Sunday, December 29, 2013

विश लिस्ट

नोकरी मिळाली की दर महिन्याला एक तरी पुस्तक घ्यायचं असं इतर अनेक पुस्तकप्रेमींप्रमाणे मी पण ठरवलं होतं. स्वकमाईतला काही हिस्सा नियमित पुस्तक खरेदीवर खर्च करावा अशी एक इच्छा होती. त्या काळात माहितीचे महाजाल नसल्यानं श्रीरामपूर सारख्या लहान गावात नव्या-जुन्या पुस्तकांबद्दल माहिती मिळण्याचा वृत्तपत्रांच्या रविवारी निघणार्‍या पुरवण्यांमध्ये येणारं पुस्तक परीक्षण हा एकच मार्ग होता. आमच्याकडे येणारी आणि शेजारून आणलेला महाराष्ट्र टाइम्स अशी तिन्ही-चारी वृत्तपत्रं मिळून मी एक पुस्तकांची 'विश लिस्ट' एका डायरीत बनवली होती. शिक्षण संपल्यावर माझ्यासोबत ती डायरी पण बंबई सें पुना, पुना सें दिल्ली, दिल्ली सें (लिटरली) पटना भटकली. बूड एका गावी स्थिरावलं तसं डायरी एका 'डोळ्यातून हमखास पाणी काढणारी पत्रं, वार्षिक स्नेहसंमेलनांतले तोंडाला फक्की फासलेले फोटो, धाव्वीत शाळेकडून मिळालेलं बक्षीस' इ. सामानसुमानात गाडली गेली. या वर्षी एक दिवस 'सीरियस क्लीनिंग'चा झटका आला तेव्हा पुन्हा हाती लागली. गेल्या अनेक वर्षांत अगदी महिन्याला एक नाही पण बर्‍यापैकी सातत्यानं पुस्तकं घेतली आहेत. तरी ही यादी चाळून बघितल्यावर लक्षात आलं की त्यातली बरीच पुस्तकं नंतर घेतली गेली नाहीत किंवा वाचली गेली नाहीत. डायरीत पुस्तकाचं नाव, लेखक, प्रकाशक अशी माहिती नोंदवलेली आहे. पण पुस्तक नक्की का वाचनीय आहे याची नोंद ठेवलेली नाही. यातली बरीचशी नावं बघितल्यावर त्या पुस्तकाची तेव्हा नोंद का ठेवली असेल अजिबात आठवत नाही. त्यामुळे आता न वाचलेली पुस्तकं घ्यावीत की नाही प्रश्नच आहे. तेव्हा वाचनीय वाटलेले विषय-आशय आता (आता आम्ही मोठ्ठे झालो ना) कितपत आवडतील अशी एक शंका पण आहे. असो, हाताशी असावी म्हणून आणि आज वेळ होता म्हणून बरीचशी छापून काढली.

मराठी:
जॅक्लीन केनेडी ओअ‍ॅसिस - सीताराम मेणजोगे - नवचैतन्य प्रकाशन
फुलवेल - इंदिरा संत - पॉप्युलर प्रकाशन
तेजोमय संगर हा - सोमनाथ समेळ - आदित्य प्रकाशन
स्पेस ट्रायअँगल - बाळ भागवत - श्रीराम बुक एजन्सी
बर्म्युडा ट्रायअँगल - चार्ल्स बर्लिझ - विजय देवधर - श्रीराम बुक एजन्सी
बिस्मार्कची शिकार - फ्रँक ब्रेनॉड - अनंत भावे - मेहता पब्लिशिंग हाउस
आदिम - रेखा बैजल - शब्द प्रकाशन
शेलका साज - शिवाजी सावंत - मेहता पब्लिशिंग हाउस
दिग्विजय - भा द खेर, राजेंद्र खेर - मेहता पब्लिशिंग हाउस
रक्तखुणा - प्रल्हाद वाडेर - स्नेहवर्धन प्रकाशन
बंदीश - अंजली सोमण - राजहंस प्रकाशन
शपथ - नारायण धारप - दिलीप प्रकाशन
माहितीचे महामार्ग - के डी पावटे - वैशाली जोशी - मेहता पब्लिशिंग हाउस
पेशीबद्ध जीवन : एक निरंतर प्रवास - डॉ. बाळ फोंडके - कविता भालेराव - मेहता पब्लिशिंग हाउस
सिकंदर - प्रमोद ओक - राजहंस प्रकाशन
ऑलिंपिक्सच्या उगमाशी - हेमंत जोगदेव - कॉन्टिनेन्टल प्रकाशन
गस्तवाल्याची गस्त - ग ह पाटील - प्रतिभा प्रकाशन
वात्सल्यपथ - व्यास बाळ - मीरा शिराली
डॉक्टर नसेल तेथे - डेव्हिड बर्नर
राजा शिवछत्रपती - ब म पुरंदरे
प्रेषित - जयंत नारळीकर
यक्षांची देणगी - जयंत नारळीकर
अंतराळातील भस्मासुर - जयंत नारळीकर
थँक यु मिस्टर ग्लाड - अनिल बर्वे
मारुती कारस्थान - वि स वाळिंबे
एल्गार एल्गार - ग म केळकर
साहसांच्या जगात - विजय देवधर
स्वामी - रणजित देसाई
माझी जन्मठेप - वि दा सावरकर
सनी डेज - सुनील गावसकर
माझ्या आठवणी - वि दा सावरकर
ज्ञानवृक्षाच्या पारंब्या - सुरेश मथुरे
आनंदमठ - बंकिमचंद्र चटर्जी
राजा रवी वर्मा - रणजित देसाई
सुखाचा शोध - प्र के अत्रे
लव्हाळी - श्री ना पेंडसे
रक्तकमळे
शून्याची देणगी
छावा
शेलार खिंड

इंग्रजी:
Electroral Reforms of India - S S Gadakari - Wheeler Publications
Assert and Succeed - Rishi Kumar Pandya - Arnold Associates
Women's Health in India : Risk & Vulnerability - Monica Dasgupta, Linkedin Chain, T N Krishnan - Oxford Uni Press
The Advent of Advani - Atmaram Kulkarni - Aditya Prakashan
Genes and Means - D. Balasubramanian
Man In Space - P Radhakrishnan
Green Gene - Shakuntala Bhattacharya
Make It Cloud Nine - Bal Phondke
Cats Have Nine Lives - D. Balasubramanian
Managing for the Future - Peter Drucker
His Master's Slave - Tapas Bhattacharya
Green Willow - Enid BlyTon
The Art of Cricket - Don Bradman
Life - Elia Kazan
My 60 Memorable Games - Bobby Fischer

Thin Air - George Simpson, Neil Berger
Flame of Discovery - D A Richards
Actors on Acting
Honorable Insults

Friday, September 27, 2013

हाथ की सफाइ

"तुमच्या मुलीला हँड आहे हो" आमच्या शाळेतल्या चित्रकलेच्या शिक्षिका धाकट्या बहिणीबद्दल एकदा आईला सांगत होत्या. ती खूप छान चित्र काढायची म्हणून तिला हँड होता. मला नव्हता. मला गणित होतं, विज्ञान होतं झालंच तर गर्व होता. चित्रकला, हस्तकला अशा बीन-महत्त्वाच्या विषयांकडे लक्ष देण्याची गरज वाटत नव्हती आणि वेळही नव्हता. घरात एक से बढकर एक कलाकार मंडळी असून सुद्धा या दोन विषयांत मी स्वतःच पाचर ठोकून टाकली होती. एकदा तर चित्रकलेच्या सरांनी संतापाने वही वर्गाबाहेर फेकून द्यावी अशी वेळ माझ्यावर आ(ण)ली. पण अशा छोट्या-मोठ्या संकटांना न डगमगता आम्ही मोठ्या निश्चयाने कलेतली अधोगती सुरूच ठेवली. शालेय अभ्यासक्रमाच्या बरोबरीने अधून-मधून स्ट्रॉ पासून बनवलेले समोसे, सिरॅमिक, कापसाच्या बाहुल्या, मेंदी आर्टच्या फ्रेम्स, फलाणं नी बिस्ताणं टूम निघत. सगळी दुनिया खाली मुंडी घालून हे प्रकार करण्यात प्रावीण्य मिळवत असताना आम्ही यत्ता पहिली फ सुद्धा कधी गाठली नाही.

लाकडाचं चरक फिरत असतं. एक मस्त रसरशीत ऊस त्यात जातो. ताजा गोड गोड रस खाली पातेल्यात पडतो. भरपूर रस जमा होत राहतो. रसरशीत दांड्याचं पाचट होतं. पातेलंभर रस जमा होतो. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन अशा एकेक फेर्‍या पार करून मी पण पातेलंभर रस उर्फ डिग्री सर्टिफिकेट घेऊन बाहेर पडले. अभियांत्रिकीला प्रवेश घेतला तेव्हा आधी मेकॅनिकलचे शीट्स मग डिजिटल सर्किट्स आणि मग अगदीच वेळ आल्यास नोट्स लिहिणे एवढीच हाताशी दोस्ती उरली होती. एक पूर्ण लांबीचा 'मेन स्ट्रीम प्रोफेशनल' अभ्यासक्रम पूर्ण करून मग मी नोकरीच्या गाढवावर चढले. नोकरीचं गाढव तसं गुणी निघालं. सोडू म्हणता सोडवलं नाही. नोकरी लागल्यापासून तर 'आता उरलो की-बोर्ड पुरता...' अशी हाताची अवस्था झाली.

कालांतराने आई होण्याचं राज्य आलं. बर्‍याच आया आपल्या बाळासाठी स्वहस्ते काही ना काही बनवतात. कलेच्या प्रांगणातली सरड्याची धाव लक्षात घेता क्विक स्टिच किट आणायचं ठरलं. किट मागितल्यावर दुकानदाराने लहान मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागल्याशिवाय हा माल ठेवत नाही असं सांगितलं. पण अशा छोट्या-मोठ्या संकटांनी आम्ही अजिबात डगमगत नाही. त्याच्या खोक्यात शोधाशोध करून एक मस्त चित्र आणून विणलं(च). बाळ आल्यावर मात्र त्याची शें-शू-शी काढण्याशिवाय स्वहस्ते फारसं काही केलं नाही. बाळाचं खोडकर हसू, बोबडे बोल, पहिलं पाऊल हे सगळं ठीक आहे. पण खरी मजा(?) आली ती त्याने (आणि त्याच्या बरोबरीने किंवा त्याच्यासाठी मी) रेघोट्या गिरवायला सुरुवात केल्यावर. एकदा त्याला फुल काढून दाखवल्यावर त्याने, 'Not this one, a real flower' असं म्हटल्यावर 'हँड' आठवला नसता तरच नवल. आई-बाबांच्या राज्यात कुठलेच विषय ऑप्शनला टाकून चालत नाही. त्यामुळे चित्रकला आणि हस्तकला या विषयांशी नव्याने 'हात'मिळवणी करणं भाग होतं. केली सुरुवात. इथे आवड नसताना लेकाच्या गळ्यात बळंच काही मारण्याचा उद्देश अजिबात नव्हता. साधारण त्याच्या वयास झेपेल इतकाच वेळ एका जागी स्वस्थ बसून काही करायला शिकवणं हा एक हेतू होता. त्याला शिकवण्यासाठी मला आधी काही शिकणं भाग होतं. सुरुवातीला त्याच्या टीचरला विचारून लहान मुलांसाठी असलेली काही संकेतस्थळं आणि पुस्तकं बघून छोटे छोटे प्रयोग केले. मग 'मायकल्स'सारख्या दुकानांमध्ये शोध घ्यायला सुरुवात केली. थोडी आणखी 'ऑनलाइन' शोधाशोध केली. क्ले, मार्कर्स, क्रेयॉन्स, रंगीत वाळू, मधाच्या रिकाम्या बाटल्या, डिस्पोजेबल कप्स, पॉप कॉर्न्स, (न वापरलेल्या) इयर बड्स, टूथ पिक्स (न वापरलेल्याच), मार्शमेलोज काय सापडेल ते सामान वापरून एक एक प्रकार त्यालाच सोबतीला घेऊन करून बघितले. मी त्याला शिकवत होते नी तो मला. मग एके वर्षी दिवाळीत शाळेतल्या मुलांना आकाश-कंदील बनवायला शिकवण्यापर्यंत आम्ही मजल मारली.

एकदा इथल्याच एका गावात सुंदर मणी मिळाले. आणून नुसते ठेवले होते. मायकल्समध्ये 'जुलरी किट' मिळतं ते माहिती होतं. घेऊन आले. एक साधाच नेकलेस बनवला. तिथेच मिळणारं सामान-सुमान बघून बाप्पासाठी मखर बनवायचं डोक्यात आलं. ऐन वेळी धीर खचल्याने मखर न बनवता नुसतंच आसन बनवलं. दर वर्षी स्टेप स्टूलवर हिरवा किंवा लाल ब्लाउजपीज (Sounds funny, I know) पसरवून त्यावर बसणारे बाप्पा त्या वर्षी हक्काच्या आसनावर बसले. या प्रकाराचा फारसा अनुभव नसल्याने ग्लिटर, ग्लू, चमक्या, टिकल्या सगळ्याचा खूपच रहाडा झाला. शहाणं होऊन पुढच्या वर्षी हे सगळं साहित्य 'कटाप' करून टिकल्या-टुकल्यांचे स्टिकर्स वापरून मेस-फ्री मखर बनवलं. गेल्या भारतवारीत एक एप्रन शिवलंय स्वतःसाठी आणि एक भाचीसाठी. हे सगळं सुरू असताना मी आणि लेक एकमेकांमध्ये अखंड लुडबुड करत होतो, असतो. कितीही amature काम असलं तरी त्याला शिकवणं, त्याच्याकडून शिकण्यात प्रचंड धमाल येत होती, येते. त्याच्यासोबत 'क्वालिटी टाइम' की काय म्हणतात तो व्यतीत केल्याचं समाधान होतंच. पण आणखी एक सोनेरी धागा होता जो लखकन चमकून जात होता पण हाती लागत नव्हता.

एक दिवस एका मैत्रिणीशी याच विषयावर बोलत होते. बोलता बोलता ती म्हणाली, 'आपण आजकाल हाताचा किती मर्यादित वापर करतो. दिवसभर की-बोर्ड बडवायचा. लिहिणं फारसं नाहीच. काही क्रियेटिव्ह करणं तर फारच दूर. आपले हात वापरून काही तरी निर्माण करणं ही खरं तर आपल्याला मिळालेली देणगी आहे. त्यात निर्मितीचा आनंद तर असतोच पण आपण स्वतः बनवलेली वस्तू वापरताना जे समाधान मिळतं त्याला खरंच तोड नाही.' मला अचानक तो सोनेरी धागा गवसल्यासारखं झालं. त्याची सुरेख वीण घातली ती आणखी एका मैत्रिणीनं. तिचं म्हणणं तिच्याच शब्दांत, 'आपण स्वतः बनवलेल्या वस्तूंमध्ये एक सुरेख उबदार फीलिंग असतं. त्या करताना आजूबाजूला जे काही घडत असतं त्या आठवणींचा एक सुरेख गोफ विणला जातो.' घड्याळाशी आम्ही नेहमीच शर्यत हरतो त्यामुळे अगदी दर आठवड्यात शक्य होत नाही नवे प्रोजेक्ट्स हाती घेणं. अनेकदा गोष्टी चुकतात, हवी तशी सफाई येत नाही कामात. पण निर्मितीचा आनंद असतो. आणि आपण स्वतः बवनवलेली वस्तू वापरताना जे समाधान मिळतं त्याला खरंच तोड नाही!!!



Sunday, May 19, 2013

काकूआजी

माझ्या चुलत आजी बद्दल थोडंसं. माझ्या वडिलांची काकू म्हणून ती आमची 'काकूआजी'. 'काकूआजी' मूळची सांगलीची. शिक्षणासाठी पुण्याला आली. तिथे मॅट्रिकपर्यंत शिकली. त्या काळातही पोहायला जायची, नाटकात काम करायची, नाटकं बघायला जायची, गावात सभा असल्या की भाषणं ऐकायला जायची. पुढे माझ्या आजोबांशी तिचा प्रेम विवाह झाला. त्यांची म्हणजे जया भादुरी-अमिताभ बच्चन जोडी होती (अर्थात ही जया-अमिताभ जोडी खूप नंतर आली)- आजोबा एकदम सहा फूट उंच तर आजी एकदम पिटुकली. मूर्ती लहान तरी एकदम करारी, धडाडीचं व्यक्तिमत्त्व होतं. आजोबा-आजी नंतर बिलासपूरला स्थायिक झाले. तिथे आजोबांनी एक भोजनालय सुरू केलं. सुरुवातीला भोजनालयात लागणारं सगळ्या वर्षाचं कित्येक किलोंचं लोणचं ती स्वतः घालत असे. तिथे दिल्या जाणार्‍या इतर पदार्थांसाठी लागणारे जिन्नस बाजारातून आणून सगळी प्रक्रिया करून माल भोजनालयात पाठवणे हे सगळं आजीच्या देखरेखीखाली चाले. तिचं माणसं हाताळायचं कसब जबरदस्त होतं. तिथल्या कामगारांकडून सगळी कामं ती चोख करून घेत असे. आजोबांचा सगळा व्यवसाय तिनेच अतिशय शिस्तीत चालवला असं म्हंटलं तरी अतिशोयक्ती होणार नाही. आजोबा पुण्यात अनाथ विद्यार्थी गृहात शिकले. त्यामुळे त्यांना अनाथ विद्यार्थ्यांविषयी खास जिव्हाळा होता. त्यांनी आणि आजीने 'मानसकन्या' ह्या उपक्रमात अशा अनेक अनाथ विद्यार्थिनींची आयुष्ये मार्गी लावली. त्यामागची भावना आजोबांची होती तरी उपक्रम राबवण्याचं काम आजीनेच केलं होतं. आजी हिंदी अतिशय उत्तम बोलायची. आजोबांकडे येणं जाणं खूप होतं. राजकारण्यांपासून ते क्रिकेट खेळाडूंपर्यंत अगदी कुणीही यायचं. तरी त्या काळी सुद्धा आजीचा स्वतःचा असा गोतावळा होता.

आजीला खाण्याची आणि इतरांना खिलवण्याची खूप आवड होती. कुठल्याही गावी गेली की कुणी सोबत असो नसो ती जाऊन सगळा बाजार पालथा घालणार, ताज्या भाज्या-फळं घेणार, गावात चांगली हॉटेल्स कुठली त्याची चौकशी करून तिथे जाऊन दोन पदार्थ चाखून घरच्या सदस्यांसाठी आणखी चार बांधून घेऊन येणार. पेढे खावे तर ह्या गावचे, वांगी खावी तर त्या गावची अशी सगळी माहिती तिच्याकडे एकदम तयार असे. तिने बाजारात जायचं ठरवलं की ती एकदम बाजारहाटचंडिका होत असे. आमच्या गावातला मोंढा घरापासून दूर आहे. तिथवर नेणारं कुणी नसलं, रिक्षा मिळाली नाही असं काही झालं की ती आमच्या घरी काम करणार्‍या बन्सीच्या मोटरसायकलवर सुद्धा बाजारात जायची. बन्सीच्या मागे मोटरसायकलवर दोन्ही बाजूस पाय टाकून बसलेली आजी आणि त्या दोघांच्या मध्ये भाजीपाल्याने भरलेल्या पिशव्या हे दृश्य सगळ्या गावाला ओळखीचं असणार नक्की. वास्तविक आजी-आजोबांनी बिलासपूरचा व्यवसाय खूप वाढवला होता, त्यामुळे गाडी-घोडे अशा सगळ्या सुखसोयी तिथे होत्या. पण म्हणून हाताशी गाडी नसताना तिचं काही अडलं नाही. माझ्या मोठ्या बहिणी बरोबर तिच्या सायकलवर डबलसीट बाजारात गेलेली आजी आठवते आहे. तिच्या मनमोकळ्या स्वभावामुळे आणि सढळ हाताने खरेदी करण्यामुळे तिच्या गावोगावी खूप ओळखी होत. प्रत्येक भेटीत नेहमीच्या ठिकाणी आवर्जून भेट दिल्यामुळे ओळखी टिकायच्या सुद्धा. त्याचा फायदा तिने आपल्या व्यवसायासाठी करून घेतला. जास्त पगार, इतर सुविधा देऊन इकडचे मुख्य आचारी, इतर कारागीर बिलासपूरला न्यायची. तिचं नावच इंदिरा होतं. नक्की कुठल्या इंदिरेने कुणाचे गूण घेतले कळायला मार्ग नाही. पुढे दुर्दैवाने तिला पचनसंस्थेचा असाध्य विकार जडला. खाल्लेलं काही पचत नसे. लगेच उलटून पडे. उपचारांसाठी ती एकदा एकटी लंडनला जाऊन आली. इतर अनेक उपाय केले. पण तो आजार काही बरा झाला नाही. आजी अक्षरशः शाळकरी मुलीसारखी हलकी-फुलकी झाली. तरी निराश, दु:खी दिसली असं कधी झालं नाही. आधीच्याच उत्साहात सगळी कामं करायची. त्याच उत्साहात उदरभरणाचं यज्ञकर्म सुरूच असायचं :)

बाहेर कितीही कर्तृत्ववान बाई असली तरी घरात आमच्यासाठी मात्र ती शिस्त आणि लाड ह्याचं अफलातून मिश्रण होती. ताटात साधी लोणच्याची फोड टाकलेली सुद्धा तिला चालत नसे. पोहायला शिकली तेव्हा कदाचित नऊवारी साडी घालून शिकली असेल. पण पुढे तिच्या नाती पोहायला जायच्या तेव्हा त्यांच्या बरोबर 'लेटेस्ट' पोहण्याचा पोशाख घालून पोहायला जायची. आमच्या घरी पण लोकांचं येणं जाणं खूप होतं. त्यातले काही नमुने आले की आतल्या खोलीत कुजबूज करून हसणे हा आमचा आवडता उद्योग होता. आजीला ते कळल्यावर ती पण आमच्यात शामील व्हायची. आमच्या सोबत नवीन चित्रपटांतली हिंदी गाणी म्हणायची. एकदा आम्ही व्हॅक्सिंग इ. बद्दल बोलत होतो. आजीने लगेच आम्हाला तिच्यावेळी ती काय करत असे ते सांगितलं. अगदी आमच्या पिढीतल्या मुली सुद्धा ज्या विषयांवर बोलायला लाजतात त्या विषयांवर ती आमच्याशी मोकळेपणाने बोलायची. हे अतिशय कौतुकास्पद वाटतं मला.

माझी खात्री आहे, आज आजी असती तर तिने इंटरनेट, स्मार्ट फोन्स सगळं शिकून घेतलं असतं. इथे अमेरिकेत माझ्या घरी आली असती. इथल्या फार्मर्स मार्केटमध्ये गेली असती एकटीच. इथल्या भाज्या, इतर शेतीमाल आणि त्याच्या वेगवेगळ्या जाती, त्यामागचे सगळे अर्थकारण समजावून घेतले असते. आजी खरंच खूप भारी होती. आजी अजून आमच्यात असायला हवी होती.

****************************************************************************
मायबोलीवर मातृदिना निमित्त 'ग्रँडमॉम्स गोइंग स्ट्राँग' ह्या उपक्रमात आज्यांविषयी लिहायचे होते. काकूआजी बद्दल थोडंसं काही लिहावं म्हणून लिहायला घेतलं आणि बरंच काही लिहिलं. आजी एक जबरी रसायन असतं. तिच्या आठवणी तर सतत येतातच पण आठवणींना शब्दरूप देण्याची वेळ क्वचित येते. पूर्वीच्या काळी अतिशय कठीण, प्रतिकूल परिस्थितीत अनेक बायकांनी थोर कर्तृत्व गाजवलीत. पण काळाच्या ओघात त्यांची ओळख पुसली गेली. ती ओळख नव्याने करून द्यायची ही एक चांगली संधी आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते. तुमची आजी पण अशी सुपर-आजी असल्यास तिच्या बद्दल नक्की लिहा. तिथे नाही तर तुमच्या ब्लॉगवर.

Thursday, April 11, 2013

शुभेच्छा!

गुढी पाडव्या निमित्त हार्दिक शुभेच्छा! नवे वर्ष आपल्याला आनंदाचे आणि सुख, समाधानाचे जावो :)

Monday, February 4, 2013

बबूची गोष्ट

बबू त्या दिवशी खूप आनंदात होती. तिचे आजोबा तिला छ्बूच्या घरी घेऊन जाणार होते. छबू आणि बबूची एकदम घट्ट मैत्री होती. त्या दोघी एकाच वर्गात होत्या. पण बबू आणि छबू पहिलीतून दुसरीत जाणार होत्या त्या वर्षी छबूची आई छबूला घेऊन तिच्या मामाच्या घरी राहायला गेली. छबू मग नव्या शाळेत जायला लागली. छबू गेली म्हणून बबूला खूप वाईट वाटलं. एकदा जिन्याखाली बसून एकटीने रडताना तिला आजोबांनी बघितलं. त्या दिवशी पासून ते जेव्हा नदीपलीकडल्या छबूच्या मामाच्या गावी जात तेव्हा बबूला सोबत घेऊन जात. तिच्या शाळेला सुट्टी असेल तरच. पण ते नेहमीच बबूला शाळा असेल अशा दिवशी जात आणि तिला त्यांच्या बरोबर जायला मिळत नसे. त्या दिवशी बबूच्या शाळेला सुट्टी होती आणि म्हणूनच बबू खूप आनंदात होती.

बबू सकाळी लवकर उठली. तिने दात घासले, शहाण्या मुलीसारखं पटकन दूध प्यायलं, आजीने बनवलेला उपमा चटचट संपवला, अंघोळ केली, छबूचा आवडता फ्रॉक घातला, केस विंचरले, तोंडाला पावडर फासली आणि आजोबा तयार व्हायची वाट बघत घराबाहेरच्या ओट्यावर बसून राहिली. समोरच्या घरात राहाणार्‍या मांजरीची तीन पिलं एकमेकांच्या खोड्या करत अंगणात बागडत होती. पण बबू पिलांशी खेळायला गेली नाही. तेवढ्या वेळात आजोबा तयार झाले आणि बोटीवर निघून गेले तर छबूकडे जायला मिळणार नाही अशी भिती तिला वाटत होती. तिचं सगळं लक्ष आजोबांच्या जाड तळ असलेल्या चपलांच्या  खरड-खरड आवाजाकडे लागलं होतं. तो आवाज आला आणि टुणकन उडी मारून  उभी राहत बबू आजोबांचा हात धरून चालू लागली.

आजोबांना जवळ-जवळ खेचतच तिने डेकपर्यंत आणलं. आजोबा तिकिट काढायला गेले तेवढ्या वेळात तिने छबूसाठी डेकपासल्या गुलमोहरा खाली पडलेल्या सड्यातून राजे आणि राण्या गोळा केले. आजोबा तिकिट काढून परत आले तेव्हा हातात फुलं नाचवत ती बोटीत एकदम पुढच्या बाजूस तिच्या आवडत्या जागेवर जाऊन बसली. तिथे बसलं म्हणजे बोट किनार्‍याला लागताना टेकडीवरचं छबुच्या मामाचं घर मोठं मोठं होताना दिसे. ते बघायला तिला भारी मजा वाटे. वाटेतच थेंब थेंब पाऊस पडायला लागला. बबूने आकाशाकडे आ वासला आणि पाण्याचे थेंब तोंडात झेलले. नदी पार करून बोट पलीकडच्या डेकला लागली तेव्हा खाली उतरायचं म्हणून बबू उभी राहिली आणि अचानक जोरात खूप मोठा पाऊस पडायला लागला. आजोबांनी त्यांची मोठी छत्री उघडून तिच्या डोक्यावर धरेपर्यंत बबू चिंब भिजली. तिच्या हातातल्या राजे-राण्या पण चिंब भिजल्या.

आजोबा आणि बबू छबूच्या घरी पोचले तेव्हा छबूची आई आणि मामी आत ओट्यापाशी स्वयंपाक करत होत्या. छबू  आईने दिलेल्या कणकेच्या गोळ्यांशी खेळत होती. बबूला बघताच ती खेळ सोडून दाराकडे धावली. बबूने हातातला लाल-पिवळा चिखल तिच्या हातात दिला. बबूला अशी भिजलेली पाहताच छबूची आई तरातरा पुढे आली आणि पदरानेच तिनं बबूचं डोकं खसाखसा पुसलं. तिला अशी भिजू दिल्याबद्दल आजोबांना रांगे भरलं. आजोबांना कुणी रागावतं हे बबूला पहिल्यांदाच कळत होतं. तिला त्याची खूप मजा वाटली. छबूला पण. दोघी एकमेकींकडे बघून खुदकन हसल्या. छबुच्या आईने बबूला न्हाणीघरात नेऊन तिचे हात-पाय धुऊन दिले, अंग पुसलं आणि छबूचा एक छान फ्रॉक घालायला दिला. बबू आणि छबू दोघी जणी मग हरणाच्या पाडसांची जोडी असल्यासारख्या उड्या मारत मागच्या अंगणात पसार झाल्या. छबूच्या आईने केलेला चहा घेऊन आजोबा त्यांची कामं करायला गावात गेले.

छबूच्या घरी वेळ कसा गेला त्यांना कळलंच नाही. त्या दोघी सापशिडी खेळल्या. लपाछपी खेळल्या. शिवणापाणी खेळल्या. छबूच्या टॉमी कुत्र्याला त्यांनी घराभोवती चक्कर मारून आणली. फुलपाखरांच्या मागे बागेत धावल्या. पाणघोडे पकडले. छबूच्या मामीने त्यांच्यासाठी बनवलेला खाऊ खाल्ला. छबूच्या आईला आणि मामीला ऐकू जाणार नाहीत अशा खुसुखुसू गप्पा मारल्या. फिदीफिदी हसल्या. छबूच्या आईने साता समुद्रापार राहाणर्‍या राजकन्येच्या गोष्टी सांगितल्या त्या त्यांनी डोळे विस्फारून ऐकल्या. पण तरी त्यांना अजून खूप खेळायचं होतं. आणखी खूप गप्पा मारायच्या होत्या.

आजोबा परत घ्यायला गेले तेव्हा जरा नाखुशीनेच बबू घरी जायला तयार झाली. छबूच्या  आईने दिलेला फ्रॉक बदलून तिने स्वतःचा फ्रॉक घातला. आजोबा छबूच्या आईचा निरोप घेत असताना छबूला टाटा करून ती फाटकाकडे चालायला लागली. तेवढ्यात छबूच्या आईने तिला हाक मारली. तिने मागे वळून बघितले तेव्हा तिला छबूच्या आईच्या हातात एक लालचुटुक सफरचंदी रंगाची, नाजूक पांढरी फुलं असलेली, छोट्याशा मुठीची छत्री दिसली. बबू धावतच परत गेली. तिला ती छत्री फारच हवीशी वाटत होती. पण कुणाकडून काही वस्तू घ्यायची नाही अशी आजोबांची सक्त ताकीद असल्याने ती लकाकत्या डोळ्यांनी छत्रीकडे नुसतीच बघत राहिली. आजोबांनीच तिच्या मनातला गोंधळ ओळखून छबूच्या आईकडून छत्री घेतली आणि तिच्या हातात दिली. बबूला खूप आनंद झाला. तिने छबूच्या आईला घट्ट मिठी मारली.

परत जाताना पाऊस पडत नव्हता. आभाळ भरून आल्याने ऊन सुद्धा नव्हते. तरी बबू डोक्यावर छत्री धरून ऐटीत चालत होती. लालचुटुक सफरचंदी रंगाची ती छत्री तिला खूपच आवडली होती. एवढी सुंदर छत्री आपली आहे ह्याचं तिला अप्रूप वाटत होतं आणि अनावर हसू सुद्धा येत होतं. छत्री घेऊन चालणार्‍या स्वतःच्या छबीची मनात कल्पना करत तिची स्वारी रस्त्याने चालली होती. आईला पण छत्री खूप आवडेल असं तिला वाटलं. आईची आठवण येताच तिची छोटी पावलं पटापट पडू लागली. एका हातात छत्री आणि दुसर्‍या हातात आजोबांचा हात धरून तिने जवळ-जवळ खेचतच त्यांना डेकपर्यंत आणलं. आजोबा तिकिट काढत असताना छत्री डोक्यावर धरून डेकपासल्या पत्र्याच्या शेडमध्ये ती उभी राहिली. आजोबा तिकिट काढून परत आले तेव्हा हातात  छत्री नाचवत ती बोटीत एकदम पुढच्या बाजूस तिच्या आवडत्या जागेवर जाऊन बसली. तिथे बसलं म्हणजे बोट किनार्‍याला लागताना कधी कधी काठावर उभी असलेली आई दिसे. आईला अशी तिची वाट बघत उभी असलेली पाहायला तिला खूप आवडे. आज तर आईला छत्री दाखवायची होती.

बोट किनार्‍याला लागली पण तिला आई दिसली नाही. थोडी खट्टू होत आजोबांचं बोट धरून बबू खाली उतरली. गुलमोहोराखाली सगळा रहाडा  झाला होता. आजोबांनी एका खाली झुकलेल्या फांदीवरून बबूला राजे आणि राण्या काढून दिल्या. घराकडे चालायला लागल्यावर आईला छत्री दाखवायची ह्या विचाराने बबूच्या मनाने पुन्हा भरारी घेतली. छत्री डोक्यावर नाचवत घोड्यासारखी दौडत बबू घराकडे निघाली. घरापाशी पोचली तेव्हा बबूला धाप लागली होती. हातातली फुलं रस्त्यात कुठे तरी पडून गेली होती. समोरच्या घराच्या अंगणात मांजरीची पिलं खेळताना दिसली. पण बबू त्यांच्याशी खेळायला गेली नाही. ओट्यावर वाती वळत बसलेल्या आजीला ओलांडून बबू धावतच घरात गेली. आणि ती लालचुटुक सफरचंदी रंगाची, सुंदर पांढरी फुलं असलेली, छोट्याशा मुठीची छत्री तिने जरा सुद्धा ऊन-पाऊस लागणार नाही अशी आईच्या हार घातलेल्या फोटोभोवती ठेवली!
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी