'QSQT' रिलीज झाला तेव्हा मी नाबालिग होते त्यामुळे अर्थातच चित्रपट बघायची परवानगी मिळाली नाही. तेव्हा कॉलनीतल्या एक काकू चित्रपट बघून आल्यावर आमीर खान 'लव्ह अॅट फर्स्ट साईट' मटेरियल आहे असं महिलामंडळास सांगत असताना मी घरचा अभ्यास करता-करता चुकून(च) ऐकलं होतं. 'लव्ह अॅट फर्स्ट साईट' या संज्ञेशी ती पहिली चोरटी भेट. असो, नंतर अनेक वर्षांनी चित्रपट दूरदर्शनवर दाखवणार होते. तोपर्यंत मी अशा 'भूतो न भविष्यती' संधीचा फायदा घ्यायचा असेल तर फिजिक्ससह इतर सर्व लेक्चर्स 'बंक' मारून घरी जाणे आवश्यक आहे हा निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घेण्याइतकी बालिग झाले होते. खरं तर वर्गातल्या सगळ्याच मुलींनी लेक्चर्स बुडवायची ठरवलं होतं. दिवसाच्या सुरुवातीची काही लेक्चर्स उरकून मधली सुट्टी झाल्यावर आम्ही बोचकी आवरली आणि गुमान पार्किंगचा रस्ता धरला. कशी कुणास ठाऊक पण मी सगळ्या गँगच्या पुढे चालत होते (उपजत नेतृत्वगुण हो, दुसरं काय!). आमच्या फिजिक्सच्या शिंदे सरांनी नेमका तो नजारा बघितला. सर भयंकर कडक. त्यात त्यांच्या हातात प्रॅक्टिकलचे मार्क्स असायचे. त्यांचा तास पण बुडणारच होता. ते तास घ्यायला वर्गावर गेले तेव्हा वर्गात बसून राहिलेल्यांनी सरांकडे पद्धतशीर चुगली केली. शिंदे सरांच्या गुड बुक्समध्ये जाण्याची संधी त्यांनी तरी का सोडावी? सरांनी आम्हाला बघितलं तर होतंच आता सगळी गँग कुठे गेली हे सुद्धा त्यांना समजलं. आमचं कॉलेज रयत शिक्षण संस्थेचं. बरेचसे शिक्षक सातारा भागातले होते. शिंदे सर पण सातार्याचेच. हुशार होते, विषय चांगला शिकवायचे त्यामुळे आमच्या वर्गाला शिंदे सर फिजिक्स शिकवणार समजल्यावर आनंद आणि भिती दोन्ही वाटलेलं कारण सर कडक होते खूप, उदाहरणं सोडवण्यात एखादी स्टेप गाळली-चुकली की उभं करून सगळ्या वर्गासमोर टाकून बोलायचे, मुलांना तर खूपच बोलायचे, मूड असेल तर मिश्किल बोलून सगळ्या वर्गाला हसवायचे, चाचणी पेपर चांगला सोडवला की पेपर हातात देताना नुसतं 'हं!' एवढंच म्हणायचे. कौतुकाची परिसीमा म्हणजे टॉपरचा पेपर गठ्ठ्यात सगळ्यात वर ठेवून आणायचे आणि 'टॉपरला पैकीच्या पैकी मार्क्स आहेत' असं सांगून पेपर बाजूला ठेवायचे. मग सगळ्यात शेवटी त्या टॉपरला पेपर मिळायचा, वर्गाला कळायचं टॉपर कोण आहे. एकुणात शिंदे सरांची बर्यापैकी दहशत वाटायची. त्यांनी आम्हाला पळून जाताना बघितलं आहे आणि त्यामागचं कारण त्यांना समजलं आहे हे जर आधी कळतं तर आम्ही कुणीच उरलेलं वर्षभर त्यांच्यासमोर उभं राहायची हिंमत केली नसती. अज्ञानातलं सुख फार काळ उपभोगायला मिळालं नाही. दुसर्या दिवशी सर वर्गात आले तेच भयंकर चिडलेली, खुनशी वाटेल अशी नजर घेऊन. हजेरी घेतली, मला नीट आठवत असेल तर हजेरी घेताना मुलींची नावं आली की 'आलात का?' असं विचारत जळजळीत नजरेचा प्रसाद वाटत होते. हजेरी झाल्यावर त्यांनी निवांतपणे मस्टर बंद केलं, एक थंड नजर सगळ्या वर्गावर फिरवली, मुलींच्या दिशेने दोन क्षण रोखून बघितलं आणि आपल्या सातारी लयीत मोठ्यानं म्हणाले, 'तृप्ती आवटीच्या नेतृत्वाखाली पळून गेलेल्या सर्वच्या सर्व लेडीज उभ्या राहा'. सगळ्या वर्गात खसखस पिकली. आणि मग अचानक इतक्यावेळचा सगळा चिडका आवेश सोडून त्यांनी अतिशय विनोदी ढंगात आमची यथेच्छ शाब्दिक धुलाई केली. उभ्या नसलेल्या उर्वरित वर्गानं भरपूर मजा घेतली हे ओघानं आलंच. आज एका मैत्रिणीनं कशावरून तरी 'QSQT' ची आठवण काढली आणि विसरायला झालेला हा प्रसंग अचानकच आठवला.
Friday, March 13, 2015
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
4 टिप्पणी(ण्या):
Chhan ahe, maja aali vachtana..
Thanks IndradhanU :)
He sahiye .... me vachlach navta....
He sahiye .... me vachlach navta....
Post a Comment