माझ्या आईकडे एक 'शिवणाची कात्री' होती. होती म्हणजे अजून आहे. केशरी
मूठ, मॅट फिनिशची पाती. ती कात्री म्हणजे आईच्या विशेष जिव्हाळ्याचा विषय.
त्या कात्रीला हात लावायची आम्हाला कुणालाच परवानगी नव्हती. अगदीच
उन्हाळ्याच्या सुट्टीत काही भरतकाम करायला घेतलं तर कटपीसमधून रुमालांचे
चौकोनी तुकडे कापायला तेवढी ती कात्री हातात येई. पण चुकून जरी त्या
कात्रीने कागद-बिगद (बिगद मध्ये पुठ्ठे, थर्माकोल, स्ट्रॉ, सुतळ्या,
झाडांच्या फांद्या जे काही कापण्यासारखं असेल ते सगळं येतं) कापले की
आईच्या नजरेला आणि आवाजाला त्या कात्रीची धार येई. आणि कात्रीची धार कमी
होई. तसं पण अधनंमधनं तिची (कात्रीची) धार कमी होत असे. मग तेवढ्यापुरती
कात्री संजू/नंदू/बन्सी अशा कुणाच्या तरी ताब्यात जाई. तो कुठून तरी तेज
धार लावून आणे आणि कात्री पुनः: पहिल्यासारखी. कापडाच्या एका टोकाला लावली
की सर्रर्रर्रर्र दुसर्या टोकापर्यंत अजिबात बोटं न चालवता कपडा कापला
गेलाच पाहिजे.
आमच्या गावात एक मारवाडी मुलगा मुंबईहून "imported" सामान आणून घरोघरी विकायचा. ही कात्री आईने त्याच्याकडून घेतली होती. आता सगळीकडे तशाच कात्र्या मिळतात पण तेव्हा ती खूपच भारी वाटलेली. त्या आधी कित्येक वर्ष- किंबहुना मला आठवतंय तसं- आईकडे एक लोखंडाची जड कात्री होती. तिचं पण असच एक लाईफ सायकल होतं. अधनंमधनं तिची (कात्रीची) धार कमी व्हायची. मग संजू/नंदू/बन्सी कुणीतरी धार लावून आणायचा. कात्री परत पहिल्यासारखी!! त्या कात्रीने सुद्धा कागद-बिगद कापायला परवानगी नसे. नंतर नवी केशरी मूठवाली आल्यावर ह्या लोखंडाच्या कात्रीचं 'कागदाची कात्री' असं डिमोशन झालं. केशरी मूठवालीने मात्र अढळपद पटकावलं.
ह्या दोन्ही कात्र्यांनी आईने आमच्यासाठी असंख्य सुंदर सुंदर कपडे बेतले असतील. कोणा कोणाच्या लेकीबाळींसाठी बाळंतविडे केले असतील. कित्येक नवशिक्यांना पहिल्याने कपडा बेतायला शिकवला असेल. काही गणतीच नाही. तेव्हा एक तर आजच्यासारखे डिजीटल कॅमेरे नव्हते. शिवाय उजव्या हाताचं डाव्या हाताला कळू नये इतक्या सहजतेने आईने सगळं केलं. ह्या सगळ्याचं काहीच रेकॉर्ड नाही याचं आता फार वाईट वाटतं. तेव्हा आमचे वेळप्रसंगी काढलेले काही फोटो आणि आम्हाला आठवणीत राहिलेले काही एवढ्या शिलकीवर मी आणि धाकट्या बहिणीने पेंट ब्रशमध्ये आईने शिवलेल्या कपड्यांचे काही डिझाइन्स करायला घेतले आहेत. पूर्ण झाले की इथे टाकेनच. तोपर्यंत फक्त ही छोटीशी आठवण