Sunday, May 19, 2013

काकूआजी

माझ्या चुलत आजी बद्दल थोडंसं. माझ्या वडिलांची काकू म्हणून ती आमची 'काकूआजी'. 'काकूआजी' मूळची सांगलीची. शिक्षणासाठी पुण्याला आली. तिथे मॅट्रिकपर्यंत शिकली. त्या काळातही पोहायला जायची, नाटकात काम करायची, नाटकं बघायला जायची, गावात सभा असल्या की भाषणं ऐकायला जायची. पुढे माझ्या आजोबांशी तिचा प्रेम विवाह झाला. त्यांची म्हणजे जया भादुरी-अमिताभ बच्चन जोडी होती (अर्थात ही जया-अमिताभ जोडी खूप नंतर आली)- आजोबा एकदम सहा फूट उंच तर आजी एकदम पिटुकली. मूर्ती लहान तरी एकदम करारी, धडाडीचं व्यक्तिमत्त्व होतं. आजोबा-आजी नंतर बिलासपूरला स्थायिक झाले. तिथे आजोबांनी एक भोजनालय सुरू केलं. सुरुवातीला भोजनालयात लागणारं सगळ्या वर्षाचं कित्येक किलोंचं लोणचं ती स्वतः घालत असे. तिथे दिल्या जाणार्‍या इतर पदार्थांसाठी लागणारे जिन्नस बाजारातून आणून सगळी प्रक्रिया करून माल भोजनालयात पाठवणे हे सगळं आजीच्या देखरेखीखाली चाले. तिचं माणसं हाताळायचं कसब जबरदस्त होतं. तिथल्या कामगारांकडून सगळी कामं ती चोख करून घेत असे. आजोबांचा सगळा व्यवसाय तिनेच अतिशय शिस्तीत चालवला असं म्हंटलं तरी अतिशोयक्ती होणार नाही. आजोबा पुण्यात अनाथ विद्यार्थी गृहात शिकले. त्यामुळे त्यांना अनाथ विद्यार्थ्यांविषयी खास जिव्हाळा होता. त्यांनी आणि आजीने 'मानसकन्या' ह्या उपक्रमात अशा अनेक अनाथ विद्यार्थिनींची आयुष्ये मार्गी लावली. त्यामागची भावना आजोबांची होती तरी उपक्रम राबवण्याचं काम आजीनेच केलं होतं. आजी हिंदी अतिशय उत्तम बोलायची. आजोबांकडे येणं जाणं खूप होतं. राजकारण्यांपासून ते क्रिकेट खेळाडूंपर्यंत अगदी कुणीही यायचं. तरी त्या काळी सुद्धा आजीचा स्वतःचा असा गोतावळा होता.

आजीला खाण्याची आणि इतरांना खिलवण्याची खूप आवड होती. कुठल्याही गावी गेली की कुणी सोबत असो नसो ती जाऊन सगळा बाजार पालथा घालणार, ताज्या भाज्या-फळं घेणार, गावात चांगली हॉटेल्स कुठली त्याची चौकशी करून तिथे जाऊन दोन पदार्थ चाखून घरच्या सदस्यांसाठी आणखी चार बांधून घेऊन येणार. पेढे खावे तर ह्या गावचे, वांगी खावी तर त्या गावची अशी सगळी माहिती तिच्याकडे एकदम तयार असे. तिने बाजारात जायचं ठरवलं की ती एकदम बाजारहाटचंडिका होत असे. आमच्या गावातला मोंढा घरापासून दूर आहे. तिथवर नेणारं कुणी नसलं, रिक्षा मिळाली नाही असं काही झालं की ती आमच्या घरी काम करणार्‍या बन्सीच्या मोटरसायकलवर सुद्धा बाजारात जायची. बन्सीच्या मागे मोटरसायकलवर दोन्ही बाजूस पाय टाकून बसलेली आजी आणि त्या दोघांच्या मध्ये भाजीपाल्याने भरलेल्या पिशव्या हे दृश्य सगळ्या गावाला ओळखीचं असणार नक्की. वास्तविक आजी-आजोबांनी बिलासपूरचा व्यवसाय खूप वाढवला होता, त्यामुळे गाडी-घोडे अशा सगळ्या सुखसोयी तिथे होत्या. पण म्हणून हाताशी गाडी नसताना तिचं काही अडलं नाही. माझ्या मोठ्या बहिणी बरोबर तिच्या सायकलवर डबलसीट बाजारात गेलेली आजी आठवते आहे. तिच्या मनमोकळ्या स्वभावामुळे आणि सढळ हाताने खरेदी करण्यामुळे तिच्या गावोगावी खूप ओळखी होत. प्रत्येक भेटीत नेहमीच्या ठिकाणी आवर्जून भेट दिल्यामुळे ओळखी टिकायच्या सुद्धा. त्याचा फायदा तिने आपल्या व्यवसायासाठी करून घेतला. जास्त पगार, इतर सुविधा देऊन इकडचे मुख्य आचारी, इतर कारागीर बिलासपूरला न्यायची. तिचं नावच इंदिरा होतं. नक्की कुठल्या इंदिरेने कुणाचे गूण घेतले कळायला मार्ग नाही. पुढे दुर्दैवाने तिला पचनसंस्थेचा असाध्य विकार जडला. खाल्लेलं काही पचत नसे. लगेच उलटून पडे. उपचारांसाठी ती एकदा एकटी लंडनला जाऊन आली. इतर अनेक उपाय केले. पण तो आजार काही बरा झाला नाही. आजी अक्षरशः शाळकरी मुलीसारखी हलकी-फुलकी झाली. तरी निराश, दु:खी दिसली असं कधी झालं नाही. आधीच्याच उत्साहात सगळी कामं करायची. त्याच उत्साहात उदरभरणाचं यज्ञकर्म सुरूच असायचं :)

बाहेर कितीही कर्तृत्ववान बाई असली तरी घरात आमच्यासाठी मात्र ती शिस्त आणि लाड ह्याचं अफलातून मिश्रण होती. ताटात साधी लोणच्याची फोड टाकलेली सुद्धा तिला चालत नसे. पोहायला शिकली तेव्हा कदाचित नऊवारी साडी घालून शिकली असेल. पण पुढे तिच्या नाती पोहायला जायच्या तेव्हा त्यांच्या बरोबर 'लेटेस्ट' पोहण्याचा पोशाख घालून पोहायला जायची. आमच्या घरी पण लोकांचं येणं जाणं खूप होतं. त्यातले काही नमुने आले की आतल्या खोलीत कुजबूज करून हसणे हा आमचा आवडता उद्योग होता. आजीला ते कळल्यावर ती पण आमच्यात शामील व्हायची. आमच्या सोबत नवीन चित्रपटांतली हिंदी गाणी म्हणायची. एकदा आम्ही व्हॅक्सिंग इ. बद्दल बोलत होतो. आजीने लगेच आम्हाला तिच्यावेळी ती काय करत असे ते सांगितलं. अगदी आमच्या पिढीतल्या मुली सुद्धा ज्या विषयांवर बोलायला लाजतात त्या विषयांवर ती आमच्याशी मोकळेपणाने बोलायची. हे अतिशय कौतुकास्पद वाटतं मला.

माझी खात्री आहे, आज आजी असती तर तिने इंटरनेट, स्मार्ट फोन्स सगळं शिकून घेतलं असतं. इथे अमेरिकेत माझ्या घरी आली असती. इथल्या फार्मर्स मार्केटमध्ये गेली असती एकटीच. इथल्या भाज्या, इतर शेतीमाल आणि त्याच्या वेगवेगळ्या जाती, त्यामागचे सगळे अर्थकारण समजावून घेतले असते. आजी खरंच खूप भारी होती. आजी अजून आमच्यात असायला हवी होती.

****************************************************************************
मायबोलीवर मातृदिना निमित्त 'ग्रँडमॉम्स गोइंग स्ट्राँग' ह्या उपक्रमात आज्यांविषयी लिहायचे होते. काकूआजी बद्दल थोडंसं काही लिहावं म्हणून लिहायला घेतलं आणि बरंच काही लिहिलं. आजी एक जबरी रसायन असतं. तिच्या आठवणी तर सतत येतातच पण आठवणींना शब्दरूप देण्याची वेळ क्वचित येते. पूर्वीच्या काळी अतिशय कठीण, प्रतिकूल परिस्थितीत अनेक बायकांनी थोर कर्तृत्व गाजवलीत. पण काळाच्या ओघात त्यांची ओळख पुसली गेली. ती ओळख नव्याने करून द्यायची ही एक चांगली संधी आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते. तुमची आजी पण अशी सुपर-आजी असल्यास तिच्या बद्दल नक्की लिहा. तिथे नाही तर तुमच्या ब्लॉगवर.

7 टिप्पणी(ण्या):

Posting Load and Truck said...

Post is amazing.

Tveedee said...

छान ! .. व्यक्ती चित्र नेहमीच आवडतात मला. माझी आज्जी आणि पणजी दोघीही अश्याच "सुपर" होत्या !

Rohi said...

Ajjicha ekhada photohi hava hota n..

अपर्णा said...

___/\_____ हे तुझ्या आज्जीसाठी. :)

तृप्ती said...

Thanks everyone :)

shriraj moré said...

Kaku-ajjisathi Hats-off! Chhan lihilays

तृप्ती said...

Thanks Shriraj!

Post a Comment

लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी