अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यात प्रवरेकाठी मालुंजे हे आमचे गाव वसले आहे. पंढरपूरला भीमा जशी दक्षिणमुखी होऊन तिची चंद्रकोर तयार झाली आहे, तशी प्रवराही इथे दक्षिणमुखी झाली आहे व तिची सुरेख चंद्रकोर तयार झाली आहे. नदीच्या दोन्ही तीरांवर पेशवेकालीन विठ्ठल-रुक्मिणीच्या सुरेख मूर्ती असलेली मंदिरे आहेत. घराण्याचे मूळपुरूष नारोपंत रत्नपारखी यांच्याविषयी एक आख्यायिका सांगतात ती अशी - नारोपंत राघोबादादांच्या दफ्तरी चाकरीस होते. राघोबादादांचा एकदा गोदातीरी कोपरगावला मुक्काम पडला. राघोबादादा मोठे धार्मिक. रोज सकाळी मोठी पूजाअर्चा चाले. पूजेसाठी त्यांना भरपूर फुले लागत. त्यांचा मुक्काम पडला तेव्हा नेमका गोदामाईला महापूर आलेला. बळकट शरीरयष्टीचे नारोपंत पट्टीचे पोहणारे. फुले आणायची जबाबदारी त्यांनी शिरावर घेतली. नदी पार करून पोहून तर जाता येईल, परंतु फुले आणणार कशी ? कुणी म्हणे, डोईवर वाहून आणा. पण अशी डोक्यावर वाहिलेली फुले देवाला कशी चालणार? शेवटी त्यांनी एका हातात फुलांचा भारा घेतला आणि केवळ एका हाताने भल्या पुरात पोहून आले. राघोबादादांच्या कानावर ही हकीकत गेल्यावर खूष होऊन त्यांनी मालुंजे आणि आजूबाजूची काही अशी पंचावन्न गावांची जहागीर नारोपतांना बक्षिस दिली. त्यांनी मग मालुंज्याला वाडा बांधला. चार एकर क्षेत्रावर बांधलेला हा वाडा अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. वाड्याला भल्या मोठ्या संरक्षक भिंती आहेत. भिंतींना युद्धकाळात बंदुकीची नळी ठेऊन नेम धरायला लांबोळके झरोके आहेत. वाड्याला लागूनच विठ्ठल मंदिर आहे.
पुढे १८५७ ची लढाई हरल्यावर नानासाहेब परागंदा झाले, ते जवळच बेलापूरला केशव-गोविंदाच्या बनात आश्रयाला आले. तिथे त्यांनी भगवी वस्त्रे व स्वामी विद्यानंद हे नाव धारण केले. तेथे अनेक क्रांतीकारक त्यांना भेटायला येत. ह्या क्रांतीकारकांना मालुंज्याचे जहागीरदार करत असलेल्या मदतीचा सुगावा तेथील इंग्रज अधिकार्यास लागला. त्याने वाड्यावर छापा घातला. सगळा वाडा खणून काढला. काही पुरावा न सापडल्यावर जहागीर काढून घेऊन केवळ ५५ एकर जमीन तेवढी ताब्यात ठेवली. त्या ५५ गावांचा शेतसारा वसुल करण्याचे काम मात्र मागे लावून दिले. ह्या सार्याच्या वसूल केलेल्या एका रुपयामागे साडे तीन आणे वसुल करणार्यास मिळत. औटकी नुसार साडे तीन आणे म्हणजे होतो एक औट. मग औट वसुल करणारे म्हणून कालांतराने आमचे आडनाव रत्नपारखी न राहता आवटी झाले.
अशा ह्या आवटी घराण्यात दिनकर आवटींच्या घरी माझ्या आजोबांचा म्हणजे वासुदेव दिनकर आवटींचा १९०० साली जन्म झाला- ज्यांना आम्ही नाना म्हणत असू. दिनकर आवटी अतिशय विद्वान गृहस्थ. सरस्वती आणि लक्ष्मी एकाच ठिकाणी नांदत असलेल्या घरात संपन्न बालपण व्यतीत होत असताना दुर्दैवाने वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी नानांचे पितृछत्र हरवले. त्यांच्या कोवळ्या वयाचा फायदा घेऊन चुलत्यांनी असेल नसेल ती संपत्ती हडप केली, अक्षरशः देशोधडीला लावले. त्यावेळी नानांच्या दोन बहिणी पुण्यास देशपांडे व संगमनेरकरांकडे दिल्या होत्या. देशपांडेंनी मग नानांना Hindusthan Construction इथे अर्धवेळ नोकरी बघून दिली. शिक्षणाला तर रामराम ठोकलाच होता. नानांनी मग झारापकर इंस्टिट्यूट मधे शिवणकामाचे धडे घ्यायला सुरुवात केली. पुढे ते इतके उत्तम शिवणकाम करु लागले की स्वतःचे कोट देखील कितीतरी वर्षे स्वतःच शिवत असत. ह्या पुण्याच्या वास्तवात असताना अतिशय भाग्याची गोष्ट अशी की स्वातंत्र्यवीर सावरकरांची व्याख्याने ऐकण्याचा त्यांना योग आला. सावरकरांच्या विचारांचा त्यांच्यावर अतिशय प्रभाव पडला. पुढे काही वर्षांनी मालुंज्याला परत आल्यावर सावरकरांचे चरित्र आल्या-गेल्याला ऐकवणे हे जणू त्यांचे कर्तव्यच झाले. त्यांच्याविषयी बोलताना नाना देहभान विसरत. बोलता-बोलता कधी आवेशात उभे राहत तर त्यांचे त्यांना कळत नसे.
पुण्यात असतानाच बालगंधर्वांच्या गाण्याने त्यांना मोहिनी घातली. बालगंधर्वांची अनेक गाजलेली नाटके त्यांनी बघितली. त्यांचा स्वतःचा आवाजही अतिशय गोड. गाण्याची आवड होतीच. नंतर आयुष्य स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी एक पायपेटी व एक साधी पेटी विकत घेतली होती. एक ग्रामोफोनही घेतला (जो आमच्या घरी अजूनही आहे). बालगंधर्व, दीनानाथ मंगेशकर अशा दिग्गज कलावंतांच्या असंख्य रेकॉर्डस त्यांनी जमा केल्या होत्या (ह्या ही सांभाळून ठेवल्यात). हे गाण्याचे वेड स्वतःपुरते न ठेवता गावातल्या मुला-मुलींना नाना आग्रहाने गाणे ऐकवीत, शिकायला उत्सुक असणार्यांना पेटी शिकवीत. एकदा ते खास बालगंधर्वांना भेटण्यासाठी म्हणून पुण्यास गेले. बालगंधर्व कुठे बाहेर गेले असावेत, बरेच तास लोटले तरी ते काही परत येईनात. नानाही त्यांची वाट बघत त्यांच्या घरी बसून राहिले. शेवटी प्रत्यक्ष भेटीत समोरासमोर बसुन त्यांचे गाणे ऐकून, त्यांना स्वतःचे गाणे ऐकवून वर नाट्यसंगीतावर तासभर चर्चा करुनच परत आले. त्यांच्या घरी ग्लासभर केशर दुधाचा आस्वादही घेतला. नानांना बालगंधर्वांच्या गायकीबरोबरच कोण कौतुक होते त्या ग्लासभर दुधाचे. कुठे जाऊ, कसे जाऊ असे प्रश्न त्यांना कधी पडलेच नाहीत. निर्भीडता, बाणेदारपणा, स्पष्टवक्तेपणा ही त्यांची स्वभाव वैशिष्ठ्ये.
नानांचा एका गोष्टीवर फार भर असे ते म्हणजे व्यायाम. त्यांच्या लग्नावेळची गम्मत- नवरदेवाची प्रकृती इतकी तोळामासा होती की घोड्यावर बसायची मारामार. वरात पूर्ण कशी होणार असा ज्याला-त्याला प्रश्न पडला. कशीबशी रडत खडत वरात पूर्ण केली. लग्न झाल्यावर परत मालुंज्याला रहायचा निर्णय त्यांनी घेतला. परंतु भाऊबंदकीपुढे काही टिकाव लागेना. वडील वारलेले, जमीन, वाडा भाऊबंदांनी बळकावलेला. रहायला एक खोली मिळेना. देशावर इंग्रजांचे राज्य होते तो हा काळ. बळी तो कान पिळी अशी अवस्था होती. आजीचे माहेर मालुंज्याचेच. त्यामुळे रहाण्याची तात्पुरती व्यवस्था झाली. दरम्यान त्यांच्या मोठ्या मुलीचा जन्म झाला. ह्याच काळात कधीतरी नानांना असे जाणवले की व्यायाम करुन शरीर कमावले पाहिजे. घरी गाय होती. रोजचा दुधाचाच खुराक काय तो असे. मेहनत घेऊन त्यांनी अशी काही तब्येत कमावली की आजु-बाजुच्या गावांतूनही त्यांना कुस्ती खेळायला जोडीदार मिळेना. त्या काळातील एक किस्सा अतिशय प्रसिद्ध आहे. नाथा काका म्हणुन आमचे एक पूर्वज काही कारणाने वाममार्गी लागले होते. चोरी-मारी करत. एके दिनी भर बाजारात नाथाकाका आणि नानांची गाठ पडली. शब्दाला शब्द वाढून दोघांत हमरी-तुमरी चालू झाली. नानांनी जे नाथाकाकाला उचलला आणि गरगर फिरवला तो त्याची भीतीने पार गाळण उडाली. त्याने ह्यानंतर बाकी गावकर्यांनादेखील उपद्रव करणे बंद केले. भाऊबंदांनी घाबरुन जाऊन शेतीवाडी सर्व परत केले.
मग नानांचा हळूहळू गावात जम बसू लागला. सांपत्तिक स्थिती सुधारत होती. त्यांचा मूळचाच दिलदार स्वभाव आता उफाळून वर आला. जमेल तशी, कोणाला गरज पडेल तशी ते मदत करु लागले. वाड्यातील राबता वाढला. नाना येणार्या-जाणार्याला आग्रहाने बोलावून कुठे दूध प्यायला लाव, कुठे वानोळाच दे, जेवायलाच ठेवून घे असे करत असत. रोजच्या पंगतीला चार-पाच काय अधिकच पान जास्तीचे उठू लागले. आजीचीही ह्या सगळ्याला साथ होतीच. आजी देखील ग्रामपंचायत सदस्य होती. तिचीही आपल्या परीने समाज-सेवा चालूच असे. ह्या सर्व प्रपंचात माणसा-माणसात भेदभाव मात्र त्यांनी कधीही केला नाही. कोण गरीब, कोण श्रीमंत, कोण कुठल्या जातीच्या ह्या चौकशा वाड्यात कधीच झाल्या नाहीत. सगळी आपली माणसं. लोकही काही संकट असो, छोटी-मोठी अडचण असो, हक्काने नानांकडे येत. नानाही त्यांचा विश्वास सार्थकी लावत. वाडा म्हणजे सगळ्यांचं आश्रयस्थान बनलं. लोक आदराने त्यांना अण्णा आणि आजीला चंपाकाकू म्हणू लागले.
त्यांच वैशिष्ठ्य म्हणजे कुठलीही गोष्ट त्यांनी स्वतःपुरती सीमित ठेवली नाही. दूध पिणे आरोग्यास चांगले ना मग घरकामाची गडी-माणसे पण दूध प्यायल्याखेरीज कामाला हात लावणार नाहीत. त्यांच्या मुलींना तर दूध/व्यायाम सक्तीचे होतेच पण गावातल्या मुला-मुलींनाही त्यांचा तो आग्रह असे. तेच वाचनाचेही. त्यांना वाचनाची भयंकर आवड. डिटेक्टिव कथा वाचायचा ही त्यांना नाद होता. दोन मोठी कपाटे भरुन अनेक विषयांवरची! मोगरा फुलला पासून ते बाबुराव अर्नाळकरांच्या झुंझारकथांपर्यंत, माझी जन्मठेपपासून चांदोबा, आईची देणगीपर्यंत असंख्य पुस्तके त्यांच्याकडे होती. त्यातच ८० पैशांना विकत घेतलेली "स्वामी" देखील होती. कोणीही यावे, आवडेल ते पुस्तक वाचायला न्यावे असे चाले. यातच अनेक डांबरट लोकांनी पुस्तके लंपास केली. त्याविषयी आम्ही कोणी तक्रार करु परंतु नाना पुन्हा पुन्हा पुस्तके देत राहत. नानांचा इतिहासाचा ही गाढा अभ्यास होता. एक एक घटना, गाजलेले प्रसंग, सनावळी त्यांना तोंडपाठ होत्या. आम्ही लहानपणी मालुंज्याला गेलो की समोर बसवून ते शिवरायांपासून सुरुवात करीत ते दुसरे महायुद्ध उरकून भारताला स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय सोडतच नसत. तेव्हा आम्हाला शेतावर उडाणटप्पूपणा करायला जायचे असे. त्यामुळे तिथे बसून रहायचा कंटाळा येई. नानांची नजर बारीक, टिवल्याबावल्या केल्या की लगेच हटकत. पण त्यांच्या त्या प्रवचनांचा परिणाम की काय आम्हा सर्व भावंडांना इतिहासाची/वाचनाची अतिशय आवड आहे. त्यांची निवेदनशैली वेगळीच होती. गेल्या महिन्यात श्रीमान योगी वाचून झाले तेव्हा मनात असंख्य प्रश्न उभे राहिले. नानांची तीव्र आठवण झाली. मला ठाऊक आहे मी जर शिवरायांच्या त्या शेवटच्या कालखंडाविषयी विचारले असते तर नानांनी "ती सोयराबाई अतिशय लबाड बाई..." अशी सुरुवात करुन माझ्या सर्व शंकांचे निरसन केले असते.
खोटं बोललेलं एक त्यांना अजिबात आवडत नसे. कुणी खोटारडेपणा करतंय असे दिसले की नानांनी दिलाच दणका. ज्याला प्रसाद मिळे त्याच्या घरचेही म्हणत, "अण्णांनी मारलं ना, मग तुझीच चूक असणार" एवढा विश्वास. कोणी चहा पिताना दिसला की नानांनी दुधाची महती सांगितलीच पाहिजे. नेमकेच माझ्या आजीला चहा फार आवडे. त्या एका विषयावरुन नवरा-बायकोत कायम वाद होत.
अशाप्रकारे सामोरा येईल त्याला सन्मार्गाला लावणे, त्याच्या आयुष्याची घडी लावून देणे हे त्यांनी आपले कर्तव्यच मानले. आपल्या आचार-विचारांनी नानांनी एक आख्खी पिढी भारुन टाकली होती. गावात अतिशय छान वातावरण तयार केले होते. मग लोकप्रियतेबरोबरच शत्रूही तयार झाले. भाऊबंदही टपलेले होतेच. त्यांच्यावर तीनदा मारेकरी घालण्यात आले. नानांची पद्धत अशी की रात्री दाराला कडी लावायची नाही. मी असताना कोण चोर-दरोडेखोर येतो त्याचा बेत बघतो असे म्हणत. झोपही इतकी सावध असे की मांजरीच्या पावलांनी कुणी आले तरी त्यांना चाहूल लागत असे. तीनही वेळा त्यांनी मारेकर्यांना चांगला चोप देऊन कबुली घेतली. शेवटी ते गयावया करु लागत आणि नाना त्यांना क्षमा करुन सोडून देत.
माणसांवर जसे प्रेम तसे प्राण्यांवरही अतिशय प्रेम. त्यांच्याकडे नेहेमी एक कुत्रा पाळलेला असे. त्याशिवाय अजूनही ७-८ कुत्री कायम वाड्यात मुक्कामाला असत. गायी तर असतच. १०-१२ झोपे दिलेल्या तालेवार गायी म्हातार्या झाल्यावर त्या विकून टाकाव्यात असे सगळेच सांगत. नानांनी मात्र कसायाच्या भीतीने एक गाय कधी कुणाला दिली नाही की विकली नाही. ते म्हणत माझी आई म्हातारी झाली तर मी विकणार आहे का कुणाला देणार आहे?
शेवटच्या दिवसांत मात्र त्यांना एकाच गोष्टीचा ध्यास लागला होता. विठ्ठल मंदिराचे बांधकाम खचले होते. ते पूर्ण करुन घे असे वारंवार बाबांना सांगत. बाबांनी आणि नानांचे छोटे भाऊ, अच्युतकाकांनी मिळून ते काम नेटाने पूर्णही केले. वयाच्या ८९ व्या वर्षी एक अतिशय समाधानी आयुष्य व्यतीत करुन नानांनी देह ठेवला. अंत्यसंस्कारासाठी गावेच्या गावे लोटली. काही नातेवाईक यायला वेळ होणार होता. वाड्याच्या प्रांगणात असंख्य लोक जेवण-खाण न करता नि:शब्द बसून होते. जणू त्यांच्या घरातलेच एक माणूस हरवले होते.
काल-परवाची गोष्ट. शेतीवाडीची पहाणी करायला बाबा मालुंज्याला गेले होते. रस्त्यात रामदास पवार काका भेटले. ऐंशीच्या वर वय आहे पण पायीच निघाले होते बांधावर. बाबा तब्येतीची चौकशी करु लागले. तसे म्हणतात, "तुझ्या अण्णाची कृपा आहे बघ. त्यांनी व्यायामाची, दुधाची, निर्व्यसनी आयुष्याची सय लावली म्हणुन ह्या वयातही हाडं-काडं मजबूत आहेत बघ." कधी असेच कुणी भेटतात, अण्णांनी लावलेल्या वाचनाच्या आवडीने कशी आयुष्याला दिशा मिळाली सांगतात. लहानपणी कडक शिस्तीचे हे आजोबा फारसे आवडत नसत. भेटायला गेले की बिस्किट वगैरे खाऊ न देता जानव्यातल्या चावीने कुलूप उघडून पुस्तके देत. टोकरीभरुन आंबे खाऊ घालत. बरोबरीच्या मैत्रिणींचे लाड करणारे आजोबा बघितले की असूया वाटे. आता ते गेल्यावर इतक्या वर्षांनी श्रीमान योगी वाचून खाली ठेवली नी नानांच्या आठवणीने प्रथमच रडले. हे असे जगावेगळे आजोबा मिळणे किती भाग्याचे आहे हे जरा उशीराच कळले म्हणायचे.
(वरील लेख हा माझे वडील, श्री हेरंब आवटी ह्यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेल्या कार्यक्रमाचे लिखित रुपांतर आहे. नाना म्हणजे त्यांचे वडील, माझे आजोबा.)
Monday, April 19, 2010
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
1 टिप्पणी(ण्या):
Surekha.
Post a Comment