Friday, September 27, 2013

हाथ की सफाइ

"तुमच्या मुलीला हँड आहे हो" आमच्या शाळेतल्या चित्रकलेच्या शिक्षिका धाकट्या बहिणीबद्दल एकदा आईला सांगत होत्या. ती खूप छान चित्र काढायची म्हणून तिला हँड होता. मला नव्हता. मला गणित होतं, विज्ञान होतं झालंच तर गर्व होता. चित्रकला, हस्तकला अशा बीन-महत्त्वाच्या विषयांकडे लक्ष देण्याची गरज वाटत नव्हती आणि वेळही नव्हता. घरात एक से बढकर एक कलाकार मंडळी असून सुद्धा या दोन विषयांत मी स्वतःच पाचर ठोकून टाकली होती. एकदा तर चित्रकलेच्या सरांनी संतापाने वही वर्गाबाहेर फेकून द्यावी अशी वेळ माझ्यावर आ(ण)ली. पण अशा छोट्या-मोठ्या संकटांना न डगमगता आम्ही मोठ्या निश्चयाने कलेतली अधोगती सुरूच ठेवली. शालेय अभ्यासक्रमाच्या बरोबरीने अधून-मधून स्ट्रॉ पासून बनवलेले समोसे, सिरॅमिक, कापसाच्या बाहुल्या, मेंदी आर्टच्या फ्रेम्स, फलाणं नी बिस्ताणं टूम निघत. सगळी दुनिया खाली मुंडी घालून हे प्रकार करण्यात प्रावीण्य मिळवत असताना आम्ही यत्ता पहिली फ सुद्धा कधी गाठली नाही.

लाकडाचं चरक फिरत असतं. एक मस्त रसरशीत ऊस त्यात जातो. ताजा गोड गोड रस खाली पातेल्यात पडतो. भरपूर रस जमा होत राहतो. रसरशीत दांड्याचं पाचट होतं. पातेलंभर रस जमा होतो. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन अशा एकेक फेर्‍या पार करून मी पण पातेलंभर रस उर्फ डिग्री सर्टिफिकेट घेऊन बाहेर पडले. अभियांत्रिकीला प्रवेश घेतला तेव्हा आधी मेकॅनिकलचे शीट्स मग डिजिटल सर्किट्स आणि मग अगदीच वेळ आल्यास नोट्स लिहिणे एवढीच हाताशी दोस्ती उरली होती. एक पूर्ण लांबीचा 'मेन स्ट्रीम प्रोफेशनल' अभ्यासक्रम पूर्ण करून मग मी नोकरीच्या गाढवावर चढले. नोकरीचं गाढव तसं गुणी निघालं. सोडू म्हणता सोडवलं नाही. नोकरी लागल्यापासून तर 'आता उरलो की-बोर्ड पुरता...' अशी हाताची अवस्था झाली.

कालांतराने आई होण्याचं राज्य आलं. बर्‍याच आया आपल्या बाळासाठी स्वहस्ते काही ना काही बनवतात. कलेच्या प्रांगणातली सरड्याची धाव लक्षात घेता क्विक स्टिच किट आणायचं ठरलं. किट मागितल्यावर दुकानदाराने लहान मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागल्याशिवाय हा माल ठेवत नाही असं सांगितलं. पण अशा छोट्या-मोठ्या संकटांनी आम्ही अजिबात डगमगत नाही. त्याच्या खोक्यात शोधाशोध करून एक मस्त चित्र आणून विणलं(च). बाळ आल्यावर मात्र त्याची शें-शू-शी काढण्याशिवाय स्वहस्ते फारसं काही केलं नाही. बाळाचं खोडकर हसू, बोबडे बोल, पहिलं पाऊल हे सगळं ठीक आहे. पण खरी मजा(?) आली ती त्याने (आणि त्याच्या बरोबरीने किंवा त्याच्यासाठी मी) रेघोट्या गिरवायला सुरुवात केल्यावर. एकदा त्याला फुल काढून दाखवल्यावर त्याने, 'Not this one, a real flower' असं म्हटल्यावर 'हँड' आठवला नसता तरच नवल. आई-बाबांच्या राज्यात कुठलेच विषय ऑप्शनला टाकून चालत नाही. त्यामुळे चित्रकला आणि हस्तकला या विषयांशी नव्याने 'हात'मिळवणी करणं भाग होतं. केली सुरुवात. इथे आवड नसताना लेकाच्या गळ्यात बळंच काही मारण्याचा उद्देश अजिबात नव्हता. साधारण त्याच्या वयास झेपेल इतकाच वेळ एका जागी स्वस्थ बसून काही करायला शिकवणं हा एक हेतू होता. त्याला शिकवण्यासाठी मला आधी काही शिकणं भाग होतं. सुरुवातीला त्याच्या टीचरला विचारून लहान मुलांसाठी असलेली काही संकेतस्थळं आणि पुस्तकं बघून छोटे छोटे प्रयोग केले. मग 'मायकल्स'सारख्या दुकानांमध्ये शोध घ्यायला सुरुवात केली. थोडी आणखी 'ऑनलाइन' शोधाशोध केली. क्ले, मार्कर्स, क्रेयॉन्स, रंगीत वाळू, मधाच्या रिकाम्या बाटल्या, डिस्पोजेबल कप्स, पॉप कॉर्न्स, (न वापरलेल्या) इयर बड्स, टूथ पिक्स (न वापरलेल्याच), मार्शमेलोज काय सापडेल ते सामान वापरून एक एक प्रकार त्यालाच सोबतीला घेऊन करून बघितले. मी त्याला शिकवत होते नी तो मला. मग एके वर्षी दिवाळीत शाळेतल्या मुलांना आकाश-कंदील बनवायला शिकवण्यापर्यंत आम्ही मजल मारली.

एकदा इथल्याच एका गावात सुंदर मणी मिळाले. आणून नुसते ठेवले होते. मायकल्समध्ये 'जुलरी किट' मिळतं ते माहिती होतं. घेऊन आले. एक साधाच नेकलेस बनवला. तिथेच मिळणारं सामान-सुमान बघून बाप्पासाठी मखर बनवायचं डोक्यात आलं. ऐन वेळी धीर खचल्याने मखर न बनवता नुसतंच आसन बनवलं. दर वर्षी स्टेप स्टूलवर हिरवा किंवा लाल ब्लाउजपीज (Sounds funny, I know) पसरवून त्यावर बसणारे बाप्पा त्या वर्षी हक्काच्या आसनावर बसले. या प्रकाराचा फारसा अनुभव नसल्याने ग्लिटर, ग्लू, चमक्या, टिकल्या सगळ्याचा खूपच रहाडा झाला. शहाणं होऊन पुढच्या वर्षी हे सगळं साहित्य 'कटाप' करून टिकल्या-टुकल्यांचे स्टिकर्स वापरून मेस-फ्री मखर बनवलं. गेल्या भारतवारीत एक एप्रन शिवलंय स्वतःसाठी आणि एक भाचीसाठी. हे सगळं सुरू असताना मी आणि लेक एकमेकांमध्ये अखंड लुडबुड करत होतो, असतो. कितीही amature काम असलं तरी त्याला शिकवणं, त्याच्याकडून शिकण्यात प्रचंड धमाल येत होती, येते. त्याच्यासोबत 'क्वालिटी टाइम' की काय म्हणतात तो व्यतीत केल्याचं समाधान होतंच. पण आणखी एक सोनेरी धागा होता जो लखकन चमकून जात होता पण हाती लागत नव्हता.

एक दिवस एका मैत्रिणीशी याच विषयावर बोलत होते. बोलता बोलता ती म्हणाली, 'आपण आजकाल हाताचा किती मर्यादित वापर करतो. दिवसभर की-बोर्ड बडवायचा. लिहिणं फारसं नाहीच. काही क्रियेटिव्ह करणं तर फारच दूर. आपले हात वापरून काही तरी निर्माण करणं ही खरं तर आपल्याला मिळालेली देणगी आहे. त्यात निर्मितीचा आनंद तर असतोच पण आपण स्वतः बनवलेली वस्तू वापरताना जे समाधान मिळतं त्याला खरंच तोड नाही.' मला अचानक तो सोनेरी धागा गवसल्यासारखं झालं. त्याची सुरेख वीण घातली ती आणखी एका मैत्रिणीनं. तिचं म्हणणं तिच्याच शब्दांत, 'आपण स्वतः बनवलेल्या वस्तूंमध्ये एक सुरेख उबदार फीलिंग असतं. त्या करताना आजूबाजूला जे काही घडत असतं त्या आठवणींचा एक सुरेख गोफ विणला जातो.' घड्याळाशी आम्ही नेहमीच शर्यत हरतो त्यामुळे अगदी दर आठवड्यात शक्य होत नाही नवे प्रोजेक्ट्स हाती घेणं. अनेकदा गोष्टी चुकतात, हवी तशी सफाई येत नाही कामात. पण निर्मितीचा आनंद असतो. आणि आपण स्वतः बवनवलेली वस्तू वापरताना जे समाधान मिळतं त्याला खरंच तोड नाही!!!5 टिप्पणी(ण्या):

Unknown said...

Mastach...as always :-)

तृप्ती said...

Thanks :)

Abhijit said...

Awadla lekh! Shewatcha para chhanach!

Priti said...

Mast lihila aahes Trupti.. Me swataha banavlelya vastuncha feeling kharach khup chan aste.. Mag te ekhada painting aso, ki woolen cap, ki swayampak aso, ki vichar karun implement kelela code.. :)

तृप्ती said...

Thanks Abhijit :)

Priti, Agreed although code is your brain's baby :)

Post a Comment

लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी