घरी होतो तेव्हा मोसम चालू झाल्यापासून एक एक करून सगळे प्रकार येत. बाजारात मिळणारे हापूस, पायरी, बदाम, केशर, लंगडा, तोतापुरी इ. आणि घरचे अनेक प्रकार. ते तर शेकड्याने येत. संपूर्ण आंबा मोसम अक्षरशः रोज रस असे. हे कितीही खाल्ले, शेजारी-पाजारी, ओळखी-पाळखीच्यांना दिले तरी उरतच. त्याच्याच पोळ्या, वड्या होत. आई रस काढून ऍल्युमिनिअमच्या थाळ्यांमध्ये तूप लावून ओतून देई आणि आम्ही ते थाळे गच्चीवर ठेवून येत असू. धुळ किंवा कचर्यापासून संरक्षण म्हणून वर वाळवणाचे प्लॅस्टिकचे आवरण. सकाळी ठेवले की संध्याकाळपर्यंत पोळी तयार. वड्यांना मात्र फार वेळ लागे. आईने वड्या करायला घेतल्यापासून तयार होईपर्यंत अगदी जीव टांगणीला लागे. आधी चांगला २-३ लीटरचे पातेले भरून रस काढायचा. तो चांगला घट्ट गोळा होईपर्यंत आटवायचा. एव्हढा रस आटायला ३-४ तास तरी लागत (असावेत). तो गोळा गार झाल्यावर त्यात पिठीसाखर माळून वड्या थापायच्या. तो नुसता गोळा पण इतका चविष्ट लागतो. गेली कित्येक वर्षे आई न चुकता, न कंटाळता पोळ्या/वड्या करते आहे. आणि आता जमेल तश्या आम्हा सगळ्यांना पाठवते. मागच्याच महिन्यात नवर्याच्या मैत्रिणीबरोबर माझ्यासाठी पाठवल्या.
शाळेत असताना आम्ही झाड उतरवायचे असले की जातीने मालुंज्याला जात असू. गड्यांनी कैर्या खाली घेतल्या की त्यातल्या शाख (झाडावरच थोडी पिकलेली कैरी) शोधून खाणे हा अतीव आवडता प्रकार. त्यातल्या त्यात आरतीला जरा जास्तच सापडत (तिचे नाक फार तिखट आहे). आता मला तर जाणे जमत नाही पण तिघी बहिणी मात्र घरचे आंबे एक-एक करून उतरायला लागले की चक्कर टाकतात. तरी आम्ही सगळ्या पूर्णवेळ घरी होतो तेव्हा ज्या प्रमाणात आणि वेगात आंबे संपत तेव्हढे आता संपत नाहीत. आई-बाबा रोज सकाळी "फ्रूट आवर" मध्ये एखादा दुसरा चिरून खातात, एखादा दुसरा चोखून खायला चांगला म्हणून तो प्रकार. बाकीच्यांचा बहुतेक करून रस आणि मग वड्या. आणि मग ते आम्ही नाही म्हणून हळहळतात. बाकी तिघी कमीत-कमी बाजारात मिळणारे आणून खाऊ शकतात. आणि आई त्यांना घरचे आंबेही पाठवतेच अधून मधून. राहता राहिले ती मीच.
मग बाबा आपले रोज फोनवर मला "आंबे-वृत्तांत" देतात. साधारण मोहोर यायच्या वेळेपासूनच प्रत्येक फोनवर त्यांची "आंबे-बोलणी" सुरू होतात. आईचं मागून चाललेलं असतं, झालं का तुमचं आंबे-पुराण सुरू? एखाद्या वर्षी सगळ्याच झाडांना खूप चांगला बार येतो. बाबांचा आनंद बघण्यासारखा असतो. मग हमखास गारपीट होते, मोहोर गळून जातो. एखाद्या लहान मुलाचं आवडतं खेळणं हरवावं तसा त्यांचा सुर होतो. ह्या वर्षी असेच झाले. बार खूप चांगला आला होता. पण अवेळी आलेल्या पावसाने बराच गाळून गेला. मग सध्या कुठला आंबा भरपूर मिळतोय (पावसाळ्याच्या सुरुवातीला केशर/बदाम मिळायला सुरुवात होते ना? ). आज एक शेकडा "राम" उतरवला. मग अढी लावली. इथे परत एकदा अढी लावायचे शास्त्र गिरवून होते. मग आज काय सगळे आंबे पिकल्याने कसा घमघमाट सुटलाय घरात. कपड्यांना पण कसा आंब्यांचाच वास येतोय. आणि कधी कधी (उगीचच) "तुझी आईच सगळे आंबे खाते, माझ्या वाटेला काय १-२ आले तर वाट बघतोय". आणि मग पाठीमागून आईचा "मुली काय आज नाही ओळखत आईला" अश्या अर्थाचा हुंकार!!!
इथे मला आंबे फारसे मिळत नाहीत ह्याचे मला जितके वाईट वाटते त्यापेक्षा आई-बाबांनाच जास्त वाटते. गेल्या वर्षी आंबे अमेरिकेला निर्यात होणार अशा बातम्या यायल्या लागल्यावर त्यांना कोण आनंद झाला. अक्षरशः रोज (पूर्वी घर ते ऑफिस आणि आता पाळणाघर ते ऑफिस असा रोज फोन करते घरी) ते मला काय नवी-जुनी बातमी आली ते सांगत. आम्हीही उत्साहात एक पेटी आणली खरी पण उघडल्यावर फार निराशा झाली. सगळे आंबे अर्धे-मुर्धे कच्चे/सडके निघाले. ह्या वर्षी पुन्हा असे होणार नाही कारण काय प्रक्रिया बदलली की यंदा Reliance निर्यात करणार अशा काही बातम्या आल्या नी बाबांना पुन्हा आशा वाटली की यंदा तरी लेकीला चांगले आंबे मिळतील.
पण इथे कितीही चांगल्या दर्जाचे आंबे मिळायला लागले तरी सगळ्यांसोबत बसून खाल्लेल्या घरच्या आंब्यांची लज्जत वेगळीच. लहानपणी सकाळी अकराच्या सुमारास घमेलंभर आंबे अढीतून काढून आम्ही सगळे गोल करून बसायचो. आई, आरती एका पातेल्यात रस काढणार. आम्ही बाकीचे "कुच्चर" नुसते आंबे खाणार. त्या चीकमिश्रित रसाची चव न्यारीच. त्याची सर अमेरिकेत आयात केलेल्या "दर्जेदार" आंब्यांना कुठे यायला!!!!
.
असो, इथे काही आंब्यांच्या जाती देत आहे, हे सगळे आमच्या शेतावरील आंबे आहेत-
राम- मध्यम आकार, हिरवी जाड साल, रस पिवळसर केशरी. आंबा चांगला झाला असेल तर चव गोड. कोय आंब्याच्या एकूण आकारच्या मानाने बरीच मोठी. दशा खूप.
.
गोटी- नाव सार्थ करणारा गोटीचा आकार. ती एक मोठी गोटी असते ना, अगदी तेव्हढा. हिरवी साल आणि रस एकदम गोड, रंगाने केशरी. कोय लहानीच. ह्याचाच एक प्रकार काळी गोटी. साल काळी बाकी सगळा गोटीसारखा.
.
गाढवमुत्या- चांगला तळहाताएव्हढा मोठा आंबा. हिरवी पातळ साल. रस भरपूर पण अगदी फिकट पिवळा आणि पाण्यासारखा पातळ. नावाचा बोध आता झाला असेल.
.
मारुती- हा आमच्या सगळ्यांचा एकदम आवडता. ह्याची चव, रसाचा रंग अगदी हापुसाशी स्पर्धा करणारा. रस करून किंवा चिरून दोन्ही प्रकारे खाता येतो. साल मात्र जाड हिरवी. मारुतीचे एकच झाड आता शिल्लक आहे. त्यालाही दर वर्षी बार येत नाही आता. यंदा खूप आला होता पण निसर्गाने दगा दिला. असो, हा खाण्याची एक विशेष पद्धत आहे-केळं सोलल्यासारखे सगळी साल सोलून घ्यायची. मग लाडूसारखा आंबा खायचा. ह्याची कोय एकदम चपटी असते (बहुतेक). हापूसही अनेक लोक असा खातात.
.
वनराज- हा पुष्कळ ठिकाणी दिसतो. आमच्या शेतात नाही पण शेजारच्या काकांनी लावला आहे. किलोत एकच बसेल एव्हठा मोठा आंबा. भरपूर गुठळ्या असलेला पिवळसर रस.
.
सीता आणि भरत- हे मला फारसे आठवत नाहीत.
.
राजा- हे आमच्या दारातच झाड होते. हा दिसायला "राम" सारखाच. पण रस अगदी हापुसासारखा घट्ट, जर्द केशरी, गोड. दशा अजिबात नाहीत. हे झाड काही वर्षांपूर्वी जळाले.
.
खोबर्या- कुंकवाची कोयरी असते तसा आकार. कैरीत आंबटपणा अजिबात नाही. तयार आंबा कसा लागतो माहिती नाही. कारण ह्याची २-३ झाडे नमकी आमच्या सोसायटीतल्या खतरुड लोकांच्या दारात होती. हे लोक मे महिन्याच्या सुट्टीत गावाला गेलेच तर कैर्या हाती लागायच्या (आणि कैर्यांबरोबर तोंडी लावायला आईची बोलणी). पण बरोबर झाड उतरवायच्या वेळेस यायचेच परत. त्यामुळे ह्याची शाख पण कधी खाल्ली नाही
.
साखर्या- नावाप्रमाणे साखरेसारखी गोडी. मध्यम आकार, हिरवी साधारण साल. बाबांच्या भाषेत साखर्या थकला आता. ह्या वर्षी चार-दोनच कैर्या दिल्या ह्याने.
.
नळ्या- अगदी नळ सोडल्यासारखा भरपूर रस म्हणून नळ्या.
.
कागद्या- कागदासारखी पातळ साल.
.
चरख्या- चरख्यासारखी लांबलचक चांगली ९ इंच कैरी.
.
राघ्या- ह्याच्या कैरीला देठाच्या विरुद्ध बाजूला पोपटासारखी चोच म्हणून राघ्या.
.
ढोल्या- चांगली ढोली, गुबगुबीत कैरी.
.
फुट्या- ही खास लोणच्याची कैरी. लोणच्यासाठी फोडावा लागतो म्हणून फुट्या.
तर असे हे आंबे पुराण. तुम्हालाही अशा काही वेगळ्या (गावठी? ) जाती माहीत असतील तर जरूर ओळख करून द्या.
2 टिप्पणी(ण्या):
माझ्या आजोबांनी कोकणात काही झाडे लावली आहेत. त्यातील बहुतांशी आंब्याची झाडे आहेत.
वरील लेखातील आंब्याची काही नावे ऐकल्याची आठवतात.
मस्तच. तुला नावं आठवत असतील तर लिहिशील का ?
Post a Comment