऊन आला. डॅडी त्याला आणि मला हॉस्पिटलमध्ये (कधी ? तो ३ वर्षाचा असताना. Remember when I was 3 years old... अशी सुरुवात करत अनेक आठवणी सारख्या सांगतो. त्याबद्दल नंतर कधी किंवा कधीच नाही.) सोडून गेला तेव्हाचं गाणं म्हणतो म्हणे. मग अगदी कसलेल्या गवयाच्या थाटात एकच की वाजवत काळी छप्पन्न मध्ये हे  म्हटले:

Daddy left at the hospital
When me and mamma played at home
When I was a baby
Then it was getting dark
When you rock me to sleep
We sleep for a long time
Then it was a day
Daddy came back home
And We all played together !!

दीssssssss एंड !!!


त. टि.: गाण्याचा शेवट असाच लांबलचक दीssssssss म्हणत करणे बंधनकारक आहे.
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी