Friday, April 29, 2011

आनंदी जोडपं

आटपाट नगरात एक जोडपं रहात होतं आनंद आणि आनंदी. गृहलक्ष्मीच्या नावासारखच आनंदी. आनंदचे घराणे थोर. आनंदी देखील उच्च कुळातली थोरा घरची लेक. थोरल्याच्या जन्मानंतर नवसाने झालेली, लाडावलेली राजकन्याच. उंच, गोरी, देखणी रुपगर्विता. आनंदाईने लाडक्या लेकासाठी शोधून निवडून आणलेली. आनंद आणि आनंदी- लक्ष्मी नारायणाचा जोडा जणू. लग्न करुन दूर देशी आली. भले मोठे घर. महाल जणू. घराला दारं-खिडक्याच सतराशे साठ. मोठ्ठे अंगण. परसात भाज्या. फुलं अन फळं. आनंदच्या प्रेमात आनंदी मोहरली. आनंदली.

आनंदीला घरकामाची सवय नव्हती. आवड तर नाहीच नाही. स्वयंपाक करणे म्हणजे तिला शिक्षा वाटे. नोकरी निमित्ये मात्या-पित्यांपासून दूर राहिली तरी हाताशी नोकर-चाकर होतेच. तरी नव्या वातावरणाशी जुळवून घेऊ लागली. आनंद कुशल स्वयंपाकी. त्याला खाण्या-पिण्याची-खिलवण्याची भारी आवड. आनंदीला स्वयंपाकाची आवड नाही तरी काही फरक पडला नाही. आनंद होताच. आनंदीच्या प्रेमात.

आनंदीने म्हणावे, घरकामापायी मला श्रम होतात. आनंदने घरकामासाठी बाई शोधावी.

आनंदीने म्हणावे, मला बाट्या जमेना. आनंदने कणिक मळावी.

आनंदीने म्हणावे, घरात बसून मी कंटाळले. आनंदने तिच्या पुढील शिक्षणाची तजवीज करावी.

आनंदीने म्हणावे, भारतात परत जाऊ तर तुझ्या गावी मला मिळेल का काम ? आनंदने बेंगरोली राहु म्हणावे.

आनंदीने म्हणावे, दूर देशी आलोय. इथले जग पाहु. चार ठिकाणं बघू. मगच मुलाबाळांचे ठरवू. आनंदने अनुमोदन द्यावे.

आम्ही बघ्यांनी त्यांच्या प्रेमाची कौतुकं करावी.
                                                                        ~~~
आनंदाईला हे कौतुक सोहळे सहन होइनात की काय न कळे. आनंदाई अजून पट्टराणी होती, घरचा सगळा कारभार स्वतः चालवत होती. थोरली सून- दोन लेकांची आई- अजून पट्टराणीच्या हुकुमात होती. मग आनंदी अपवाद कशी ? आनंदीकडे कामाला बाई येते, आनंदी उच्च शिक्षण घेते, आनंदी नोकरी करणार म्हणते, इतक्यात मूलबाळ नको म्हणते, आनंदी भारतात परत गेल्यावर परराज्यात स्वतंत्र रहायचं म्हणते ? हे चालणार नाही. आनंदाईने आपली नाराजी लेकाच्या कानी घातली. आनंद बिथरला. आनंदी बिथरली.

आनंद म्हणे, आपण बेंगलोरी नाही रहायचं. आनंदी म्हणे, जमणार नाही.

आनंद म्हणे, तिथे घरी राहून आईची सेवा करायची. आनंदी म्हणे, मुळीच नाही.

आनंद म्हणे, रांधा-वाढायला शिकावे लागेल. आनंदी म्हणे, मला आवडत नाही.

आनंद म्हणे, घरीच तर आहेस काय एवढे श्रम तरी. आनंदी म्हणे, तुझ्या घरची न्हाणीघरं आवरायला मी लग्न करुन आले नाही.

आनंद म्हणे, खानदान की रोशनी वाढवायलाच हवी. आनंदी मान फिरवे.

ही अशी कशी थोरा घरची लेक ? उलटी उत्तरं देते. आनंदाई म्हणे हिने माझी माफी मागावी. हिच्या आई-बापाने माझी माफी मागावी. ही अशी बिन-वळणाची कार्टी त्यांनीच तर मोठी केली.

आम्ही बघ्यांनी उभयतांच्या समजुती काढाव्यात.
                                                                        ~~~
आनंदी म्हणे, "Trupti, I told myself, either make it or quit it. और अगर इस रिलेशनमे रेहना है तो मुझे खुश रेहना है....इसलिये मैने आनंद को अपने तरीके से मोल्ड कर लिया है..."

आनंद विजयी मुद्रेने म्हणे, "भाभीजी, आनंदी अब बदल गयी है बहोत..."

...आनंदी दोन मुलांची आई आहे, आनंदीने नोकरी सोडली, आनंदीकडे आता बाई येत नाही, आनंदी बाट्यांसाठी कणिक स्वतःच मळते आणि आनंदी सासरी एकत्र कुटुंबात रहायला तयार आहे. 

आनंदी जोडपे आटपाट नगरात सुखाने नांदते आहे.

आम्ही बघे !!!

8 टिप्पणी(ण्या):

हेरंब said...

दूरदेशी असूनही आनंदाईची एवढी पॉवर??? कमाल आहे..

बिचारी हतबल आनंदी (आणि ठोंब्या आनंद !!)

तृप्ती said...

हेरंब, केवळ हेच जोडपं नाही रे अशी खूप बघितलीत जिथे रिमोट कंट्रोलने कारभार चालतो. तुला विश्वास बसणार नाही पण माझ्या एका जवळच्या मैत्रिणीने घटस्पोट घेतलाय ह्याच कारणासाठी. इतकी ढवळा-ढवळ की तिला डिप्रेशन आलं. शेवटी एक घाव दोन तुकडे केले बिचारीने. :(

Anonymous said...

आपण बघेच असतो नाही तृप्ती.... एक जीव वरवर जिवंत दिसतो पण आत खूप काही मृतवत सांभाळतोय याची जाण असूनही बघण्याखेरीज काही करता येत नाही...

अश्या अनेक ’आनंदाया’ आनंदाने मुलांचे संसार मोडताहेत गं...

हेरंब + १

तृप्ती said...

kharay Sarika :(

हेरंब said...

सारिका?? सारिका नाही ग ही तन्वी :)

अपर्णा said...

घरोघरी त्याच त्या आनंदाई...मलाही अशा काही आनंदाया (खरं दुःखाया म्हटलं पाहिजे नं?) माहितेत...
लेख खूप छान...

भानस said...

जग कितीही पुढे गेले तरी काही गोष्टी अजूनही बदलतच नाहीत. :( हे असे रिमोट्स बहुतांशी स्वत:ही यातूनच गेलेले असतात तरीही स्वत: तेच करतात हे अजूनच वाईट.

छान लिहीलेस गं.

हेरंब, तन्वीचे माहेरचे नाव सारिका आहे. ( मला जे आठवतेय त्यानुसार )

तृप्ती said...

धन्यवाद मंडळी. यंदा देशवारीत इंटरनेटपासून सन्यास घेतला होता. आता आल्यावर प्रतिसाद बघते आहे.

तन्वी-सारिकाचा खुलासा तिलाच करु देत :)

Post a Comment

लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी