Monday, October 25, 2010

दसरा दिवाळी, आमच्या घरी : भाग १

दसरा

माझे बाबा सगळ्यात मोठे म्हणून परंपरेने सर्व देव त्यांच्याकडे आलेत. आई दरवर्षी सगळे सणवार अगदी श्रद्धेने करते. ह्यात गौरी गणपती, दसरा, दिवाळी, चैत्र गौर हे ठळक मोठे सण जेव्हा मेहूण, सवाष्ण, मुंजा असे कोणी कोणी जेवायला बोलावतात. दसर्‍याला मेहूण असते. नैवेद्याचा स्वयंपाक, पूजा, देवीची आरती, सडा-रांगोळ्या, फुलांच्या माळा, वाहनांची सजावट अशी कितीतरी कामे दुपारी बारा पर्यंत उरकायची असतात. आईने दरवर्षी प्रमाणे आदल्याच दिवशी सार्वजनिक तंबी दिलेली असते,"उद्या सगळ्यांनी लवकर उठायचं (हे भाऊ आणि बाबांसाठी) आणि भराभर कामं उरकायची (हे मी आणि रचनासाठी)". नवरात्राचे उपवास, पुजा-अर्चा करून तिच्यात एकदम देवी संचारली आहे की काय असे वाटते. त्यांमुळे बाबांसह आम्ही सगळे निमूट माना डोलवतो.

दुसर्‍या दिवशी सकाळी नऊ वाजता चित्र असं असतं- बाबा वर्तमान पत्रांची चळत घेऊन एकदम बाहेरच्या खोलीत- व्हरांड्यात एका वर्तमानपत्रात डोके घालून बसलेले, भाऊ- मांजराने डोळे मिटून दूध प्यावे तसे- चहाचा कप घेऊन आवाज बंद ठेवून टी व्ही बघत बसलेला, मोठी बहीण घरकामाचा गडी बरोबर घेऊन फुले, आपट्याची पाने आणायला गेलेली (तिकडेच खूप वेळ लावायचा आणि आल्यावर गावात फारच ऊन आहे म्हणून एका जागी बसून राहायचे असा हिचा दरवर्षीचा प्लॅन), मी गेले एक तासभर फक्त मागच्या-पुढच्या अंगणात सडा घालून रांगोळीचे ठिपके तिरके घालत आई नाश्त्याला कधी हाक मारते याची वाट बघतेय, रचना दूर्वा खुडायच्या नावाखाली बागेत मांजरांशी खेळते आहे आणि आरती व आई सकाळीच अंघोळ-बिंघोळ करून स्वयंपाकघरात स्वयंपाकाच्या तयारीत. सकाळपासून आईची अनंत कामे करून झालेली असतात. आरती पण तिच्याबरोबर शर्यतीत असते. पण तेव्हढ्या घाईत देखील दोघीजणी आम्हा काम न करणार्‍या मंडळींवर येताजाता तुच्छ कटाक्ष टाकायचे विसरत नाहीत.

तेव्हढ्यात आई घाईत पोह्यांची बशी घेऊन बाबांना नाश्ता द्यायला येते. "तुम्ही किनई आत बसा पेपर वाचत. मला आज हेलपाटे घालायला लावू नका". बाबांना ठरावीक वेळेपर्यंत नाश्ता नाही मिळाला की ते घरात येतातच पण आईलाच धीर नसतो. सगळी कामे कशी भराभर उरकायची असतात. पण बाबा वर्तमानपत्रातून डोकेही वर काढत नाहीत. त्याने आईचा पारा चढतो, "ते पेपर राहूद्यात बरं आजच्या दिवस. बातम्या काही कुठे जात नाहीत, उद्या वाचा".
"हं" बाबा.
त्यांचा थंडपणाने आई अजूनच चिडते,"आहो आज मेहूण सांगितलं आहे. ते पाठक काका बरोबर बाराच्या ठोक्याला येतील आणि तुम्ही बसा पेपर वाचत."
बाबा (अती थंडपणे),"झालंच" त्यांना खरे तर संध्याकाळी विजयादशमी निमित्त कुठेतरी सभेत करायच्या भाषणाची पूर्वतयारी म्हणून सगळी वर्तमानपत्रे जरा अधिक बारकाईने वाचायची असतात.
आता आई शेवटचे अस्त्र काढते,"तुमच्याच घरातल्या रिती-भाती सांभाळते तर ही तर्‍हा...."
पुढे तिला काही बोलू न देता (तेच फायद्याचे असते) बाबा ,"नऊच तर वाजताएत. मी मागून सावकाश आवरणार होतो. म्हंटलं तुमचं आधी आवरू द्यावं, माझी लुडबुड कशाला."
आई, "हो !! तुम्ही तुमचं आवरा, आमची नका काळजी करू...तुमचा शर्ट बदलून होईपर्यंत माझा पुरणाचा स्वयंपाक होतो."

आईने असे म्हंटल्याबरोब्बर भावाच्या तोंडातून तर एकदम चहाचा फवारा टीव्हीवर उडतो. बाकीची आम्ही हातातली कामे सोडून खी खी करायला लागतो. हा संवाद न चुकता दर वर्षी दसर्‍याला आमच्या घरी होतो आणि प्रत्येक वेळी आम्ही तो पहिल्यांदाच होतो आहे असे हसतो.

आई आता चिडली आहे हे बघितल्या बरोबर भाऊ चहाचा कप तिथेच ठेवून रॉकेट सुटावे तसे सूssss न्हाणीघरात घुसतो. मी आणि रचना गप्प बसून पोह्यांवर ताव मारतो. नाश्ता झाल्यावर मग आम्ही सगळेच भराभर अंघोळी करून घेतो. स्वाती आणि सजू तोवर येतातच. वर्षानुवर्षे आमच्याकडे अदलुन बदलून सजू आणि नंदु नावाचेच गडी आहेत कामाला. तर संजुचा नाश्ता होऊन तो गाड्या धुणे, आंब्याच्या डहाळ्या आणणे अशी कामे करायला घेतो. मी, रचना आणि भाऊ झेंडूच्या माळा करायला घेतो. हा एक अत्यंत आवडता कार्यक्रम. आपल्या घराचे तोरण कसे भरगच्च, वेगळे दिसले पाहिजे ह्याचा अट्टहास असायचा. पिवळी, केशरी फुले वेगळी काढायची, दाराची मापे घेऊन दोरा ओवायचा, कल्पकतेने दोन-तीन माळा एकत्र गुंफून त्याची महिरप करायची, मध्येच आंब्याची पाने ओवायची. सगळ्या घरादाराला, देवघराला, आजी-आजोबांच्या तसबिरींना, पुस्तकाच्या कपाटांना, गाड्यांना, सायकलींना गेला बाजार मांजरांना ह्या सगळ्यांना माळा केल्याशिवाय आम्ही तिथून हालायचोच नाही. एकीकडे आई आणि आरतीचा स्वयंपाक चालू असे. आलटून पालटून पुरण, बटाट्याची खास सणवार स्पेशल भाजी, कटाची आमटी, अळूची भाजी, साधे वरण, कोशिंबिरीच्या फोडण्या आणि सर्वात वरताण बटाटे आणि घोसाळ्याची भजी असे एक-एक वास नाकावर आदळत. आत्ता आत जाऊन उपयोग नाही. नैवेद्याचा स्वयंपाक असल्याने साधं एक भज्याच बोंडुक सुद्धा हाती गावणार नाही हे माहिती असूनही पाणी-बिणी प्यायच्या निमित्ताने आम्ही पुन्हा पुन्हा स्वयंपाकघरात चक्कर टाकतो. बाबांचं उगीचच "बारा वाजत आले बरं, पाठक येतीलच"
"पुरणाला साखर घातली का ?"
"वरणाला मीठ घातलं का ?"
"पाठक आले की त्यांना दक्षिणा दे बरं" असे  सल्ले देणं सुरू असतं जे आई अजिबात मनावर घेत नाही.

असे करत एकदाची सगळी कामं संपतात. पक्वान्नांनी नैवेद्याची ताट सजतात. पाठक काका-काकू अगदी बाराच्या ठोक्याला येतात. नैवेद्य दाखवून देवीची आरती झाली की मंडळी जेवायला बसतात. सगळा स्वयंपाक कसा अगदी चोख चविष्ट झालेला असतो. दसर्‍याच्या जेवणाचे स्टार आकर्षण म्हणजे फुलोरा. साटोर्‍या, करंज्या सप्तमीपासून डब्यात बंद असतात तो डबा आज उघडलेला असतो. हा फुलोर्‍याचा डबा उघडण्या इतकी जीवघेणी वाट मी दुसर्‍या कशाची बघितली नसेल. जेवताना नेमकेच पाठककाका बाबांना मुळ्याचा चटका (कोशिंबिरीचा एक प्रकार) घेण्याचा आग्रह करतात. बाबा ही सुवर्णसंधी सोडत नाहीत, "अहो आयुष्यभर मुळ्यांचाच चटका मिळालाय, आज मला आग्रह करू नका". आईच्या माहेरचे आडनाव मुळे आहे हे सांगायला हवे का ? थट्टा विनोदात जेवणे पार पडतात. मग खास मसाला पान होते. एके एके वर्षी दसरा अगदी सहामाही परीक्षेच्या मध्ये येई. मग दुपारी सक्तीने अभ्यास करावा लागे. पुरणाचे तुडुंब जेवण झाले असताना जडवलेल्या पापण्यांनी अभ्यास करणे इतके जीवावर येई की विचारता सोय नाही.

दुपारी चारच्या सुमारास रांगोळीचा मोठाच कार्यक्रम सुरू होतो. इथे मात्र स्वाती आघाडीवर असते. लहानपणापासूनच माझं कलेशी वाकडं असल्यामुळे रांगोळीच्या रेघा काही सरळ पडत नाहीत. त्यामुळे दोघी ताया मला बॉर्डर काढण्यापुरतं देखील रांगोळीच्या आसपास फिरकू देत नसत. आईच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी वेगवेगळ्या कल्पना लढवून दोघी इतक्या देखण्या रांगोळ्या काढत की बघतच राहावे. दोन्ही दारापुढे सुंदर रांगोळ्या, दारांना तोरणं, तुळशीपुढे दिवा सगळं घर इतकं देखणं दिसतं. आणि ह्या घरात नवी रेशमी साडी नेसून, मोजके दागिने घालून, खास नवरात्रातच मिळणारी शेवंतीची वेणी केसांत माळून प्रसन्न, कृतकृत्य चेहर्‍याने वावरणारी आई. तिच्या लगबगीने, तिच्या पदराच्या सळसळीने सगळ्या घरादारात चैतन्य भरून राहतं. सगळे काही यथासांग, रीतीने पार पडल्याचे समाधान तिच्या चेहर्‍यावर विलसत असतं. आम्ही भावंडे पण नवे कपडे घालून आवरून तयार होतो. बाबा पण शक्य तितके रंगीत- म्हणजे एरवी पांढरे घालतात ते आज ऑफ व्हाईट वगैरे रंगाचे- कपडे घालून तयार असतात. मग आई-बाबांना सोने देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले की दसर्‍याची, विजयादशमीच्या ह्या सणाची यथार्त सांगता होते !!!
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी