Monday, December 27, 2010

Merrier & merrier...the X'Mas !!!

यंदा  ख्रिसमससाठी आम्हाला माझ्या आत्येभावाकडून बोलावणे होते. त्याच्या बायकोने- ब्याता- पोलिश पद्धतीने ख्रिसमस साजरा  करायचा फतवा काढला होता. भावाने आणि मी कमीत कमी आल्याचा चहा मिळाला पाहिजे असे घोडे दामटायचा प्रयत्न केला पण आम्हाला, "Do not mess with my x'mas !!" अशी सक्त ताकिद मिळाल्यावर ख्रिसमसला आल्याचा चहा केल्यास  पुढल्या वर्षी गणपतीत मोदकांच्या ऐवजी  प्येरोगि मिळतील   ह्या भितीने आम्ही चहा बासनात गुंडाळला.

पोलिश कल्चरप्रमाणे ख्रिसमस इव्हला म्हणजे २४ तारखेला मुख्य सेलिब्रेशन असते. ह्या दिवशी संध्याकाळी पाच-साडेपाचला सर्व फॅमिली मेंबर एकत्र जमतात. ख्रिसमस ट्री आधीच सजवून झालेला असतो. सगळी गिफ्ट्स सुंदर आकर्षक आवरणांमध्ये ख्रिसमस ट्री खाली ठेवलेली असतात. आधी पोटोबा आणि मग गिफ्टोबा असा कार्यक्रम असतो.
इथे ईशानसाठी म्हणून २४ ला दुपारी डेकोरेशन करायचे ठरवले होते. निघेपर्यंत बराच उशीर झाला. ९५ आमची वाट बघत थांबला होता आणि थांबलाच होता. जीपीएस काकू कधी कधी खरं बोलतात आणि त्यांचं ऐकण्यात शहाणपणा असतो. त्यांनी आम्हाला दीड तासात पोचवलं बॉ. गेल्यावर स्वागतासाठी गरम गरम हर्बाता मिओदेम सित्रेनोम (लेमन आणि हनी घातलेला पोलिश चहा) तयार होता. ट्री आधीच डेकोरेट करुन झाला होता. आम्ही त्यावरच बरोबर नेलेली ऑर्नामेंट्स जागा मिळेल तिथे टांगली. गिफ्ट्स खाली मांडून ठेवली. एवढे करुन आमचे आवरुन होइतो बाकीचे दोन पाहुणे जेमा आणि रॉबर्ट आले. जेमा अमेरिकन आहे आणि ३५ वर्षांहुन अधिक काळ कनेटिकटमध्ये रहाते आहे. रॉबर्ट जर्मनीहून इंटर्नशिपसाठी गेले सहा महिने इथे आलाय.
बरोबर सहा वाजता सगळे जेवणाच्या टेबलभोवती जमले. सुरुवात अर्थातच प्रार्थनेने झाली. प्रार्थनेच्या वेळी एक खास प्रकारचा ब्रेड किंवा ख्रिसमस वेफर (opłatek) एकमेकांना देण्याची प्रथा आहे. आपल्या हातातला हा वेफर उपस्थित असलेल्या प्रत्येकासमोर धरुन पीस, हेल्थ आणि प्रॉस्परिटी मिळो अशी सदिच्छा व्यक्त केली जाते. समोरच्या व्यक्तीने त्या वेफरचा एक तुकडा तोडून खाण्यासाठी घ्यायचा. ह्या वेफरवर अतिशय सुंदर चित्र एम्बॉस केलेली असतात.  अधिक माहितीसाठी इथे बघा.
ह्यानंतर सुरु झाले मुख्य जेवण. पोलिश कल्चरमध्ये ख्रिसमस डिनर हे मीटलेस असते. फिश आणि अंड वगळता इतर  कुठलेही सामीश पदार्थ ह्या दिवशी खात नाहीत. जेवणाची सुरुवात बार्श्त टर्वोनी उश्कामी (Barszcz Czerwony Z Uszkami - Beet soup with sour cabbage/sauerkraut dumplings) आणि ग्झिबोवा मकारोनेम (Grzybowa z Makaronem- Forest mushroom soup with home made noodles) ह्या दोन सूपने झाली. काही लोक सूपसोबत श्लेजें (Sledzie- Herring with onion and sour cucumber in veggie oil) सुद्धा खातात. इथे पण श्लेजें होते पण मी व्हेजिटेरिअन असल्याने केवळ सूपचा आस्वाद घेतला. मुख्य जेवणात आणि त्यानंतर डेझर्टमध्ये खालील पदार्थ होते:
_यजेनोवा सॅलड (Jarzynowa Salad- Veggie salad with mayonnaise and mustard)
_कपुस्ताज ग्रोहेम (Kapusta Z Grochem- Polish style sour cabbage with yellow split peas)
_प्येरोगी कपुस्ताम् झिबामी (Pierogi Z Kapusta- Steamed dumplings with polish style sour cabbage and forest mushrooms)
_प्येरोगी रुस्क्यिं (Pierogi Ruskie- Steamed dumplings with potatoes and cheese)
_रिबा स्मजोना (Ryba Smazona- Fried fish with bread crumbs)
_ख्लेब झिटनि (Chleb Zytni- Sour dough rye bread)
_सेरनिक (Sernik- Polish style cheese cake)
_प्येस्कोविच्छ काकाव्ह (Piaskowiec Z Kakao- Potato flour cake)
_प्येरनिकि (Pierniki- Polish style ginger short bread)
अजून एक पोलिश व्हाइट ब्रेड आणि २-३ प्रकारचे चीज होते. ह्यात अर्थातच प्रत्येक कुटुंबाची स्वतःची काही खासियत असे पदार्थ सुद्धा असतात. एवढे सगळे खाऊन झाल्यावर पुन्हा एक राउंड हर्बाता मिओदेम सित्रेनोमचा झाला.
जेवणानंतर भेटवस्तु देण्याचा कार्यक्रम झाला. ह्या सगळ्या गिफ्ट्सवर ते गिफ्ट ज्या कुणासाठी आहे त्या व्यक्तीचे ते नाव असते फक्त. सगळी गिफ्ट्स सँटाकडून असल्याचे गृहित धरलेले असते. ब्याताच्या फॅमिलीत गिफ्ट बॉक्समध्ये बर्‍याच गमतीजमती करतात. उदा: रिकाम्या फेशिअल टिशुच्या भल्यामोठ्या बॉक्समध्ये एक लहानसं मिंट चॉकोलेट. सँटा सगळ्यात जास्त प्रसन्न झाला तो ईशानवर. त्याच्यासाठी मामा, मामी, मावशी, आई, बाबा असे सगळ्यांनीच दोन-दोन तीन-तीन गिफ्ट्स आणली होती. त्याने सँटाचा ड्रेस न घालून सुद्धा सँटाचे काम अगदी चोख बजावले. तसे पण ख्रिसमस ट्री च्या एवढ्याशा पसार्‍यात घुसून गिफ्ट्स काढण्याइतका इवलुला तो एकटाच होता आमच्यात.
रॉबर्टशी बोलताना समजले की जर्मनीत सुद्धा २४ तारखेला संध्याकाळी मुख्य सेलिब्रेशन असते. प्रत्येक फॅमिलीच्या स्वतःच्या काही खास प्रथा असतात. रॉबर्टच्या फॅमिलीत २४ तारखेपर्यंत लहान मुलांना लिव्हिंग रुममध्ये प्रवेश नसतो. नवे कपडे  घालून, आजी-आजोबांसोबत थेट ख्रिसमस इव्हला ती सजवलेली खोली, झगमगता ख्रिसमस ट्री आणि त्याखाली ठेवलेली आकर्षक गिफ्ट्स बघायला खूप मजा यायची असे त्याने सांगितले.
जेमाच्या फॅमिलीत ख्रिसमस डिनर दोनदा होते. एकदा ख्रिसमच्या एक आठवडा आधी जेव्हा साधारण जवळचे नातेवाईक एकत्र जमतात. ह्या डिनरला नवरा आपल्या फॅमिलीकडे जातो तर बायको तिच्या फॅमिलीकडे. तिथे सख्खी चुलत बिलत भावंडे असा जामानिमा असतो. मुख्य ख्रिसमस इव्हला फक्त इमिडिएट फॅमिली असते. नवरा-बायको, असल्यास आणि येणार असल्यास आई-वडील आणि मुलं.
माझ्या माहितीत अमेरिकेत गिफ्ट्स ख्रिसमस डे च्या सकाळी उघडतात. त्यानंतर ब्रंच अथवा लंच असते. लंडनमध्ये सुद्धा गिफ्ट्स ख्रिसमस डे च्या सकाळी उघडतात. संध्याकाळी सगळ्या फॅमिलीसोबत ख्रिसमस डिनर असते.
इतकी वर्ष ख्रिसमस तसा दुरुनच साजरा केला. ह्या दिवशी सुट्टी तर असतेच. इथे मॉलमध्ये ख्रिसमस इव्हला छान कार्यक्रम असतात. तिथे एक मोठा ख्रिसमस ट्री आणि इतर बरेच डेकोरेशन केलेले असते. लहान मुलांच्या दिमतीला एक सँटा पण असतो. मॉलमध्ये जायचे, सँटासोबत फोटो काढायचा, तिथेच X'Mas Carols ऐकायचे, घरी येताना हाय वे न घेता गावांमधून आतल्या रस्त्यांनी ख्रिसमस डेकोरेशन बघत यायचे, लोकांच्या उत्साहाचे कल्पकतेचे कौतुक करायचे असे मर्यादित सेलिब्रेशन असायचे. ह्यावर्षी पहिल्याने असा ख्रिसमस सेलिब्रेशनमध्ये भाग घेतला. ईशानने तर धमाल केलीच पण आम्ही मोठ्यांनी पण खूप एन्जॉय केले. बिलव्ड फॅमिली, पर्फेक्ट मील, लॉट्स ऑफ गिफ्ट्स अँड माय लिटल सँटा...it couldn't have been merier !!! 

Sunday, December 5, 2010

शिवणाची कात्री

माझ्या आईकडे एक 'शिवणाची कात्री' होती. होती म्हणजे अजून आहे. केशरी मूठ, मॅट फिनिशची पाती. ती कात्री म्हणजे आईच्या विशेष जिव्हाळ्याचा विषय. त्या कात्रीला हात लावायची आम्हाला कुणालाच परवानगी नव्हती. अगदीच उन्हाळ्याच्या सुट्टीत काही भरतकाम करायला घेतलं तर कटपीसमधून रुमालांचे चौकोनी तुकडे कापायला तेवढी ती कात्री हातात येई. पण चुकून जरी त्या कात्रीने कागद-बिगद (बिगद मध्ये पुठ्ठे, थर्माकोल, स्ट्रॉ, सुतळ्या, झाडांच्या फांद्या जे काही कापण्यासारखं असेल ते सगळं येतं) कापले की आईच्या नजरेला आणि आवाजाला त्या कात्रीची धार येई. आणि कात्रीची धार कमी होई. तसं पण अधनंमधनं तिची (कात्रीची) धार कमी होत असे. मग तेवढ्यापुरती कात्री संजू/नंदू/बन्सी अशा कुणाच्या तरी ताब्यात जाई. तो कुठून तरी तेज धार लावून आणे आणि कात्री पुनः: पहिल्यासारखी. कापडाच्या एका टोकाला लावली की सर्रर्रर्रर्र दुसर्‍या टोकापर्यंत अजिबात बोटं न चालवता कपडा कापला गेलाच पाहिजे.

आमच्या गावात एक मारवाडी मुलगा मुंबईहून "imported" सामान आणून घरोघरी विकायचा. ही कात्री आईने त्याच्याकडून घेतली होती. आता सगळीकडे तशाच कात्र्या मिळतात पण तेव्हा ती खूपच भारी वाटलेली. त्या आधी कित्येक वर्ष- किंबहुना मला आठवतंय तसं- आईकडे एक लोखंडाची जड कात्री होती. तिचं पण असच एक लाईफ सायकल होतं. अधनंमधनं तिची (कात्रीची) धार कमी व्हायची. मग संजू/नंदू/बन्सी कुणीतरी धार लावून आणायचा. कात्री परत पहिल्यासारखी!! त्या कात्रीने सुद्धा कागद-बिगद कापायला परवानगी नसे. नंतर नवी केशरी मूठवाली आल्यावर ह्या लोखंडाच्या कात्रीचं 'कागदाची कात्री' असं डिमोशन झालं. केशरी मूठवालीने मात्र अढळपद पटकावलं.

ह्या दोन्ही कात्र्यांनी आईने आमच्यासाठी असंख्य सुंदर सुंदर कपडे बेतले असतील. कोणा कोणाच्या लेकीबाळींसाठी बाळंतविडे केले असतील. कित्येक नवशिक्यांना पहिल्याने कपडा बेतायला शिकवला असेल. काही गणतीच नाही. तेव्हा एक तर आजच्यासारखे डिजीटल कॅमेरे नव्हते. शिवाय उजव्या हाताचं डाव्या हाताला कळू नये इतक्या सहजतेने आईने सगळं केलं. ह्या सगळ्याचं काहीच रेकॉर्ड नाही याचं आता फार वाईट वाटतं. तेव्हा आमचे वेळप्रसंगी काढलेले काही फोटो आणि आम्हाला आठवणीत राहिलेले काही एवढ्या शिलकीवर मी आणि धाकट्या बहिणीने पेंट ब्रशमध्ये आईने शिवलेल्या कपड्यांचे काही डिझाइन्स करायला घेतले आहेत. पूर्ण झाले की इथे टाकेनच. तोपर्यंत फक्त ही छोटीशी आठवण

Sunday, November 21, 2010

संवाद - कर्नल बकरे

गेल्या वर्षी मायबोली दिवाळी अंकाच्या निमित्ताने कर्नल बकरे ह्यांच्याशी गप्पागोष्टी करण्याचा योग आला. मुलाखत आणि त्यांची छायाचित्रे प्रकाशित करण्याची परवानगी मायबोली पुरतीच घेतली असल्याने तसेच मुलाखत पूर्ण होण्यात माझ्या दोन मैत्रिणींचा सुद्धा हातभार लागल्याने इथे संपूर्ण मुलाखत न देता केवळ दुवा देते आहे. हा संवाद इथे वाचायला मिळेल.

Wednesday, November 3, 2010

दसरा दिवाळी, आमच्या घरी : भाग २

दिवाळी



दसरा सरत नाही तो दिवाळीची चाहूल लागते. मध्ये सहामाही परीक्षेचाच काय तो अडसर असतो. आईची घर आवरून घेणे, दिवाळीचे सामान आणून घेणे अशी कामे सुरू होतात. संजूला आता आईचा मदतनीस म्हणून घरी जास्त वेळ थांबावे लागते. आम्हालाही परीक्षा संपल्यावर करायची कामे नेमून मिळतात. त्यात पुस्तकांचे कपाट आवरणे आणि स्वत:ची सायकल सर्विसिंग करून आणणे पहिल्या नंबरावर असतात. अशातच एक दिवस आई बाजारात जाऊन आम्हा सर्वांसाठी  फ्रॉक, सलवार-कमीज असे काय काय शिवायला कापड घेऊन येते. भावासाठी अर्थातच तयार शर्ट/पँट येतात त्यामुळे त्याला नव्या कपड्यांची जरा कमी वाट बघावी लागते. एखादे वर्षी दिवाळीच्या दरम्यान प्रेसच्या अथवा पार्टीच्या कामानिमित्त बाबांचे पुण्या/मुंबईला जाणे झाले तर आम्हाला एक-एक बोनस ड्रेस मिळे. आई अतिशय उत्तम शिवणकाम करते त्यामुळे आम्ही लहान असल्यापासून ते परवा परवा पर्यंत आमचे कपडे ती घरीच शिवायची. आम्ही मोठ्या झाल्यावर अशीच बाही हवी, तसाच पॅटर्न हवा, एम्ब्रॉयडरी हवी अशा मागण्या करत असू. शिवाय दिवाळीच्या तीन दिवसांचे तीन वेगवेगळे पॅटर्न्स हवे असत. आई पण इतके मस्त शिवायची की त्यापुढे इतर मैत्रिणींचे किंवा बाबांनी आमच्यासाठी विकत आणलेले कपडे फिके वाटत. इतके छान कपडे घालण्यासाठी दिवाळीपर्यंत वाट बघावी लागे हा आणखी एक अत्याचार!!!

परीक्षा संपेपर्यंत आईने बाई, सजू ह्यांच्या मदतीने घर आवरून ठेवलेले असे. सगळे डबे, क्रॉकरी घासून पुसून आल्याने स्वयंपाकघर तर विशेष चकचकीत दिसे. बाबांची प्रेसवरील कामावर देखरेख असे. तिथे पण साफसफाई, रंगरंगोटी, सगळी मशीन्स घासून पुसून स्वच्छ करणे, त्यांचे तेल-पाणी करणे अशी कामे सुरू असत. ह्या काळात प्रेसमध्ये जायला फार आवडे. कारण प्रश्नपत्रिकांची कामे आवरल्याने आणि लग्नसराईस अवकाश असल्याने सहसा फक्त दिवाळी भेटकार्डांची कामे सुरू असत. गुळगुळीत कागदांवर मनमोहक रंगात पणत्या, आकाशकंदील, रांगोळ्यांची चित्रे आणि आत दिवाळी शुभेच्छांचा लाघवी मजकूर अशी भेटपत्रे बघायला खूप गंमत वाटे.

... आणि एके दिवशी सकाळी अचानक कॉलनीतल्या बायकांचा भांडणसदृश्य कलकलाट ऐकू येई. तो आवाज दिसर्‍या तिसर्‍या कशाचा नसून दिवाळी फराळाचे जिन्नस करण्यासाठी महाराजाशी चाललेल्या घासाघिशीचा असे. मुख्य अडचण असे महाराजाच्या वेळेची. मग एखादीकडे दिवाळसण वगैरे असेल तर तिला पहिला नंबर मिळे. पण तिच्या दारात महाराजाची भट्टी पेटणार आणि एकामागून एक सगळ्यांचेच जिन्नस तिथेच होणार ह्या अटीवर. सहसा बुंदीचे लाडू, बालूशाही, गाठी प्रकाराची पण तिखट शेव, एखादे वेळेस मक्याचा चिवडा ह्यासारखे प्रकार आई महाराजाकडून करून घेई. बाकी दडप्या पोह्यांचा चिवडा, चकल्या, शेव, शंकरपाळी, लाडवांचे प्रकार, अनारसे, करंज्या हे सगळे आई बसुबारसेपासून करायला सुरुवात करे. चकली तर एका वेळी एक पायलीचा डबा भरून अशी दोन तीन वेळा तरी होई. कारण आम्ही खादाड, आमचे मित्र-मैत्रिणी खादाड!!! आता मी दोन तीन प्रकार करते तर सगळ्या गावाला जाहिरात असते. पण आई तेव्हा एकटीने सगळे व्याप कसे सांभाळत असेल ह्याचे आश्चर्य वाटते. आम्ही मोठ्या झालो तसे आईला जमेल तशी मदत करत असू. त्यातल्या त्यात आरतीने आईच्या हातचे करणे हुबेहूब- कणभर अधिकच- उचलले आहे. बाकी आम्ही तिघी जन्मभर साइड हिरॉईन्स! भावाला पण आईने काही नाही तर सोर्‍यात पीठ घालून दिले की चकल्या कशा करायच्या ते शिकवण्याचा प्रयत्न केला. पण तो चुकीच्या ठिकाणी प्रेशर देतो. त्यामुळे त्याला २-३ चकल्या केल्या की लगेच पळावे लागते. मग आई त्याला सामान आणणे, वरचे डबे काढून देणे गेला बाजार लाडवांपासून स्वतःला आणि मांजरांना दूर ठेवणे अशी कामे सांगते.

त्याचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे किल्ला करणे. पुढच्या दारात कोन होत असलेल्या कुठल्याही दोन भिंतींना धरून तो किल्ला करतो. एक संपूर्ण दिवस तो किल्ल्यात घालवतो. त्यावर शेणाचा सडा वगैरे 'संस्कार' बाईकडून करवून घेतो. अळीव, धणे वगैरे धान्य लावणे, आरसा ठेवून तळ्याचा देखावा करणे, किल्ल्याच्या अर्ध्या उंचीएवढा शिवाजी राजांचा पुतळा लावणे, त्या पुतळ्याच्या बेसपेक्षाही छोटे मावळे लावणे, ह्या दोन्हींच्या उंचीशी काहीही संबंध नसलेल्या तलवारी, भाले वगैरे लावणे काही म्हणून करायचे ठेवत नाही :) एके वर्षी तर त्याने किल्ल्यापेक्षा उंच दोन त्रिशूळ लावले होते. एवढे करून शेवटच्या दिवशी सगळे मित्र मिळून खास टाइम बाँब (एका मोठ्या फटाक्याला सुतळी बांधून त्या सुतळीचे टोक आधी पेटवायचे. सगळी सुतळी जळून फटाका फुटेपर्यंत थोडा टाइम जातो म्हणून 'टाइम बॉंब') लावून एक एक किल्ला उडवून देतात.

एव्हाना सगळा बाजार दिवाळी अंक, कंदील, रांगोळ्यांचे रंग, लाह्या-बत्ताशे आणि फटाक्यांनी सजतो. घरी मटा, सास, सकाळ, विवेक असे अंक येत पण ते अगदी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी. एखादे दिवशी आम्ही बरीच चर्चा, बोलाचाली, वादावादी इत्यादी करून यंदा कसा आकाशकंदील आणायचा आणि अजून कुठले दिवाळी अंक आणायचे हे 'एक'मताने ठरवून बाजारात खरेदीला जात असू. बाबांनी पैसे सगळे स्वाती नाहीतर आरतीकडे दिलेले असत. त्यामुळे आधी काहीही ठरले असले तरी बाजारात गेल्यावर ह्या स्वत:च्या पसंतीने खरेदी करत. ह्याच वेळी आपापल्या ड्रेसला मॅचिंग क्लिप्स, टिकल्या, नेलपेंट्स, लिपस्टिक्स वगैरेची पण खरेदी होई. आणि थोडे फार फटाके. फटाक्यांचा मुख्य बाजार गावाबाहेर भरतो. गावात दोन-चार लहान स्टॉल्स लागलेले असत. तिथून आम्ही अगदी थोडे फटाके घेत असू. कारण फटाक्यांची आमच्या घरी प्रथा अशी की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी बाबा आम्हाला कुठले फटाके हवे ते विचारून मोठ्या मार्केटमध्ये खरेदी करत. एखाद्या वर्षी नवीन आलेले प्रकार त्यांनी मुद्दाम जास्त घेतलेले असत. हे सगळे फटाके प्रेसमध्ये आधी जात. प्रेसमध्ये पूजा झाल्यावर लावायची पाच हजाराची लड, तिथे वाजवायला वेगळे आणि आम्हाला घरी वाजवायला वेगळे असा फटाक्यांचा ढीग लागलेला असे. पूजा झाल्यावर आधी ती लड लागे आणि मग बाकीचे फटाके उडवायला मिळत. घरी पण पूजा झाल्याशिवाय फटाके मिळत नसत. हे सर्व नियम आम्हालाच बरं. आता नातवंडांसाठी सगळे नियम गुंडाळून माळ्यावर गेलेत. ही कार्टी दिवाळी सुरू नाही झाली की दुपारी बारा वाजता भुईनळे लावतात आणि आजी-आजोबा त्यांचे कौतुक बघतात.

सगळी जय्यत तयारी होते आणि नरकचतुर्थीचा दिवस उजाडतो. हा दिवस म्हणजे सूर्योदयाच्या आधी न्हाण्याचा दिवस नाहीतर नरकात प्रवेश नक्की. रचना, भाऊ आणि स्वाती हे सर्व नरकनगरीचे कायमस्वरूपी नागरिक. अगदी लहान असताना आईने सूर्य उगवायच्या आत न्हाणीघरात उभे करून डोक्यावर पाणी ओतून जी काही पुण्याची सोय केली तेवढीच. आई, आरती, मी, रचना, स्वाती, भाऊ+बाबा अशा क्रमाने मंडळी उठतात आणि आवरतात. आजचा खास दिवस म्हणजे बाबा आणि भावाला तेल लावायचा. बाबा नावापुरते चार थेंब डोक्यावर चोळून घेतात. भाऊ मात्र वर्षभराची खुन्नस ह्या दिवशी आणि भाऊबीजेला काढतो. हात-पाय-पाठ-डोकं अगदी व्यवस्थित रगडून घेतल्याशिवाय उठतच नाही. एवढं करून भाऊबीजेला सुट्टे पाच रुपये द्यायचा. आणि एक लहानपणापासूनची खोड की तो अंघोळ करत असताना बाहेर फटाके वाजवायचे नाहीतर तो बाहेरच येत नाही. आता मोठा झालाय तसा. लक्षात ठेवून आमच्यासाठी काहीतरी आधीच आणून ठेवतो :)

बरेचदा लक्ष्मीपूजन आणि नरकचतुर्थी एकाच दिवशी येतात. दिवाळीला काही मेहूण नसते. त्यामुळे आई थोडी रिलॅक्स असते. तरी साडे अकरा-बाराच्या सुमारास तिचे सगळे आवरतेच. आजच्या दिवशी आमच्याकडे बासुंदीचा बेत असतो. कधी आई घरी करते तर कधी बुवा हलवाईकडची प्रसिद्ध बासुंदी ऑर्डर देऊन आणतो. मला आणि आरतीला बासुंदी आवडत नाही म्हणून आमच्यासाठी चितळ्यांचे आम्रखंड असते. बाकी भजी, दोन-चार भाज्या, ओल्या नारळाची चटणी, कोशिंबीर, पापड-कुरडया, पुर्‍या असे नेहमीचे यशस्वी कलाकार असतातच. सोवळ्याचा स्वयंपाक नसल्याने कांद्याची भजी पण होतात. आजही सगळ्या घरादाराला झेंडू, शेवंतीचे हार होतात. येता जाता फराळावर ताव मारत आम्ही सडा घालणे, रांगोळ्या काढणे, फुसक्या फटाक्यांची दारू गोळा करणे अशी कामे करतो. आज आम्ही सगळे घरचेच असल्याने सगळे बैठकीच्या खोलीत खाली पंगत मांडून जेवायला बसतो. बाबांचा स्वभाव फार मिश्किल आहे. ते जास्तकरुन आईला आणि आरतीला काहीबाही चिडवतात. आम्ही असतोच फिदीफिदी हसायला. गोडाचे जेवण झाल्यावर मसाला पान हवेच. हे काम मात्र भाऊ आनंदाने करतो. आणि मग दुपारी दिवाळी अंक वाचता वाचता इतकी मस्त झोप लागते.

जाग येते तीच अनारशांच्या वासाने. आईने लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू केलेली असते. तेल, वाती घालून पणत्या एका मोठ्या थाळ्यांत ठेवलेल्या असतात, स्वच्छ चकचकीत पूजेची चांदीची भांडी, समया, लक्ष्मीची मूर्ती, लाह्या बत्तासे, हळद कुंकू, फुलं, उदबत्त्या असा सगळा सरंजाम तयार असतो. एकीकडे अनारसे करणं सुरू असतं. सजू पण प्रेसमधल्या पूजेच्या सामानाची यादी घेऊन आलेला असतो. त्याची वेगळी तयारी असते. प्रेसमध्ये सतरंजी पासून सर्व सामान द्यावे लागते. बाबा संजुकडून सगळ्या बागेत, अंगणात पाणी मारून घेणे, गाड्या लांब उभ्या करून आमच्या फटाक्यांसाठी मोकळी जागा बनवणे अशी कामे करून घेतात आणि खूप वेळा 'मी आहे म्हणून सर्व कामं वेळेत होतात' असे आईला ऐकू जाइलशा आवाजात म्हणतात. ताया आज पण सुंदर रांगोळी रेखाटतात. आजची रांगोळी अशी काढलेली असते की त्यात ठिकठिकाणी पणत्या ठेवून सजावट करता येईल. आम्ही किल्ल्यासमोर पण त्यांच्याकडुन रांगोळी काढून घेतो आणि सगळ्या किल्ल्यावर त्यांना रांगोळीसाठी नको असलेले रंग फवारतो. किल्ल्यात पणत्या ठेवायला मोक्याच्या जागा असतात. तो रंगीबेरंगी किल्ला सगळ्या पणत्या लावल्यावर इतका गोजिरा दिसतो.

सगळे आवरुन मग आम्ही प्रेसमधल्या पूजेसाठी जातो. प्रेस जिथे आहे तिथे एका बैठ्या इमारतीत शेजारी-शेजारी पाच-सहा ऑफिसेस आहेत. सगळ्या सहा कार्यालयांना पुरेल असा प्रशस्त मांडव घातलेला असतो. मध्ये मध्ये नारळाच्या झावळ्या उभारलेल्या असतात. प्रत्येक कार्यालयासमोर तिथल्या कामगारांनी त्यांच्या आवडीप्रमाणे रांगोळी वगैरे सजावट केलेली असते. आमच्या प्रेससमोर हटकून 'कमळ' काढलेले असते. इथे मात्र माझे कलाकौशल्य जोखण्याची मला मुभा असते. थोड्याच वेळात इंद्रधनुष्याला लाजवेल असे रंगीबेरंगी कमळ दिमाखात हसते. तिथे एकच गुरुजी सगळीकडे पूजा सांगायला येतात. गुरुजींची वाट बघत मंडळी मांडवात खुर्च्या घालून बसतात. मग बाबांचे कुणी कुणी स्नेही त्यांना भेटायला येतात. त्यांच्या बायका प्रेसमध्ये आत आईला भेटतात. प्रत्येकाला आम्ही यंदा कितव्या यत्तेत आणि परीक्षा सोप्प्प्प्पी गेली सांगतो. एकदाचे गुरुजी येतात. प्रत्येक ठिकाणी जाऊन ऐकली तरी बोध होणार नाही अशा अगम्य भाषेत आणि अचाट वेगाने गुरुजी पूजा सांगतात. एरवी दहा हाका मारूनही ढिम्म न हालणारा माझा भाऊ गुरुजींनी पूजेत सांगितलेले विधी मात्र बिनचूक कसे करतो हे एक कोडेच आहे. आम्हाला तसे पण पूजा कधी एकदा संपते आणि कधी एकदा फटाके फोडायला लागतो ह्याची घाई असते. एकदा का लाह्या बत्तासे, पेढ्याचा बोकणा भरला की आम्ही उदबत्त्या, फुलबाज्या घेऊन तयार असतो. सगळ्यात धमाल असते ती मोठ्या लडींची. जसे गुरुजी एका एका ठिकाणची पूजा संपवतात तशा ह्या लडी पेटायला लागतात आणि सगळीकडे नुसता तडतडतडतड आवाज भरून राहतो. आई पदर लावून तिच्या नातवंडांचे कान घट्ट झाकण्याचा प्रयत्न करते पण ते घाबरतातच. प्रेसमध्ये कागद भरलेला असल्याने दरवर्षी न चुकता बाबा थोडे दूर जाऊन फटाके उडवायला सांगतात. प्रेसमध्ये आणलेले फटाके तिथल्या कामगारांना आणि आम्हाला असे असतात. त्यामुळे ते पण खूश असतात. मला आठवते लहानपणी प्रेसमधल्याच कुणाचे तरी बोट धरून पहिला सुतळी फोडला होता.  झाडून सगळे फटाके उडवल्यावर आम्ही कुणाची कशी फजिती झाली आठवून दात काढतो. मग तिथला सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे बोनस वाटप करून सगळेच घरी येतो.

आईने पूजेची तयारी आधीच केलेली असते. इतक्या वर्षांच्या अनुभवाने घरची पूजा आईच सांगते. दिव्यांच्या प्रकाशात एकाग्र चित्ताने श्रद्धेने एक एक विधी सांगणार्‍या घरच्या लक्ष्मीचं ते देखणं रूप बघतच राहावं असं. बाबा मुद्दाम 'आज जरा नवी साडी नेसायची की' असं म्हणतात पण ती त्यांच्या परीने दिलेली दादच असते. आई पण लटक्या रागाने, 'तुमच्या पेक्षा बरं आहे. तुमचे तर नवे की जुने कळत नाहीत' असं उत्तर देते. देवीची आरती करून आणि प्रसाद घेऊन आम्ही फटाके वाटप उरकून घेतो. प्रत्येकाचे तीन दिवसांचे तीन वाटे होतात. दिवाळीचे नवे, सुळसुळीत कपडे घालून फटाके फोडायचे नाहीत हा अजून एक दंडक. नवेच पण कॉटनचे कपडे घालून आम्ही फटाके घेऊन अंगणात जमतो. एकामागून एक भुईनळे उडतात, सुतळी कानठळ्या आणतात, चक्रं भिरभिरतात तर बाण सुईsssss आवाज करत आकाशात झेपावतात आणि चिल्ली पिल्ली फुलबाज्या नाचवत गातात दिन दिन दिवाळी.... गाई म्हशी ओवाळी!!!

दिवाळी निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

Monday, October 25, 2010

दसरा दिवाळी, आमच्या घरी : भाग १

दसरा

माझे बाबा सगळ्यात मोठे म्हणून परंपरेने सर्व देव त्यांच्याकडे आलेत. आई दरवर्षी सगळे सणवार अगदी श्रद्धेने करते. ह्यात गौरी गणपती, दसरा, दिवाळी, चैत्र गौर हे ठळक मोठे सण जेव्हा मेहूण, सवाष्ण, मुंजा असे कोणी कोणी जेवायला बोलावतात. दसर्‍याला मेहूण असते. नैवेद्याचा स्वयंपाक, पूजा, देवीची आरती, सडा-रांगोळ्या, फुलांच्या माळा, वाहनांची सजावट अशी कितीतरी कामे दुपारी बारा पर्यंत उरकायची असतात. आईने दरवर्षी प्रमाणे आदल्याच दिवशी सार्वजनिक तंबी दिलेली असते,"उद्या सगळ्यांनी लवकर उठायचं (हे भाऊ आणि बाबांसाठी) आणि भराभर कामं उरकायची (हे मी आणि रचनासाठी)". नवरात्राचे उपवास, पुजा-अर्चा करून तिच्यात एकदम देवी संचारली आहे की काय असे वाटते. त्यांमुळे बाबांसह आम्ही सगळे निमूट माना डोलवतो.

दुसर्‍या दिवशी सकाळी नऊ वाजता चित्र असं असतं- बाबा वर्तमान पत्रांची चळत घेऊन एकदम बाहेरच्या खोलीत- व्हरांड्यात एका वर्तमानपत्रात डोके घालून बसलेले, भाऊ- मांजराने डोळे मिटून दूध प्यावे तसे- चहाचा कप घेऊन आवाज बंद ठेवून टी व्ही बघत बसलेला, मोठी बहीण घरकामाचा गडी बरोबर घेऊन फुले, आपट्याची पाने आणायला गेलेली (तिकडेच खूप वेळ लावायचा आणि आल्यावर गावात फारच ऊन आहे म्हणून एका जागी बसून राहायचे असा हिचा दरवर्षीचा प्लॅन), मी गेले एक तासभर फक्त मागच्या-पुढच्या अंगणात सडा घालून रांगोळीचे ठिपके तिरके घालत आई नाश्त्याला कधी हाक मारते याची वाट बघतेय, रचना दूर्वा खुडायच्या नावाखाली बागेत मांजरांशी खेळते आहे आणि आरती व आई सकाळीच अंघोळ-बिंघोळ करून स्वयंपाकघरात स्वयंपाकाच्या तयारीत. सकाळपासून आईची अनंत कामे करून झालेली असतात. आरती पण तिच्याबरोबर शर्यतीत असते. पण तेव्हढ्या घाईत देखील दोघीजणी आम्हा काम न करणार्‍या मंडळींवर येताजाता तुच्छ कटाक्ष टाकायचे विसरत नाहीत.

तेव्हढ्यात आई घाईत पोह्यांची बशी घेऊन बाबांना नाश्ता द्यायला येते. "तुम्ही किनई आत बसा पेपर वाचत. मला आज हेलपाटे घालायला लावू नका". बाबांना ठरावीक वेळेपर्यंत नाश्ता नाही मिळाला की ते घरात येतातच पण आईलाच धीर नसतो. सगळी कामे कशी भराभर उरकायची असतात. पण बाबा वर्तमानपत्रातून डोकेही वर काढत नाहीत. त्याने आईचा पारा चढतो, "ते पेपर राहूद्यात बरं आजच्या दिवस. बातम्या काही कुठे जात नाहीत, उद्या वाचा".
"हं" बाबा.
त्यांचा थंडपणाने आई अजूनच चिडते,"आहो आज मेहूण सांगितलं आहे. ते पाठक काका बरोबर बाराच्या ठोक्याला येतील आणि तुम्ही बसा पेपर वाचत."
बाबा (अती थंडपणे),"झालंच" त्यांना खरे तर संध्याकाळी विजयादशमी निमित्त कुठेतरी सभेत करायच्या भाषणाची पूर्वतयारी म्हणून सगळी वर्तमानपत्रे जरा अधिक बारकाईने वाचायची असतात.
आता आई शेवटचे अस्त्र काढते,"तुमच्याच घरातल्या रिती-भाती सांभाळते तर ही तर्‍हा...."
पुढे तिला काही बोलू न देता (तेच फायद्याचे असते) बाबा ,"नऊच तर वाजताएत. मी मागून सावकाश आवरणार होतो. म्हंटलं तुमचं आधी आवरू द्यावं, माझी लुडबुड कशाला."
आई, "हो !! तुम्ही तुमचं आवरा, आमची नका काळजी करू...तुमचा शर्ट बदलून होईपर्यंत माझा पुरणाचा स्वयंपाक होतो."

आईने असे म्हंटल्याबरोब्बर भावाच्या तोंडातून तर एकदम चहाचा फवारा टीव्हीवर उडतो. बाकीची आम्ही हातातली कामे सोडून खी खी करायला लागतो. हा संवाद न चुकता दर वर्षी दसर्‍याला आमच्या घरी होतो आणि प्रत्येक वेळी आम्ही तो पहिल्यांदाच होतो आहे असे हसतो.

आई आता चिडली आहे हे बघितल्या बरोबर भाऊ चहाचा कप तिथेच ठेवून रॉकेट सुटावे तसे सूssss न्हाणीघरात घुसतो. मी आणि रचना गप्प बसून पोह्यांवर ताव मारतो. नाश्ता झाल्यावर मग आम्ही सगळेच भराभर अंघोळी करून घेतो. स्वाती आणि सजू तोवर येतातच. वर्षानुवर्षे आमच्याकडे अदलुन बदलून सजू आणि नंदु नावाचेच गडी आहेत कामाला. तर संजुचा नाश्ता होऊन तो गाड्या धुणे, आंब्याच्या डहाळ्या आणणे अशी कामे करायला घेतो. मी, रचना आणि भाऊ झेंडूच्या माळा करायला घेतो. हा एक अत्यंत आवडता कार्यक्रम. आपल्या घराचे तोरण कसे भरगच्च, वेगळे दिसले पाहिजे ह्याचा अट्टहास असायचा. पिवळी, केशरी फुले वेगळी काढायची, दाराची मापे घेऊन दोरा ओवायचा, कल्पकतेने दोन-तीन माळा एकत्र गुंफून त्याची महिरप करायची, मध्येच आंब्याची पाने ओवायची. सगळ्या घरादाराला, देवघराला, आजी-आजोबांच्या तसबिरींना, पुस्तकाच्या कपाटांना, गाड्यांना, सायकलींना गेला बाजार मांजरांना ह्या सगळ्यांना माळा केल्याशिवाय आम्ही तिथून हालायचोच नाही. एकीकडे आई आणि आरतीचा स्वयंपाक चालू असे. आलटून पालटून पुरण, बटाट्याची खास सणवार स्पेशल भाजी, कटाची आमटी, अळूची भाजी, साधे वरण, कोशिंबिरीच्या फोडण्या आणि सर्वात वरताण बटाटे आणि घोसाळ्याची भजी असे एक-एक वास नाकावर आदळत. आत्ता आत जाऊन उपयोग नाही. नैवेद्याचा स्वयंपाक असल्याने साधं एक भज्याच बोंडुक सुद्धा हाती गावणार नाही हे माहिती असूनही पाणी-बिणी प्यायच्या निमित्ताने आम्ही पुन्हा पुन्हा स्वयंपाकघरात चक्कर टाकतो. बाबांचं उगीचच "बारा वाजत आले बरं, पाठक येतीलच"
"पुरणाला साखर घातली का ?"
"वरणाला मीठ घातलं का ?"
"पाठक आले की त्यांना दक्षिणा दे बरं" असे  सल्ले देणं सुरू असतं जे आई अजिबात मनावर घेत नाही.

असे करत एकदाची सगळी कामं संपतात. पक्वान्नांनी नैवेद्याची ताट सजतात. पाठक काका-काकू अगदी बाराच्या ठोक्याला येतात. नैवेद्य दाखवून देवीची आरती झाली की मंडळी जेवायला बसतात. सगळा स्वयंपाक कसा अगदी चोख चविष्ट झालेला असतो. दसर्‍याच्या जेवणाचे स्टार आकर्षण म्हणजे फुलोरा. साटोर्‍या, करंज्या सप्तमीपासून डब्यात बंद असतात तो डबा आज उघडलेला असतो. हा फुलोर्‍याचा डबा उघडण्या इतकी जीवघेणी वाट मी दुसर्‍या कशाची बघितली नसेल. जेवताना नेमकेच पाठककाका बाबांना मुळ्याचा चटका (कोशिंबिरीचा एक प्रकार) घेण्याचा आग्रह करतात. बाबा ही सुवर्णसंधी सोडत नाहीत, "अहो आयुष्यभर मुळ्यांचाच चटका मिळालाय, आज मला आग्रह करू नका". आईच्या माहेरचे आडनाव मुळे आहे हे सांगायला हवे का ? थट्टा विनोदात जेवणे पार पडतात. मग खास मसाला पान होते. एके एके वर्षी दसरा अगदी सहामाही परीक्षेच्या मध्ये येई. मग दुपारी सक्तीने अभ्यास करावा लागे. पुरणाचे तुडुंब जेवण झाले असताना जडवलेल्या पापण्यांनी अभ्यास करणे इतके जीवावर येई की विचारता सोय नाही.

दुपारी चारच्या सुमारास रांगोळीचा मोठाच कार्यक्रम सुरू होतो. इथे मात्र स्वाती आघाडीवर असते. लहानपणापासूनच माझं कलेशी वाकडं असल्यामुळे रांगोळीच्या रेघा काही सरळ पडत नाहीत. त्यामुळे दोघी ताया मला बॉर्डर काढण्यापुरतं देखील रांगोळीच्या आसपास फिरकू देत नसत. आईच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी वेगवेगळ्या कल्पना लढवून दोघी इतक्या देखण्या रांगोळ्या काढत की बघतच राहावे. दोन्ही दारापुढे सुंदर रांगोळ्या, दारांना तोरणं, तुळशीपुढे दिवा सगळं घर इतकं देखणं दिसतं. आणि ह्या घरात नवी रेशमी साडी नेसून, मोजके दागिने घालून, खास नवरात्रातच मिळणारी शेवंतीची वेणी केसांत माळून प्रसन्न, कृतकृत्य चेहर्‍याने वावरणारी आई. तिच्या लगबगीने, तिच्या पदराच्या सळसळीने सगळ्या घरादारात चैतन्य भरून राहतं. सगळे काही यथासांग, रीतीने पार पडल्याचे समाधान तिच्या चेहर्‍यावर विलसत असतं. आम्ही भावंडे पण नवे कपडे घालून आवरून तयार होतो. बाबा पण शक्य तितके रंगीत- म्हणजे एरवी पांढरे घालतात ते आज ऑफ व्हाईट वगैरे रंगाचे- कपडे घालून तयार असतात. मग आई-बाबांना सोने देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले की दसर्‍याची, विजयादशमीच्या ह्या सणाची यथार्त सांगता होते !!!

Sunday, October 17, 2010

बबनची "दुसरी" गोष्ट

"दुसरी गोष्ट अशी तुमाला सांगतो बाबा अहो खुर्पणीला बाया मिळंना...धा धा दरानं बी दोघी-तिघीच आल्या..."

शुक्रवारी बाजार करण्यासाठी बबन श्रीरामपूरला येतो. बाजारातली कामं झाली की त्याची घरी एक चक्कर असते. बाबा वर्‍हांड्यात असतील तर थेट पुढच्या दाराशी नाही तर बैठकीतल्या दिवाणाला टेकून बसायचे आणि आईने दिलेल्या चहाचे नाही तर पन्ह्याचे भुरके मारत बाबांना सगळ्या आठवड्याची उस्तवार सांगायची. ह्या हकिकतींमध्ये बबनच्या सगळ्या गोष्टी दुसर्‍याच असतात. त्याला पहिली गोष्ट सांगताना आम्ही कुणी कधीच ऐकलं नाहीये. बियाणं मिळत नाही, कामाला बाया मिळत नाहीत, वळवाने आंबा झोडपला अगदी गायीला झालेली पहिली कालवड सुद्धा "दुसरीच". ह्या बबनच्या स्वतःच्या आयुष्यात मात्र भलतीच दुसरी गोष्ट घडली होती. तेव्हाच्या बबनच्या निर्णयाचे आम्हाला सगळ्यांना खूप कौतुक वाटले, अभिमान वाटला तरी त्याला स्वतःला मात्र आपल्या वागण्याचा पश्चाताप होतो.

बबनचे पूर्ण नाव बबन देविदास भिलारे. मराठवाड्यातल्या उस्मानाबादहुन बबन आणि त्याचे आई-वडिल, सहा बहिणी असं कुटुंब मोलमजुरीसाठी मालुंज्याला आलं. ते आले तेव्हापासून आमच्याकडे कामाला आहेत. सुरुवातीची काही वर्ष विशेषत: मुलींची लग्न होइपर्यंत त्याचे आई-वडिल तिथेच होते. पुढे ते परत उस्मानाबादला गेले. बबन मात्र इथेच राहिला. त्याचं लग्न झालं, मग बायको इथे आली. सगळा प्रपंच उभा राहिला. ही भिलारे कुटुंबातली माणसं सगळी देखणी. त्यामुळे त्याच्या बहिणींची पटापट लग्न झाली तशी त्याला स्वतःला सुद्धा बायको नाकी डोळी निटस शिवाय शिकलेली- पाचवी पास- मिळाली. मंगल तिचं नाव. मंगल कामाला अगदी वाघ होती. नवर्‍याच्या बरोबरीने कष्ट करायची. दोघं मिळून अनेक उद्योग करत. थोडी फार वहिवाटीची मिळालेली जमीन होतीच. त्याबरोबरीने लोकांचे आंबे, चिंचा उतरवायला घ्यायच्या, मोंढ्यावरुन भाज्या घेऊन त्या आठवडी बाजारात विकायच्या असे पण काही ना काही उपजिविकेचे उद्योग सुरुच असायचे.

मंगलला लग्नानंतर वर्षा दोन वर्षांत मुलगा झाला. सगळा आनंदी आनंद असतानाच दुर्दैवाने ते पोर देवाघरी गेलं. त्यानंतर दोन मुली झाल्या. तिनही बाळांतपणात सी-सेक्शन झालेलं. त्यामुळे तिसर्‍या खेपेनंतर आता अजून बाळांतपण नको असं डॉक्टरांनी सुचवलं. आता चांगल्या मोठ्या शहरांमध्ये डॉक्टरचे सल्ले धुडकावून बाईच्या जीवाशी खेळ करणारे 'सुशिक्षित' लोक बघितले आहेत. खेड्यापाड्यांमध्ये तर कल्पनाच करायला नको. पण बबनचा बायकोवर भारी जीव. तिच्या तब्येतीची हानी व्हायला नको म्हणून त्यांनी कुटुंब नियोजन करायचे ठरवले. मुलगा मुलगी भेद करायचा नाही. आपल्या मुलींनाच खूप शिकवू, मोठं करु असा त्यांचा विचार. पण त्याच्या आई-वडिलांना कुठलं चैन पडायला. सहा बहिणींमध्ये हा एकुलता एक मुलगा. त्याच्या वंशाला दिवा तर हवाच. मग दुसरं लग्न कराव म्हणून त्यांनी बबनच्या मागे लकडा लावला. बबनच्या काही मनास नव्हतं दुसरं लग्न करण्याचं. त्यामुळे गावी गेलं की काही ना काही करुन हा विषय टाळणे हे एकच काम त्याच्या मागे लागलं. गंमत म्हणजे मंगलच्या माहेरी सुद्धा सगळ्यांचं म्हणणं होतं की त्याने दुसरं लग्न करावं. तिच्या थोरल्या भावाचा तर फारच आग्रह होता.

बबन ऐकत नाही म्हंटल्यावर एकदा सगळ्या नातेवाईकांनी संगनमत केलं आणि दाखवायला म्हणून मराठवाड्यातलीच एक मुलगी मालुंज्याला घेऊन आले. गोरी गोमटी अशी ती मुलगी बबनपेक्षा वयाने बरीच लहान होती. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु असताना अचानकच सगळ्यांनी घेराव घालून बबनला गाडीत कोंबला आणि बेलापूरच्या केशव-गोविंद मंदिरात घेऊन गेले. हे केशव-गोविंदाचे मंदीर गंधर्व विवाहांसाठी फार प्रसिद्ध आहे. तिथे 'माळ घातली' की लग्न अधिकृत समजतात. तिथे बळजबरीने ह्या दोघांचं लग्न लावलं. मागून मंगलही तिथे आली होती, तिच्या देखतच हा प्रकार घडला. लग्न लागून सगळी वर्‍हाडी मंडळी घरी परत गेल्यावर तिनेच बिचारीने गोड-धोड करुन सगळ्यांना जेऊ घातलं. जेवणावळी आटोपल्या. इप्सित साध्य झालंच होतं. मंडळी आपापल्या वाटेला लागली. घरी राहिले हे तिघे, एक नवरा आणि दोन बायका. एक सोळा-सतरा वर्षांची नवी नवरी तर दुसरी दोन मुली पदरात असलेली आणि आता नव्यानेच सवत झालेली.

नवरा बायकोसमोर फारच मोठा पेच पडला. बबनने तर तिला बायको म्हणून वागवायला सरळ नाही सांगितलं. मग दोघांनी मिळून तिला ह्या बंधनातुन मोकळं करायचं असं ठरवलं. दोघांचं असं म्हणणं पडलं की ही मुलगी एक तर वयाने लहान आहे. आपलं वय तिच्यापेक्षा जास्त, दोन मुली आहेत आपल्याला. आटोपशीर म्हणावा असा संसार आहे. दोन वेळचं सुखासुखी पोटात जातय. त्यात अजून ह्या मुलीची, पुढे मुलाबाळांची भर घालून तिची आणि आपल्या संसाराची तरी का परवड करा.

तिला लग्नबंधनातुन मोकळं करणं सोपं नव्हतं. नवर्‍याने टाकलेली बाई म्हणून तिचे हाल झाले असते. मग तिच्या दुसर्‍या लग्नाचं सुद्धा बबननेच अंगावर घेतलं. त्याने स्वत: प्रयत्न करुन, चार नातेवाईकात शब्द टाकून तिच्यासाठी एक चांगला मुलगा बघितला आणि तिचं त्याच्याशी लग्न लावून दिलं. हे लग्न जमेपर्यंत तिला उस्मानाबादला आपल्या आई-वडिलांकडे ठेवलं. तिच्या आई-वडिलांवर भार नाही टाकला. आज ती आपल्या संसारी सुखात आहे. तिला दोन मुलं आहेत. अशा प्रकारे बबनने आपल्या परीने "दुसर्‍या" गोष्टीला पूर्णविराम दिला. ज्या समाजात आजही मुलगा नाही म्हणून बाईला तुच्छ वागणूक मिळते, बायकोवर हात उगारणे मर्दुमकी समजली जाते त्या समाजात त्याने आपल्या वागण्याने एक आदर्श पायंडा पाडला.

पुढे बबनच्या दोन्ही मुली भरपूर शिकल्या. मोठ्या मुलीने संगणक अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतली आहे आणि आता तिला पुण्यात एका चांगल्या कंपनीत नोकरी लागली आहे. धाकटीने एम ए केलय. ती एखादा लघु उद्योग सुरु करता येइल का ह्याची चाचपणी करते आहे. तिथे गावात एक छोटंसं ब्युटी पार्लर चालवते आहे. पंधरा-वीस वर्षांपुर्वी एका लहानशा खोपटात रहाणार्‍या बबनने स्वतःचं टुमदार घर बांधलय. दोन चाकी गाडी घेतलीये. ह्या सगळ्या बदललेल्या परिस्थितीत माणसं मात्र होती तशीच आहेत. सगळं कुटुंब अजुनही कष्ट करतं. त्याची मोठी मुलगी सुट्टीत घरी येते तेव्हा आईला मदत म्हणून डोक्यावर भाजीची टोपली घेऊन आठवडे बाजारात जाते. बबन अंगठे बहाद्दर आहे पण सरासरा नोटा मोजतो. सरासरा मोजण्याइतक्या नोटा त्याच्या हातात येतात हे महत्वाचे. बाकी सगळा हिशेब मंगल ठेवते.

असे सगळे आलबेल आहे. परंतु आजही त्या "दुसर्‍या" गोष्टीची आठवण निघाली की बबनचा चेहरा कसानुसा होतो. आई-वडिलांच्या आग्रहाला बळी पडून एक दिवसा साठी का होइना दुसरी मुलगी लग्न करुन घरात आणली हा मंगलवर मोठाच अन्याय केला असे त्याला वाटते. त्या नव्या नवरीवर काही कमी अन्याय नाही झाला ह्याची पण त्याला जाणीव आहे. त्यातल्या त्यात सुख एवढेच की तिच्या भावी आयुष्यावर ह्या प्रसंगाचा काही विपरीत परिणाम नाही झाला.

खरं तर खेड्यात लहानाचा मोठा झालेला अशिक्षित तरुण. मुलगाच हवा म्हणून हट्टाला पेटला असता तर आश्चर्य नव्हते. लग्नाची बायको म्हणून घरात आलेली तरुण सुंदर मुलगी. आई-वडिलांनीच करुन दिलेली. पहिली बायको स्वभावाने गरीब. तिने काही विरोध केला नसता. तिच्या माहेरच्यांचा पण पाठिंबाच होता. आजुबाजुला अशी दोन-दोन लग्न झालेली जोडपी राजरोस दिसत नसली तरी अगदीच विरळी पण नाहीत. त्यामुळे तिच्याशी संसार करण्याचा बबनला मोह पडणे सहज शक्य होते. पण तरी त्या नव्या नवरीचे उमलते आयुष्य आपल्या हातून कोमेजू नये अशी तळमळ त्याला होती. बर्‍या-वाईटाची त्याची समज, बायकोवरचे प्रेम लक्षणीय म्हणायचे.

आपण अनेकदा सुसंस्कृतपणाची जोड माणसाच्या शिक्षणाशी, पुस्तकी ज्ञानाशी लावतो. पण मग एवढा समजुतदारपणा कुठल्या शाळेत शिकला असेल हा अंगठे बहाद्दर ? विचारांची इतकी परीपक्वता कुठली पुस्तकं वाचून आली असेल त्याला ? अनाकलनीयच !!!

Tuesday, July 27, 2010

जनुकं ?

सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठून आईची स्वयंपाकघरात खुडबूड सुरू आहे. एवढ्यात बाबांना जाग येते, ते उठून बसतात. आईची चाहूल लागल्याबरोबर-
"ऐकलं का ?"
"ऐकते आहे. बोला !!"
"बदाम आहेत का घरात ?"
"आहेत. का ?"
"शिरा कर मग"
"बदामाचा शिरा ? आज काय विशेष ?"
"खावासा वाटला म्हणून कर म्हणालो. शिरा काय तुझ्या मांजरी बाळांत झाल्यावरच करावा असे थोडीच आहे"
"हो !! जसं काय तुमच्यासाठी काही करतच नाही"
"म्हणून तर सांगतोय, शिरा कर"

मग आई बदाम भिजत घालते. बदामाचा शिरा फारच जड पडतो म्हणून आई सगळा बदामाचाच शिरा नाही करत. एक वाटी रवा आणि एक वाटी वाटलेले बदाम असं करते.

"घ्या तुमचा शिरा" आई बाबांच्या हातात शिर्‍याची बशी ठेवत म्हणते.
"एवढा ? कमी कर..कमी कर"
"खा तेवढा. आवडतो ना तुम्हाला ?"
"आवडतो म्हणून एवढा खायचा का ? घास दोन घास दे फक्त"
"बदामाचा शिरा काही नेहमी होत नाही. केलाय तर खा"
"नको नको...कमी कर"

दुपारी जेवणात आईने खमंग लसणाची फोडणी घालून एखादी पातळ भाजी नाही तर पिठलं, लाल मिरच्यांची चटणी नाही तर ठेचा असे काही तरी केलेले असते. पोटभर जेवून तृप्त मनाने बाबा म्हणतात, "हे खरं जेवण. तो तुमचा (?) शिरा कसा चवीपुरता खायला. पोटभर जेवायचं तर भाजी-भाकरी-चटणीच हवी."
*****************************************************
शनिवार असूनही नेहमीप्रमाणे ईशानची आई सकाळी लवकर उठली आहे. आधुनिक आई असल्यामुळे स्वयंपाकघरात खुडबूड करण्याऐवजी ती की-बोर्डाचा खडखडाट करते आहे. एवढ्यात ईशानला जाग येते, तो आईची चाहूल घेत बाहेर बैठकीच्या खोलीत येतो.

"I don't want to drink milk"
"आं ?"
"Mamma, Can you please make brown shiraa ?"
"आज शिरा खायचाय मनीमाऊला ? बरं तू पटकन दात घासून घे. आपण शिरा करू."

कार्टं स्वतःहून काही तरी खायला मागतंय ह्या आनंदात मी शिर्‍यासाठी रवा भाजायला घेते. ईशान शिरा तयार होण्याची वाट बघत स्वयंपाकघरात खेळत बसतो.

"ईशान चल शिरा खाऊन घे"
"I don't want so much shiraa"
"आं ?"
"I don't want to eat so much shiraa"
"खा गुपचूप. तुला आवडतो, तू मागितलास म्हणून केलाय ना ?"
"...."

तरी फार फार तर अर्धी वाटी शिरा खाऊन तो स्वयंपाकघरातून धूम ठोकतो. दुपारी जेवणात पराठे किंवा भाजी-पोळी किंवा आमटी-पोळी असे काही तरी असते. पहिला घास पोटात गेल्या बरोबर ईशान म्हणतो,

"hmmmmmmmmm....yummy"
"आवडली आमटी ?"
"I don't like sheeraa"
"आं ?"
"Mamma, I like spicy. Can you make spicy every day ?"
 "...."

Saturday, May 15, 2010

माझा

रोजच्या सारखी बरोबर सहा वाजता तिला जाग आली. डोळे उघडल्याबरोबर आपसूकच मान वळली. अंगावरचे पांघरुण फेकून तो वेडावाकडा पालथा झोपला होता. त्याची ही नेहमीची सवय. कधी कधी झोपेतच तिच्या गळ्यात हात पडत. हात सोडवायला गेले तर त्याची झोप चाळवे. ती मग टक्क छताकडे बघत विचारांच्या माळा गुंफत पडून राही, तो बाजूला होईतो.

तिने त्याचे पांघरुण सारखे केले आणि हलक्या पावलांनी खोलीबाहेर आली. दार बंद करुन सरळ न्हाणीघराचा रस्ता धरला.  आवरुन चहा घेऊन झाला तेव्हा आतल्या खोलीत जाग जाणवली. तिने आत डोकावून पाहिले. पांघरुण पुन्हा फेकून देऊन तो आता उताणा झोपला होता. कौतुकाने हसत ती त्याच्या शेजारी जाऊन बसली. त्याच्या निरागस चेहर्‍याकडे निरखून पाहता-पाहता तिची बोटे त्याच्या केसांतून फिरू लागली. डोळे जरा किलकिले करत त्याने तिच्याकडे कूस वळवली. तिला बघताच ओठ थोडेसे विलग होत सगळ्या चेहर्‍यावर गोड हसू पसरले. त्याचे विस्कटलेले केस सावरत ती पुन्हा विचारात हरवली.

"झोपेतही किती छान हसला मला बघून. मला माहिती आहे, खूप खूप आवडते मी त्याला. माझा...अगदी माझा आहे  तो"

तिला उगीचच लहानपणीचा प्रसंग आठवला. सातवीत असताना एका संध्याकाळी खेळ झाल्यावर आईने तिला गल्लीतल्या मुलांबरोबर खेळायचे नाही असे सांगितले होते. तिच्याच वयाची, तिच्याबरोबर लहानाची मोठी झालेली दिप्या, संद्या, अज्या ही मुलं.

"त्यांच्या बरोबर का नाही खेळायचे ? त्यांच्या बरोबर नाही तर कुणाबरोबर खेळायचे ?"

पुढे कधी तरी असंच मावस भावंडांबरोबर पेरुच्या झाडावर चढून पेरु काढण्याचा खेळ रंगात आलेला असताना मावशीने येऊन रागे भरले होते. झाडावरुन उतरल्यावर फराफरा घरात नेऊन बरंच काही बोलली होती. गोंधळात पडायला झालं होतं अगदी आई-मावशीचं ते वागणं बघून.

"हे तर भाऊ आहेत माझे. मग त्यांच्यासोबत झाडावर चढून पेरु खायला काय हरकत आहे ?"

कॉलेजमध्ये असताना एकदा सगळा ग्रूप कट्ट्यावर चकाट्या पिटत उभा होता. एका मित्राच्या डोक्यात कुठून तरी किडा पडला. ही त्याच्या शेजारीच उभी होती. हिने सांगून त्याला समजेना. एवढा मोठा किडा, उगी चावेल-बिवेल त्याला म्हणून तिने पटकन पुढे होईल हाताने झटकला. त्यासरशी मित्र चटका बसल्यासारखा मागे झाला. त्यानंतर तो आपल्याला टाळतोय, शेजारी उभा राहत नाही असे चांगलेच जाणवले तिला. इतके अपमानास्पद वाटले.

"मित्र ना तू माझा ? मग इतका हक्क नाही माझ्या तुझ्यावर ?"

मग 'तो' भेटला. वाटले हा खरा आपला हक्काचा. पण तो तरी काय रस्ता क्रॉस करताना हात धरला की ह्याला संकोच वाटतो. बरोबर फिरायला गेले की तो आपला दहा पावले पुढेच. एके दिवशी त्याचे मामा-मामी, त्यांचा मुलगा-सून आले होते. सगळ्यांसाठी पोहे करुन, बश्या हातात देऊन झाल्यावर ही जाऊन बसली त्याच्या शेजारी तर तो चक्क कॅमेरा आणायच्या बहाण्याने सरळ उठून गेला.

"लग्नाची बायको ना मी तुझी ? आणि मी केलेय तरी काय ? शेजारी येऊन बसले ना ? तेवढा पण अधिकार नाही का मला ?"

असे काही झाले की तिला क्षुद्रांहून क्षुद्र वाटायचे. चीड यायची. कमालीचे वाईट वाटायचे.

...आणि मग हा आला. आला तो सगळे आयुष्यच व्यापून राहिला.

"असं वाटतं हा खरा माझा. माझ्यातून निर्माण झालेला. ह्याच्याबरोबर कितीही खेळले तरी कोणी रागे भरत नाही. त्याच्या शेजारी काय तो मांडीत  असतो  किंवा कडेवर असतो माझ्या. त्याच्या केसांतून हात फिरवला की असा खूश होऊन बिलगतो. आता काय आणि अजून किती वर्षांनी काय, माझा पूर्ण हक्क असणार आहे त्याचा चेहरा कुरवाळण्याचा, त्याचे केस सावरण्याचा."

एकदम तिला वाटले बापासारखा उंच झाला तर तिचा हात सुद्धा नाही पुरणार त्याच्या  केसांपर्यंत.

"हा असा ताड-माड वाढून मला एकदम लहान करुन टाकेल का ?"

त्या विचारासरशी डोळ्यांच्या कडा ओलसर झाल्या तरी ओठांवर हसू फाकले. हलक्या पावलांनी खोलीच्या बाहेर पडत तिने दार जरासे ओढून घेतले आणि त्याच्यासाठी खीर करायला म्हणून स्वयंपाकघराकडे वळली.

Monday, May 10, 2010

रडं

मी एक अत्यंत खमकी बाई आहे. सहसा धीर (धूर नव्हे) सोडत नाही. आमचे बाबा नेहमी आमच्याविषयी 'मुली खंबीर आहेत' असे म्हणतात आणि आई आम्हाला 'पाषाणहृदयी' म्हणते. पण तरी काही घटना, प्रसंग, कोणाची नुसती आठवण, फोनवर ऐकलेला आवाज ह्या गोष्टी अशा असतात की कितीही दात-ओठ खाल्ले तरी डोळे जुमानत म्हणून नाहीत. माझा एक मित्र नेहमी म्हणायचा Everybody has a weak moment. असे अशक्त क्षण अनेक येतात आयुष्यात. कधी तेव्हढ्या पुरतं वाईट वाटणं असतं तर काही प्रसंग काही म्हणता पाठ सोडत नाहीत. कित्येकदा विस्मयात पडावं असं आपण वागतो. आपल्या स्वत:च्याच व्यक्तिमत्त्वाविषयी, जडणघडणी विषयी शंका यावी असं. पुन्हा असं वागायचं नाही ठरवूनही आपण असे वेड्यासारखे का वागतो कळतच नाही. हे असच काहीसं...

शिक्षण संपल्यावर मी नोकरी शोधायला म्हणून माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी ठाण्याला जाऊन राहिले होते. त्या दरम्यान एकदा ह्या नवरा-बायकोत एकदम कडाक्याचे भांडण झाले. तेव्हा मला नवरा-बायको मधले भांडण हे काहीतरी गंभीर प्रकरण वाटायचे. दुसर्‍या दिवशी पहाटे जिजा नागपूरला निघून गेले. तिथे त्यांचे काही महत्त्वाचे काम होते. बहिणीला आदल्या दिवशीच जरा बरे वाटत नव्हते, रात्रीतून ताप चढला. बायकोला बरे नसल्यावर नवर्‍याने (किंवा नवर्‍याला बरे नसल्यावर बायकोने) महत्त्वाची बिझिनेस टूर सोडून घरी थांबायचे असते असा एक गैरसमज तेव्हा होता. ह्या सगळ्या प्रकाराने मला खरोखर फार अस्वस्थ वाटत होते. काय करावे समजेना. आई-बाबांशी बोलल्यावर बरे वाटले असते पण त्यांना काही सांगू नकोस असे बहिणीने सांगितले होते. मग मी तिला नाश्ता वगैरे करून दिला. भाच्याचे आवरून त्याला ड्रायव्हरबरोबर खेळायला सोडले आणि भाजी आणायच्या निमित्ताने घराबाहेर पडले. तिथे जवळच एक टेलिफोन बूथ होता. घरी फोन लावला तर बाबांनी उचलला. बाबांचा आवाज डोळ्यांनी कसा ऐकला कोण जाणे, रडं आवरेनाच. कसं बसं "बॅबॅ स्वॅतीचे अ‍ॅणि जिजँचे भँडण झॅले अ‍ॅणि जिजॅ निघून गॅलॅ...तुम्ही या ना इकॅडॅssssssss" एवढं रडत रडत बोलले आणि मग रडतच राहिले. झालं, आई-बाबा दुसरे दिवशी सकाळीच निघून ठाण्याला आले. तोपर्यंत जिजा पण परत आले. ते बिचारे सासू-सासर्‍यांना घरात बघून जाम घाबरले. मग संध्याकाळ पर्यंत सगळे खुलासे, दिलजमाई होऊन आम्ही मस्तपैकी बाहेर जेवायला गेलो. प्रकरण अर्थातच मी रडून गोंधळ घालण्या इतके काही गंभीर नव्हते. ह्या सगळ्या मुक्कामात बाबा मात्र मला 'ये आंसू मेरे दिल की जबान है..' गाणं म्हणत चिडवत राहिले. (जिजांची चहाडी केल्याबद्दल त्यांनी कधी ही माझ्यावर राग धरला नाही हे विशेष.)

ठाण्याला जायच्या आधी मी श्रीरामपूरला राहूनच नोकरी शोधत होते. बरोबरीच्या इतर मित्र-मैत्रिणींत अनेकांच्या नोकर्‍या सुरू झाल्या होत्या, काहींना कॉल आले होते. मला एक तर श्रीरामपूरला राहून वॉक इनला जाता येत नसे. पोस्टाने अर्ज पाठवून त्याची कोणी दखल घेतली नव्हती. पुण्याच्या एक दोन चकरा करून बरेच ठिकाणी अर्ज देऊन झाले होते पण त्याचा काही उपयोग नसतो हे फार उशीरा समजले. निकाल येऊन दोन-तीन महिने झाले होते. एव्हाना डेस्परेट होऊन मी सरकारी नोकर्‍या (DRDO, BARC), बँकांमधली IT संबंधित पदं अशा ठिकाणी अर्ज करायला सुरुवात केली होती. ह्या संस्थांमध्ये नोकरीचा अर्ज पाठवायचा म्हणजे अर्जासोबत मार्क शीट इत्यादीच्या अटेस्टेड फोटो कॉपी जोडाव्या लागत. गावातल्याच एका शाळेचे मुख्याध्यापक गॅझेटेड ऑफिसर होते. मी सगळी कागदपत्रं घेऊन त्यांच्या ऑफिसमध्ये गेले. सरांचा कशावरून तरी ताल गेला होता, समोरच्या व्यक्तीला रागावत होते. मी त्यांना निरोप पाठवला आणि वाट बघत बाहेर थांबले. आधी त्यांनी खूप वेळ आत बोलावलेच नाही. बोलावल्यावर आत गेले आणि मी कशासाठी आले हे सांगतच होते तर सगळ्यांच्या देखत अचानक ते माझ्यावर मोठ्याने ओरडले, "जा, देत नाही सही. येतात तोंड घेऊन नोकर्‍या शोधायला" आणि इतरही बरीच अपमानास्पद बडबड केली. तिथे उभा असलेला शिपाई तेव्हढ्यात म्हणाला "सर अहो ह्या आपल्या आवटीसाहेबांच्या कन्या". पण सर काही ऐकायच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांनी मला निघून जायला सांगितले. मी इतकी अचंबित झाले. सरांचे बाबांकडे येणे-जाणे होते. ज्यांना कमीत कमी एकशे एक वेळा चहा-पाणी दिले त्या सरांनी माझा असा चारचौघात अपमान का करावा तेच कळेना. संतापाने नुसती थरथर कापत मी कशीबशी घरी गेले. बारा वाजले असतील. आई स्वयंपाकघरात ओट्यापाशी पोळ्या करत पाठमोरी उभी होती. माझी चाहूल लागल्याबरोबर आई "गरम गरम जेवून घे. भूक लागली असेल" असं म्हणाली. आईचे मायेचे शब्द, शाळेत सगळ्यांदेखत झालेला अपमान, त्याचा राग, दु:ख, इतक्या दिवसात साधा एक कॉल न आल्याने वाढत चाललेले फ्रस्ट्रेशन आणि अपराधीपण ह्या सगळ्याची इतकी दाटी झाली मनात. आणि मग सगळे एकदमच डोळ्यांवाटे बाहेर पडले. माझे रडू आवरल्यावर बाबांनी काय झाले ह्याची खात्री केली आणि सरांना फोन केला. बाबांनी फोन केल्यावर अर्थातच चुटकीसरशी काम झाले. पण सर त्या दिवशी असे का वागले मला आजतागायत कळलेले नाही.

नोकरी मिळायची काही राहिली नाही. तेव्हा कंपनीतर्फे बांद्रा रेक्लेमेशनमधे राहायला फ्लॅट मिळाला होता. तिथे काही मोजकी कुटुंबे वगळल्यास आम्ही बहुतेक सगळे बॅचलर्स. एकाच ऑफिसामध्ये काम करायला आणि एकाच बिल्डिंगमध्ये राहायला असल्यामुळे तिथे सगळ्यांशी छान मैत्री झाली होती. दीड-पावणे दोन वर्ष तिथे काढल्यावर अचानक ती संस्था भारत सरकार अनुदानित दुसर्‍या एका संस्थेत विलीन करण्याची टूम निघाली. नव्या संस्थेत  आपल्याला ठेवणार की काढणार ह्याची वाट न बघता आम्ही सगळ्यांनी नोकरी शोधायला सुरुवात केली. तेव्हा एकाला कुठे पोझिशन आहे कळले की खटपट करून आम्ही सगळ्यांचे रेझुमे तिथे पाठवायचो. ह्याच पद्धतीने आम्हाला सगळ्यांना तेव्हा भारतात नुकतेच ऑफिस थाटलेल्या एका प्रसिद्ध कन्सल्टिंग कंपनीतून कॉल आले. मी वगळता बहुतेक सगळ्या कंपूला शनिवारी बोलावले होते. ते सगळे ऑफर घेऊनच घरी आले. दुसर्‍या दिवशी मी गेले. रिटन टेस्ट, अ‍ॅप्टिट्यूड टेस्टनंतर दोन टेक्निकल इंटरव्हिव्युज् असा कार्यक्रम होता. टेक्निकलमध्ये नेमकेच मला जावा स्विंगवर प्रश्न विचारले. मी आधीच्या प्रोजेक्टवर सगळं काम जावा स्विंगमधे केलं होतं. तेव्हा नवीन असलेला ड्रॅग आणि ड्रॉप कंट्रोल (oh yeh, I am an old woman) वापरून एक फक्कड GUI बनवला होता. त्यामुळे टेक्निकल राउंड अपेक्षेपेक्षा चांगला झाला. राहता राहिला एच आर राउंड. शेवटी फायनल राउंडाला पोचलेल्या सोळा उमेदवारांपैकी मी आणि एक मुलगा असे दोघेच राहिलो होतो. आम्हाला टोकन्स दिले होते त्यामुळे पुढचा नंबर कोणाचा लगेच कळत होतं. पण आम्हाला आत पाठवणार्‍या बाईने काय गडबड केली आणि माझा नंबर असताना त्या दुसर्‍या मुलाला आत पाठवलं. तो पण ऑफर घेऊन बाहेर आला. मी आत गेले. तिथे एक गृहस्थ गंभीर चेहर्‍याने बसले होते. त्यांनी एच आर इंटरव्हिव्यु घेतला, मी विचारलेल्या शंकांची उत्तरं दिली. आणि मग शांततेत त्या दिवशीच्या सर्व जावा पोझिशन्स संपल्याचे सांगितले. हा जॉब मिळणार ह्याची मला इतकी खात्री वाटत होती की त्यांनी सांगितलेय ते नीट माझ्या डोक्यातच शिरले नाही. त्यांनी पुन्हा तेच सांगितले आणि परत एखादी पोझिशन ओपन झाली तर मला नक्की बोलावतील असे आश्वासन दिले (असं सांगायची एचआरवाल्यांची पद्धतच असते). मी निमूट धन्यवाद दिले आणि उठून चालू लागले. त्या बाईवर भयंकर चीड येत होती. माझी काही चूक नसताना हाताशी आलेला जॉब न मिळाल्याचे दु:ख तर होतेच पण सगळी गँग (ज्यात माझा नवरा, तेव्हाचा बॉयफ्रेंड पण होता) ह्या प्रतिष्ठित कंपनीत नोकरी करणार आणि मी मात्र नाही ह्याचे भयंकर वाईट वाटत होते. बाहेर येऊन टॅक्सी घेतली. गाडी जशी कंपनीच्या आवाराबाहेर पडली तसे मी ह्या आवारात पुन्हा येणार नाही अशा जाणिवेसरशी जे काही रडू फुटले. सगळ्या रस्त्याने रडत-रडत घरी गेले. घरी गेल्यावर सगळा ग्रूप विचारायला आला, सगळ्यांदेखत मी पुन्हा रडारड केली. खरं तर सहा महिन्यांनी परत अप्लाय करता आले असते पण तेव्हा कशाचे इतके वाईट वाटत होते कळलेच नाही. असो, आठ-पंधरा दिवसांनी त्या कंपनीच्या एच आरने फोन करून एका अर्जंट पोझिशनसाठी ऑफर दिली आणि मग सगळाच आनंदी-आनंद झाला.

ईशानच्या जन्माच्या वेळी मदत म्हणून बहीण आणि आई इथे आल्या होत्या. त्या दोघी माझ्या ड्यू डेटच्या पंधरा दिवस आधीच इथे पोचल्या होत्या. त्यामुळे ईशान झाल्यावर अगदी पहिल्या तासापासून आई बरोबर होती. ईशान तीन महिन्याचा होता तेव्हा मी आणि आई बरोबरच भारतात गेलो. तिथे मी पाच महिने होते. सुरुवातीचे तीन आणि हे पाच असे आठ महिने आईनेच त्याला अंघोळ घातली. सकाळी उठल्यावर, संध्याकाळी, दिवसभरात वेळ सुटेल तसा तो आईकडेच असायचा. भात वगैरे खायला लागला ते पण आईच्याच हाताने. इथे होतो तेव्हा त्याचा पाळणा आईच्या रूममध्येच होता. ह्या सगळ्या काळात आईने माझे लाड भरपूर केले. माझ्या आवडीचं गोड-धोड, माझ्या आवडीच्या भाज्या. माझं शिक्षण संपल्यावर पहिल्यांदाच इतकं निवांत घरी राहणं होत होतं. आमच्या किती तरी गप्पा व्हायच्या. आईच्या लहानपणाच्या, आई लग्न करून सासरी आली तेव्हाच्या, आणीबाणीच्या वेळच्या, आईच्या बाळंतपणाच्या, आमच्या लहानपणच्या. हे असं आठ महिन्याच मोठं बाळांतपण करवून ईशानचं जावळ, बारसं सगळं उरकून आम्ही (एकदाचे) अमेरिकेत परत आलो. आल्यावर जरा वेळाने मी सहजच ईशानला आईच्या रूममध्ये घेऊन गेले. आईचं इथेच राहिलेलं काही सामान- ज्यात तिच्या विणकामाच्या सुया होत्या- समोरच पडलं होतं. इथे पाळण्याला म्युझिक प्लेयर सहसा असतोच. आई इथे असताना ईशानला पाळण्यात ठेवून त्यातल्या गाण्यांच्या बरोबर गुणगुणायची. इतक्या दिवसांनी ते गाणं ऐकल्यावर ईशानची काही रिअ‍ॅक्शन येते का बघायला म्हणून मी प्लेअर ऑन केला. ते संगीत कानावर पडलं तसं एकदम आईबरोबर व्यतीत केलेले सगळे दिवस फेर धरायला लागले. लहानपणी मी सतत आईच्या आगे-मागे असायचे. अभ्यास पण स्वयंपाकघरात बसून करायचे. आई दुपारचं काही शिवणकाम करत असली की मी तिथे मशीनच्या खडखडाटातच पाठांतर करायचे. मला असलेल्या सगळ्या शंका आईलाच विचारायचे. कधी तरी मी आता मोठी झाले असं मलाच वाटायला लागलं आणि आईचं बोट सुटलं....ते आता इतक्या वर्षांनी हाती धरलं होतं. मी आई झाल्यावर पुन्हा प्रत्येक अडल्या-नडल्याला आईचाच आधार होता...पण तिला सोडून मी इतक्या लांब निघून आले होते...पुन्हा एकदा माझं मलाच सगळं बघायचं होतं, एकटीने !!! मला तर ईशानला साधी अंघोळ घालायची सुद्धा येत नव्हती आणि आईशिवाय एवढं मोठं आईपण कसं निभावणार होते मी ? असं इतकं काय काय मनात येत होतं. ईशान चांगला खुदुखुदू हसत होता आणि मी आसवं गाळत होते.

.....तशी मी एक अत्यंत खमकी बाई आहे बरं का :)

Thursday, April 29, 2010

करायला गेले गूळपोळी...

साहित्य: सारणासाठी- दोन वाट्या किसलेला गूळ, पाऊण वाटी तिळाचा कूट, एक वाटी बेसन, १/४ जायफळ
पारीसाठी- दोन वाट्या गव्हाचे पीठ, अर्धी वाटी बेसन, एक कणी मीठ, एक डाव तेल
 कृती: इ.स. १८५७ मधे आपल्या मातोश्रींना विचारुन गूळपोळीची कृती एका चिठोर्‍यावर लिहून घेणे. घर बदलले, नोकरी बदलली, घरात लहान बाळ आल्यावर आयुष्य उलटे-पालटे बदलले तरी तो चिठोरा प्राणांहुन अधिक जपून ठेवणे. पूढे २०१० सालात संक्रांतीच्या आगेमागे कुणी नवी-जुनी गृहिणी मायबोलीवरील "पाककृती माहिती आहे का" धाग्यावर गूळपोळीची कृती विचारेल. तिच्या पाठोपाठ अजून एखादी 'घरात तूर डाळ, राजगिरा आणि धाकट्याच्या वाढदिवसाला केक करायला आणली होती ती ब्राऊन शुगर एवढेच जिन्नस आहेत. दुकानात जायला वेळ नाही. तेव्हा आहे त्या सामानात गूळपोळी करता येइल अशी कृती सांगा की' अशी लाडिक विनवणी करेल. इथले दादा लोक तुरीच्या डाळीपासून अमृत बनवु शकतात तर गूळपोळी क्या चीज ? ह्या विनंत्यांचा मान ठेवून लगबगीने एक फक्कड हमखास यशस्वी कृती येइल. ह्या सर्वांकडे 'काय पण स्वयंपाकी जमलेत' असा विचार करुन तुच्छ कटाक्ष टाकावा. संक्रांत जवळ येइल तशा 'माझे काय चुकले' धाग्यावरील पोस्ट्सची वाढती संख्या बघून गालातल्या गालात हसावे. गूळपोळीच्या नावाने तोंडाला पाणी सुटेल त्याकडे लक्षपुर्वक दुर्लक्ष करावे. पण पाककृती विभाग सगळा नुसता गूळपोळीमय झाल्यावर 'मी पण गूळपोळी करणार' असे जाहिर करावे. एक ते दोन तासांत सगळीकडे खबर पोचेल आणि (न विचारताच) गूळपोळी विषयावर सल्ल्यांमागून सल्ले येतील. गूळपोळी बिघडल्यास त्याचा मायक्रोवेव्हमधे बकलावा करावा (आणि सासरच्या पाहुण्यांना खाऊ घालावा) असे पण सल्ले येतील. ते सर्व सल्ले फक्त वाचावेत. आपल्या सुगरणपणाच्या कमाल आणि किमान मर्यादा फक्त एक आपली जन्मदात्री ओळखून असते त्यामुळे तिने सांगितलेल्या कृतीनेच गूळपोळी करावी. त्यासाठी घरी येऊन निमूट "तो" चिठोरा शोधावा.

ती कृती वाचता वाचता 'माझे काय चुकले' धाग्यावरील वरील पोस्ट्स आठवून पोटात गोळा येइल. नकोच ती गूळपोळी त्यापेक्षा भारतात जाऊन खाऊन येते असा विचार करुन चिठोरा रोज दिसेल अशा ठिकाणी ठेऊन द्यावा. तसे पण आईच्या हातची सर येणार आहे का माझ्या गूळपोळीला ? पण गूळपेळी करणार अशी खबर कानोकानी झाल्याने 'मी करणार(च) आहे' असे शक्य होइल तिथे सांगत रहावे. संक्रातीच्या दिवशी सगळ्यांना 'केली का गूळपोळी ?' विचारत सुटावे. एखादी मैत्रिण आस्थेने गूळपोळी कशी झाली विचारेल तर संक्रांत वीक डे ला आहे ह्याचा (गैर)फायदा घेऊन नोकरीच्या नावाने 'नै बै..वीक डे ला गूळपोळी ? छे छे काय शक्यय हाश्श हुश्श' करावे. आईला पण 'अगं वीक एंडला करणारच आहे गूळपोळी' असे सांगून प्रत्यक्ष करायची वेळ येइल तेव्हा गव्हाची खीर करावी. ह्याच दरम्यान भारतातून आणलेले सामान देण्याच्या निमित्ताने (आणि गूळपोळीच्या मिषाने) मित्र घरी यायचं म्हणेल. त्याला मामा बनवण्याचे सर्व हक्क अपल्या लेकाने राखून ठेवल्याचा फायदा घ्यावा आणि गूळपोळी व्यतिरिक्त इतर चारीठाव स्वयंपाक करावा. संक्रांत उलटुन रथसप्प्तमी सुद्धा गेल्यावर गूळपोळीच्या प्रकरणावर पडदा पडला अशी स्वत:ची समजूत घालावी.

अशातच एके दिवशी अचानक ध्यानीमनी नसताना मैत्रिणीकडे गूळपोळी खायचा योग येइल आणि गूळपोळीची खुमखुमी टरारुन वर आलेल्या हरभर्‍यासारखी (साभारः प्रा. देशपांडे) वर येईल. ह्यानंतर वीक डे/वीक एंड ह्याची पर्वा न करता जो पहिला रिकामा दिवस हाती लागेल तेव्हा "तो" चिठोरा बाहेर काढावा आणि मग.....

पारीसाठी साधारण पोळ्यांसाठी भिजवतो तशी कणिक भिजवून घेणे. त्याला तेलाचा हात लावून झाकून ठेवणे. मग गूळपोळीसाठी गूळ किसून घ्यायचा असतो हे विसरुन सुरीने गुळाच्या जमेल तशा खपल्या काढायला सुरुवात करणे. तुम्ही रहात असाल तिथल्या हवामानामुळे गूळ कोरडा पडला असेल तर सुरीने भोस्कुन त्याचे वेडेवाकडे खडे पाडणे.  एकीकडे तूप घालून बेसन भाजायला घेणे. थंड हवेत नदी थिजते तुपाची काय कथा हे लक्षात आल्यावर ते बेसन बाजुला ठेवून अर्धी वाटी बेसन तेल घालून पुन्हा भाजायला घेणे. गुळाच्या पुरेशा खपल्या आणि खडे जमले की त्यात तिळाचा कूट घालणे. एव्हाना गूळ किसून घ्यायचा असतो ह्याची आठवण येइलच. काय मी करु, कसं मी करु ह्या अवस्थेत थोडा वेळ गेल्यावर करपत्या बेसनाच्या वासाने भान येइल. भर्रकन ते एका ताटात काढून गार करायला ठेवणे. त्या खड्यांचं काय मी करु, कसं मी करु सुरुच ठेवणे. पण....घाबरायचे काही कारणच नाही. स्वत:मधल्या कप्लक सुगरणीची ओळख पटवून द्यायची हीच वेळ आहे. गरम बेसन जर गुळात घातले तर ते खडे नक्कीच वितळतील. विचार पूर्ण व्हायच्या आत कृती करावी. नाही तर "बेसन गरम असताना गुळात घालु नकोस, गूळ वितळायला लागेल आणि सारण चिक्कट होइल" हा आईने दिलेला सल्ला आठवेल. योग्य वेळ टळुन गेल्यावर हा सल्ला आठवला की पुन्हा काय मी करु, कसं मी करु !!! हृदयाचे ठोके जरा सावकाश पडायला लागले की इकडे तिकडे नजर टाकावी. नवरा नजरेच्या टप्प्यात आल्यास त्याला 'अब (ये गूळ वितळने लगा तो) मै क्या करु ?' असे विचारावे. तो अर्थातच 'आमच्यात गूळपोळी खात नाहीत, करत तर त्याहुन नाहीत' असं म्हणून जबाबदारी झटकेल तेव्हा नुसत्या नजरेने त्याला टप्प्याबाहेर घालवावे. आता तीच नजर इकडे-तिकडे गरागरा फिरवत काय मी करु, कसं मी करु !!! चॉप सेटिंगवर मिक्सरमधून काढले सगळे तर खडे फुटतील काय ? सुगरण लागली कामाला. ते सगळं मिक्सरच्या भांड्यात ओतून ऑन बटन दाबले रे दाबले पुर्वायुष्यातली एक नको ती आठवण येइल. पहिल्यांदा बटाट्याचे पराठे करायचे होते तेव्हा अर्धवट शिजलेल्या बटाट्यातले खडे फोडण्यासाठी सारण असेच मिक्सरमधे फिरवले होते. चिक्कट झालेले ते भांडे दोनदा डिश वॉशरमधे आणि अर्धा डझनवेळा हाताने धुवावे लागले होते. पण त्यात काssssय..होतं असं कधी कधी...नै का ? ह्या सारणाचं तसं होइलच असं काही नाही. आणि झालं तsssssर ? नुसत्या विचारानेच ठोके धावु लागतील. ते काबूत आणून एका डावाने सगळे मिश्रण हलवावे. गूळ पुरेसा कोरडा असल्याने चिकट्ट वगैरे काही झाले नसेल. मग नव्या जोमाने मिक्सर चालु करावा व शक्य तेव्हढे दळण दळावे. काही कुच्चर खडे तसेच राहतील ते आपल्या पोळी लाटण्याच्या कौशल्यावर विश्वास ठेवून राहु द्यावेत. हुश्श !!! आता जरा दम खावा.

आता गूळपोळी करायला घ्यावी. सारण बर्‍यापैकी कोरडे आसल्याने पारीत भरुन त्याचा गोळा वळताना तारांबळ उडेल. 'इतकी तारांबळ तर लेकाला पहिल्यांदा आंघोळ घालताना झाली नव्हती' असे शेरे घरातल्या काही व्यक्ती देतील पण त्यांना मह्त्व द्यायचे कारण नाही. कसेबसे पारीचे तोंड बंद करुन पोळी लाटायला घ्यावी. पहिलीच पोळी न फुटता लाटली जाइल (कारण सारण पुरेसे भरलेच नाही). अत्यानंदाने दोन्ही हातांवर छान तोलत ती तव्यावर टाकावी. पुरी फुगावी तशी ती पोळी टम्म फुगेल (कारण सारण पुरेसे भरलेच नाही...लक्षात येतय का ?). पहिली पोळी भाजून दहा मिनिटे झाली तरी दुसरी अर्धीच लाटली गेली आहे ह्याचे वाईट वाटून घेऊ नये. त्याला कारण म्हणजे लाटणे. त्या लाटण्याने पोळ्या भराभरा लाटल्याच जात नाहीत. दुसरे लाटणे आपल्या बाळाच्या कृपेने गेस्ट रुममधल्या बेडखाली सापडेल. पहिले टाकून हे दुसरे (स्वच्छ धुवून) घ्यावे. उरलेली पोळी लाटून तव्यावर. ही पण टम्म फुगेल. पहिली गार झालेली पोळी उचलुन बघावी तर त्याचा खुळखुळा (कारण सारण पुरेसे भरलेच नाही...आले लक्षात). सारण कोरडे असल्याने नीट भरले जात नाहीये लक्षात आल्यावर सारणाला कोमट दुधाचा हात लावावा. सारण ओलसर झाल्यावर त्याला आई करते तशा सारणाचा रंग येइल (मग जरा हुश्श वाटेल). आता वेळ न घालवता सारणाचे गोळे करुन ठेवावेत. पारीसाठी लाट्या कराव्यात आणि (नव्या लाटण्याने) जोमात पोळ्या लाटायला घ्याव्यात. छान कडेपर्यंत सारण पसरत जाऊन सरसर पोळ्या लाटल्या जातील. अर्धा डझन तरी कराव्याच (पहिल्या दोन माकाचु सदस्य वगळून). ताजं तूप लावलेली पोळी लेकाला खाऊ घालून त्याचे तोंड सुद्धा न धुता गूळपोळ्या केल्याची खुषखबर मित्र-मैत्रिणींना द्यावी. त्यांची गूळपोळी केव्हाचीच करुन, खाऊन, पचवून झाल्यामुळे ते तुमचा आणि तुमच्या गूळपोळीचा अनुल्लेख करतील. पण इतक्या खटपटींनंतर यशस्वी गूळपोळी करुन तुम्ही स्वत:ला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे तिथुनच मित्र-मैत्रिणींकडे तुच्छ कटाक्ष टाकावा. अशी ही तुच्छ कटाक्ष ने सुरु होऊन तुच्छ कटाक्ष वर संपलेली गूळपोळीची यशस्वी कृती. पहा बरं तुम्हाला आवडते का ? ;)

त. टि. वर सांगितलेले सर्व प्रसंग, पोलपाट, दोन्ही लाटणी आणि पोळ्या काल्पनिक नाहीत.

Friday, April 23, 2010

इंस्टंट माहेर

गेल्या आठवड्यात अचानकच हार्टफर्डला भावाकडे जायचा योग आला. माझा अमेरिकेतला सर्वात जवळचा- अंतराने आणि मनाने- नातेवाईक. त्याने लग्नानंतर यंदा प्रथमच गणपती बसवला आहे. माझ्या वहिनीने अगदी दगडुशेठचे चित्र समोर ठेऊन घरी मूर्ती बनवली आहे. त्यांच्या गणपतीचे दर्शन घ्यायचेच होते. शिवाय माझा किडक्या दातांच्या बाईबरोबर सकाळी-सकाळी interview होता. मग आम्ही सगळेच आदल्या दिवशी हार्टफर्डला गेलो. संध्याकाळी निघतो म्हणेतो आठ वाजले निघायला. ९५ ची डागडुजी काढलीये, रात्रीचं काम सुरु होतं त्यामूळे दोन-तीन वेळा रहदारीत अडकलो. पोचायला बराच उशीर झाला. भावाला आणि वहिनीला जेऊन घ्या सांगितले होते. तरी ते वाट बघत थांबलेच.

भावाचे लग्न झाल्यापासून सगळेच कसे बदलले आहे. त्याच्या लग्नाआधी आम्ही जायचो तेव्हा इशानचे खाण्या-पिण्याचे तर न्यावे लागायचेच पण भावासाठी पण काहीतरी करुन न्यायचे. त्याबरोबर डिस्पोजेबल ताटं/वाट्या/चमचे/पेले आणि अगदी पेपरटावेल्स पण न्यायचे. ह्यावेळेस जायचे ठरले तेव्हा मी सवयीने सर्व तयारी केली. रहायला जायचे म्हणून उशा/चादरी पण नेल्या. पण तिथे पोचल्यापासून कसा अगदी 'पाट बसायला..ताट जेवायला' असा थाट होता. वहिनी माझी पोलिश आहे. पण तिने खपून छोले, नारळाची चटणी, जीरा राइस, मलई बर्फी कृतीने पेढे असा बेत केला होता. स्वच्छ बाथरुममधे स्वच्छ धुतलेले टावेल्स घडी करुन ठेवले होते. आमच्यासाठी गादी घालुन तयार होती. सकाळी आवरुन येईपर्यंत नाष्टा टेबलवर वाट बघत होता.

एरवी इशानला पाळणाघरात सोडुन माझी मी कुठे जायचे ते गेले असते. आज मात्र डाउनटाउनमधे सकाळी कुठे पार्किंग मिळणार, आता मला हार्टफर्ड सवयीचं नाही इ. म्हणून वहिनी मला सोडवायला आली. त्यांच्या घरापासून अर्ध्या तासाचं तरी ड्राइव्ह आहे. इंटरव्यु अपेक्षेपेक्षा लवकरच संपला (किडक्या दातांच्या बाईशी कितीवेळ बोलणार). मग घाई घाई घ्यायला आली.

वहिनीला माझ्या वेगवेगळे फ्रूट स्प्रेड्स बनवायची फार आवड आहे. सारखे काही न काही विणकाम पण सुरु असते. माझ्या गाडीतल्या गणपतीसाठी आसन विणले आहे. निघताना ते आसन, २-३ प्रकारचे स्प्रेड्स, पेढे असे काय काय बांधुन दिले. आईची आठवण झाली. आईकडे गेले की काही हवे आहे म्हणावे लागत नाही. मी भारतात पोचायच्या २-३ दिवस आधीच ताजे मसाले, भाजणी असे काय काय तयार असते. आता आईकडे माहेरपणाला जायचे झाले तर अजून वर्षभर तरी वाट बघावी लागेल. पण काल अगदीच ध्यानी मनी नसता भावाकडे माहेरपणाचे सूख अनुभवुन आले. परत येताना विचार करत होते, 'हे बरंय, आता माहेरी जावसं वाटलं की हे आहेच माझं इंस्टंट माहेर' :)

Monday, April 19, 2010

नाना

अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यात प्रवरेकाठी मालुंजे हे आमचे गाव वसले आहे. पंढरपूरला भीमा जशी दक्षिणमुखी होऊन तिची चंद्रकोर तयार झाली आहे, तशी प्रवराही इथे दक्षिणमुखी झाली आहे व तिची सुरेख चंद्रकोर तयार झाली आहे. नदीच्या दोन्ही तीरांवर पेशवेकालीन विठ्ठल-रुक्मिणीच्या सुरेख मूर्ती असलेली मंदिरे आहेत. घराण्याचे मूळपुरूष नारोपंत रत्नपारखी यांच्याविषयी एक आख्यायिका सांगतात ती अशी - नारोपंत राघोबादादांच्या दफ्तरी चाकरीस होते. राघोबादादांचा एकदा गोदातीरी कोपरगावला मुक्काम पडला. राघोबादादा मोठे धार्मिक. रोज सकाळी मोठी पूजाअर्चा चाले. पूजेसाठी त्यांना भरपूर फुले लागत. त्यांचा मुक्काम पडला तेव्हा नेमका गोदामाईला महापूर आलेला. बळकट शरीरयष्टीचे नारोपंत पट्टीचे पोहणारे. फुले आणायची जबाबदारी त्यांनी शिरावर घेतली. नदी पार करून पोहून तर जाता येईल, परंतु फुले आणणार कशी ? कुणी म्हणे, डोईवर वाहून आणा. पण अशी डोक्यावर वाहिलेली फुले देवाला कशी चालणार? शेवटी त्यांनी एका हातात फुलांचा भारा घेतला आणि केवळ एका हाताने भल्या पुरात पोहून आले. राघोबादादांच्या कानावर ही हकीकत गेल्यावर खूष होऊन त्यांनी मालुंजे आणि आजूबाजूची काही अशी पंचावन्न गावांची जहागीर नारोपतांना बक्षिस दिली. त्यांनी मग मालुंज्याला वाडा बांधला. चार एकर क्षेत्रावर बांधलेला हा वाडा अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. वाड्याला भल्या मोठ्या संरक्षक भिंती आहेत. भिंतींना युद्धकाळात बंदुकीची नळी ठेऊन नेम धरायला लांबोळके झरोके आहेत. वाड्याला लागूनच विठ्ठल मंदिर आहे.

पुढे १८५७ ची लढाई हरल्यावर नानासाहेब परागंदा झाले, ते जवळच बेलापूरला केशव-गोविंदाच्या बनात आश्रयाला आले. तिथे त्यांनी भगवी वस्त्रे व स्वामी विद्यानंद हे नाव धारण केले. तेथे अनेक क्रांतीकारक त्यांना भेटायला येत. ह्या क्रांतीकारकांना मालुंज्याचे जहागीरदार करत असलेल्या मदतीचा सुगावा तेथील इंग्रज अधिकार्‍यास लागला. त्याने वाड्यावर छापा घातला. सगळा वाडा खणून काढला. काही पुरावा न सापडल्यावर जहागीर काढून घेऊन केवळ ५५ एकर जमीन तेवढी ताब्यात ठेवली. त्या ५५ गावांचा शेतसारा वसुल करण्याचे काम मात्र मागे लावून दिले. ह्या सार्‍याच्या वसूल केलेल्या एका रुपयामागे साडे तीन आणे वसुल करणार्‍यास मिळत. औटकी नुसार साडे तीन आणे म्हणजे होतो एक औट. मग औट वसुल करणारे म्हणून कालांतराने आमचे आडनाव रत्नपारखी न राहता आवटी झाले.

अशा ह्या आवटी घराण्यात दिनकर आवटींच्या घरी माझ्या आजोबांचा म्हणजे वासुदेव दिनकर आवटींचा १९०० साली जन्म झाला- ज्यांना आम्ही नाना म्हणत असू. दिनकर आवटी अतिशय विद्वान गृहस्थ. सरस्वती आणि लक्ष्मी एकाच ठिकाणी नांदत असलेल्या घरात संपन्न बालपण व्यतीत होत असताना दुर्दैवाने वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी नानांचे पितृछत्र हरवले. त्यांच्या कोवळ्या वयाचा फायदा घेऊन चुलत्यांनी असेल नसेल ती संपत्ती हडप केली, अक्षरशः देशोधडीला लावले. त्यावेळी नानांच्या दोन बहिणी पुण्यास देशपांडे व संगमनेरकरांकडे दिल्या होत्या. देशपांडेंनी मग नानांना Hindusthan Construction इथे अर्धवेळ नोकरी बघून दिली. शिक्षणाला तर रामराम ठोकलाच होता. नानांनी मग झारापकर इंस्टिट्यूट मधे शिवणकामाचे धडे घ्यायला सुरुवात केली. पुढे ते इतके उत्तम शिवणकाम करु लागले की स्वतःचे कोट देखील कितीतरी वर्षे स्वतःच शिवत असत. ह्या पुण्याच्या वास्तवात असताना अतिशय भाग्याची गोष्ट अशी की स्वातंत्र्यवीर सावरकरांची व्याख्याने ऐकण्याचा त्यांना योग आला. सावरकरांच्या विचारांचा त्यांच्यावर अतिशय प्रभाव पडला. पुढे काही वर्षांनी मालुंज्याला परत आल्यावर सावरकरांचे चरित्र आल्या-गेल्याला ऐकवणे हे जणू त्यांचे कर्तव्यच झाले. त्यांच्याविषयी बोलताना नाना देहभान विसरत. बोलता-बोलता कधी आवेशात उभे राहत तर त्यांचे त्यांना कळत नसे.

पुण्यात असतानाच बालगंधर्वांच्या गाण्याने त्यांना मोहिनी घातली. बालगंधर्वांची अनेक गाजलेली नाटके त्यांनी बघितली. त्यांचा स्वतःचा आवाजही अतिशय गोड. गाण्याची आवड होतीच. नंतर आयुष्य स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी एक पायपेटी व एक साधी पेटी विकत घेतली होती. एक ग्रामोफोनही घेतला (जो आमच्या घरी अजूनही आहे). बालगंधर्व, दीनानाथ मंगेशकर अशा दिग्गज कलावंतांच्या असंख्य रेकॉर्डस त्यांनी जमा केल्या होत्या (ह्या ही सांभाळून ठेवल्यात). हे गाण्याचे वेड स्वतःपुरते न ठेवता गावातल्या मुला-मुलींना नाना आग्रहाने गाणे ऐकवीत, शिकायला उत्सुक असणार्‍यांना पेटी शिकवीत. एकदा ते खास बालगंधर्वांना भेटण्यासाठी म्हणून पुण्यास गेले. बालगंधर्व कुठे बाहेर गेले असावेत, बरेच तास लोटले तरी ते काही परत येईनात. नानाही त्यांची वाट बघत त्यांच्या घरी बसून राहिले. शेवटी प्रत्यक्ष भेटीत समोरासमोर बसुन त्यांचे गाणे ऐकून, त्यांना स्वतःचे गाणे ऐकवून वर नाट्यसंगीतावर तासभर चर्चा करुनच परत आले. त्यांच्या घरी ग्लासभर केशर दुधाचा आस्वादही घेतला. नानांना बालगंधर्वांच्या गायकीबरोबरच कोण कौतुक होते त्या ग्लासभर दुधाचे. कुठे जाऊ, कसे जाऊ असे प्रश्न त्यांना कधी पडलेच नाहीत. निर्भीडता, बाणेदारपणा, स्पष्टवक्तेपणा ही त्यांची स्वभाव वैशिष्ठ्ये.

नानांचा एका गोष्टीवर फार भर असे ते म्हणजे व्यायाम. त्यांच्या लग्नावेळची गम्मत- नवरदेवाची प्रकृती इतकी तोळामासा होती की घोड्यावर बसायची मारामार. वरात पूर्ण कशी होणार असा ज्याला-त्याला प्रश्न पडला. कशीबशी रडत खडत वरात पूर्ण केली. लग्न झाल्यावर परत मालुंज्याला रहायचा निर्णय त्यांनी घेतला. परंतु भाऊबंदकीपुढे काही टिकाव लागेना. वडील वारलेले, जमीन, वाडा भाऊबंदांनी बळकावलेला. रहायला एक खोली मिळेना. देशावर इंग्रजांचे राज्य होते तो हा काळ. बळी तो कान पिळी अशी अवस्था होती. आजीचे माहेर मालुंज्याचेच. त्यामुळे रहाण्याची तात्पुरती व्यवस्था झाली. दरम्यान त्यांच्या मोठ्या मुलीचा जन्म झाला. ह्याच काळात कधीतरी नानांना असे जाणवले की व्यायाम करुन शरीर कमावले पाहिजे. घरी गाय होती. रोजचा दुधाचाच खुराक काय तो असे. मेहनत घेऊन त्यांनी अशी काही तब्येत कमावली की आजु-बाजुच्या गावांतूनही त्यांना कुस्ती खेळायला जोडीदार मिळेना. त्या काळातील एक किस्सा अतिशय प्रसिद्ध आहे. नाथा काका म्हणुन आमचे एक पूर्वज काही कारणाने वाममार्गी लागले होते. चोरी-मारी करत. एके दिनी भर बाजारात नाथाकाका आणि नानांची गाठ पडली. शब्दाला शब्द वाढून दोघांत हमरी-तुमरी चालू झाली. नानांनी जे नाथाकाकाला उचलला आणि गरगर फिरवला तो त्याची भीतीने पार गाळण उडाली. त्याने ह्यानंतर बाकी गावकर्‍यांनादेखील उपद्रव करणे बंद केले. भाऊबंदांनी घाबरुन जाऊन शेतीवाडी सर्व परत केले.

मग नानांचा हळूहळू गावात जम बसू लागला. सांपत्तिक स्थिती सुधारत होती. त्यांचा मूळचाच दिलदार स्वभाव आता उफाळून वर आला. जमेल तशी, कोणाला गरज पडेल तशी ते मदत करु लागले. वाड्यातील राबता वाढला. नाना येणार्‍या-जाणार्‍याला आग्रहाने बोलावून कुठे दूध प्यायला लाव, कुठे वानोळाच दे, जेवायलाच ठेवून घे असे करत असत. रोजच्या पंगतीला चार-पाच काय अधिकच पान जास्तीचे उठू लागले. आजीचीही ह्या सगळ्याला साथ होतीच. आजी देखील ग्रामपंचायत सदस्य होती. तिचीही आपल्या परीने समाज-सेवा चालूच असे. ह्या सर्व प्रपंचात माणसा-माणसात भेदभाव मात्र त्यांनी कधीही केला नाही. कोण गरीब, कोण श्रीमंत, कोण कुठल्या जातीच्या ह्या चौकशा वाड्यात कधीच झाल्या नाहीत. सगळी आपली माणसं. लोकही काही संकट असो, छोटी-मोठी अडचण असो, हक्काने नानांकडे येत. नानाही त्यांचा विश्वास सार्थकी लावत. वाडा म्हणजे सगळ्यांचं आश्रयस्थान बनलं. लोक आदराने त्यांना अण्णा आणि आजीला चंपाकाकू म्हणू लागले.

त्यांच वैशिष्ठ्य म्हणजे कुठलीही गोष्ट त्यांनी स्वतःपुरती सीमित ठेवली नाही. दूध पिणे आरोग्यास चांगले ना मग घरकामाची गडी-माणसे पण दूध प्यायल्याखेरीज कामाला हात लावणार नाहीत. त्यांच्या मुलींना तर दूध/व्यायाम सक्तीचे होतेच पण गावातल्या मुला-मुलींनाही त्यांचा तो आग्रह असे. तेच वाचनाचेही. त्यांना वाचनाची भयंकर आवड. डिटेक्टिव कथा वाचायचा ही त्यांना नाद होता. दोन मोठी कपाटे भरुन अनेक विषयांवरची! मोगरा फुलला पासून ते बाबुराव अर्नाळकरांच्या झुंझारकथांपर्यंत, माझी जन्मठेपपासून चांदोबा, आईची देणगीपर्यंत असंख्य पुस्तके त्यांच्याकडे होती. त्यातच ८० पैशांना विकत घेतलेली "स्वामी" देखील होती. कोणीही यावे, आवडेल ते पुस्तक वाचायला न्यावे असे चाले. यातच अनेक डांबरट लोकांनी पुस्तके लंपास केली. त्याविषयी आम्ही कोणी तक्रार करु परंतु नाना पुन्हा पुन्हा पुस्तके देत राहत. नानांचा इतिहासाचा ही गाढा अभ्यास होता. एक एक घटना, गाजलेले प्रसंग, सनावळी त्यांना तोंडपाठ होत्या. आम्ही लहानपणी मालुंज्याला गेलो की समोर बसवून ते शिवरायांपासून सुरुवात करीत ते दुसरे महायुद्ध उरकून भारताला स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय सोडतच नसत. तेव्हा आम्हाला शेतावर उडाणटप्पूपणा करायला जायचे असे. त्यामुळे तिथे बसून रहायचा कंटाळा येई. नानांची नजर बारीक, टिवल्याबावल्या केल्या की लगेच हटकत. पण त्यांच्या त्या प्रवचनांचा परिणाम की काय आम्हा सर्व भावंडांना इतिहासाची/वाचनाची अतिशय आवड आहे. त्यांची निवेदनशैली वेगळीच होती. गेल्या महिन्यात श्रीमान योगी वाचून झाले तेव्हा मनात असंख्य प्रश्न उभे राहिले. नानांची तीव्र आठवण झाली. मला ठाऊक आहे मी जर शिवरायांच्या त्या शेवटच्या कालखंडाविषयी विचारले असते तर नानांनी "ती सोयराबाई अतिशय लबाड बाई..." अशी सुरुवात करुन माझ्या सर्व शंकांचे निरसन केले असते.

खोटं बोललेलं एक त्यांना अजिबात आवडत नसे. कुणी खोटारडेपणा करतंय असे दिसले की नानांनी दिलाच दणका. ज्याला प्रसाद मिळे त्याच्या घरचेही म्हणत, "अण्णांनी मारलं ना, मग तुझीच चूक असणार" एवढा विश्वास. कोणी चहा पिताना दिसला की नानांनी दुधाची महती सांगितलीच पाहिजे. नेमकेच माझ्या आजीला चहा फार आवडे. त्या एका विषयावरुन नवरा-बायकोत कायम वाद होत.

अशाप्रकारे सामोरा येईल त्याला सन्मार्गाला लावणे, त्याच्या आयुष्याची घडी लावून देणे हे त्यांनी आपले कर्तव्यच मानले. आपल्या आचार-विचारांनी नानांनी एक आख्खी पिढी भारुन टाकली होती. गावात अतिशय छान वातावरण तयार केले होते. मग लोकप्रियतेबरोबरच शत्रूही तयार झाले. भाऊबंदही टपलेले होतेच. त्यांच्यावर तीनदा मारेकरी घालण्यात आले. नानांची पद्धत अशी की रात्री दाराला कडी लावायची नाही. मी असताना कोण चोर-दरोडेखोर येतो त्याचा बेत बघतो असे म्हणत. झोपही इतकी सावध असे की मांजरीच्या पावलांनी कुणी आले तरी त्यांना चाहूल लागत असे. तीनही वेळा त्यांनी मारेकर्‍यांना चांगला चोप देऊन कबुली घेतली. शेवटी ते गयावया करु लागत आणि नाना त्यांना क्षमा करुन सोडून देत.

माणसांवर जसे प्रेम तसे प्राण्यांवरही अतिशय प्रेम. त्यांच्याकडे नेहेमी एक कुत्रा पाळलेला असे. त्याशिवाय अजूनही ७-८ कुत्री कायम वाड्यात मुक्कामाला असत. गायी तर असतच. १०-१२ झोपे दिलेल्या तालेवार गायी म्हातार्‍या झाल्यावर त्या विकून टाकाव्यात असे सगळेच सांगत. नानांनी मात्र कसायाच्या भीतीने एक गाय कधी कुणाला दिली नाही की विकली नाही. ते म्हणत माझी आई म्हातारी झाली तर मी विकणार आहे का कुणाला देणार आहे?

शेवटच्या दिवसांत मात्र त्यांना एकाच गोष्टीचा ध्यास लागला होता. विठ्ठल मंदिराचे बांधकाम खचले होते. ते पूर्ण करुन घे असे वारंवार बाबांना सांगत. बाबांनी आणि नानांचे छोटे भाऊ, अच्युतकाकांनी मिळून ते काम नेटाने पूर्णही केले. वयाच्या ८९ व्या वर्षी एक अतिशय समाधानी आयुष्य व्यतीत करुन नानांनी देह ठेवला. अंत्यसंस्कारासाठी गावेच्या गावे लोटली. काही नातेवाईक यायला वेळ होणार होता. वाड्याच्या प्रांगणात असंख्य लोक जेवण-खाण न करता नि:शब्द बसून होते. जणू त्यांच्या घरातलेच एक माणूस हरवले होते.

काल-परवाची गोष्ट. शेतीवाडीची पहाणी करायला बाबा मालुंज्याला गेले होते. रस्त्यात रामदास पवार काका भेटले. ऐंशीच्या वर वय आहे पण पायीच निघाले होते बांधावर. बाबा तब्येतीची चौकशी करु लागले. तसे म्हणतात, "तुझ्या अण्णाची कृपा आहे बघ. त्यांनी व्यायामाची, दुधाची, निर्व्यसनी आयुष्याची सय लावली म्हणुन ह्या वयातही हाडं-काडं मजबूत आहेत बघ." कधी असेच कुणी भेटतात, अण्णांनी लावलेल्या वाचनाच्या आवडीने कशी आयुष्याला दिशा मिळाली सांगतात. लहानपणी कडक शिस्तीचे हे आजोबा फारसे आवडत नसत. भेटायला गेले की बिस्किट वगैरे खाऊ न देता जानव्यातल्या चावीने कुलूप उघडून पुस्तके देत. टोकरीभरुन आंबे खाऊ घालत. बरोबरीच्या मैत्रिणींचे लाड करणारे आजोबा बघितले की असूया वाटे. आता ते गेल्यावर इतक्या वर्षांनी श्रीमान योगी वाचून खाली ठेवली नी नानांच्या आठवणीने प्रथमच रडले. हे असे जगावेगळे आजोबा मिळणे किती भाग्याचे आहे हे जरा उशीराच कळले म्हणायचे.

(वरील लेख हा माझे वडील, श्री हेरंब आवटी ह्यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेल्या कार्यक्रमाचे लिखित रुपांतर आहे. नाना म्हणजे त्यांचे वडील, माझे आजोबा.)

Friday, April 16, 2010

एक सकाळ

..आज सकाळी उशीरा जाग आली. नवर्‍याला ८:३० ची मीटिंग होती, मला ९ चा एक इंटरव्यु. नवरा घाई-घाई आवरुन पळाला. रोज सकाळी जी काय थोडी-फार कामं तो करतो ती पण न करता. उशीरच झाला मग त्याला इलाज नाही. लेकाला डब्यात बटाट्याचे पराठे द्यायचे म्हणून त्याची तयारी केली होती. पटकन दोन पराठे लाटु (एक त्याला, एक मला) म्हंटलं तर लेकाने नेमकच एकदा शी केली आणि एकदा अंगावर पाणी सांडुन घेतले. बर्नर बंद करा, त्याचे आवरा आणि परत कामाला लागा. डबे भरत होते तेव्हा त्याला काय खायला दिले होते ते सगळे अंगावर माखुन घेतले. परत त्याला धुवा. मग कपडे घालायला त्याने इतके पळवले की शेवटी त्याला नुसतेच जॅकेट घालून घेऊन जावे असे वाटले. कसे-बसे दोघांचे आवरले तर घराची चावी सापडेना. सापडायला सोपी म्हणून गाडीची आणि घराची चावी माझ्या हँडबॅगमधे असते. आज-काल लेकाला झिप काढता येते त्यामूळे त्यानेच कधीतरी चावी काढून कुठेतरी भिरकावली असणार. नवर्‍याला फोन केला तर त्याने मीटिंगमधून येउन हळु आवाजात काय सांगितले त्यालाच कळाले नसणार. काहीतरी कॉफी टेबल असे ऐकु आले. सगळ्ळा कॉफी टेबल धुंडाळला पण काही सापडली नाही. शेवटी एंड टेबलच्या खणात सापडली. दाराला कुलुप घातल्यावर लक्षात आले माझे जॅकेट घरातच राहिले. ते घेऊन एकदाची निघाले तर हॅमिल्टन एव्हेन्युवर काम सुरु म्हणून रुट-१ ला जावे लागले. तिथेही काम सुरु म्हणून एक लेन बंद होती. मग रुट-१ चे नेहेमीची रहदारी, ते काम वगैरे मिळुन तिथे पोचायलाच अर्धा तास आणि त्यापूढे रुट-१, ग्रीनिच एव्हेन्यु आणि मग I-९५ असे यायला अर्धा तास. ९५ वर पण काम सुरु आहे. काम रात्री करत असले तरी सामान-सुमान मिळुन एक लेन बंद. बॉसला फोन करु म्हंटले तर एक चढे वळण घेताना बॅग सीटवरुन खाली पडली होती. ड्रायव्हिंग सीटवरुन तिथपर्यंत माझा हात पुरेना. रडत-खडत १० मिनिटांचे अंतर एक तास ड्राइव्ह करुन पार केल्यावर एकदाचे एक्झिट ७ आले. लेकाला एव्हाना झोप यायला लागली. आज-काल पाने झडुन गेल्याने हाय-वे वरुनच पाळणाघराचे पार्किंग दिसते. दोन जागा रिकाम्या होत्या. इतक्या उशीरा कोण तिथे येणारे असा विचार करत एक्झिट घेऊन एक सिग्नल ओलांडुन तिथे पोहोचेपर्यंत दोन्ही भरल्या. परत गाडी मागे घेऊन इमारतीतल्या पार्किंगमधे गेले. आधी बॉसला फोन केला, तर तो जाग्यावर नव्हता. लेकाला गाडीतुन काढून पाळणाघराकडे निघाले तर चष्मा गाडीतच राहिला. तरी बरे रस्त्याने चालताना चष्म्याची गरज अजून तरी पडत नाही. एकदाचे त्याला पाळणाघरात सोडले आणि धावत-पळत 9:45 वाजता ऑफिसला आले. आल्या आल्या मॉनिटरवर चिठ्ठी- Please join me in the empty room next to Pete's office- Dan 09:15 am. बॉस तसा भला गृहस्थ. त्याने पुष्कळच ३० मिन. खिंड लढवली होती, इंटरव्यु अजून संपला नव्हता. टेक्निकल प्रश्नांसाठी माझ्याकडे हँड ओवर करुन तो पूढल्या मीटिंगसाठी पळाला. इंटरव्यु संपवुन जागेवर आले तेव्हा असे वाटत होते, आधी एक तास झोप काढावी आणि मग कामाला सुरुवात करावी :)


एखादी सकाळ अशीच येते ना, सावळ्या गोंधळाची...काय म्हणतात ते chaotic :)

Monday, April 12, 2010

अ‍ॅल्युमनीला परात

मूळ कवितेला आलेल्या प्रतिसादांत अ‍ॅल्युमनी म्हणजे अल्युमिनिअमचे भंगार विकून आलेला मनी अशी कुणीतरी मल्लीनाथी केली. त्यावरुन हे विडंबन:-

तो (डबा बाटली भंगारवाला) म्हणाला मला
'ती (परात)' देणार का अ‍ॅल्युमनीला ?

(मी म्हणाले)
खूप वर्ष झाली पाहिलं नाही तिला
जे तोलायचं होत ते राहुनच गेल "त्या" वेळेला

काय म्हणाव या खुळ्याला ?
पोचेच काय खड्डे पडले असतील एव्हाना "तिला"

इतकी वर्ष लोटली या घटनेला
(चोरुन दूध पिले म्हणुन आज्जीने फेकुन मारली मांजरीला)
"हा" अजून धुंडाळतो आहे त्या (अ‍ॅल्युमनीच्या) धुडाला

तो हादराच असा होता
बहुधा "तिला" जोरदार पोचा पडला होता

शेवटी व्हायच तेच झालं
बापानं माझ्या मुंबईहुन (स्टेनलेस स्टीलच) ताट आणलं

(परातीचा कणा)
तुटला नाही रडला नाही
गप्प असा झाकून राहीला

(भंगारवाला)(तराजुत)
पडलं भंगार सोशीकपणे
मूक राहून तोलीत राहीला

पंधरा वर्षानी एक दिवस
तराजु याचा एका बाजुस कलला

तीसर्‍या किलोला झाकली परात
माझ्याजवळ मागून बसला

अजून त्याला एकच आशा
देईन मी एक दिवस

डोळे त्याचे शोधत रहातात
रुप परातीचे आठवत रहातात
 
** मूळ कविता: अ‍ॅल्युमनी

Thursday, April 8, 2010

लेखणीवाल्या प्राण्यांची सभा

लेखणीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा
पोपट होता सभापती मधोमध उभा

पोपट म्हणाला, मित्रांनो देवाघरची देणगी
देवाघरची देणगी, अशी ही लेखणी
ह्या लेखणीचे कराल काय ?

गाय म्हणाली अशा अशा
पाडेन मी कविता खाशा

घोडा म्हणाला, कथा ढापेन कविता पाडेन
मी सगळ्या ब्लॉगविश्वात हैदोस घालेन,
हैदोस घालेन

कुत्रा म्हणाला, कुत्रा म्हणाला
खूशीत येइन तेव्हा,
प्रतिक्रीया देइन मोठ्या

मांजरी म्हणाली, नाही गं बाई
कुत्र्यासारखे माझी मुळीच नाही
खूप खूश होइन जेव्हा प्रतिक्रीया येइल,
प्रतिक्रीया येइल

खार म्हणाली, खार म्हणाली
पडेल कविता, पडेल कविता
तेव्हाच होतील प्रतिसादांच्या बाता

मासा म्हणाला, लेखणीचा उपयोग
काय सांगु आता पण..पाडत राहिन कविता

मोर म्हणाला, लाडं लाडं कविता पाडेन मी पाडेन
कवितेत माझ्या अगम्य शब्द टाकेन मी टाकेन

कांगारु म्हणाले, माझे काय ?
तुझे काय ? तुझी लेखणी म्हणजे
खाली डोकं वर पाय !!!

ह्या लेखणीचा कर्फरा (करा फरा फरा) उपयोग
नाहीतर काय होइल, काय होइल, काय होइल....
दोन पायांच्या माणसाची ज्ञानेश्वरी
लोकांच्या मनावर राज्य करत राहिल !!!

** मूळ गाणे: शेपटीवाल्या प्राण्यांची

Wednesday, April 7, 2010

कुणाच्या ह्या फण्या

कसल्या या खुणा
कोण येउन गेलं इथे
कुणाच्या ह्या फण्या
रूतल्यात जिथे तिथे

गेली असतिल इथून
काही तुरतुर पावले
एक पिल्लु भांगातून
अलवार ओघळले

तेलकट टाळक्यावर
जाई सुळ्ळकन आणि
आत आत कुठेतरी
लपली असेल राणी 

डोके खाजवलेले
बट ही काळीशार
फिरवु किती कंगवा
चावतात आरपार

कुणी लायसील लावले
की मेडिकेअर हा चांगला
बसेन सोबती सखीच्या
हट्ट असा हा भोवला

** मूळ कविता: कुणाच्या ह्या वेणा

Wednesday, March 31, 2010

नवी गाडी

गेल्या महिन्यात आम्ही नवी गाडी घेतली. ह्या आधी आम्ही वापरत असलेली गाडी, सध्याची अर्थव्यवस्था, दोघेही investment banking मधे असल्याने आमच्या धोक्यात आलेल्या नोकर्‍या, पदरी एक मूल (अरेरे किती ते रंजले, गांजले) आणि गाडीचा काळा रंग अशा पार्श्वभुमीवर घरातील, बाहेरील मंडळींच्या आलेल्या प्रतिक्रीया.

आम्ही नुकतेच गाडी घेउन घरी आलो होतो. शनिवारी डील करण्यात बराच वेळ गेला म्हणून गाडी घरी आणायला सोमवार उजाडला. येईतो रात्रीचे आठ वाजून गेले होते. मी घाई-घाई इशानच्या जेवणाचे बघतच होते तर फोन वाजला. भारतातुन मोठ्या बहिणीचा होता.
मी, "हाय, मी आज फोन करणारच होते. काय म्हणतेस ?"
ती, "का ग ? आज काय विशेष ?"
मी, "नवी गाडी घेतली ते सांगायला."
ती, "अरे व्वा, मस्तच बातमी, कुठली घेतली ?"
मी, "होंडा ऍकॉर्ड"
ती, "मस्तच...आई-बाबांना सांग बाई आधी फोन करुन. अमेरिकेत सध्या काय गोंधळ आहे. त्यांना फार काळजी पडलीये तुमची. बरं रंग कुठला ?"
मी, "काळा.."
ती, "अर्र काळाच का ?"
हे ऐकल्यावर मी फोन ठेऊनच दिला. कारण आमच्या आख्या खानदानात पहिली काळी गाडी ह्यांची. माझ्या भाच्याचा मुंजीत ह्या गाडीला कल्पकतेने थर्माकोलची सोंड वगैरे लावुन वरातीसाठी हत्ती बनवला होता. हत्ती करायची कल्पनाच मुळी गाडीच्या काळ्या रंगावरुन आली. म्हणतात ना, आपला तो बाब्या !!!

त्या दिवशी रात्री काही मला घरी फोन करणे झाले नाही. दुसर्‍या दिवशी सकाळी-
मी, "हॅलो बाबा"
बाबा, "बोला..." बाबांना कधीही मी कोण बोलते सांगावे लागत नाही. ते बरोबर ओळखतात. ह्याविरुद्ध मी, एकदा खुद्द आईला "बाई तुम्ही कोण बोलताय ते आधी सांगणार का ?" असे म्हणाले होते.
मी, "काल गाडी घेतली. तेच सांगायला फोन केला"
बाबा, "गाडी घेतली ? नवी ?"
मी- बारीक आवाजात, "हो, नवीच आहे"
बाबा, "वा छान छान. आम्ही इथे काळजी करतो. ओबामा निवडुन येइल तर बरे म्हणतो आणि तुम्ही तर गाडी घेतली !!!"
मी, "आता हिवाळा आला ना. दोन गाड्या हव्याच. पहिली विकुनही वर्ष-सहा महिने होत आले की आता."
बाबा, "ते ही खरच, बरं झालां घेतली. रंग कुठला ?"
मी (चाचरत), "काळा...."
बाबा, "तुझी आई बाहेर गेलीये. सकाळी फोन कर."
"काळा रंग ह्या मॉडेलला खूप छान दिसतो.." हे माझे शब्द ओठातुनच पोटात जातात. काळा रंग म्हणजे बाबांची साफ नापसंती असते. ते नेहेमी म्हणतात, "आपली गाडी रंग पांढरा असल्यामुळे कशी सगळ्यांच्या गाड्यांपेक्षा भारी दिसते."

ऑफिसमधील माझी मैत्रिण शीतलला आम्ही गाडी घेणार हे आधीच ठाऊक होतं. गाडी घरी आणल्याची सांगावं म्हणुन मी तिला मेसेज पाठवला. आता हा संवाद जसाच्या तसा दिला नाही तर त्यातली गंम्मत उरणार नाही म्हणुन इंग्रजीत.
"Hi"
"Hey...whatz up ?"
"have a news to share with u.."
"so soon ? Ishan is just a year old...;)"
"ha...sooner than u can expect...the baby is home already..."
"really...which one ?"
"Honda Accord..2009.."
"noooooooooo..."
"yessssssss.."
"I was so proud of you guys..."
"you have many other reasons to be proud of us :)"
आधीच आम्ही इतकी मस्त स्पोर्ट्स कार विकून मोठ्याच पापाचे धनी झालो होतो. त्याबदल्यात होंडा ऍकॉर्ड म्हंटल्यावर तर जगबुडी नक्की !!! आणि मग जसे काही आम्ही केलेल्या पापाचा धक्का सहन न झाल्याने ती तरातरा माझ्या डेस्कपाशीच येउन उभी राहिली आणि "How can you do this..." वगैरे वगैरे बोलायला लागली.

मग जेवणाच्या सुट्टीत मैत्रिणीला फोन केला. आम्ही गाडी घ्यायचे ठरवले तेव्हापासून सर्व शोधाशोधी वगैरे ह्या नवरा बायकोला माहिती होती. मी, "कामात आहेस का ?"
ती, "बोल.."
मी, "गाडी घेतली बरं एकदाची..."
ती, "कुठली घेतली शेवटी ?"
मी, "होंडा ऍकॉर्ड २००९..."
ती, "तू तुझ्या खतरुडपणाने नवर्‍याचं स्टँडर्ड* घालवलं आहेस.."
मी, "ठेऊ का फोन ?"
ती, "बाय"
* हे स्टँडर्डचं समीकरण अगदी सोप्पं आहे:- माझ्या नवर्‍याने उकरुन काढलेले खर्च + वैद्य कुटुंबीयांचा पाठिंबा = स्टँडर्ड. वैद्य पाठिंबा देतील नाहीतर काय.

एव्हाना मी रचना, आरतीला इपत्र पाठवले होते. रचनाने गेल्याच महिन्यात काळ्याच रंगाची वॅगन-आर घेतली. मी चुकुन सँट्रोला मोठी बहिण झाली असे लिहिले. त्यावर त्यांचे उत्तर-
आरती- हो ? कस्स्काय ? पण जबर्‍या !!!
रचना- सहीSSSSS लेकीन येह सँट्रो कौन है भाय ? काळा रंग बाबांना सांगितलास का ?
हे लिहिताना रचना खुदुखुदु हसत असणार आणि तिच्या नव्या गाडीवर बाबांनी टाकलेला तु. क. आता मला झेलावा लागणार ह्या विचाराने तिला आसूरी आनंद होत असणार हे मला शंभर टक्के माहिती होते.

आई आदल्या दिवशी भेटली नाही म्हणुन मी परत फोन केला.
मी, "आई..."
ती, "ह्म्म मला कळालं नवी गाडी घेतली...रचनाने सांगितलं मला..."
मी, "रचनाने ? अगं मी काल बाबांना फोन केला होता...त्यांनी नाही का सांगितलं ?"
ती, "अगं बाई काही बोलले नाहीत मला. बाबांचं हे असंच आहे. बागेत घोसाळ्याला घोसाळी लागली की सगळ्या गावाला बातमी आणि महत्वाचं ते सांगायच नाही. आता घोसाळ्याला घोसाळी नाहीतर काय आंबे लागणारेत ?" इथे मी काहीच बोलत नाही. मागे एकदा मी आईची बाजुन घेउन कायसं म्हणाले तर बाबा दुसर्‍या लाइनवर ऐकत होते. मग आईच पूढे म्हणाली, "छाssssन झालं...आम्हाला आपली काळजी वाटते रोज बातम्या ऐकुन...तुम्ही नवी गाडी घेतली म्हणजे मग आम्हाला चिंता नको. रंग कुठलाय ?"
मी, "काळा"
आई, "तरीच बाबा काही बोलले नाहीत बरका. काळा का घेतला ? बाळाला आवडेल असा घ्यायचा ना."
आता आजीबाईंचा नातू आहे सव्वा वर्षाचा. त्याला आवडणारे रंग म्हणजे भडक लाल, पिवळा, निळा. अशा रंगाची गाडी घ्यायची का ? पण त्याच्या आजीला कोण समजावणार. मांजराच्या गळ्यात घंटा !!!

नवरा आणि त्याचा मित्र. ह्या दोघांनी संगनमताने पहिल्या महागडया गाड्या घेतल्या होत्या. प्रत्येकवेळी भेटल्यावर आपापल्या गाडीच्या कौतुकात तासनतास घालवले होते. त्याने ही थोडे दिवसांपुर्वीच पहिली गाडी विकुन "क्यामरी" घेतलीये.
हा, "हाय.."
तो, "क्यु बे साले बाप बन गया तो फोन करना बंद कर दिया.."
हा, "तु है ना लाइन मे..सब समझ जायेगा..."
तो, "हा यार...मेरी बिवी तो अभी से मम्मी मोड मे आ गयी है...मै फस गया यार तीन तीन मम्मीयों के बीचमें" तीन मम्म्या म्हणजे ह्याची आई, सासू आणि बायको.
हा (अत्यंत केवीलवाण्या आवाजत), "अच्छा सुन, कल नयी गाडी ले आये यार.."
तो, "अबे तो रो क्यु रहा है ? कौन सी ?"
हा, "होंडा ऍकॉर्ड.."
तो, "साला देसी...आ गया ना औकात पे..."
आणि मग इशान दचकुन उठला इतकं हा मोठ्याने हा हा हा करुन हसला !!!

Friday, March 26, 2010

गौरी


८ मार्च २००४, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने बांद्र्याला रंगमंदिरात गौरी देशपांडे आणि प्रिया तेंडुलकर ह्यांच्या आठवणी असा कार्यक्रम होता. ह्या दोघींचे आपल्यातुन निघून जाणे हुरहुर लावणारे खरे पण त्यांच्या अगदी जवळच्या मोजक्या लोकांनी फार हृद्य आठवणी सांगितल्या. कार्यक्रम छानच झाला. कार्यक्रम संपल्यावर दादरला येऊन फास्ट ट्रेन घेतली आणि खिडकीतली जागा पटकावुन बसले. अजून मनात त्या सगळ्या आठवणी रुंजी घालत असतानाच भांडुप आले. भर दुपारी उन्हाची मी स्टेशन वर उतरत होते. अचानक कुठुन आले आहे, कुठे चालले आहे आठवेचना. धक्क्यांमधुन सावरत, ट्रेन मधुन उतरणार्‍र्या आणि चढणार्‍या गर्दीतुन कुठल्या दिशेने चालायला सुरूवात करायची आहे हे ठरवण्यासाठी आधी स्वतःला एका जागेवर उभे केले आणि एकदम माझे लक्ष एका आकर्षक व्यक्ती कडे गेले.


...खादीचा लांब कुडता, पांढरी पडलेली निळ्या रंगाची जीन्स, खांद्याला लटकवलेली एक पिशवी की शबनम की असेच काहीतरी लटकत होते ज्यात बरेच जास्तीचे सामान कोंबले होते. कुडत्याला बटनपट्टीपाशी एक गॉगल लटकत होता. डोक्यावरचे केस जवळ जवळ सगळे पांढरे झाले होते आणि लहानपणी घामोळ्या येऊ नयेत म्हणुन कापतात तसे बारीक कापले होते. म्हणजे नवरात्रात सहाव्या-सातव्या माळेला गहु जितपत वाढतात तेव्हढे. मला वाटते ह्या सगळ्यात आधी दिसली ती हातातली सिगरेट. गुरुदत्त स्टाईल मधे कपाळावर आठ्या घालुन झोकात सिगारेट ओढत ट्रेन ची वाट न बघता स्टेशन वर उभं असलेल ते सुंदर ध्यान मला बघत रहावसे वाटले. मी एकटक बघत आहे हे लक्षात येउनही माझ्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करुन थंडपणे उभ्या असलेल्या त्या व्यक्तीकडे मी दुर्लक्ष करुन निघून जाउच शकत नव्हते.


आमचं मन तेव्हढ्यात पचकलं, "जाउन बोल तरी नाहीतर चल घरी. उगाच आपलं उन्हातान्हात, गर्दीत इथे येड्यासरखं उभं रहायचं." पण काय बोलु ? ओळख नाही, पाळख नाही. बर ज्यांच्यासमोर मी ट्रेन मधुन उतरले त्यांना विचारता पण येणार नाही, "कल्याण गेली ?". मी विचारात असतानाच पावलांनी 'ध्यानाच्या' दिशेने चालायला सुरुवात केली आणि अर्ध्या मिनीटात मी ध्यानाच्या एकदम समोर. आमच्या थोबाडाचा टाइम सेन्स एकदम भारी, ताबडतोब प्रश्न बाहेर आला, "मी तुम्हाला कुठेतरी पाहीलयं असं वाटतं आहे, नाव काय आपलं?" ध्यान उत्तरलं, "गौरी देशपांडे". मी डोळे विस्फारुन, तोंड बंद करायचं विसरुन बघतच राहीले. बॅकग्राउंड ला बाजुने येणार्‍या जाणार्‍या ट्रेन्स ची धाडधाड धाडधाड, एकदम फ़िल्मी स्टाईल.


तेव्हढ्यात कोणीतरी ट्रेन पकडण्यासाठी धावत आले आणि मला धक्का मारुन गेले. त्या धक्क्यासरशी मी जरा शुद्धीवर आले. डोळे नेहेमीच्या आकारात आले, तोंडही बंद झाले. बघीतले तर आजुबाजुचे लोक माझ्याकडे आश्चर्याने बघत होते. गर्दीतल्याच एक बाई माझ्याजवळ येउन म्हणाल्या, "बरं वाटत नाहीये का तुला ?" मी नकारार्थी मान हलवुन त्यांना म्हंटलं, "मी ह्यांच्याशी बोलायला थांबले आहे." ह्या वाक्यावर बाई घाबरल्यासारख्या मागे सरकुन निघुन गेल्या.


बाई म्हणाल्या, "चल आपण तुझ्या घरी जाता जाता बोलु. एक गोष्ट सांगते तुला." आम्ही रिक्षाने गेलो. बाईंची चालत जाण्याची तयारी होती पण मला चालणं शक्यच नव्हतं. रिक्षात त्या बोलत होत्या, मी ऐकत होते. एक दोनदा मी फ़क्त ऐकता ऐकता 'हं' म्हणाले तर रिक्षावाल्याने चमत्कारीक नजरेने मागे वळुन पाहीले. घर येईपर्यंत त्यांची गोष्टही संपली. बाई घरापर्यंत आल्या आणि म्हणे, "आता वर नही येत, उशीर होईल. रात्री प्रियाकडे जेवायला जायचयं".


माझ्या डोक्यात त्यानंतर बराच वेळ फक्त मुंग्या !!!
*****************************************************
~रचना आवटी
माझ्या धाकट्या बहिणीने लिहिलेली ही कथा. तिचा स्वत:चा ब्लॉग नाहीये म्हणून माझ्या ब्लॉगवर प्रकाशित केली आहे.

Wednesday, March 24, 2010

क्षणभर

सकाळी जमेल तितक्या लगबगीने आवरून विंदुने दाराला कुलूप घातले आणि गाडीचे कुलूप काढणार तर सिंधूची गाडी तिच्या गाडीच्या मागे उभी बघून तिच्या तोंडून पटकन "अरे देवा" निघून गेले. आधीच उशीर झालेला त्यात आता पुन्हा गाड्या पुढे-मागे कुठे करा म्हणून तिने निमूट पिशवीतून दुसरी चावी काढली नी सावकाश पायर्‍या उतरू लागली. नाही म्हंटले तरी सहावा लागूनही एक आठवडा उलटून गेला होता. पोट आता चांगलेच दिसू लागले होते. त्यामुळे एरवी कितीही कौतुकाची असली तरी आता सिधच्या स्पोर्टस् कारमधे बसायचे म्हणजे विंदुला अवघडल्यासारखे व्हायचे. "संध्याकाळी सांगितले पाहिजे सिधला त्याची गाडी पुढे लावून ठेवायला" असे मनात म्हणत ती गाडीत बसली. समोरच्या घरातनं निघून लिझ दणादणा पायर्‍या उतरून धप्पकन गाडीत बसल्याचं तिच्या नजरेतून सुटलं नाही.

सकाळी नऊ वाजता सुद्धा इतके ऊन चढले होते. डोळ्यांवर काळा चष्मा चढवून तिने गाडी सुरू केली आणि रिव्हर्स टाकला. सवयीप्रमाणे आरशात मागे बघितले आणि ती घाबरलीच. लिझची गाडी एकदम वेडीवाकडी होत वेगात मागे येत होती. एक क्षण गांगरलेला गेल्यावर तिने चपळाईने गिअर बदलला आणि गाडी जमेल तेव्हढी पुढे घेतली. पण ड्राइव वे मध्ये त्यांचीच दुसरी गाडी उभी असल्याने पुढे जाण्यास फारसा वाव दिसेना. आता ही बया धडकते की काय असे वाटल्यावर तिने दार उघडले. गाडीच्या बाहेर पडणार एव्हढ्यात मागून करकचून ब्रेक दाबल्याचा आवाज आला नी ती गाडी भुर्रकन निघून पण गेली. विंदुला वाटले उगीच घाबरलो आपण. लिझ अशीच गाडी चालवते नेहमी. तिच्या आईच्या जिवाला एक घोर असतो ही बया कुठे बाहेर गेली म्हणजे. एक मोठा सुस्कारा टाकून "काय मस्ती करायची ती घरात करावी, दुसर्‍यांच्या जीवाशी खेळ कशाला..." असे पुटपुटत तिने गाडी पार्किंगमधून बाहेर काढली.

ऑफिसला येई येईतो साडे-नऊ झालेच. खाली कॅफेटेरिआत, इमारतीच्या आवारात बरेच लोक घोळक्याने उभे होते. तिला उगीचच आजी गेली तो दिवस आठवला. संजुचा- धाकट्या भावाचा- ताबडतोब घरी निघून ये असा निरोप आला तेव्हा बाप-लेकांचे परत भांडण झालेले दिसतेय असेच तिला वाटले. हे नेहमीचेच होते. त्यांच्या भांडणांची कारणे तशी क्षुल्लकच असत पण विंदुला मध्ये घेतल्याशिवाय काही "मांडवली" होत नसे. त्याला जायचे असे मित्रांबरोबर हुंदडायला तर बाबांना वाटे आता त्याने धंद्यात अधिक लक्ष घालावे. इथून सुरुवात होऊन मग विषय हमखास आमची पिढी कर्तृत्ववान तुमची आयताड पर्यंत जात असे. "आयताड" म्हंटले की संजुचे डोके भयंकर तडके आणि मग तो "ह्या घरात एक क्षण थांबणार नाही", "पाणी पिणार नाही" अशा शपथा घेऊन घराबाहेर पडे. विंदु कॉलेजमधे नसली तर वाचनालयात नाहीतर मैत्रिणीच्या घरी अभ्यास करताना सापडे. मग प्रत्येकवेळी वेगवेगळे बहाणे काढून ती संजुला घरात यायची परवानगी मिळवे. एव्हाना त्याच्या शपथा त्यालाच आठवत नसत.

पण त्या दिवशी घराशी आली तो गल्लीच्या टोकालाच कुजबुजणारे जोशी काका आणि कुलकर्णी आजोबा दिसले. "दीक्षित निघाले आहेत...पोचायला ४-५ तास तरी लागतीलच..." अस्पष्टसे कानावर आले. आणि मग सगळ्या गल्लीभर अशा कुजबुजणार्‍या लोकांची रांग. ती रांग तिच्याच घरापाशी येऊन थांबलेली. तिच्या काही लक्षात येईना काय चालले आहे. थोडे घराजवळ गेल्यावर आतून येणार्‍या आवाजांनी काही तरी आपल्याच घरी झाले आहे ह्याची तिला खात्री झाली. घराच्या पायरीवर तिची वाट बघत बसलेला हमसून हमसून रडणारा सजू दिसला आणि काय झाले असेल हे जाणवून ती थिजल्यासारखी एका जागी उभी राहिली. "आजी..." आजीला २-३ दिवसापूर्वीच घरी आणले होते. म्हातारीची तब्येत ठणठणीत पण रक्तदाब जरा वाढला होता. घरी येताना डॉक्टर तर म्हणाले होते सगळे उत्तम आहे, घाबरण्यासारखे काही नाही. मग हे काय ? धावत जाऊन आजीला बिलगावेसे वाटले पण पुढे पाऊलच टाकवेना, ती उभ्या जागी "आजी...आजी" पुटपुटत राहिली. शेवटी शेजारच्या काकूंनी बळे ओढत तिला आपल्या घरी नेली. सगळे संस्कार झाले, लोक पांगले तरी विंदु मख्खपणे काकूंच्याच घरात बसून होती. आजीला शेवटचे बघायला पण गेली नाही.

विचारांच्या नादात समोर "Caution: Wet Floor" ची पाटी तिला दिसलीच नाही. ओल्या गुळगुळीत फरशीवर तिचा सर्रकन पाय सरकला. सहा महिन्यांचे पोट घेऊन तिला तोल सावरता येणं अशक्य होतं. पण जवळच उभ्या असलेल्या एका सुरक्षा व्यवस्थापकाने चटकन पुढे होऊन आधारासाठी हात देऊन तिला धड उभी केली. विंदुने पुन्हा पुन्हा त्याचे आभार मानल्यावर तो गमतीने म्हणाला, "कितीवेळा धन्यवाद देणार आहेस. त्यापेक्षा मला एक कप  कॉफी दे".

वर गेल्यावर पाहिले तर मार्क नेहमीप्रमाणे फोनवर कुणाला तरी शिव्या देत होता, बरेच टीम मेंबर्स घोळक्याने गप्पा ठोकत होते आणि कॅफेटेरिआत काम करणारे अक्षरशः: आग्रह करून सगळ्यांना आईस क्रीमचे कप आणि कोल्ड्रिंक्स देत होते. तिला एकदम सगळा उलगडा झाला. कनेटिकटमधे आल्यापासून गेले ३ वर्षे त्यांना हा अनुभव न चुकता आला होता. जुलैच्या मध्यात एकदा तरी कुठे कुठे अती उष्णतेने पावर ग्रीड तुटायची नाहीतर वाकायची आणि अर्धे कनेटिकट सुट्टी साजरी करायचे. विंदु काम करत होती त्या बँकेत भले थोरले जनरेटर्स होते पण त्यांचा ट्रेडिंग फ्लोअरही तेव्हढाच मोठा असल्याने सगळे स्रोत तिकडे वळवण्यात यायचे. जवळ-जवळ सगळे संगणक, वातानुकूलित यंत्रणा बंद करण्यात येत. आजही तसेच झाले होते. बारा  न पंधरा  मजले चढून जायला कुणीच तयार नसे म्हणून एलेवेटर्स चालू ठेवत. सध्याच्या परिस्थितीत तर दोन मजले चढून जायला पण विंदु नाही म्हणाली असती.

डेस्कपाशी जाऊन तिने पिशवी खाली ठेवली. एवीतेवी वीज नाहीये तर बर्‍याच दिवसांपासून थकलेली काही ऑफलाइन कामे हातावेगळी करावी ह्या विचाराने ती टेबलवरच्या प्रिन्टसची चळत चाळायला लागली. तेवढ्यात कॅफेटेरिआतर्फे आइस क्रीम घेऊन कोणीतरी आले. आता वायाच जाणार त्यापेक्षा वाटून टाका असा त्यांचा विचार. तिने औपचारिकता म्हणून एक छोटा कप ट्रेमधुन उचलला. पहिला घास घेतला तो पोटात जोरात खळबळ झाली. गोड हसत तिने पोटावर हात ठेवला नी स्वतःशीच म्हणाली "आवडतेय वाटते आइस क्रीम !!!".

एक-दोन मीटिंग, काही थकलेली कामे उरकल्यावर तिला कंटाळा यायला लागला. उकाड्याने नको नको झाले होते. बाहेर जायची पण सोय नव्हती. ऊनच इतके होते. गप्पा ठोकायला कोणी आहे का म्हणून तिने प्रीतीला फोन लावला तर ती देखील घरी निघालेली. तिच्या टीममधलेही बरेच जण घरी जायच्या तयारीत होते. इतकी छान सुट्टी कोण वाया घालवणार. काही तरी चाळा म्हणून ती खुर्ची फिरवून खिडकीतनं बाहेर पाहायला लागली. समोर अस्ताव्यस्त पसरलेला लॉग आयर्लंड साउंड दिसत होता. लांब क्षितिजावर बोटींचे बारीक पांढरे ठिपके दिसत होते. आपणही बीचवर जाऊन पाण्यात खेळावं असं तिला वाटलं.

"वृंदाssss" अचानक आलेल्या आजीच्या प्रेमळ हाकेने विंदुने दचकून मागे वळून बघितले. तिला कळेना आज आजीची का आठवण येते आहे ? आजीला जाऊन आता किती वर्षे झाली. एव्हढ्यात काही विषयही नाही आजीचा. तिला वाटले, सकाळपासून दोनदा अपघात होता होता वाचले, कदाचित म्हणूनच असा आजीचा भास. ती लहान असताना कुठे धडपडायच्या आधीच आजीचा आवाज असे, "वृंदा, पडशील बाळ....जरा जपून". आज पण आजी काही सांगते आहे का ? अस्वस्थ होऊन तिने सिधला फोन लावला.

"बोला राणी सरकार, काय सेवा करू ?" त्याचा प्रसन्न आणि प्रेमळ आवाज ऐकून विंदुला जरा बरे वाटले. त्याला मनातले सांगायला तिने तोंड उघडले खरे पण तिला एकदम वाटले संध्याकाळीच सांगावे त्याला. नाही तर तो एकदम पॅनिक होईल आणि सगळा कार्यक्रम रद्द करून घरात डांबून ठेवेल.

"सिध, संध्याकाळी तुझी गाडी पुढे काढून ठेव. आणि आता नीघ ऑफिसमधून. आपण जोन्स बीच वर जात आहोत"

"जशी आपली इच्छा. पण मला निघायला अर्धा तास तरी लागेल. एक काम संपवायचे आहे."

"चालेल. तसे पण बीच तुझ्या ऑफिसपासून जवळ आहे. मला यायला तेवढा वेळ लागेलच. मी कुठे घ्यायला येऊ ?"

"विंदु तू आता हाय वे वर गाडी चालवत येणार ? मीच येऊ का घरी ? आपण नॉरवॉक बीचवर जाऊ." घातलाच त्याने खोडा.

"नssssको, त्या डबक्यात डुंबायला तुझ्या एखाद्या सुंदर गर्ल फ़्रेंडला घेऊन जा" ह्यावर सिधु मोठ्याने हसला. मग बोलता बोलताच त्याने जाण्या-येण्याच्या दिशा तिला मेल केल्या. तिचा कंप्युटर बंद आहे हे दोघांच्याही लक्षात आले नाही. मधल्या एका स्टेशनवर तिने त्याला घ्यायला जावे आणि तिथून मग दोघांनी मिळून बीचवर जावे असे ठरले.

त्याच्याशी बोलून झाले तसे विंदुने भराभर आपली पिशवी आवरली. दिवसभर खायला म्हणून फळे-बिळे आणले होते. ते सगळे आवरून ती निघणार तोच टॉमचे टक्कल आपल्या दिशेने येत असल्याचे तिला दिसले. जणू बघितलेच नाही अशा आविर्भावात तिने दाराकडे चालायला सुरुवात केली. पण एखाद्या पेंग्विनसारख्या दुडक्या चालणार्‍या विंदुला टॉमने गाठलेच.

"हेssss वँडु काय विशेष ?" त्याने विंदुचे असे विडंबन केलेले एक हजार वेळा ऐकूनही आता पुन्हा तिला दाताखाली खडा आल्यासारखे झाले.

आंबट तोंडाने ती म्हणाली, "मला तुझा फार कंटाळा आलाय म्हणून कुठे तरी लांब पळतेय" त्यावर नुसतेच हसून त्याने खिडकीतून दिसणार्‍या रांगत जाणार्‍या महामार्गाकडे बोट दाखविले. तिनेपण नुसते हसून रस्त्याच्या विरुद्ध दिशेला बोट दाखविले. दक्षिणे दिशेने रहदारी छान सुरळीत जात होती.

"हो तू तिकडे राहतेस नाही का. बरं तुला वेळ असेल तर यूजर्स कडून आलेले नवीन फॉर्म्स बघूयात का ?"

आता हा पण आला का खोडा घालायला, विंदु चडफडली. "त्यापेक्षा तू तुझा mid year performance review का नाही करत मार्कला गाठून. तसेही त्याच्या सर्व शिव्या एव्हाना संपल्या असतील"

आणि टॉम काय म्हणतोय याची वाट न बघता ती वळून चालायलाही लागली. तीच्या बोलण्याने अवाक झालेला टॉम ती गेली त्या दिशेने नुसताच बघत बसला.

 विंदुने तिची शानदार गाडी पार्किंग गरजांबाहेर काढली तेव्हा अनेक लोकांच्या नजरा वळल्या, काही कौतुकाच्या काही असूयेचा. कंपनीतल्या भारतीय लोकांमध्ये तर चर्चेचा विषय होती तिची गाडी. कोपर्‍यावरच सिग्नलची वाट बघत असताना तिला रस्ता पार करत असलेला जेसन दिसला. विंदुकडे नजर जाताच त्याने व्याकुळ हावभाव करत हृदयावर हात ठेवला. हे सगळे तिच्या गाडीसाठी होते हे दोघांनाही पक्के ठाऊक होते. "नाटकी...." त्याच्याकडे हसून बघताना विंदु स्वत:शीच म्हणाली. आता अजून एक सिग्नल की हाय वे लागेल. गर्दी झाली नसेल तर बरे असा विचार करत करतच तिने रँपवर गाडी घातली आणि एकदम आपल्याकडे प्रिंटस् नसल्याचे तीच्या लक्षात आले. सिधला फोन लावेपर्यंत रँपवर वळसा घेऊन ती महामार्गावर आली सुद्धा. एकदम लखक्कन डोळ्यांवर ऊन आले. एका हातात फोन आणि दुसर्‍या हातात गॉगल व त्याच हाताने लेफ्ट इंडिकेटर देऊन तिने गाडी डावीकडे घेतली. तेवढ्यात सिधचा आवाज ऐकू आला. "सिध, ऐक मला प्रिंटस् घ्यायला झालेच नाही...पावर नाहीये ना...यार हा जेसन ना फार पकवू आहे...आता कशाला फोन करतोय" पुढचे वाक्य जेसनचा फोन येतोय हे बघून होते. सिधुला तीच्या अशा भुलभुलैया बोलण्याची सवय होती. "ठीक आहे, मी येताना..." पण त्याचे बोलणे पूर्ण झालेच नाही.

सगळ्या गडबडीत आपल्या मागे एखादी गाडी आहे का हे तिने बघितलेच नाही. पण डाव्या बाजूच्या आरशात अगदी जवळ काही तरी आल्याचे दिसले आणि तिला एकदम जाणवले की अंमळ उशीरच झाला ब्लाइंड स्पॉट बघायला. पलीकडच्या लेनमधून एक ट्रक तोवर त्याच लेनवर पोचला होता ज्यावर विंदु होती. काय होते आहे हे कळायच्या आत विंदुच्या गाडीला ट्रकची जोरदार धडक बसली. एवढ्या अवाढव्य ट्रकपुढे काडेपेटीसारखी दिसणारी तिची छोटीशी गाडी त्या धडकेने स्वत:भोवती दोन गिरक्या घेऊन मधली संरक्षक भिंत फोडून रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला जाऊन उभी राहिली. चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रकही रस्त्यात आडवा उभा राहिला. रस्त्यावर नुसता गोंधळ माजला. तुटलेल्या भिंतीचे अवशेष, रस्त्यात आडवा झालेला ट्रक आणि विंदुच्या लाडक्या गाडीच्या काचा. रस्त्याच्या दोन्ही बाजूनं गाड्यांचा समुद्र.

"सिध, I am sorry..." व्याकुळ होत जाणार्‍या आवाजात ती अचानक असे का म्हणाली हे क्षणभर त्याला कळलेच नाही. पण त्यापाठोपाठ तिच्या किंकाळ्या, चित्रविचित्र आवाज आणि मध्येच बंद पडलेला फोन ह्या सगळ्यांनी पलीकडे काय घडले असावे ह्याची जाणीव शिरशीरत मेंदूपर्यंत पोचली. पण आपण काय ऐकतोय, काय झाले असावे ह्यावर विश्वासच ठेवायला मन राजी होईना. विंदुच्या गाडीला अपघात ? छे कसे शक्य आहे ते. तिचं गाडी चालवणं किती वेगळं आहे, सुसाट तरी सावध. स्वत:वरचा आणि गाडीवरचा ताबा सोडत नाही कधी. हाय वे वरून जाते तर सरळ, एका रेषेत..कधी लेन सोडून जाणे तर तिला माहितीच नाही. गाडी चालवायला लागल्यापासून एकदाही कधी किरकोळ अपघातातही सापडली नाही ती. कधी वेळ आलीच तर अतिशय संयमाने ती सर्व सांभाळून घेणार. "तू ना उगी पॅनिक होतोस सिध" तो खाडकन भानावर आला. अशी हाय खाऊन चालणार नव्हते. त्याने तिला फोन लावायचा प्रयत्न केला...

...हातात घट्ट धरून ठेवलेला फोन किणकिणतोय हे लक्षात आल्यावर तिने त्या अवस्थेतही हात उंच धरला. हातातून फोन घेणारी व्यक्ती पोलीस आहे की देवदूत हे नीटसे उमजण्याआधीच तिचे डोळे मिटले. गाडी गिरक्या घेत मधल्या भितीला धडकली तेव्हा डाव्या बाजूचे दार चेपले गेले होते. खिडकीच्या काचा आणि दाराचा पत्रा आत घुसून तिचा डावा हात संपूर्ण खांद्यापासून सोलवटून निघाला होता. त्यांतून रक्स्त्राव बराच होत होता. दोन्ही गुडघ्यांना मुका मार बराच लागला होता. आणि एअर बॅगच्या दाबाने पोट दाबले जाऊन पोटातून प्रचंड कळा यायला लागल्या होत्या. विंदुला तातडीने जवळच्याच हॉस्पिटलामध्ये नेण्यात आले.

सिद्धार्थाने दोन-तीन वेळा फोन लावला पण पलीकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्याचा धीर खचला. कसाबसा तो बॉसच्या- वेंकटच्या- डेस्कपाशी पोचला आणि त्याला काय झाले ते सांगितले. वेंकटनेच मग पोलिसांचा हेल्पलाइन, ९११ ला फोन करून काही माहिती मिळते का बघितले आणि सिधला घेऊन तो हॉस्पिटलला पोचला. डॉक्टरांनी विंदुला early contractions चालू झाल्याचे सांगितले. बाळाचा खाली जाणारा रक्तदाब बघता त्यांनी शस्त्रक्रिया करायचा निर्णय घेतला. ह्या सगळ्यात विंदुच्या व बाळाच्या जीवाला धोका तर होताच. सिध पुन्हा पुन्हा विंदुला काही होऊ देऊ नका असे डॉक्टरांना बजावत होता. एकदाची शस्त्रक्रिया पार पडली. विंदु आणि बाळ दोन्ही सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सहा महिन्यांच्या अपुर्‍या कालावधीत जन्माला आले असल्याने बाळाला इन्क्युबेटरमधे ठेवण्यात आले.

विंदुची परिस्थिती हळूहळू सुधारत होती. ती अधून मधून डोळे उघडे पण त्यात ओळख काहीच नसे. सिध दिवस दिवस तीच्या शेजारी बसून राही. तिला बाळाच्या गोष्टी ऐकवे. पण तिच्याकडून काहीच प्रतिसाद येत नसे. सिध निराश होई. आणि त्यातच एक दिवस डॉक्टरांनी त्याला ती धक्कादायक बातमी सांगितली. झाल्या प्रकाराचा विंदुला जबरदस्त धक्का बसला होता. कदाचित आपल्या चुकीमुळे आपण बाळ गमावू असे तीच्या मनाने घेतले होते. शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त झाल्यावरही कुठलाही अवयव हालवणे, कुठलीही क्रिया करणे- साधे उठून बसणेही ती स्वतःहून करत नव्हती. डोळे उघडे असूनही ते कुणालाही बघत नव्हते. डॉक्टरांनी तीच्या अनेक टेस्ट्स केल्या. आजूबाजूला काय घडते आहे ह्याची तिचा मेंदू नोंद घेत होता, ते त्यांना EEG Monitor दिसत होते. परंतु विंदु किंवा तिचा मेंदू कशालाच प्रतिसाद देत नव्हता. बहुतेक वेळ ती डोळे मिटून खोलीत पाडून असे. सिध तिला खुर्चीत बसवून फिरायला नेत असे तेवढा वेळ डोळे उघडे असत तेवढेच काय ती जिवंत असल्याची खूण.

असे जवळ जवळ दोन अडीच महिने गेल्यावर डॉक्टरांनी तिला घरी जाण्यास परवानगी दिली. त्याच्याकडूनही करण्यासारखे काही उरले नव्हते. बाळाची तब्येतही आता बरी होती. बाळ दाखवल्यावर तरी काही तरी घडेल अशी आशा फोल ठरली होती. तरी देखील विंदुला भावणार्‍या गोष्टी करत राहाव्या, तिला आवडणारी ठिकाणे दाखवावीत, तिच्याशी बोलत राहावे अशा काही गोष्टी डॉक्टरांनी आवर्जून सांगितल्या.

हे सगळे एकट्याने झेपण्यासारखे नव्हते म्हणून सिधने विंदु आणि बाळाला घेऊन भारतात जायचा निर्णय घेतला. तिथे तिचे आणि त्याचे आई-वडील मदतीला होते. सर्वांना सोयीचे होईल असे ओळखीच्याच एका डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये तिला ठेवावे असे ठरले. अधून मधून सिधचे तिला ने सिद्धिविनायकाला, ने तीच्या आवडत्या आमराईत, ने त्यांच्या जुन्या घरी असे चालू असे. ह्या सगळ्यात त्याचे बाळाकडे दुर्लक्षच होत होते. बाळाची सगळी जबाबदारी विंदुच्या आईवर आणि तिच्या बहिणीवर सोपवून तो विन्दुची शुश्रूषा करण्यात मग्न असे. तसे तिथे डॉक्टर्स, नर्सेस होत्या पण तरी सिध दिवस-दिवस तिच्या उशाशी बसून राही. सर्वांनी त्याला पुष्कळ समजावले पण व्यर्थ. अशी तीन वर्षे गेली. ह्या तीन वर्षात जणू तीन तपे पार व्हावी इतका काळ धीमे चालला होता. विंदुची अवस्था आहे तीच होती. त्यांचा मल्हार तीन वर्षांचा झाला होता- तीन वर्षाचा गोजिरा गोंडस मल्हार, अगदी विंदुचा तोंडवळा घेऊन जन्माला आलेला मल्हार, विंदुचा आवडता राग मल्हार. मुलगा आहे कळल्यावर विंदुने दुसर्‍या कुठल्या नावाचा विचारच नव्हता केला. सिधला, तीच्या घरातल्या कुणालाच हे नाव आवडले नव्हते. सिध तर म्हणे, "तुझ्या पोटातनं घोड्यावर बसून आणि हातात तलवार घेऊनच येईल बघ तुझा मल्हारबा." पुढे हे सगळे रामायण झाल्यावर अर्थातच त्याने बाळाचे नाव मल्हार ठेवले.

सिधचा दिनक्रम आताशा थोडा बदलला होता. मल्हारच्या बाललीलांमध्ये त्याला आनंद वाटू लागला होता. मल्हारासाठी काही-बाही खाऊ आणणे, त्याला बागेत नेणे असे सुरू झाले होते. एक-दोनदा मल्हाराला घेऊन तो विंदुच्या भेटीसही गेला. पण छोट्या मल्हाराला काहीच बोध झाला नाही आणि त्याने तिथल्या मॉनिटरवर कार्टून का दिसत नाही म्हणून हट्ट धरला. शेवटी सिधने तो नाद सोडला. विंदुला तर कशा कशाची जाणीव नव्हती. असे दिवस चालले होते.

आज विंदुचा वाढदिवस. परिचारिकेने सकाळीच सिधने आणलेला नवा गाऊन विंदुवर चढवला होता. एरवी निचेष्ट पाडून राहणार्‍या विंदुच्या चेहर्‍यावर आज थोडे हसू उमलले होते. सकाळी तिच्या तपासणीसाठी आलेले डॉक्टरसुद्धा मॉनिटरवरील आलेख बघून खूश झाले होते. सिधने दरवर्षी प्रमाणे सर्वांना निमंत्रणे धाडून बोलवून घेतले होते. विंदुचे आई-बाबा, बहीण, तिचा नवरा, मुलं, मल्हार सगळीच जमली होती. आज सकाळांपासूनच विंदुच्या चेहेर्‍यावर थोडी जाग दिसत होती. तीच्या आईने कुठली-कुठली स्त्रोत्रे म्हंटली, अंगारा लावला. मग भाचरांनी आणि मल्हाराने केक कापला. लहानग्यांच्या कौतुकात सगळे असतानाच हलके हलके हसत विंदुने डोळे उघडले. सिध अनिमिष नेत्रांनी तिच्याकडे बघत होता. ज्या दिवसाची, ज्या क्षणाची चातकासारखी वाट बघितली तो असा अनपेक्षित समोरा आल्यावर त्याच्या हाता-पायातले बळच सरले. तो नुसताच तोंडाचा ऑ वासून तिच्याकडे बघत बसला. विंदुची नजर हळूहळू तिथे बसलेल्या प्रत्येकावर फिरू लागली.

आई-बाबा तरण्याताठ्या मुलीचे हे असे झालेले उघड्या डोळ्यांनी बघावे लागल्यामुळे अधिकच म्हातारे दिसत होते. आई तर पार खंगली होती. तरी आपले लटलटत्या हातांनी लाडक्या मल्हारबासाठी स्वेटर विणणे चालूच होते. कधी काळी विंदुच्या ऑर्कुटची पाने सजली होती आईच्या हस्तकलेने. संजुच्या डोक्यावर अक्षता पाडून अवघे दोन महिने झाले होते. त्याची लाजरी-साजरी नववधू उगी चुळबुळत नवर्‍याशेजारी उभी होती. मोठी बहीण स्वतःच्या संसाराबरोबर विंदुचाही अर्धवट पडलेल्या संसाराचा गाडा ओढून थकली वाटत होती. मल्हारबा आजोबांच्या खोड्या काढत त्यांच्या मांडीत बसला होता. कोणाचा बरे हा मुलगा ? अगदी त्या आजोबांसारखाच दिसतोय. बाजूलाच दोन चिली-पिल्ली खेळत होती. ही सगळी आली कुठून इथे ?

आणि हे कोण पुढारी बसलेत इथे ? पांढरा स्वच्छ खादीचा कुर्ता, कडक इस्त्री केलेला, दवाखान्यातल्या खोलीतही डोळ्यांवर काळा चष्मा आणि भाळी शिवगंध. इतक्यात एखाद्या मंत्र्याचा PA शोभेल अशा एका माणसाने मोठ्या अदबीने त्यांच्या हातात फोन आणून दिला. अतिशय हळू आवाजात ते काही कुजबुजले. उत्तरादाखल पलीकडची व्यक्ती त्यांना कौतुकास्पद काही म्हणाली असावी. कारण अशावेळी हसायचे तसे ते ठेवणीतले मिशीत हसले. एकदम ती ओळख पटून विंदु क्षीण पुटपुटली, "दीक्षित.." . आणि तेवढे श्रमही सहन न झाल्याने तिने थकून डोळे मिटले. डोळ्याची पापणीही न लवता तिच्या चेहर्‍याकडे एकटक बघणारा सिध त्यासरशी ताडकन उठून उभा राहिला आणि त्याने तिच्या बेडशेजारी असलेले emergency बटण जोराजोरात दाबायला सुरुवात केली. एकीकडे त्याने विंदुच्या चेहर्‍यावर हलके हलके थापटायला सुरुवात केली. एकीकडे व्याकुळ आवाजात त्याचे विंदुला हाका मारणे चालू होते, "विंदु ऊठ ना गं...किती वाट पाहिली तुझी...ऊठ ना गं...डोळे उघड विंदु...एकदा बघ गं माझ्याकडे..." विंदुच्या डोक्यात मात्र धाड धाड आवाज होत होते. सिधच्या कर्कश हाका कानांवर आदळत होत्या. तिने एकदम डोळे उघडले.

सिध मोठ्याने हाका मारत तिच्यासमोर उभा होता. त्याचा काळजीने ग्रासलेला चेहरा बघून तिने विचारले, "काय झाले ?" त्यावर तो चिडून म्हणाला,"काय झाले मला काय विचारतेस ? दुपारची निघालेलीस ऑफिसमधून. मी कितीवेळा फोन केला. शेवटी लवकर निघून घरी आलो तर दार उघडेनास. माझ्याकडच्या किल्लीने घरात यावं म्हणून मागच्या दारी आलो तर तू पुस्तक वाचता वाचता इथे बॅकयार्ड मध्ये झोपा काढतेयस. किती घाबरलो होतो माहिती आहे का ?" विंदुला काही बोधच होईना कशाचा. ती नुसतीच एकदा सिधकडे, एकदा आजूबाजूला बघत बसली. "विंदुssssss" सिधच्या असह्य हाकेने एकदम भानावर येत ती म्हणाली,"असे रे काय करतोस ? क्षणभर तर डोळा लागला माझा !!"
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी