Monday, February 4, 2013

बबूची गोष्ट

बबू त्या दिवशी खूप आनंदात होती. तिचे आजोबा तिला छ्बूच्या घरी घेऊन जाणार होते. छबू आणि बबूची एकदम घट्ट मैत्री होती. त्या दोघी एकाच वर्गात होत्या. पण बबू आणि छबू पहिलीतून दुसरीत जाणार होत्या त्या वर्षी छबूची आई छबूला घेऊन तिच्या मामाच्या घरी राहायला गेली. छबू मग नव्या शाळेत जायला लागली. छबू गेली म्हणून बबूला खूप वाईट वाटलं. एकदा जिन्याखाली बसून एकटीने रडताना तिला आजोबांनी बघितलं. त्या दिवशी पासून ते जेव्हा नदीपलीकडल्या छबूच्या मामाच्या गावी जात तेव्हा बबूला सोबत घेऊन जात. तिच्या शाळेला सुट्टी असेल तरच. पण ते नेहमीच बबूला शाळा असेल अशा दिवशी जात आणि तिला त्यांच्या बरोबर जायला मिळत नसे. त्या दिवशी बबूच्या शाळेला सुट्टी होती आणि म्हणूनच बबू खूप आनंदात होती.

बबू सकाळी लवकर उठली. तिने दात घासले, शहाण्या मुलीसारखं पटकन दूध प्यायलं, आजीने बनवलेला उपमा चटचट संपवला, अंघोळ केली, छबूचा आवडता फ्रॉक घातला, केस विंचरले, तोंडाला पावडर फासली आणि आजोबा तयार व्हायची वाट बघत घराबाहेरच्या ओट्यावर बसून राहिली. समोरच्या घरात राहाणार्‍या मांजरीची तीन पिलं एकमेकांच्या खोड्या करत अंगणात बागडत होती. पण बबू पिलांशी खेळायला गेली नाही. तेवढ्या वेळात आजोबा तयार झाले आणि बोटीवर निघून गेले तर छबूकडे जायला मिळणार नाही अशी भिती तिला वाटत होती. तिचं सगळं लक्ष आजोबांच्या जाड तळ असलेल्या चपलांच्या  खरड-खरड आवाजाकडे लागलं होतं. तो आवाज आला आणि टुणकन उडी मारून  उभी राहत बबू आजोबांचा हात धरून चालू लागली.

आजोबांना जवळ-जवळ खेचतच तिने डेकपर्यंत आणलं. आजोबा तिकिट काढायला गेले तेवढ्या वेळात तिने छबूसाठी डेकपासल्या गुलमोहरा खाली पडलेल्या सड्यातून राजे आणि राण्या गोळा केले. आजोबा तिकिट काढून परत आले तेव्हा हातात फुलं नाचवत ती बोटीत एकदम पुढच्या बाजूस तिच्या आवडत्या जागेवर जाऊन बसली. तिथे बसलं म्हणजे बोट किनार्‍याला लागताना टेकडीवरचं छबुच्या मामाचं घर मोठं मोठं होताना दिसे. ते बघायला तिला भारी मजा वाटे. वाटेतच थेंब थेंब पाऊस पडायला लागला. बबूने आकाशाकडे आ वासला आणि पाण्याचे थेंब तोंडात झेलले. नदी पार करून बोट पलीकडच्या डेकला लागली तेव्हा खाली उतरायचं म्हणून बबू उभी राहिली आणि अचानक जोरात खूप मोठा पाऊस पडायला लागला. आजोबांनी त्यांची मोठी छत्री उघडून तिच्या डोक्यावर धरेपर्यंत बबू चिंब भिजली. तिच्या हातातल्या राजे-राण्या पण चिंब भिजल्या.

आजोबा आणि बबू छबूच्या घरी पोचले तेव्हा छबूची आई आणि मामी आत ओट्यापाशी स्वयंपाक करत होत्या. छबू  आईने दिलेल्या कणकेच्या गोळ्यांशी खेळत होती. बबूला बघताच ती खेळ सोडून दाराकडे धावली. बबूने हातातला लाल-पिवळा चिखल तिच्या हातात दिला. बबूला अशी भिजलेली पाहताच छबूची आई तरातरा पुढे आली आणि पदरानेच तिनं बबूचं डोकं खसाखसा पुसलं. तिला अशी भिजू दिल्याबद्दल आजोबांना रांगे भरलं. आजोबांना कुणी रागावतं हे बबूला पहिल्यांदाच कळत होतं. तिला त्याची खूप मजा वाटली. छबूला पण. दोघी एकमेकींकडे बघून खुदकन हसल्या. छबुच्या आईने बबूला न्हाणीघरात नेऊन तिचे हात-पाय धुऊन दिले, अंग पुसलं आणि छबूचा एक छान फ्रॉक घालायला दिला. बबू आणि छबू दोघी जणी मग हरणाच्या पाडसांची जोडी असल्यासारख्या उड्या मारत मागच्या अंगणात पसार झाल्या. छबूच्या आईने केलेला चहा घेऊन आजोबा त्यांची कामं करायला गावात गेले.

छबूच्या घरी वेळ कसा गेला त्यांना कळलंच नाही. त्या दोघी सापशिडी खेळल्या. लपाछपी खेळल्या. शिवणापाणी खेळल्या. छबूच्या टॉमी कुत्र्याला त्यांनी घराभोवती चक्कर मारून आणली. फुलपाखरांच्या मागे बागेत धावल्या. पाणघोडे पकडले. छबूच्या मामीने त्यांच्यासाठी बनवलेला खाऊ खाल्ला. छबूच्या आईला आणि मामीला ऐकू जाणार नाहीत अशा खुसुखुसू गप्पा मारल्या. फिदीफिदी हसल्या. छबूच्या आईने साता समुद्रापार राहाणर्‍या राजकन्येच्या गोष्टी सांगितल्या त्या त्यांनी डोळे विस्फारून ऐकल्या. पण तरी त्यांना अजून खूप खेळायचं होतं. आणखी खूप गप्पा मारायच्या होत्या.

आजोबा परत घ्यायला गेले तेव्हा जरा नाखुशीनेच बबू घरी जायला तयार झाली. छबूच्या  आईने दिलेला फ्रॉक बदलून तिने स्वतःचा फ्रॉक घातला. आजोबा छबूच्या आईचा निरोप घेत असताना छबूला टाटा करून ती फाटकाकडे चालायला लागली. तेवढ्यात छबूच्या आईने तिला हाक मारली. तिने मागे वळून बघितले तेव्हा तिला छबूच्या आईच्या हातात एक लालचुटुक सफरचंदी रंगाची, नाजूक पांढरी फुलं असलेली, छोट्याशा मुठीची छत्री दिसली. बबू धावतच परत गेली. तिला ती छत्री फारच हवीशी वाटत होती. पण कुणाकडून काही वस्तू घ्यायची नाही अशी आजोबांची सक्त ताकीद असल्याने ती लकाकत्या डोळ्यांनी छत्रीकडे नुसतीच बघत राहिली. आजोबांनीच तिच्या मनातला गोंधळ ओळखून छबूच्या आईकडून छत्री घेतली आणि तिच्या हातात दिली. बबूला खूप आनंद झाला. तिने छबूच्या आईला घट्ट मिठी मारली.

परत जाताना पाऊस पडत नव्हता. आभाळ भरून आल्याने ऊन सुद्धा नव्हते. तरी बबू डोक्यावर छत्री धरून ऐटीत चालत होती. लालचुटुक सफरचंदी रंगाची ती छत्री तिला खूपच आवडली होती. एवढी सुंदर छत्री आपली आहे ह्याचं तिला अप्रूप वाटत होतं आणि अनावर हसू सुद्धा येत होतं. छत्री घेऊन चालणार्‍या स्वतःच्या छबीची मनात कल्पना करत तिची स्वारी रस्त्याने चालली होती. आईला पण छत्री खूप आवडेल असं तिला वाटलं. आईची आठवण येताच तिची छोटी पावलं पटापट पडू लागली. एका हातात छत्री आणि दुसर्‍या हातात आजोबांचा हात धरून तिने जवळ-जवळ खेचतच त्यांना डेकपर्यंत आणलं. आजोबा तिकिट काढत असताना छत्री डोक्यावर धरून डेकपासल्या पत्र्याच्या शेडमध्ये ती उभी राहिली. आजोबा तिकिट काढून परत आले तेव्हा हातात  छत्री नाचवत ती बोटीत एकदम पुढच्या बाजूस तिच्या आवडत्या जागेवर जाऊन बसली. तिथे बसलं म्हणजे बोट किनार्‍याला लागताना कधी कधी काठावर उभी असलेली आई दिसे. आईला अशी तिची वाट बघत उभी असलेली पाहायला तिला खूप आवडे. आज तर आईला छत्री दाखवायची होती.

बोट किनार्‍याला लागली पण तिला आई दिसली नाही. थोडी खट्टू होत आजोबांचं बोट धरून बबू खाली उतरली. गुलमोहोराखाली सगळा रहाडा  झाला होता. आजोबांनी एका खाली झुकलेल्या फांदीवरून बबूला राजे आणि राण्या काढून दिल्या. घराकडे चालायला लागल्यावर आईला छत्री दाखवायची ह्या विचाराने बबूच्या मनाने पुन्हा भरारी घेतली. छत्री डोक्यावर नाचवत घोड्यासारखी दौडत बबू घराकडे निघाली. घरापाशी पोचली तेव्हा बबूला धाप लागली होती. हातातली फुलं रस्त्यात कुठे तरी पडून गेली होती. समोरच्या घराच्या अंगणात मांजरीची पिलं खेळताना दिसली. पण बबू त्यांच्याशी खेळायला गेली नाही. ओट्यावर वाती वळत बसलेल्या आजीला ओलांडून बबू धावतच घरात गेली. आणि ती लालचुटुक सफरचंदी रंगाची, सुंदर पांढरी फुलं असलेली, छोट्याशा मुठीची छत्री तिने जरा सुद्धा ऊन-पाऊस लागणार नाही अशी आईच्या हार घातलेल्या फोटोभोवती ठेवली!

14 टिप्पणी(ण्या):

Yashwant Palkar said...

:(
manala chatka lavun gel.... :(

Anagha said...

सुंदर झाली आहे गोष्ट ! शेवटच्या वाक्याने खरोखर चटका लावला.

तृप्ती said...

Thanks Anagha!

Yashwant, Welcome to saangatyeaika :)

Avani1405 said...

mastach shindibaay.. :)

Preeti said...

Sahich ahe Goshta..shevatacha vakya kharach manat ghalmel karnara ahe...

तृप्ती said...

Thanks Avani :) Thanks Preeti :)

Priti said...

Goshta mast lihili aahe..

केदार said...

शेवट छान आहे. एकदम भरून आलं...

तृप्ती said...

Thanks Priti and Kedar :)

Anonymous said...

तॄप्ती, क्या बात है....
मला नं नेहेमी प्रश्न पडतो आपण अश्या सगळ्या ’साहित्यिक’ ;) गप्पा लोणीत कधीच का नाही मारल्या ? :)
शेवट खरच वेगळा आणि मनाचा ठाव घेणारा आहे...

तृप्ती said...

तन्वी, :) तेव्हा इतर अनेक इंटरेस्टिंग टॉपिक्स असल्याने असं झालं असेल. आणि माझी जी काही उणीपुरी उर्मी होती लिहीण्याची ती मी सगळी C.R. च्या नाकावर चारोळ्या लिहीण्यात खर्च केली ;)

On a serious note, खरंच तेव्हा कुणांत हे काही गूण होते कळलंच नाही. मी थोडं थोडं लिहायचे तेव्हा. पण संकोचाने कधी कुणाला सांगितलं नाही :)

Yashodhan said...
This comment has been removed by the author.
Rohi said...

खूप खूप नीरगास आनी सुंदर...

तृप्ती said...

Thx Rohi!

Post a Comment

लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी